अतुल देऊळगावकर atul.deulgaonkar@gmail.com

पर्यावरण आणि मुलं यांच्यात जितकी दरी निर्माण होईल तितकीच आपली मुलं स्वमग्न, एकलकोंडी होतील, हे वेळीच उमगलेल्या स्वीडननं आपल्या शिक्षणपद्धतीतच मुलं आणि पर्यावरण असा योग्य मेळ साधला, मुलांमधील संवेदनशीलता आणि सहृदयता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले..  याच स्वीडनमध्ये आजच्या जागतिक पर्यावरण दिनी ५० वी ‘जागतिक पर्यावरण परिषद भरते आहे ! भावी पिढीचं जगणं अधिक सुकर करण्यासाठी मुलांना पर्यावरणाच्या समीप नेण्याची गरज आहेच, ती ओळखण्याची सुरुवात घरापासूनच व्हायला हवी..

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

‘पर्यावरण’ नामक विषयानं देशात व राज्यात ‘विचारांतील’ अंतर पूर्णपणे मिटवून टाकण्याचं विलक्षण कार्य साध्य केलं आहे. दिल्लीपासून गल्लीतील मंडळांपर्यंत शिक्षण, राजकारण, उद्योग व सांस्कृतिक क्षेत्र- सर्वत्र ‘पर्यावरण’ प्रेमींची दाटी झाली आहे. सर्व पातळय़ांवरील व्याख्याने, समारंभ व उत्सव यांतून या मंगल ‘पर्यावरणा’ची ‘जाहिरात’ होत असते. गल्लीबोळातील अति अरुंद जागेतील क्रिकेटसारखं हे सारं लटकं असल्याची जाणीव असूनही तशा ‘छान छान महाउत्सवी’ आभासी वास्तवात रममाण होणं हे आरोग्यास हितकारक असतं. ‘टाइमपास’ करण्यासाठी सहज उपलब्ध असं हे ‘पर्यावरण’ कधीकधी आपल्याला न पडणारे टोकदार प्रश्नही दाणकन् टाकत असतं. उदाहरणार्थ, आपलं आपल्या मुलांवर खरंच प्रेम आहे का? आपल्या प्रेमाचं ‘डिझाइन’ नेमकं कसं आहे? तेव्हा मात्र लुटुपुटुच्या जगातून खऱ्याखुऱ्या ‘पर्यावरणा’ला भिडावंच लागतं.

पालक मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी आटोकाट धडपडून शक्य तितकी स्थावर व जंगम मालमत्ता कमावून ठेवतात. ते ‘आपलं जगणं हेच मुलांच्या भल्यासाठी आहे,’ असा दावाही करत राहतात. तरीही बहुसंख्य पालक, ‘पुढील पिढी ही स्वमग्न, मूल्य व कणव नसलेली, उर्मट व एकलकोंडी आहे,’ असा आरोप करत राहतात.’ दुसरीकडे त्यांना मुलांच्या वाटय़ाला कुरूपता, गलिच्छता, प्रदूषित वातावरण व  जीवविविधतेचं दारिद्रय़ हा वारसा येत असल्याची जाणीवही होत असते. मुलांना वर्तमानातील व भविष्यातील वातावरण हे अस्थिर-अुसरक्षित वाटत असतं. परिणामी घरोघरी दोन पिढय़ांतील संवाद नष्ट होत असून, त्या एकमेकांवर दोषारोपण करीत कटुता वाढवत आहेत. आपण पुढच्या पिढीला कोणता ऐवज देत आहोत? याच्या खोलात गेलं तर कळतं, मुलांवर प्रेम करण्याचं आपलं डिझाइनच चुकलेलं आहे. सगळे आडाखे व निष्कर्ष चुकीच्या गृहीतकावर आधारलेले आहेत हे अस; परंतु प्रखर वास्तव लक्षात येऊ शकतं. आपल्या समाजाने अस्सल प्रेमाला भ्रष्ट करणाऱ्या डिझाइनला मूक संमती दिली आहे. आणि त्यामध्ये वाढणारी मुलं सभोवतालचे वातावरण अनुभवत स्वत:ला घडवत आहेत. पालकांचा जिव्हाळा, सुरक्षितता, निखळ आनंद, मोकळा वेळ आणि खेळ ही बालपणाची प्राथमिक गरज आहे. यातून बालकांना बाहेरचं जग समजत जातं. मुलांची करुणामय बुद्धिमत्ता घडत जाते, याचा आपल्याला विसरच पडला आहे. अत्यंत कमी काळात अतोनात पैसा कमावणारी यंत्रं व त्यांनी घडवलेलं ‘पर्यावरण’ पाहून मुलांना काय वाटत असेल?

