रघुनंदन गोखले

बुद्धिबळ हा बुद्धिवंतांचा खेळ. चौसष्ट घरांच्या या ‘सोंगटीपटा’ला आत्मसात करणे सोपे, पण त्यात असामान्य कौशल्य प्राप्त करणे भल्याभल्यांना अप्राप्य. हा खेळ मुलांना लहानपणापासून गांभीर्याने शिकविण्याकडे पालकांचा कल जगभरात वाढत चालला आहे. पुढील वर्षभर माजी बुद्धिबळपटू आणि प्रसिद्ध प्रशिक्षक रघुनंदन गोखले या नव्या सदरातून या खेळामधील आपल्या अनुभवांसह अनेक किश्शांना सादर करणार आहेत.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

आज देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील आघाडीचे उद्योगपती आपल्या मुलांना बुद्धिबळ शिकण्यासाठी प्रवृत्त करत आहेत; कारण बुद्धिबळामुळे मुलांना खूप फायदा होतो. आणि त्यामुळेच आपल्यानंतर आपली मुलं आपला विशाल व्यवसाय समर्थपणे सांभाळू शकतील याची त्यांना खात्री आहे. मी स्वत: देशातील आणि विदेशातील अनेक प्रमुख उद्योगपतींच्या मुलांना प्रशिक्षण दिलं आहे, आज ती मुलं आपला पिढीजात व्यवसाय व्यवस्थित चालवत आहेत.

माझे असंख्य विद्यार्थी आज संगणक क्षेत्रात आहेत आणि  IIT/IIM यांसारख्या विश्वविद्यालयाच्या परीक्षा देऊन विविध देशांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या या यशामागे पालकांच्या बुद्धिबळ निवडण्याच्या दूरदृष्टीचाही मोठा हात आहे. आता आपण शास्त्रीयदृष्टय़ा बुद्धिबळ हा खेळ मनोविकासात कसा हातभार लावतो ते बघू.

डॉ. पीटर डोव्हर्न नावाच्या एका कॅनडाच्या रहिवाशानं सिडने विश्वविद्यालयासाठी काम करताना एक प्रबंध लिहिला आणि बुद्धिबळासाठी एक नवा विचार जगाला दिला. आतापर्यंत बुद्धिबळ हा खेळ वेळ घालवण्यासाठी ठीक आहे, अशी लोकांची धारणा होती. लहान मुलांना तर या खेळापासून दूर ठेवायचे प्रयत्न होत असले तरी मला आश्चर्य वाटलं नसतं, असं काय लिहिलं होतं डॉ. पीटर डोव्हर्न यांनी? त्यांनी आपल्या प्रबंधामध्ये  ‘बुद्धिबळ – मुलांची मानसिक जडणघडण करण्याचं साधन’ हा विषय मांडला होता. त्यांनी नुसता विषयच मांडला नाही तर विविध उदाहरणं देऊन हे पटवून दिलं की बुद्धिबळामुळे मुलांच्या भावी आयुष्यात सकारात्मक फरक पडू शकतो.

यासाठी डॉ. अल्बर्ट फ्रँक यांनी केलेला प्रयोग फार महत्त्वाचा आहे. त्यांनी आपल्या प्रयोगासाठी १९७३ साली झैरे नावाच्या आफ्रिकेतील सर्वात मागासलेल्या देशाची निवड केली होती. त्यांनी एकाच कुवतीच्या मुलांचे दोन गट केले आणि यामधील एका गटाला आठवडय़ातून काही तास बुद्धिबळ शिकवले. दुसऱ्या गटाला कटाक्षानं बुद्धिबळापासून दूर ठेवलं गेलं.

