कमिशनर

माझ्या वडिलांचे दोन्ही मामा पैलवान होते. बंधू मामा हजारे आणि बाळू मामा हजारे.

एक माणूस आणि कलाकार म्हणून वाटचाल करताना भेटलेली माणसं.. अन् त्यांची शब्दचित्रं!

माझ्या वडिलांचे दोन्ही मामा पैलवान होते. बंधू मामा हजारे आणि बाळू मामा हजारे. माझ्या वडिलांच्या लहानपणी या हजारे बंधूंची नाशिकात स्वत:ची तालीम होती. त्यामुळे माझे वडील आणि त्यांचे दोन्ही भाऊ लहानपणापासूनच तालमीत घुमत. त्यापैकी कुणीच पुढे जाऊन पैलवान झालं नाही; पण त्यामुळे व्यायामाची आवड आमच्या घरात उपजतच. मी अकरावी संपवून बारावीत गेलो तेव्हा बाबांनी अचानक एके दिवशी आदेश काढला, ‘जवळपास जिम शोध कुठलीतरी. व्यायामाला लागायचं. बस् झाला चेंगटपणा.’ वडिलांचा आदेश शिरसावंद्य मानण्याचा तो काळ होता. त्याच संध्याकाळी गल्लीत क्रिकेट खेळून झाल्यावर जिमबद्दल चौकशी केली. तेव्हा घराजवळच एक जिम असल्याचं कळलं. मी विषय काढल्याबरोबर बरोबरच्यांमध्येही उत्साह संचारला. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी आम्ही अर्धा डझन मुलं जिममध्ये ‘भरती’ व्हायला गेलो.

सोसायटय़ांमध्येच हेल्थ क्लब वगैरे असण्याचा तो काळ नव्हता. आमच्या अख्ख्या एरियात मिळून एकच जिम होती. जिम कसली? आखाडाच तो. समोर भरपूर मोकळं मैदान आणि मैदानाच्या एका कोपऱ्यात जिम! बांधकाम पण अगदीच साधं. कॉन्क्रिटच्या भिंती आणि वर पत्र्याचं छत. त्या कॉन्क्रिटच्या भिंतींना पुरुषभर उंचीच्या खिडक्या होत्या. आमचं उत्साही मित्रमंडळ सकाळी सकाळी तिथे पोचलं. मैदानात काही मुलं जोर मारत होती. बैठका काढत होती. एकजण शिक्षा केल्यासारखा ‘पूल अप’ बारला लटकला होता. आत डोकावून पाहिलं तर तेथून भरभक्कम मंडळींचे वजन उचलतानाचे चीत्कार आणि हुंकार (प्रसंगी शिव्याही) ऐकू येत होते. काही काडीपैलवान आरशासमोर एकमेकांना आपले ‘कट्स’ दाखवण्यात मग्न होते. एक मर्द खांद्यावर अनेक वजनांचं ओझं घेऊन बैठका मारत होता. हे मनोरम दृश्य डोळ्यांत साठवत असताना खांद्यावर एक भलामोठा हात येऊन पडला. वळलो तर आधी वाटलं, समोर गोदरेजचं कपाटच आलंय. मग नीट पाहिल्यावर दिसलं की तो एक माणूस आहे. त्याला सूप पिऊन झाल्यावर नूडल नाकाखाली चिकटावा तशी मिशी आहे. दोन भलेमोठे कान आहेत. ‘क्या?’ मिशीखालच्या तोंडातून सवाल उमटला. ‘न्यू अ‍ॅडमिशन?’ आमच्यापैकी एकजण. ‘हं’ असं म्हणत त्यानं बोटानंच दारापाशी असलेल्या काऊंटरनुमा जागेकडे इशारा केला. त्याचं ते बोट त्यानं आपल्याला फेकून मारलं तरी आपल्या डोक्याला लिंबाएवढं टेंगूळ येईल, असं त्याक्षणी मला वाटून गेलं. तो कमिशनर होता. जिमला येणारा प्रत्येकजण त्याला ‘कमिशनर’ म्हणूनच हाक मारायचा. त्याच्या समोर. त्याच्या परोक्ष. वर सांगितलेल्या या प्रसंगाला आज वीस वर्षे उलटली आहेत; पण मला आजतागायत कमिशनरचं खरं नाव माहीत नाही.

