जर्मनीमध्ये नुकतीच सुरू झालेली ‘युरो स्पर्धा’ आणि येत्या आठवड्यापासून अमेरिकेत सुरू होणारी ‘कोपा अमेरिका’ ही जगभरातील फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणीच. पण दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, युरोपातील जर्मनी आणि अमेरिका या तीन राष्ट्रांच्या लेखी या खेळातील ‘आयडेंटिटी’चा शोध घेण्याची ही संधी आहे. ती कशी?

फुटबॉल जगतात सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या दोन खंडांच्या अजिंक्यपद स्पर्धा यंदा जवळपास परस्परांना समांतर खेळवल्या जात आहेत. फुटबॉल जगतातील दोन सर्वांत बलाढ्य देश ब्राझील आणि जर्मनी या दोन देशांना आपली खरी ओळख पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी या दोन स्पर्धा महत्त्वाच्या ठरतील. जर्मनीने नवीन सहस्राकात एकदा विश्वचषक (२०१४) जिंकला. पण शेवटचा युरो चषक १९९६ मध्ये जिंकला होता. ब्राझील तसे पाहायला गेल्यास जगात दादा असला, तरी कोपा अमेरिका या स्पर्धेत त्यांच्यापेक्षा अर्जेंटिना आणि उरुग्वे यांची मक्तेदारी सिद्ध झालेली आहे. ब्राझीलची ओळखच दक्षिण अमेरिकेतला जगज्जेता अशी असल्यामुळे कोपा अमेरिका स्पर्धेत फार काही करून दाखवण्याची गरज या देशाला सहसा भासली नव्हती. पण यंदाचा जगज्जेता त्यांच्यात खंडातील त्यांचा (फुटबॉल मैदानावरील) कट्टर दुश्मन अर्जेंटिना ठरला. शिवाय गेल्या २२ वर्षांत ब्राझीलला जगज्जेता बनता आलेले नाही. आता किमान जगज्जेत्या अर्जेंटिनासमोर दक्षिण अमेरिकेचे जेते बनून काही प्रमाणात पत राखण्याचे आव्हान ब्राझीलसमोर आहे.

What is the meaning of the Olympic rings?
Olympics 2024: ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये पाच वर्तुळ का असतात? काय आहे याचा अर्थ; जाणून घ्या
spain euro 2024 african player
विश्लेषण: यमाल, विल्यम्स, मुसियाला, साका… युरो फुटबॉल स्पर्धेवर आफ्रिकन प्रभाव! स्पेनला कसा झाला फायदा?
uruguay take third place at copa america beats canada
उरुग्वे संघाला तिसरे स्थान; कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत कॅनडावर शूटआऊट मध्ये ४-३ ने विजय
2024 copa america colombia beat uruguay to reach copa final
कोलंबियाची दमदार कामगिरी कायम; उरुग्वेला हरवत अंतिम फेरीत; लेर्माचा निर्णायक गोल
spain vs france semi final match preview
युरो अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज; आक्रमक स्पेनची फ्रान्सशी गाठफुटबॉल महासत्तांत वर्चस्वाची लढत
Copa America football tournament Brazil challenge ends
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा: ब्राझीलचे आव्हान संपुष्टात
Germany vs Spain and France vs Portugal match in Euro Championship football tournament sport news
बलाढ्यांतील द्वंद्वाची पर्वणी;युरो स्पर्धेत आज जर्मनीची स्पेनशी, फ्रान्सची पोर्तुगालशी गाठ
Portugal beat Slovenia on penalties sport news
पेनल्टीच्या नाट्यात पोर्तुगालचा विजय; स्लोव्हेनियावर ३-० ने मात करत उपांत्यपूर्व फेरीत