घरातील माणसं, वनस्पती व वन्यजीव यांच्यासह सभोवतालच्या परिसरास ग्रीक भाषेत ‘इको’ म्हणतात. १९६२ साली रॅचेल कार्सन बाईंच्या ‘सायलेंट प्रिंग’मुळे संपूर्ण जगाला पर्यावरणाकडे पाहण्याची वैज्ञानिक दृष्टी मिळाली. ती जागरूकता वाढत गेल्यामुळे ५ जून १९७२ साली स्टॉकहोम येथे पहिली जागतिक पर्यावरण परिषद आयोजित केली. या घटनेला यंदा ५० वर्षे; तर १९९२ ला रियो द जानेरियो येथे झालेल्या दुसऱ्या जागतिक पर्यावरण शिखर परिषदेला ३०वर्षे पूर्ण होत आहेत. ‘रियो’ परिषदेमध्येच जगातील अनेकांगी पर्यावरण सुधारणांचा पाया घातला गेला. त्यानंतरच हवामान बदलास सामोरं जाणं व जीवविविधता वाचवणं या विषयांच्या प्रयत्नांना गती आली. दरवर्षी या दोन्ही विषयांवर जागतिक अधिवेशनांचं आयोजन सुरू झालं. पर्यावरणविषयक कोणताही नवीन कायदा करण्यात तत्परता दाखवण्याच्या परंपरेनुसार आपण २००२ साली जैवविविधता कायदा तयार केला. त्यानंतर चेन्नईत राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण स्थापून टाकलं. २८ राज्यांतून प्राधिकरण व २,७६,८३६ जैवविविधता व्यवस्थापन समित्या तयार झाल्या. जैवविविधतेचं संगोपन करणाऱ्या देशातील सुमारे ११ कोटी आदिवासींना व शेतकऱ्यांना, या कायद्यामुळे कोणते लाभ मिळाले? दरम्यानच्या काळात त्याच जैवविविधतेवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांनी किती लाख कोटी कमावले? यावर संशोधन करणं कुणाला झेपेल? या ३० वर्षांत जखमी निसर्गानं निकराने परतीचे हल्ले चालू केले आहेत. ते का? ‘स्टॉकहोम परिषदे’मध्ये पर्यावरणीय विचारवंत रेने दुबॉस यांनी आता अतिवापरानं गुळगुळीत झालेला ‘विचार जागतिक, कृती स्थानिक’ या मंत्रास जन्म दिला होता. तसं प्रत्यक्षात कुठे काही झालं का? इथून पढे काय करता येईल? याची तयारी करण्यासाठी यंदाच्या पर्यावरण दिनाचा मुख्य विषय ‘एकमेव पृथ्वी’ असून त्याचं यजमानपद स्वीडनकडे सोपवलं आहे.