सहा महिन्यांनी त्यांची अनेक प्रकारे चाचणी घेण्यात आली आणि सर्वाना धक्का बसला. बुद्धिबळ शिकणारा गट दुसऱ्या गटापेक्षा अनेक बाबतीत पुढे गेला होता. विज्ञान, गणित, भूगोल अशा अनेक विषयांत त्या मुलांनी आश्चर्यकारक प्रगती केली होती. डॉ. फ्रँक  यांच्यानंतर विविध शास्त्रज्ञांनी अमेरिका, कॅनडा या देशांमध्येही असंख्य प्रयोग केले आणि सर्वाचा एकच निष्कर्ष निघाला- बुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांची मानसिक प्रगती होते.

आता आपण डॉ. पीटर डोव्हर्न यांच्या प्रबंधाकडे वळू या. त्यांचे निष्कर्ष बघून व्हेनेझुएला सरकारने आपल्या संपूर्ण देशात दुसऱ्या वर्गातील ४००० विद्यार्थ्यांवर बुद्धिबळ शिकवण्याचा प्रयोग केला आणि अवघ्या ४-५ महिन्यांत सर्व विद्यार्थ्यांची झालेली प्रगती बघून सरकारने ताबडतोब आपल्या सगळय़ा शाळांमध्ये बुद्धिबळ शिकवण्यास सुरुवात केली. ही  गोष्ट आहे १९८८ सालची.

असे कोणते निष्कर्ष होते डॉ. पीटर डोव्हर्न यांच्या प्रबंधामध्ये?

या प्रबंधानं शैक्षणिक आणि मानसशास्त्रीय अभ्यासाचे सर्वेक्षण केले.  त्यामध्ये  मुलांचा अभ्यास आणि बुद्धिबळ खेळण्याचे फायदे तपासले गेलेत. आपण थोडक्यात बघू या त्यांच्या प्रबंधाकडे –

बुद्धिबळामुळे बुद्धिमान भागफलामध्ये (I/Q) वाढ होते.

समस्यांचं निराकरण करण्याची हातोटी येते आणि मुलं स्वतंत्रपणे कठीण समस्यांना यशस्वीपणे तोंड देऊ शकतात.

वाचन, स्मरणशक्ती, विविध भाषा आणि गणित यांमध्ये प्रगती होते.

टीकात्मक, सर्जनशील आणि मूळ विचारांना प्रोत्साहन मिळतं.

वेळेच्या दबावाखाली अचूक आणि जलद निर्णय घेण्याचा सराव होतो. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेतही अधिक गुण मिळवण्यासाठी होतो.

अनेक पर्यायांमधून ‘सर्वोत्तम’ पर्याय निवडण्यास शिकून तार्किक आणि कार्यक्षमतेनं विचार कसा करावा हे बुद्धिबळ शिकवते.

हा खेळ हुशार मुलांना पुढे जाण्यासाठी आव्हान देतो आणि प्रतिभावान (पण तरीही अभ्यासात कमी पडणाऱ्या) विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा आणि उत्कृष्टतेसाठी कसे प्रयत्न करावे हे शिकण्यास मदत करतो.

योग्य नियोजन, एकाग्रता आणि आपण घेतलेल्या निर्णयांचे परिणाम यांचं महत्त्व कळतं.

मुलं/ मुली किंवा सामाजिक, आर्थिक भेदभाव यामुळे खेळावर काहीही फरक पडत नाही. सर्व घटकांना सारखाच फायदा बुद्धिबळ खेळल्यामुळे होतो.

आपल्या प्रबंधाच्या शेवटी डॉ. पीटर डोव्हर्न म्हणतात, माहितीच्या भडिमारामुळे गांगरून जाणाऱ्या प्रत्येकाला सुयोग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धिबळ हे उत्तम साधन आहे. 

आता आपण विविध देशांमध्ये मानसशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक विशेषज्ञ यांनी बुद्धिबळाविषयी काय काय संशोधन केलं आहे आणि त्यांचे त्याविषयी निष्कर्ष याबाबत  माहिती घेऊ या.