कमिशनर जिममध्ये ट्रेनर होता. पूर्ण लांबीची ट्रॅकपॅन्ट आणि सदैव अंगावर गोल गळ्याचा, पण पूर्ण बाह्य़ांचा टी-शर्ट याच वेशात मी त्याला सदैव पाहिलं. शरीरयष्टी कमावलेली. उंचीला सहा फुटांपेक्षा थोडा कमी; पण रुंदीलाही तो तेवढाच वाटायचा.  त्याचे कान मुडपलेले होते. त्याचा अर्थ तेव्हा कळायचा नाही, पण नंतर कोल्हापूरच्या तालमींमधले पैलवान पाहिल्यावर लक्षात आलं की, कमिशनरनं आपलं शरीर कुस्तीच्या आखाडय़ातच कमावलेलं आहे. त्याची मिशी मात्र त्याच्या भरघोस शरीराला अजिबातच साजेशी नव्हती. आवाज भारदस्त होता. पण शब्दांच्या वापरावर सरकार जबरी कर लादून राहिलंय असं त्याला बहुधा कुणीतरी बजावलं असावं. त्यामुळे जिथे दोन शब्द वापरायचे, तिथे तो एका शब्दावर भागवत असे. आणि जिथे एक शब्द वापरायचा, तिथे फक्त त्याच्या त्या जाडजूड बोटानं केलेले इशारेच!

जिमचा पहिला दिवस आजही आठवतो. अ‍ॅडमिशन घेतल्या घेतल्याच मालकानं आम्हाला कमिशनरच्या हवाली केलं. जिमचे मालकही एक वेगळीच असामी होती. लोकांनी गाळलेल्या घामावर तो पैसे कमवायचा. पण स्वत: इकडची काडी तिकडे करण्याचेही कष्ट त्यानं कधी घेतले नाहीत. सुटलेलं पोट आणि पडलेले खांदे घेऊन तो त्या काऊंटरवर बसलेला असे. कमिशनरला मालकाचा हा अजागळपणा अजिबात आवडत नसावा. कारण त्याच्याशी बोलताना कमिशनर त्याच्याकडे न बघता उगीच मागच्या भिंतीकडे पाहत असे. असो.

आम्ही नवे रंगरूट कमिशनरच्या हवाली झालो. आता आपण सगळे आरनॉल्ड होऊनच बाहेर पडणार अशी आमची ठाम समजूत. आत जाऊन कधी एकदा ती वजनं उचलतो आणि कधी त्या पुली मशीनवर जोर काढतो असं झालं होतं. कमिशनरनं आमच्यावरून एक नजर फिरवली आणि मैदानाकडे बोट दाखवलं. ‘दस’ एवढंच बोलून तो चुकीच्या बैठका मारणाऱ्याच्या पाठीत गुद्दा मारायला निघून गेला. बेटकुळ्या दिसेपर्यंत वजन उचलायची आमची स्वप्नं धुळीला मिळाली आणि आम्ही रडत, कुंथत मैदानाच्या चकरा काटू लागलो. पुढचे तीन महिने कमिशनरनं आम्हाला जिमच्या आत पाऊल टाकू दिलं नाही. रोज आलं की चकरा मारा. बैठका काढा. जोर मारा. वीसेक दिवसांत काही मुलं कंटाळली. त्यातली दोन-चार कायमची गळली. उरलेल्यांनी बंडाचं निशाण फडकावलं. जिमच्या आतली ती ‘ग्लॅमरस’ वाटणारी मशिन्स आम्हाला खुणावत होती आणि आम्ही आपले रोज मातीत हातपाय माखवून घेत होतो. ‘अंदर कब जानेको मिलेगा?’ आमच्यातल्या धीट योगेशनं एके दिवशी मुद्दय़ाला हात घातला. ‘हं.’ कमिशनरचं उत्तर. ‘पुरा तीन महिने का फी भरा है तो पुरा जिम वापरने को मिलना मंगताय ना?’ वाण्याचा मुलगा जितेश. कमिशनर शांतपणे त्याच्याकडे वळला आणि आपले तव्यासारखे हात पुढे केले. ‘पहले हात पे बॉडी का वजन उठाओ. फिर वो वजन उठाओ.’ स्वत:च्या दोन हातावर स्वत:च्या शरीराचं वजन उचलता यायला लागल्यावरच आम्हाला जिमच्या आत पाऊल टाकायची परवानगी मिळाली. कमिशनरची ट्रेनिंग पद्धत जुन्या जमान्यातल्या वस्तादांसारखी होती. प्रसंगी पाठीत गुद्दाही हाणायचा. मी सलग तीन वर्षे चिकाटीनं जिममध्ये गेलो. कॉलेजची र्वष एकीकडे सरत होती. फावल्या वेळेत करायला काहीच नव्हतं. त्यामुळे जिममध्ये कधी खंड पडला नाही. तशात कुणीतरी पाठीवर थाप मारत, दंड चेपत ‘आयला! व्यायाम करतो वाटतं?’ असं विचारलं की आनंदही व्हायचा. कमिशनरची इयत्ता पार करून आम्ही आपला आपला व्यायाम करू लागलो. दहावीतली मुलं पाचवीतल्या मास्तरांशी उगीच सलगीत येऊन वागतात तसं आमचं कमिशनरबरोबरचं वागणं झालं. तो मात्र त्याच नेटानं नवीन मुलांना बाहेरच्या धुळीत रगडत असे.