युरो स्पर्धेला शुक्रवारी रात्री सुरुवात झालीय, तर कोपा अमेरिका स्पर्धेला या आठवड्यात प्रारंभ होईल. फुटबॉल जगज्जेत्या देशांची विभागणी अजूनही केवळ याच दोन खंडांमध्ये केली जाते. जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन आणि इंग्लंड असे पाच जगज्जेते युरोपातील आहेत. तर ब्राझील, अर्जेंटिना आणि उरुग्वे हे दक्षिण अमेरिकेतील आहेत. फुटबॉलची लोकप्रियता खऱ्या अर्थाने जागतिक आहे आणि हा खेळ अर्थातच जगभर खेळलाही जातो. दोनशेहून अधिक सदस्य देश फार कमी संघटनांमध्ये आढळतील. पण युरोप आणि दक्षिण अमेरिका हे या समुदायाचे ‘एलिट’ सदस्य ठरतात हे नक्की. म्हणूनच विश्वचषकानंतरच्या त्या सर्वाधिक दर्शकप्रिय स्पर्धा ठरल्या आहेत. पण यंदा या स्पर्धांपलीकडेही पाहण्यासारखे आणि शोधण्यासारखे बरेच काही आहे. कोपा अमेरिका अमेरिकेत खेळवली जातेय. दोन वर्षांनी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचा अमेरिका हा सहयजमान आहे. यापूर्वी एकेकदा या देशाने विश्वचषक आणि कोपा अमेरिका स्पर्धा भरवून दाखवली होती. पण फुटबॉलमध्ये यजमानबाजीपलीकडे अमेरिकेचा दरारा का निर्माण झालेला नाही, हेही अभ्यासण्यासारखे ठरते.

तेव्हा तशी… आता अशी…

या वेळी युरो स्पर्धा जर्मनीमध्ये होत आहे. जर्मनी म्हणजे युरोपातील सर्वांत यशस्वी फुटबॉल संघ. आणि फुटबॉल जगतातील ब्राझीलनंतरचा दुसरा सर्वांत यशस्वी संघ. तीन युरो जेतेपदे आणि चार जगज्जेतेपदे असा बायो-डेटा खणखणीत खराच. तरीदेखील आज कोणत्याही महत्त्वाच्या स्पर्धेत उतरणाऱ्या जर्मनीकडे तितक्याशा भीतीने आणि गांभीर्याने पाहिले जात नाही. ‘अप्रेझल’च्या परिभाषेत जर्मनीची गेल्या काही स्पर्धांतली (दोन विश्वचषक नि दोन युरो) कामगिरी ‘बीई’ (बिलो एक्स्पेक्टेशन) म्हणजे खरे तर सुमार झालेली आहे. यात यंदा फरक पडेल का, याविषयी जर्मनीत विरोधी मतप्रवाह आहेत. अनेक जण १८ वर्षांपूर्वीचा दाखला देतात. तो का? तर त्या वेळी जर्मनीकडे विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद होते. अँगेला मर्केल नुकत्याच त्या देशाच्या चान्सेलर बनल्या होत्या. जर्मनीमध्ये बेरोजगारी आणि मंदीचा प्रभाव होता. पण मर्केल यांनी विश्वचषकाकडे जर्मनीची नवी ओळख निर्माण करण्याची संधी म्हणून पाहिले. ‘जगाचे स्वागत मनापासून करा’ असे त्या सांगत. त्या स्पर्धेतील अनेक फुटबॉल सामन्यांना त्यांनी आवर्जून हजेरी लावली. जर्मनीच्या फुटबॉल संघाचे ‘रंग’ही बदलत होते. प्राधान्याने श्वेत प्रशियन-सॅक्सन ही ओळख पुसट बनत होती. जर्मनीच्या संघात तुर्की, ट्युनिशियन, घानियन, नायजेरियन खेळाडू दिसू लागले होते. काहीशा अनपेक्षितपणे जर्मनीने त्या स्पर्धेत उपान्त्य फेरीपर्यंत मजल मारली. फुटबॉलने जर्मनीला उभारी दिली आणि जर्मनीने फुटबॉलला वेगळ्या उंचीवर नेले. जर्मनीच्या पारंपरिक टॅक्टिकल शैलीला ब्राझिलियन प्रवाहीपणाची जोड मिळाल्यामुळे काही काळातच जर्मनीचा संघ बलाढ्य आणि मुख्य म्हणजे आकर्षक संघ बनला. त्या प्रवासाची परिणती अखेर २०१४ मधील जगज्जेतेपदामध्ये झाली.

हेही वाचा – ‘युवराज’ ते धीरोदात्त नेता!

