कस्तुरीगंध : दुर्दैवाने रेलेव्हन्स राखलेलं ‘बंदिवान’ | Dramatist textured Dwarkanath dramas Marathi Theatre Maharashtra Cultural Social History writing amy 95 | Loksatta

कस्तुरीगंध : दुर्दैवाने रेलेव्हन्स राखलेलं ‘बंदिवान’

तुमचं मला माहिती नाही; पण मला नाटककार द्वारकानाथ पोतदार यांच्याबद्दल खरोखरच काहीही माहिती नाही.

कस्तुरीगंध : दुर्दैवाने रेलेव्हन्स राखलेलं ‘बंदिवान’

प्रा. विजय तापस

तुमचं मला माहिती नाही; पण मला नाटककार द्वारकानाथ पोतदार यांच्याबद्दल खरोखरच काहीही माहिती नाही. या नाटककाराच्या नावावर किमान चार-पाच नाटकं आहेत. त्या नाटकांचे मराठी रंगभूमीवर प्रयोगही झाले आहेत. मात्र, असं असूनही या माणसाबद्दल मराठी रंगभूमीशी संबंधित जे काही साहित्य उपलब्ध आहे, त्यात त्यांची बोटभरही नोंद नाही. मराठी समाजाला दस्तावेजीकरणाचं ज्ञान नाही, महत्त्व नाही, आस्था नाही हेच यातून सिद्ध होतं. आपण आजवर सामाजिक, सांस्कृतिक इतिहास लेखनाकडे जे अचाट दुर्लक्ष केलं, आणि आजही करतो आहोत, त्याचाच परिणाम म्हणजे महाराष्ट्रातल्या साध्यासुध्या शेतकऱ्यांचा त्यांच्या कुटुंबासकट गळा घोटणाऱ्या सावकारशाहीच्या विरोधात नाटक लिहिणाऱ्या द्वारकानाथ पोतदार या माणसाची, त्यांच्या बऱ्या-वाईट नाटकांची नोंद आणि समीक्षाही कुठे दिसत नाही.

हे पाहिलं की वाटतं, आपला सगळा कलाव्यवहारच धर्म, जाती, आर्थिक स्तर आणि त्यातल्या भेदाभेदांवर असा काही पोसला आहे की त्याला आपोआपच एक जन्मजात खुजेपणा प्राप्त झाला आहे. या खुजेपणातच भव्यदिव्याची, तेजस्वीतेची आणि विराटतेची अनुभूती घ्यायला आपण शिकलो आहोत. थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, आपण समजतो तितक्या गोष्टी सोप्या नाहीत.. सोप्या नसतात. प्रत्येक क्षेत्रात ठरावीक लोकांची तळी उचलून धरण्यात आणि त्यांचे नगारे वाजवण्यात (वाजवून घेण्यात) एका ‘कल्चरल पॉलिटिक्स’चा गुंता तयार झाला आहे. हा गुंता अव्याहत चालू आहे आणि चालूच राहील यात शंका नाही. मध्यमवर्गीय खुजेपणातून निर्माण झालेलं मराठी साहित्य असो वा नाटक; हा एक ‘सांस्कृतिक कोतेपणा’चा आविष्कार आहे याचं भान जोवर आपल्याला येत नाही, तोवर ‘आहे हे असं आहे’ या ब्रह्मवाक्याला पर्याय नाही. मात्र, तोवर द्वारकानाथ पोतदार यांच्यासारख्या बळींची संख्या मात्र वाढत राहते, हे सत्य!

द्वारकानाथ पोतदार यांनी १९३८ साली लिहिलेलं आणि २४ फेब्रुवारी १९४४ या दिवशी परळमधल्या ‘दामोदर हॉल’च्या रंगमंचावर पहिला प्रयोग सादर झालेलं नाटक म्हणजे ‘बंदिवान’! या नाटकाची निर्मिती गिरणगावातल्या ‘छाया नाटय़ मंडळा’ने केली असली तरी या नाटकाकडे १९३८ ते १९४४ या सात वर्षांच्या काळात कुणाचंही लक्ष गेलं नव्हतं. १९४४ मध्ये ‘राष्ट्रभूषण संगीत मंडळी’ या संस्थेच्या नारायणराव कोठारे यांनी हे नाटक वाचून ते ‘छाया नाटय़ मंडळा’चे दिग्दर्शक नागोटकर यांच्याकडे दिलं. नागोटकरांनी हे नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी बरीच खटपट केली आणि शेवटी हे नाटक साकारलं. नाटकात स्त्रियांच्या भूमिका पुरुष कलावंतांनी केल्या होत्या. नाटकाचे किती प्रयोग झाले, ते माहिती नाही. एक मात्र नक्की, की या नाटकाने महाराष्ट्रातल्या राक्षसी सावकारीच्या विरोधात रणिशग फुंकून शेतकऱ्यांच्या यातनांना एक आवाज मिळवून दिला. या नाटकाचा विषय पाहिल्यावर आणि शेतकऱ्यांचं सर्वागीण शोषण करणारी सावकारीची दमनव्यवस्था आजही काही प्रमाणात का होईना, अस्तित्वात असताना मनात प्रश्न निर्माण होतो तो असा की, मराठी रंगभूमी या प्रश्नाबद्दल जी उदासीनता दाखवते, ती का? अशी ‘सामाजिक उदासीनता’ हे कशाचं लक्षण मानायचं? मराठी रंगभूमीच्या पांढरपेशी आत्ममग्न वृत्तीचं की सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात असलेल्या व्यापक बधिरतेचं? काय असेल ते असो.