कमिशनरची एक विलक्षण आवड होती. कधी मोकळा बसलेला असला की तो ‘प्रॉपर्टी टाइम्स’ वाचत असे. नुकतीच वाचायला शिकलेली मुलं जसं एकेका शब्दावर बोट ठेवून वाचतात तसा कमिशनरचा वाचन समारंभ चालायचा. मला आधी वाटलं होतं- तो फावल्या वेळात इस्टेट एजंटच वगैरे काम करत असावा. पण तसं काही नव्हतं. बरं, याला स्वत:ला घर घ्यायचं असेल असं म्हणावं तर तसंही काही नव्हतं. कारण तो वर्षांनुवर्षे जिमच्याच मागच्या बाजूला एका खोलीत राहायचा. हा पैलवान वेळ मिळाला की पोथी वाचायला बसल्यासारखा ‘प्रॉपर्टी टाइम्स’ वाचायला का बसतो, यामागचं गूढ तेव्हा कळलं नव्हतं.

इतक्या वर्षांत माझी एक सुप्त इच्छा राहिली होती.. कमिशनरला व्यायाम करताना बघायची! हा हनुमंत नक्की व्यायाम तरी कधी करतो? हा मला नेहमी प्रश्न पडे. जिम दुपारी १२ ते ४ बंद असायची. एकदा मी काही कामासाठी त्या बाजूला गेलो असताना उगीच शॉर्टकट म्हणून जिमचं मैदान तुडवत निघालो. मला जिममध्ये हालचाल दिसली. खिडकीतून डोकावलो. आत उघडय़ा अंगाचा कमिशनर जोर काढत होता. गवयाला तल्लीन होऊन गाताना ऐकण्यात जो आनंद असतो तोच कमिशनरला व्यायाम करताना पाहण्यात होता. खाली ट्रॅक-पॅन्ट होती. कमरेच्या वर मात्र तो उघडा होता. एरवी फूल बाह्य़ांच्या टी-शर्टमधून कळून न येणारे त्याचे स्नायू आता टरारून दिसत होते. त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यानं मला इशारा केला. मी आत गेलो. त्याच्यासमोर स्टुलावर बसलो. ‘घाई?’ मी नकारार्थी मान हलवली. ‘गिन..’ म्हणाला आणि पुढच्याच क्षणी तो जोर काढू लागला. मी मोजायला सुरुवात केली. जमिनीवरून इंचभरही हात न हलवता कमिशनरनं माझ्यासमोर पंधराशे जोर काढले. घाम निथळून खालची जमीन ओली झाली होती. मला मोजताना दम लागला होता. पण त्याच्या रिदममध्ये फरक पडला नव्हता. त्या दिवशी त्याच्याबद्दलचा माझा आदर वाढला. आणि या गोष्टीचं कौतुकही वाटलं, की आपण आज एक अद्वितीय गोष्ट पाहिली.