स्वीडन, फिनलंड, नॉर्वे, नेदरलँड, जर्मनी, ऑस्ट्रिया, सिंगापूर, जपान अशा अनेक देशांत बालशिक्षणाला अतिशय प्राधान्य दिले जाते. स्वीडिश भाषेत ‘आनंद नसणारं शिक्षण सहज विसरलं जातं’ अशी म्हण आहे. या देशांत शिक्षण आणि आनंद हे शब्द समानार्थी वाटावेत, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. वाचन, लेखन याचा अट्टहास अजिबात नसतो. अध्यापनात मुलांचा सक्रिय सहभाग घेण्यासाठी कल्पक व सर्जनशील खेळ तयार केले जातात. यातून त्यांची विचार करण्याची प्रक्रिया अधिकाधिक तर्कशुद्ध होऊ लागते. आकलनशक्ती तीक्ष्ण होते. अमेरिकी विचारवंत बेंजामिन फ्रँकलिन यांनी, ‘‘तुम्ही मला सांगाल, मी विसरेन. तुम्ही दाखवाल, मी लक्षात ठेवेन. सहभागी करून घ्याल, मी शिकेन.’’ ही उक्ती शिक्षणात अवलंबिली. आज आपल्याला जगभरातील मुलांची संवेदनशीलता जाणवते, ते या शिक्षणाचे सुंदर फळ आहे. कुठलाही भेद हा मुलांवर अन्याय करतो. आपली वागणूक ही िलग, रंग, जात, धर्म वा संपती पाहून असू नये. भेदाभेद केल्याने मुलांची मने दुखावतात. अशा अपमानाने ते खचतात. कोणालाही शिव्या देणे, हे असंस्कृतपणाचं लक्षण आहे, हे बालपणापासूनच त्यांच्या अंगवळणी पडतं. या शिक्षणपद्धतीमुळेच तिकडची मुलं कमालीची संवेदनशील व सहृदय होत आहेत. अरण्यकांड व जळती जनावरं पाहून ती विषण्ण होतात. कला व विज्ञान दोन्हीतही निपुण होतात. हे पाहून ही शिक्षणपद्धती स्वीकारण्यासाठी अनेक देश पुढे येत आहेत. पुण्यातील काही शिक्षणसंस्थानी फिनलंडमधील संस्थांशी सहकार्य करार केले आहेत. 

युरोपीय व इतर देशांनी शिक्षणाला दिलेल्या कलाटणीमुळे  बालसाहित्य ते विज्ञान संशोधन व अंमलबजावणीतही ते पुढे गेले आहेत. त्यांच्याकडे निसर्गाची भाषा, कला, विज्ञान व डिझाइन समजावून घेणारे वैज्ञानिक व कलावंत वाढत आहेत. त्यामुळे विज्ञान जगताच्या कक्षाही रुंदावत आहेत. आपलं विज्ञान हेदेखील मानवकेंद्री वा प्राणिकेंद्री आहे. त्यामुळे आपलं जग हे आधी वनस्पतींचं आहे. नंतर प्राण्यांचं, याचा आपल्याला विसर पडला. जीवन विज्ञान, तत्त्वज्ञान इतकंच काय, जीवशास्त्रानंसुद्धा वनस्पतींकडे लक्ष दिलेलं नाही.  

 ‘वनांचा सांभाळ करते ती वनस्पती’ असा फुकाचा उद्घोष करत मरणासन्न अवस्थेला ‘वनस्पतीजन्य अवस्था (व्हेजिटेटिव्ह)’ अशी विशेषणं तयार करून त्यांची पुरेपूर उपेक्षा केली. मानवजातीचं निसर्ग जैवविविधतेविषयी अज्ञान हे अनुपम असलं तरीही त्यांची उपेक्षा गुणाकाराने वाढत आहे. अशा वातावरणात सुझान सिमर्ड, मायकेल पोलन, मोनिका गँग्लिओना, पीटर टॉम्पकिन्स, इमॅन्युल कॉचिआ, फ्रँटिसेक बलुस्का, पीटर बोल्हेमन, स्टिफॅनो मँकुसो यांसारखे अनेक विद्वान वनस्पती व अरण्यांकडे पाहण्यासाठी नवी दृष्टी देत आहेत. वनस्पतींना मेंदू नसला तरी त्यांच्याकडे चोख संपर्क यंत्रणा असून त्यांना आकलनशक्ती असते. त्या एकमेकांना संकटांची जाणीव करून देतात. कोणी दुसऱ्याला पाणी पोहोचवतं, तर कोणी जीवनसत्त्व. त्यांचं परस्परावलंबन व सहजीवन यावर नवनवीन प्रकाश टाकले जात आहेत.