हे नाटक लिहिण्यामागे लेखकाची भूमिका कोणती होती, ते त्यांनी नाटय़संहितेच्या प्रस्तावनेत स्पष्ट केलं आहे. ‘‘हिंदूुस्थान हा शेतकीप्रधान देश आहे. मात्र, जो शेतकरी जनतेच्या अन्नाची बेगमी करतो, त्यालाच त्याने पिकवलेल्या अन्नाला मोताद व्हावं लागतं, ही वास्तव स्थिती आहे. हलाखीत जगणाऱ्या, अहोरात्र काबाडकष्ट करणाऱ्या आणि शेत पिकवण्यासाठी रक्ताचं िशपण करणाऱ्या बळीराजाच्या जीवनाला लागलेलं अमानुष सावकारीचं ग्रहण हा ‘बंदिवान’चा विषय आहे. नाटकात जरठ-बाला विवाहाचाही एक धागा गुंफण्याचा मी यत्न केला आहे. शेती, शेतकरी, सावकारी आणि सावकारीच्या विरोधातला उठाव यांचे वास्तव रेखाटण्याचा हा अल्प प्रयत्न आहे.’’

हे नाटक वाचताना माझ्या डोळ्यांसमोर महाराष्ट्रातील गेल्या दहा-वीस वर्षांतली शेतकरीवर्गाची स्थिती होती. आजच्या घडीला शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात सारा समाज इतका बधिर आणि कोडगा झाला आहे, की या आत्महत्यांबद्दल आपल्याला काहीच वाटेनासं झालं आहे. महाराष्ट्रातली गेल्या पाच वर्षांतली शेतकरी-शेतमजुरांच्या आत्महत्यांची आकडेवारी १०,६५५ / १०,३४९ / १०,२८१ / १०,६७७ आणि २०२१ मध्ये १०,८८१- म्हणजेच एकूण ५२, ८४३ इतकी आहे. याचाच अर्थ असा की, महाराष्ट्र ही शेतकरी-शेतमजुरांची स्मशानभूमी आहे. या आत्महत्यांमधल्या किमान पंचवीस हजार आत्महत्यांना राज्यातली खासगी सावकारी जबाबदार आहे यात संशय नाही. हे वास्तव किती जहरी आणि भयानक आहे याची कणभरही दखलवजा जाणीव मराठी रंगभूमीला नाही, हे शरमेने मान खाली घालायला लावणारं वास्तव आहे. असं असताना शेतकऱ्याने ‘जय महाराष्ट्र!’ कोणत्या तोंडाने म्हणायचं, हा खरा सवाल आहे.

‘बंदिवान’ हे तीन अंकी नाटक एकूण सोळा प्रवेशांच्या माध्यमातून नाटय़रसिकांपुढे उलगडत जातं. १९३८ सालातल्या रंगभूमीवरील प्रत्येक नाटकात गाणी वा पदे असण्याची जणू सक्तीच असावी. ‘बंदिवान’मध्येही तीन अंकांत मिळून ६, ६, ३ अशी एकूण पंधरा पदं आहेत. फक्त त्यात एक वेगळेपणा असा की, दुसऱ्या अंकात नवपदवीधर असणारा वसंत आणि रामजी या कर्जबाजारी शेतकऱ्याची तडफदार मुलगी कोकिला यांचं एक द्वंद्वगीत आहे. (कदाचित आधुनिक मराठी रंगभूमीवरचं ते पहिलं द्वंद्वगीत असावं. तसं ते असेल तर नाटककार द्वारकानाथ पोतदार हे मराठी रंगभूमीवर द्वंद्वगीताची योजना करणारे पहिले नाटककार ठरतील!) मात्र, नाटकातल्या या पदांची नाटय़वस्तूला खरोखरच अपरिहार्य गरज होती असं म्हणता येणार नाही. शिवाय अत्यंत संस्कृताळलेल्या मराठीतील या पदांच्या मराठी आविष्काराची या नाटकातल्या भाषेशी अजिबातच नाळ जुळत नाही, हाही एक मुद्दा आहेच.