अशाच एका संध्याकाळी मी सायकल घेऊन जिमला गेलो. कमिशनर कुठलेतरी दोन लोखंडी रॉड घेऊन बाहेर आला. माझ्याकडे पाहिलं. सायकलकडे पाहिलं. ‘तेरा?’ मी मान हलवली. त्यानं ते हातातले स्पेअर पार्ट दाखवले. ‘वेल्डिंग!’ कुठल्यातरी मशीनचा भाग तुटला आहे व त्याला वेल्डिंगची गरज आहे, हे कळायला मला काही सेकंद लागले. ‘चल.’ कमिशनरनं आदेश दिला. माझ्या निळ्या ‘हीरो रेंजर’वर कमिशनर आणि कॅरीयरवर ते स्पेअर पार्ट पकडून मी अशी आमची वरात निघाली. त्या दिवशी मला माझ्या सायकलचा अभिमान वाटला. आम्ही कोलडोंगरीला गेलो. वेल्डिंगचं काम करून घेतलं. परत येताना कमिशनरनं उगीच पाल्र्यात सायकल घातली. पाल्र्याच्या गल्ल्या फिरून, लांब चक्कर मारून आम्ही जिमवर पोहोचलो. मला कमिशनरच्या या लांबच्या फेऱ्याचं कारणच कळेना. पाल्र्याच्या गल्ल्यांमधून जाताना तो मुलांनी खेळण्यांच्या दुकानातल्या खेळण्यांकडे पाहावं तसा इमारतींकडे पाहत सायकल चालवत होता. मला तेव्हा अनेक प्रश्न पडले होते. पण कमिशनरला ते विचारण्याची सोय नव्हती. जिथं निबंध लिहायचा, तिथे तो फक्त गाळलेल्या जागा भरणार. नकोच ते.

मला माझ्या प्रश्नांची उत्तरं नंतर अनेक महिन्यांनी जिमच्या मालकाच्या मुलाकडून- हरच्याकडून मिळाली. एव्हाना तो आमचा दोस्त झाला होता. वडिलांप्रमाणेच त्याचाही व्यायाम करण्यावर बिलकूल विश्वास नव्हता. तो जिमला यायचा, पण कट्टय़ावर बसून गप्पा मारण्यापुरताच. असंच एकदा गप्पांच्या ओघात मारामाऱ्यांचा विषय निघाला. हरच्या बोलून गेला, ‘आपला कमिशनरपण जाऊन आलाय ना!’ ‘कुठे?’ ‘आत! हाफ मर्डरसाठी.’ माझ्यासाठी ही माहिती धक्कादायक होती. ‘कमिशनर? हाफ मर्डर?’ ‘हं. गावात एकाला फोडला. मग आत गेला. सुटून आल्यावर गाव सोडला. तेव्हापासून इकडेच आहे. आपल्या पप्पाचा दोस्त गाववाला आहे त्याचा. त्यानं आणला याला इथे.’ ‘पण मग फॅमिली?’ मी विचारलं. ‘फॅमिली सुटली. बाहेर आला तेव्हा बायको कोणाबरोबर तरी निघून गेली होती. पोरंबिरं होती की नाही, माहीत नाही मला पण. आता अकेला आदमी.. ऱ्हातो आपल्याकडेच.’ हरच्यानं अत्यंत निर्लेपपणे ही माहिती दिली. मला मात्र गलबललं. ‘प्रॉपर्टी टाइम्स’ चाळताना आणि पाल्र्याच्या गल्ल्यांमधली सुबक घरं बघताना या घर तुटलेल्या माणसाच्या डोळ्यांत कुठली तृष्णा दाटून येते, हे त्या दिवशी मला उमगलं.

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Words of people to a man and artist