आपल्या पायाखालच्या मातीमध्ये थक्क करणारी विराट पर्यावरणीय यंत्रणा विराजमान असते. सागरातील प्रवाळांची अथवा सदाहरित अरण्यांमध्ये असते, तेवढीच समृद्ध जीवसंपदा मृत्तिकेमध्येही असते. माती, वनस्पती व प्राण्यांच्या अज्ञात, गुप्त व रहस्यमय आयुष्यांवर विलक्षण संशोधन चालू आहे. (इकडे आपण कविता व गीतांवरच सदाहर्षित!)

जैविक बुद्धिमत्ता (बायॉलॉजिकल इंटेलिजन्स) जाणून घेण्यासाठी अनेक प्रयोगशाळा विकसित होत आहेत. त्यात विज्ञान, तत्त्वज्ञान व संस्कृती अशा तिन्ही अंगांनी आंतरज्ञानशाखीय संशोधन करायची आकांक्षा आहे. आदिवासींकडे पारंपरिक ज्ञानातून विकसित झालेली बुद्धिमत्ता असते. नित्यनियमाने निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्यांचं वनस्पती व प्राणिजगताविषयीचं आकलन हे संसर्गरहित (अनकंडिशन्ड) असतं. हे समजून घेण्यासाठी आजमितीला अनेक वैज्ञानिक आदिवासींशी संवाद साधत आहेत. सागरीकिनारा, पठार, वाळवंट व बर्फाच्छादित प्रदेशातील वनस्पती, प्राणी व मातीची रहस्ये उलगडण्याचा अथक प्रयत्न सुरू आहेत.     

निसर्ग हा अत्यंत गूढ रीतीने अभिव्यक्त होत असतो. सभोवताल व त्या पर्यावरणात होणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी निसर्गाची स्वत:ची यंत्रणा असते. अशा यंत्रणांचा अभ्यास केल्यास दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांचं निराकरण करता येणं शक्य आहे. सध्या जगभर निसर्गापासून प्रेरणा घेऊन विज्ञान-तंत्रज्ञान, औषध, आहार, वाहतूक, द्रव्य (मटेरियल) व अभिकल्प (डिझाइन) या क्षेत्रांत बदल घडवले जात आहेत. निसर्गापासून धडे घेत जीवानुकरण वास्तुकलेला (बायोमिमिक्री आर्किटेक्चर) नवे धुमारे फुटत आहेत. वास्तुकला निसर्गाभिमुख होत गेल्यास अभिकल्प अधिक सुकर, सर्जनशील व टिकाऊ होत जातील. जीवयंत्रणा व अभियांत्रिकी रचना या दोन्हींचा समस्या निराकरणांबाबतचा दृष्टीकोन व हाताळणीची पद्धत अतिशय भिन्न आहे. जीवानुकरण वास्तुकलेमुळे वास्तूंचे रूप, आकार व रचना यांवर जीव व नैसर्गिक मूलतत्त्वांच्या प्रभावामुळे वास्तुकला अधिकाधिक सेंद्रिय होत आहे. कोळिष्टकं, पुष्परचनांपासून पक्ष्यांच्या घरटय़ांपर्यंत अनेक रचनांना वास्तुकलेत आणलं जात आहे. शिंपल्यांसारखे असंख्य सागरी जीव समुद्रात विविध प्रकारच्या गृहरचना तयार करतात. त्यात नैसर्गिकरीत्या कॅल्शियम तयार होऊन त्या रचनांना प्रबलता (स्ट्रेंथ) प्राप्त होते. ही प्रक्रिया जाणून जीवांच्या साहाय्याने कॅल्सिकरण (कॅल्सिफिकेशन) करण्यात वैज्ञानिकांना यश मिळाले असून, त्यातून कठोर वातावरणातही टिकून राहणारे व अधिक प्रबल ई-काँक्रीट तयार केलं जात आहे. झाडांच्या पानांना दुमडी व सुरकुत्यांनी प्रभावित होऊन प्रिन्स्टन विद्यापीठात जीवानुकरण सौर पटल तयार केले आहेत. अतिशय स्वस्त प्लास्टिक वापरून नेहमीच्या सौर पटलांपेक्षा ४७ टक्के अधिक ऊर्जा मिळवण्यात त्यांना यश आलं आहे. जीवानुकरण वास्तुकलेतील संशोधक वृत्तीमुळे इमारती ऊर्जा कार्यक्षम (एनर्जी इफिशियंट) होत आहेत. अफ्रिकी वास्तुशिल्पी माइक पिअर्स यांनी वारूळाच्या रचनेपासून प्रेरणा घेऊन झिंबाब्वेच्या हरारेमधील ‘इस्टगेट इमारत’ व ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे ‘कौंसिल हाऊस’ यांची निर्मिती केली आहे.