हा इतिहास काही जण हताशपणे जागवतात. सद्या:स्थितीकडे बोट दाखवतात. परिस्थिती सर्वत्र निरुत्साही आहे खरीच. आर्थिक आघाडीवर जर्मनीचा दबदबा घटलेला आहे. करोना आणि युक्रेन युद्धामुळे जगातील या उत्पादन क्षेत्रातील महासत्तेला हादरे बसले. चिनी कच्चा माल व बाजारपेठ आणि रशियन ऊर्जेवर अतिअवलंबून राहिल्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. कारण सध्या दोन्ही स्रोत आटू लागले आहेत. ‘एआय’चे तंत्र आणि मंत्र आत्मसात करण्यात इतर प्रगत देशांच्या तुलनेत जर्मनी मागे पडत आहे. शिवाय ज्या विचारधारेला इतकी वर्षे सुरक्षित अंतरावर ठेवले, त्या विचारधारेने आता मुख्य राजकीय प्रवाहात घुसखोरी सुरू केल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या युरोपियन पार्लमेंट निवडणुकीत, आल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी या अतिउजव्या पक्षाने जर्मनीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. महत्त्वाचे म्हणजे, तिथला मध्यममार्गी सत्तारूढ पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. एके काळी जर्मनीला त्यांच्या बहुवांशिक-बहुवर्णीय फुटबॉल संघाचा अभिमान वाटे. त्याच जर्मनीत आज ‘फुटबॉल संघात अजून गोरे हवेत का’ या प्रश्नावर सर्वेक्षणे घेतली जातात. जर्मन ध्वज फडकवलाच, तर आपल्याला कुणी ‘त्यांच्यातले’ समजणार नाहीत ना, या भीतीने कित्येक जण त्या भानगडीतच पडत नाहीत. या वातावरणातून आणि नैराश्यातून फुटबॉलच या फुटबॉलवेड्या देशाला बाहेर काढू शकेल. त्या वेळी जर्मनीचे आधिपत्य मर्केलबाईंकडे होते. त्यांच्या तुलनेत विद्यामान चान्सेलर ओलाफ शोल्त्झ भलतेच फिके आणि निस्तेज ठरतात. त्यांच्याकडून करिष्म्याची अपेक्षा नाही. तेव्हा जो काय तो सोक्षमोक्ष लागेल, तो फुटबॉलच्या मैदानातच, असे तिथल्या अजूनही आशावादी फुटबॉलप्रेमींचे मत आहे. जर्मनीत इतकी मोठी स्पर्धा सुरू आहे याची खबरबात नसणाऱ्यांची – विशेषत: युवकांची संख्या तेथे अनपेक्षितपणे प्रचंड आहे. विश्वचषक २००६ ही स्पर्धा म्हणजे जर्मनीचा राष्ट्रीय सण ठरला होता. यंदाची युरो स्पर्धा म्हणजे राष्ट्रीय शोक ठरली नाही, तरी पुरे असे कुत्सितपणे म्हणणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

अपना टाइम (कब) आयेगा…

ब्राझीलच्याच भूमीवर ब्राझीलच्याच संघाला जर्मनीने १-७ असे उद्ध्वस्त केले त्या घटनेला दहा वर्षे उलटून गेली. ती जखम काही प्रमाणात भरून निघालीय. पाच वर्षांपूर्वी ब्राझीलमध्येच झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेत त्या देशाने अजिंक्यपद पटकावले. परंतु गेल्या खेपेस अंतिम सामन्यात दस्तुरखुद्द अर्जेंटिनाकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. नंतर अर्जेंटिना जगज्जेतेही बनले. एकाच वेळी लॅटिन अमेरिकन जेते आणि जगज्जेते ही एकत्रित ओळख ब्राझीलशिवाय इतर कोणा संघाकडे जाते, हे ब्राझीलमधील फुटबॉलप्रेमी स्वीकारू शकत नाहीत. पण युरोपमधील फुटबॉल सत्तेचा केंद्रबिंदू सध्या फ्रान्सकडे सरकलेला दिसतो, तसा दक्षिण अमेरिकेत तो अर्जेंटिनाकडे झुकलेला दिसतो. ब्राझीलची फुटबॉल संस्कृती हरवत चाललीय. कारण दरवर्षी हजारो युवक युरोपात खेळण्यासाठी जातात. त्यांच्यातून सर्वोत्तम संघ निवडणे आणि मुख्य म्हणजे त्यांच्यात ब्राझीलविषयी खेळण्याची आसक्ती निर्माण करणे अजिबात सोपे राहिलेले नाही. या संघाला यंदा प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र होता आले नाही. विश्वचषक पात्रता फेऱ्यांमध्ये सध्या ब्राझीलचा संघ फारच खाली घसरला आहे. दोन वर्षांत राष्ट्रीय संघाचे पाच प्रशिक्षक बदलले. ब्राझीलमध्ये समृद्धीचे प्रमाण विषम आहे. तरीही गतदशकात विश्वचषक फुटबॉल आणि ऑलिम्पिक अशा महागड्या स्पर्धा यशस्वीरीत्या भरवून दाखवण्याइतपत पैसा या अजस्रा देशाकडे आहे. परंतु तो निधी गुणवान फुटबॉलपटू घडवू शकत नाही. नैसर्गिक गुणवत्तेवर निभावून नेण्याचे दिवस सरले हे ओळखण्यातच ब्राझीलच्या फुटबॉल व्यवस्थेने दहा वर्षे फुकट घालवली, असे तेथील विश्लेषक हताशपणे कबूल करतात. अजूनही वेळ गेलेली नाही. पण त्यासाठी एखादी महत्त्वाची स्पर्धा जिंकून दाखवावी लागेल. सुरुवात यंदाच्या कोपापासून करावी लागेल, असे ही मंडळी म्हणतात.