डॉ. अल्बर्ट फ्रँक यांनी १९७३-७४ साली काढलेल्या निष्कर्षांनुसार, बुद्धिबळामुळे १६-१८ वयोगटातील मुलांना बुद्धिबळ खेळल्यामुळे प्रशासकीय निर्णय योग्य दिशेनं घेण्याची पात्रता आली. एवढेच नव्हे तर कागदपत्रे हाताळण्याच्या त्यांच्या क्षमतेमध्ये चांगलीच वाढ झाली. डॉ. रॉबर्ट फग्र्युसन १९९५ मध्ये लिहितात, ‘बुद्धिबळामुळे केवळ एक किंवा दोन गुणांमध्ये फरक पडतो असे नाही, तर त्या व्यक्तीच्या सर्वागाने  बुद्धिविकास होतो.’

१९९२ साली ब्रुन्सवीक, कॅनडा येथे झालेल्या प्रयोगाअंती निघालेला निष्कर्ष सांगतो की, लहान मुलांमध्ये समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी बुद्धिबळाचे मूल्य फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे पारंपरिक गणिताच्या अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश करून शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याच्या सरासरी गुणांमध्ये लक्षणीय वाढ करू शकले. ब्रुन्सवीकमध्ये १९८९ साली फक्त १२० विद्यार्थी बुद्धिबळाच्या आंतरशालेय स्पर्धा खेळले होते. १९९५ साली तब्बल १९००० विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आयोजकांची दाणादाण उडवून दिली.

डॉ. रॉबर्ट फग्र्युसन यांनी १९७९ ते १९८३ दरम्यान ब्रॅडफोर्ड भागातील शाळांमध्ये जे प्रयोग केले त्याचे विश्लेषण करताना ते म्हणतात- ‘‘मी ७ वी ते ९ वी मधील हुशार विद्यार्थी ब्रॅडफोर्ड (अमेरिका) मधून निवडले. या सगळय़ांचा  Q/१३० च्या वर होता. आठवडय़ातून फक्त २ तास बुद्धिबळ शिकवून ३२ आठवडय़ांनंतर या विद्यार्थ्यांमध्ये मला कमालीची प्रगती जाणवली. हुशार मुले जास्त हुशार झाली. तर्कशुद्ध विचार करण्यातील त्यांची प्रगती आश्चर्यकारक होती.’’

निव्वळ हुशार विद्यार्थीच नव्हेत तर सर्वसामान्य मुलेही बुद्धिबळ शिकून भाषा शिकण्यात आघाडीवर होती. १०४/Q असणारी ९ मुले आणि ७ मुली यांनी एकतर बुद्धिबळातच प्रगती केली नाही, तर त्यांच्या तर्कशुद्ध विचारातही चांगला फरक पडला. सगळय़ांची स्मरणशक्ती वाढल्याचं दिसून आलं.

या विषयावर लिहावं तेवढं थोडंच आहे. कारण अनेक मानसशास्त्रज्ञ या विषयावर अभ्यास करून नवे नवे निष्कर्ष काढत आहेत. विविध देश बुद्धिबळाचा समावेश अभ्यासक्रमात करत आहेत. मुंबईत अनेक शाळांनी बुद्धिबळ वर्ग सुरू केले आहेत. 

या वर्षी भारतात झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या दोन्ही संघांनी (पुरुष आणि महिला) कांस्य पदके मिळवली आणि वैयक्तिक पदकांचीही लयलूट केली. ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रज्ञानंद आणि भक्ती कुलकर्णी यांना २०२२ सालचे अर्जुन पुरस्कार देण्यात आले. आज भारतात बुद्धिबळाचं सुवर्णयुग अवतरलं आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगं नाही. बुद्धिबळ हा खेळ ज्या दिवशी अभ्यासक्रमात समाविष्ट होईल, त्या वेळी भारतात शैक्षणिक क्रांती होईल याविषयी माझ्या तरी मनात शंका नाही.

gokhale.chess@gmail.com