पृथ्वीतलावर स्वत:च्या आकाराच्या मानाने उत्तुंग वास्तू उभारण्याचं श्रेय हे मुंग्यांना जातं. बाहेरच्या वातावरणात तापमानाने वाटेल तेवढे हेलकावे घेतले तरी वास्तूच्या आत एकसमान तापमान कायम राखणारी अद्भुत वास्तू म्हणजे वारूळ! अफ्रिकेमध्ये उन्हाळय़ात ४० अंश सेल्सियसच्या पुढे पारा जातो तर हिवाळय़ात ० अंश गाठतो. तरी मातीपासून तयार झालेल्या वारुळांच्या आत तापमान ३० अंश सेल्सियसपर्यंत कायम राखलं जातं. वारुळांची जमिनीवरील भिंत ही उन्हाच्या दिशेने निमुळती असल्यामुळे ती कमी तापते. वारुळाच्या आत उष्णतारोधक भिंती असतात व वारुळातील मोकळय़ा जागांतून उष्ण हवा बाहेर निघून जाण्यासाठी वारुळाच्या वरील बाजूस मोठी छिद्रं केली जातात. अशा नैसर्गिक संवातकांमुळे (व्हेंटिलेटर) हवा खेळती राहते. आतील तापमान स्थिर ठेवण्यासाठी मुंग्या काटेकोर लक्ष ठेवून छिद्र मोठी करून गरम हवेचा झोत बाहेर काढणे आणि वरून ओली माती लिंपून थंडावा करणे, अशी कामे करत राहतात. हे ‘वारुळपुराण’ सखोल जाणून घेऊन पिअर्स यांनी हरारेतील ‘इस्टगेट’ इमारतीमध्ये अल्प ऊर्जा वापरून नैसर्गिकरीत्या हवा आत खेळवली आहे. त्यांनी उष्णता शोषून घेऊ शकेल असा इमारतीचा पाया केला. रात्रीच्या वेळी इमारतीच्या तळातून थंड हवेचे झोत सोडून गरम हवा बाहेर ढकलली जाते. संवातन करण्याच्या नेहमीच्या पद्धतीस येणाऱ्या खर्चाच्या मानाने या प्रकल्पात केवळ १० टक्केच रक्कम लागली. तर ऊर्जेमध्ये ३५ टक्के बचत झाली. ३ कोटी ६० लाख डॉलरच्या इमारतीमध्ये ३५ लाखांची बचत करता आली. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये दहा मजली १२,५०० चौरस फूट क्षेत्रफळांची ‘कौंसिल हाऊस’ करताना पिअर्स यांनी अधिक सुधारणा केल्या. त्यांनी पुनर्वापर केलेल्या लाकडी फळय़ांचा खेचपडदा (शटर) करून इमारतीमध्ये हवा खेळवली. त्यांचा उपयोग उष्ण हवा बाहेर काढून टाकण्यासाठीही होतो. शहरातील सांडपाण्यावर तीन वेळा प्रक्रिया केलेलं स्वच्छ पाणी ‘कौंसिल हाऊस’ इमारतीमधील शौचालयात व झाडांसाठी वापरलं जातं. इमारतीच्या बाहेरून भिंतीभर १५ मीटर लांबीची वाहिनी बसवली आहे. त्यातून याच पाण्याचा शिडकावा करून हवा थंड केली जाते. शिल्लक राहिलेलं पाणी इमारतीच्या पायामध्ये स्टेनलेस स्टीलच्या टाक्यांमध्ये साठवून मिठाच्या साहाय्याने पाणी गोठवलं जातं. इमारतीसाठी वापरलेल्या प्रत्येक तुळईत (बीम) बसवलेल्या तांब्यांच्या वाहिन्यांमधून ते पाणी हवा थंड करण्यासाठी वापरलं जातं. या पद्धतींमुळे इमारतीमध्ये दर अर्ध्या तासाने शुद्ध व स्वच्छ हवा येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना उत्साहवर्धक वातावरणाचा लाभ होतो व त्यांची कार्यक्षमताही वाढते. मुख्याधिकारी ‘‘केवळ संवातन यंत्रणेमुळे वाढलेली कार्यक्षमता दरवर्षी २ कोटी ऑस्ट्रेलियन डॉलरांचा परतावा देते,’’ असं सांगतात. म्हणजे ५ ते ६ वर्षांत इमारतीमधील गुंतवणूक पुन्हा हाती येते.