नाटकात एकूण नऊ पात्रं आहेत. त्यात सहा पुरुषपात्रं आणि सरला, सुमती, कोकिला अशी तीन स्त्रीपात्रं आहेत. पुरुषपात्रांपैकी शेतकरी असणारा अविनाश हाच खरं पाहता नाटकाचा नायक आहे. रामजी हा अत्यंत गरीब असा कर्जबाजारी शेतकरी, वसंत हा पदवीधर, उडाणटप्पू-व्यसनी-रंगेल असलेला सावकार आबासाहेब यांचा मुलगा आनंद आणि नाटकातली कपटी-कारस्थानी-शोषक पात्रं म्हणजे सावकार आबासाहेब आणि त्यांचा मुनीम असणारा सुधीर. ही सारी नाटकात रंग भरणारी इतर पुरुषपात्रं आहेत. नाटकाचा नायक असणारा अविनाश हा सुशिक्षित तरुण एका निष्ठेने शेतीत राबतो. अपार कष्ट करतो. त्याची बहीण सुमती आणि अविनाश म्हणजे ‘देह दोन, आत्मा एक’असा प्रकार. या अविनाशचे सावकार आबासाहेब यांची मुलगी असलेल्या सरलाशी प्रेमसंबंध आहेत. नाटकाच्या पहिल्या अंकातला पहिला प्रवेश हा अविनाश आणि सरला यांचा प्रवेश आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कंगाल, मेटाकुटीला आलेल्या जीवनाचं चित्रण अविनाश-सरला यांच्या चर्चेतून नाटककार करतो. या चर्चेतला केंद्रवर्ती भाग हा सावकार शेतकऱ्याचं अमानुष शोषण कसं करतो, हे सांगणारा आहे. याचा परिणाम म्हणजे आबासाहेब सावकारांची मुलगी असलेली सरला विपन्नावस्थेतल्या अविनाशशी विवाहबद्ध होण्याचा जसा निश्चय करते, तसाच सावकारीच्या विरोधात उभ्या राहिलेल्या ‘शेतकरी संघा’च्या कार्याला वाहून घेण्याचं वचनही ती अविनाशला देते. रामजी या कर्जबाजारी शेतकऱ्याला खोटीनाटी कागदपत्रं तयार करून त्याला मारझोड करणारे आबासाहेब, अविनाशने त्यांच्याकडून कर्ज घेतलेलं नसताना त्याने कर्ज घेतलं आहे असं कागदोपत्री दाखवून त्याला तुरुंगात ढकलणारे आबासाहेब, अविनाश तुरुंगात असताना सुमतीला मुनीमजी सुधीरमार्फत पळवून नेणारे आबासाहेब हे सावकाराच्या रूपात जेव्हा समोर येतात तेव्हा महाराष्ट्रातल्या सावकारीचं विद्रूप, विकृत, वासनांध आणि संवेदनाहीन चित्रच नाटककार आपल्यापुढे उभं करतो. शेतकऱ्याचं आर्थिक, मानसिक शोषण करणारी सावकारी शेतकऱ्याच्या तरुण मुलीबाळी, बायका यांचं लैंगिक शोषण कसं करतात याचा एक नमुनाच नाटककार इथे पेश करतो. ‘‘शारीरिक महारोगी पत्करला, पण मानसिक महारोगानं पछाडलेला माणूस फार घातकी असतो! तसा तुमच्या मनाला वासनेचा महारोग झाला आहे! तुम्ही महारोगी आहात! आबा, मी तुमची मुलगी तुम्हाला विचारते, माझ्याकडे कुठल्या दृष्टीने पाहता तुम्ही? सच्छिल कुमारिकांच्या पावित्र्याची राखरांगोळी करून, त्या ढिगाऱ्यावर तुम्ही आपल्या सौख्याची इमारत उभारणार? .. नाही आबा, सुमतीच्या आयुष्याचं हे सैतानी परिवर्तन पाहण्यापेक्षा मी जगातून कायमची नाहीशी झाल्ये तर काय वाईट?’’ अशा शब्दांत सरला आपल्या बापाची पापलक्तरं वेशीवर टांगताना आपल्या अनुभवास येते. सरलाचं ‘‘आबा, मी तुमची मुलगी तुम्हाला विचारते, माझ्याकडे कुठल्या दृष्टीने पाहता तुम्ही?’’ हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं तर आहेच, पण ते त्या काळातल्या एकूण रंगभूमीचा विचार करता बाप-मुलीच्या नात्यामधले रूढ संवाद-संकेत धुडकावून लावून नकोशा, नागडय़ा सत्याचं विराट दर्शन घडवणारे आहेत.