हेही वाचा – निवडणूक निकालाच्या बोधकथा…!

हे घडून यायचे असेल तर प्रथम ‘सुंदर खेळ’, ‘पेलेंचा देश’ वगैरे स्वप्नाळू संकल्पनांतून बाहेर पडू. ती फाजील अपेक्षांची वस्त्रे फेकून देऊन बदलत्या वास्तवाला उघडेवागडे सामोरे जाऊ, असे मानणाऱ्यांचा एक गट आहे. पण सध्या तो अल्पमतात आहे. तेव्हा फुटबॉलची नेमकी ओळख शोधण्याच्या प्रयत्नात हाही देश आहे.

चिरंतन रंगीत तालीम…

कोपा अमेरिका स्पर्धेचे यजमान यंदा अमेरिका आहेत. ते दक्षिण अमेरिकी फुटबॉल संघटनेत येत नाहीत. पण निमंत्रित म्हणून अधूनमधून खेळतात. यापूर्वी १९९४ मध्ये अमेरिकेने विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भरवली होती. नंतर २०१६ मध्ये कोपा स्पर्धेचे यजमानपदही त्यांच्याकडे होते. यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने दोन वर्षांनी अमेरिकेत (तसेच मेक्सिको आणि कॅनडातही) होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून कोपा अमेरिका स्पर्धेकडे पाहिले जात आहे. अमेरिकेत फुटबॉल लोकप्रिय व्हावे, असा तीस वर्षांपूर्वी तेथे झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा एक उद्देश होता. असली चैन अमेरिकेसारख्या देशालाच परवडायची! फुटबॉल विश्वचषकात अमेरिका पुढे सातत्याने दिसू लागली, पण अमेरिकेत फुटबॉल म्हणावे इतके लोकप्रिय अजूनही झालेले नाही. तिथल्या फुटबॉल लीगमध्ये अजूनही युरोपातून पेन्शनीत गेलेले फुटबॉलपटू खेळतात. अजूनही अमेरिकन फुटबॉल किंवा चिलखती रग्बी, बेसबॉल, बास्केटबॉल आणि आइस हॉकी या चार खेळांची मक्तेदारी कायम आहे. टेनिससारख्या खेळाची जादू तेथे ओसरली, फॉर्म्युला वन रेसिंगला छाप पाडता आलेली नाही आणि क्रिकेटचा त्या दिशेने केविलवाणा प्रयत्न सुरू आहे!

शेठकडे पैसा आहे म्हणून पोरगं उत्तम कॉलेजात दाखल झालं, तरी कसंबसंच पुढे सरकतंय तसला हा प्रकार. मोठ्या स्पर्धांचा अजस्रा आवाका सामावून घेण्याची क्षमता अमेरिकेसारख्या मोजक्या मोठ्या देशांकडेच शिल्लक राहिली आहे, हा याचा दुसरा अर्थ. निव्वळ यजमान म्हणून किती वर्षे मिरवणार, कधी काही जिंकून दाखवणार का, वगैरे गैरसोयीचे प्रश्न अमेरिकेबाहेरच्यांनाच पडतात. ते जोवर तिथल्यांना पडत नाहीत तोवर आहेच पार्टी… आज, उद्या नि परवा!

siddharth.khandekar@expressindia.Com