सार्वजनिक इमारती कल्पनाशून्य, निर्जीव व भकास असणाऱ्या आपल्या देशात (व राज्यातही) अशा डिझाइनचा तिटकाराच चालू आहे. जर्मन वास्तुविशारद वॉल्टर ग्रोपिअस (१८८३-१९६९) यांनी काटकोनातील चार भिंतींवर स-लोह काँक्रीटचं छत, चौकोनी दार-खिडकी असणारं साध्या आकारातलं घनाकृती घर साकारलं. ग्रोपिअस यांना वास्तुकलेत इतर कलांचा मिलाफ घडवायचा होता; परंतु कला बाजूलाच राहिली आणि केवळ तंत्रालाच महत्त्व आलं. घनाकृती, यंत्रवत व मठ्ठ रचनांची झपाटय़ानं लागण झाली. त्यात, शार्ल एद्वार इहान्रे ऊर्फ ल-कार्बुझ्ये यांच्या (१८८७ -१९६५) ‘घर म्हणजे काय, राहण्यासाठी केलेलं यंत्र!’ या उक्तीचा जगातल्या वास्तुरचना व शहररचना यांमध्ये कमालीचा परिणाम झाला. उपयोगिता हा एकमेव निकष मानला गेला, त्यापलीकडे कुठलाही विचार नाही. नव्या वसाहती, कॉलन्या, नगरांमध्ये आधुनिक वास्तुकलेतील ठोकळा सर्रास दिसू लागला. पाहता पाहता त्यानं जग पादाक्रांत केलं. देशी, स्थानिक वास्तुकलेला मागस व जुनाट ठरवून आधुनिकतेची पताका मिरवणाऱ्या काँक्रीट डब्यानं आंतरराष्ट्रीय वास्तुकला आंरभली. आपण ज्या वास्तूमध्ये ९० टक्के वेळ घालवतो त्या आपल्या शरीराचा व भावनेचा विचार करत नसतील तर त्यांना उपयुक्त तरी कसं म्हणता येईल? बांधकाम सामग्री तयार करताना प्रचंड ऊर्जा खर्च होते. निसर्गास घातक वस्तूंचा वापर होतो. व्यक्ती व समाज, ऊर्जा व सामग्री कशाचाही विचार न करता आता उधळमाधळ शिकवणाऱ्या डिझाइनला ‘वास्तुकला’ तरी कसं म्हणता येईल? १९९० नंतर महानगरांमध्ये इमारतींच्या भिंतींसाठी काचेचा वापर हे ‘प्रगती’चं लक्षण ठरवलं गेलं. पाहता पाहता ते लोण खेडय़ांपर्यंत पोहोचलं. शिक्षणसंस्था, रुग्णालयं, व्यापारी संकुलं व खरेदी केंद्रं सर्वत्र एकसारख्या साच्यातल्या रचना दिसू लागल्या. उष्ण कटिबंधात काच लावून भिंत गरम करण्याची सोय करायची आणि मग त्यात थंडावा आणण्यासाठी वातानुकूलन यंत्रणांचा वापर अनिवार्य करून ठेवायचा. अशा निर्बुद्ध, ऊर्जाग्राही व निसर्गाची हेटाळणी करणाऱ्या डिझाइनचा सुळसुळाट झाला आहे. प्रत्येक जागेला व्यावसायिक किंमत आली. निवासाची जागा आता वास्तविक मालमत्ता (रिअल इस्टेट) ठरू लागली. मजले चढवून तिची किंमत वाढवून घेण्यात तसेच शेतीला अकृषी करून किंमत वसूल करण्यात कर्तबगारीची परिसीमा ठरू लागली.