१९३८ मधलं हे नाटक आहे याचं पक्कं भान आपण ठेवायला हवं. त्यामुळे नाटकात सावकार आणि त्यांचा मुन्शी यांची कटकारस्थानं, निष्पापतेचा बळी घेणारे जबरी प्रसंग, खुनाचे प्रसंग, दोन पात्रांमधली प्रसंगी मेलोड्रामालाही लाजवणारी भाषा, या भाषेला मूर्त करणारे कृतक नाटकी प्रसंग यांचा मोठा वावर आहे. नाटकात काही खटकेबाज संवादांची मालिकाही आहे. काही ठिकाणी कृतक सुभाषितरूप भाषेची आतषबाजीही आहे. मला व्यक्तिश: असे प्रकार जसे नाटकावर प्रेम करणाऱ्या हजारो लोकांना रुचत नाहीत, तसेच ते मलाही रुचत नाहीत. मात्र, एवढय़ावरून मला एखादं विशिष्ट नाटक आदि-अंती सरसकट नाकारणं अन्यायकारक वाटतं. माझ्या दृष्टीने या दोषांपेक्षा नाटककार जे सामाजिक, आर्थिक, राजकीय वास्तव रंगपटलावर आणू इच्छितो, ते फार महत्त्वाचं आहे. कारण अशा नाटकांच्या माध्यमातूनच विशिष्ट रंगभूमीच्या विश्वासार्ह इतिहासाची मांडणी होऊ शकते. असा प्रयत्न आपण करू पाहू तेव्हा ‘बंदिवान’ या नाटकाचं मोल आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल.

या नाटकाचा नायक अविनाश असला तरी नाटकाच्या नौकेचं इंजिन सरलाच्या हाती आहे. सावकार असलेल्या, वासनांध आणि आर्थिक सत्तेच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालणाऱ्या स्वत:च्या बापाच्या विरोधात ती ठामपणे उभी राहतेच; पण त्यांची सगळी कारस्थानं निर्ममपणे वेशीवरही टांगते. त्या काळाच्या भाषेत बोलायचं तर- सरला हा आबासाहेबांच्या पदरातला निखारा आहे. ती जणू एक प्रतिनायिका आहे. नाटकाच्या अखेरीस पश्चात्तापाने पोळून निघालेले आबासाहेब अविनाश-सरला, वसंत-कोकिला यांचा विवाह निश्चित करतातच, पण आपलं उर्वरित आयुष्य अविनाशच्या ‘शेतकरी संघा’साठी खर्ची घालण्याची तयारीही दाखवतात. ‘बंदिवान’ नाटक एका पॉझिटिव्ह नोटवर संपतं, हे निखालस सत्य. मात्र, जे नाटकात घडतं ते प्रत्यक्षात मात्र गेल्या अठ्ठय़ाऐंशी वर्षांत घडलेलं नाही. तसं काही पॉझिटिव्ह घडलं असतं तर महाराष्ट्रदेशी लाखो शेतकरी-शेतमजुरांनी आत्महत्या का केल्या असत्या? या वास्तवाचा अर्थच हा आहे की, जोवर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या घडत राहतील तोवर ‘बंदिवान’ नाटकाचा रेलेव्हन्स दुर्दैवाने कायम राहणार आहे. यावर काही उपाय आहे का आपल्याकडे?

vijaytapas@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सकारात्मक उष:कालाची नांदी

संबंधित बातम्या

मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्त चिंतन’
अंतर्नाद : मन कुंतो मौला
फक्त पासवर्ड बदललाय!
बौद्धविचारांचा अलौकिक काव्यानुभव
सुतावरून नरक..

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गोपनीयतेचा नवा कायदा लादला जाण्याची शक्यता; प्रल्हाद कचरे यांची टीका
विश्लेषण: निवडणूक रोखे योजनेचे भवितव्य काय? सत्ताधाऱ्याविरुद्ध विरोधकांची तक्रार काय?
लालचुटूक स्ट्रॉबेरीचा हंगाम बहरात; वाई, महाबळेश्वरसह नाशिक जिल्ह्यातूनही स्ट्रॉबेरीची आवक
नदाव लॅपिड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ‘द केरळ स्टोरी’च्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया, म्हणाले “हे अनैतिक…”
जुळ्या बहिणींशी लग्न करणारा तरुण अडचणीत? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पोलिसांना निर्देश देत म्हणाल्या, “सोलापूरमधील एका…”