‘स्टॉकहोम परिषदेत’च दुबॉस यांनी ‘कुरूपता हीच नित्य बाब असल्याचं मुलांना पटवून देणं, ही त्यांच्यासाठी आपण केलेली सर्वात वाईट गोष्ट आहे.’ असं त्यावेळीच बजावून सांगितलं होतं. हा प्रश्न अनिवार्य नसल्याच्या आविर्भावात त्याकडे सर्वानी सोयिस्कर दुर्लक्ष केलं आहे. आपल्याला सौंदर्य म्हणजे काय हे समजतं का? आपण पुढील पिढय़ांना सुंदर परिसर देत आहोत का? याचा झाडा देताना इतरत्र रुजत असलेल्या ‘इकॉलॉजिकल डिझाइन’कडे पाहावं लागेल. इकॉलॉजिकल डिझाइन हे निसर्गाशी जोडलं जाण्यासाठीचं एक सूत्र आहे. मानवी आकांक्षांना पर्यावरणीय वास्तवाशी जोडण्याची ती प्रदीर्घ प्रक्रिया आहे. विज्ञान, नीतीशास्त्र, अर्थशास्त्र व अभियांत्रिकी यांचा एकत्रित विचार करून निर्माण केलेली ती एक कला आहे. अनेक ज्ञानशाखांमधील तज्ज्ञ व शास्त्रज्ञ यांना एकत्र बसून निर्णय घेण्यासाठीची संधी आहे. इकॉलॉजीकल डिझाइन हे कल्पकतेला  मिळालेलं जबरदस्त आव्हान आहे. माती, पाणी, जंगल, खनिजं यांना किंमतच नसते. ते मोफत असतात, असा औद्योगिक क्रांतीनंतर झालेला गैरसमज दूर करण्यासाठीची ती अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यात, संस्थात्मक डिझाइन व व्यवस्थापन बदलून टाकण्याची क्षमता आहे. त्यानं, एकविसाव्या शतकातील प्रस्थापित विचारांना टाकून नवी व्यवस्था निर्माण करण्यासाठीच नवं बंड घडवून आणण्याची शक्यता निर्माण केली आहे. यामध्ये केवळ कामगिरीचा (परफॉर्मन्स) विचार नाही तर निवाऱ्याचं टिकाऊपण, त्याची उपयोगिता आणि सौंदर्य वाढविणे अशी अनेक कार्ये त्यातून साध्य होतात. त्यामागे, वास्तूंनी सभोवतालाचा, समाजाचा व संस्कृतीचा आदर करावा. त्यांनी तिथे राहणाऱ्यांना उपरं, परकं, तुटलेलं न वाटता, परिसराशी बंध निर्माण झाल्याचा, मूळं खोलवर गेल्याचा सुखद भाव वाढीस लागावा, असे व्यापक उद्देश आहेत. त्यामुळे सध्याचा बधीरपणा व निक्रियता जाऊन नागरिक क्रियाशील बनतील, असं स्वप्नवत जग करण्यासाठी तशी ‘गुंतवणूक’ नको ?

केवळ चटपटीतपणा वा अधिक कार्यक्षमता म्हणजे उत्तम डिझाइन ही संकल्पना मनातून काढली पाहिजे. इकॉलॉजिकल डिझाइनमुळे तिकडे माणूस व पर्यावरण दोन्हींच्या आरोग्यास हानी न करणारी नवनवी डिझाइन्स तयार होत आहेत. सांडपाणी शून्यावर आणलं आहे. स्वच्छ पिण्याचं पाणी आत येतं आणि त्याच गुणवत्तेचं पाणी बाहेर जातं. वापरापेक्षा अधिक ऊर्जानिर्मिती होते. कर्करोगजन्य वा आरोग्यास घातक वस्तूंचा (मटेरियल) अजिबात वापर नाही. ऊर्जा व वस्तू यांचा अतिशय कार्यक्षम वापर केला जातो. नासाडीचं प्रमाण अत्यल्प करण्यावर भर दिला जातो. परिसरातील भूदृश्यास (लँडस्केप) यित्कचितही बाधा न आणता जैवविविधता जपण्यास व ती वाढविण्यास हातभार लावला जातो. अन्न, उर्जा, पाणी व वस्तू यांचा वापर किती व कसा व्हावा? किती नासाडी करावी? हे ठरवणारं डिझाइन करणे ही एक राजकीय बाब असते. 

उत्तम इकॉलॉजिकल डिझाइन ही आपल्या पुढच्या पिढीला दिलेली उत्तम भेट असून त्यातून त्यांना आयुष्याची गुणवत्ता व सौंदर्य या सर्वाचा आनंद मिळू शकेल. त्यामानाने आत्ताच्या वास्तुरचना व शहर रचना या अतिशय अजागळ वाटतात. मानवी इतिहासात कधीही झालं नाही एवढं बांधकाम येत्या ५० वर्षांत होणार असून, त्यामुळे पर्यावरणाची कधीही भरून येणार नाही अशी हानी होणार आहे. धोरणकर्त्यांनी, वास्तुकला महाविद्यालयांनी तसंच वेगवेगळय़ा संस्थांनी, याचा विचार करणं अत्यावश्यक आहे.

केरळ, तामिळनाडू, पुडुच्चेरी, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात, राजस्थान, दिल्ली व उत्तराखंड या राज्यांमध्ये अत्यल्प उर्जाग्राही हरित वास्तुकलेचे अनेक प्रयत्न होत आहेत. लॉरी बेकर यांनी ‘कचरा ही मनोवृत्ती आहे, टाकाऊ असं काही नसतंच’ ही त्यांची उक्ती सातत्यानं वास्तुकलेतून दाखवून दिली होती. ‘लॉरी बेकर सेंटर’ ही कृतिशील मार्गदर्शक संस्था वास्तुकला व बांधकाम व्यवसाय यांना पर्यायी दृष्टी देऊन हरित अधिवास (ग्रीन हॅबिटाट) निर्माण करणे, त्यासाठी संशोधन व विकास करणे, विद्यार्थी व नवपदवीधर यांचे प्रशिक्षण घडवणे.. अशी अनेक कामे करीत आहे. तिथे निरुपयोगी मानून फेकून दिलेल्या विटा, काच, लोखंड व लाकडांच्या वस्तूंना बांधकामात कसं सामावून घेता येईल, याचं प्रशिक्षण दिलं जातं. नारळाच्या बुंध्यावर प्रक्रिया करून त्याचा खांबासारखा उपयोग केला जातो. बांबू, माती व शेणाचा कल्पक वापर केला जातो. देशातीलच नव्हे, तर परदेशातील विद्यार्थी इथे येऊन हाताने काम करीत प्रशिक्षण घेत असतात. बेकरांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शिष्य त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. देशांत व आपल्या राज्यात अनेक तरुण वास्तुशिल्पी अशा रचना करीत आहेत. महाराष्ट्रात मात्र याबाबत प्रदीर्घ दुष्काळ आहे. महाराष्ट्राने अभिजात संगीताला आपलंसं करून जोपासलं. हे भाग्य वास्तुकलेला अजिबात लाभलं नाही. आपल्याकडील सर्वव्यापी व सर्वशक्तिमान ‘विकासकशाही’ (बिल्डरोक्रसी) म्हणेल ती वास्तुकला ठरते. सरकार अनेक मात्र धोरण एक : कुरूपपणातील नावीन्यात भर घालणे.. जगाच्या आरशात आपली विषण्ण व गलिच्छ शहरं पाहिली तर यांना सुंदर कोण व कधी करणार? अशी देन पाहून पुढची पिढी म्हणाली, ‘विकल्पवृक्ष पोरांसाठी लावुनिया.. ’ तर..