नाचू दे ना मने सारी, चिंब चिंब आषाढात

शिळान म्हणजे ढगांची सावली. पण आद्र्राचा पाऊस येतो, तो नवोढा पतीसारखा बरसतो. म्हणूनच तो पिकांमध्ये कायापालट घडवून आणतो.

डॉ. प्रतिमा इंगोले lokrang@expressindia.com

ग्रामीण साहित्यात आषाढाचे दर्शन होणे तसे स्वाभाविक आहे. कारण ग्रीष्माने करपलेल्या भुईवर पहिला मेघवर्षांव होतो तो आषाढात! आज आपण नव्या वर्षांची सुरुवात गुढी पाडव्यापासून करतो, पण कृषिसंस्कृतीत ती आषाढापासून होते. कारण वर्षांचा पहिला सण ‘आषाढी.’ वऱ्हाडात हिला ‘अखाडी’ म्हणतात. आणि हाच शब्द जास्त योग्य वाटतो. कारण वऱ्हाडात ‘खाडा’ म्हणजे तुटवडा किंवा कमतरता; आणि ‘अ’ म्हणजे नाही. म्हणजे ज्या महिन्यात कशाची कमतरता नाही असा महिना. याला कारण पाऊस! आषाढात पाऊस बरसतो तो धुमसान. त्यामुळे रानभाज्या उगवतात आणि कष्टकरी वर्ग त्यावर पोट तगवतो. त्यामुळे उपास पडत नाहीत, अन्नाचा खाडा होत नाही. म्हणूनच लोकसाहित्यात या आषाढात असणाऱ्या नक्षत्राचं कौतुक आढळतं.

‘रोवनी करे बोवनी (भवानी)

मिरुग जाये शियानी

अळदळाचं आलं पानी’

(बयनाचे बोल, पृ. २१)

असे लोकगीत आहे. त्यात रोहिणी जरी पाण्याचे नक्षत्र असले तरी त्या नक्षत्रात फक्त पाऊस टपटपतो. मृग तर पावसाचे नक्षत्र; पण तोही थंडा पडतो. फक्त आभाळ येते अन् जाते. ऊन तापत नाही. शियान राहते. शिळान म्हणजे ढगांची सावली. पण आद्र्राचा पाऊस येतो, तो नवोढा पतीसारखा बरसतो. म्हणूनच तो पिकांमध्ये कायापालट घडवून आणतो.

‘पयल्या पुताच्या नारीले आला हासा

अरदळाचं पानी पिकाले डौल कसा’

(बयनाचे बोल, पृष्ठ ८)

पहिल्यांदा मुलगा झाल्यावर नारीला जो स्वर्गीय आनंद होतो आणि त्यामुळे तिचा चेहरा जसा खुलतो, तशीच आषाढातील पिकं खुलतात. कारण अरदळाचं (आद्र्रा) पाणी इतक्या जोमात बरसतं की पिकांची तृप्ती होते. म्हणूनच आषाढाला महत्त्व आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आषाढात येणारी ‘अखाडी’- म्हणजेच गुरुपौर्णिमा हा कृषिसंस्कृतीतील मोठ्ठा सण आहे. सणांची सुरुवातच तिच्यापासून होते. म्हणूनच अखाडीबद्दल बऱ्याच म्हणी आहेत. ‘अखाडी अन् सण उखाडी.’ म्हणजे आषाढी सण उकरून काढते. दुसरा लोकसमज आखाडी नाटी असते. म्हणजे आषाढी जर साजरी केली नाही तर नाट लागते आणि वर्षभर सण करता येत नाहीत. या सणांबद्दल लोकगीतांत बऱ्याच ओव्या आढळतात. वऱ्हाडी लोकगाथेत पृ. १५२, १५३, १५४ वर..

‘आला सन ‘अखाळी’, सारे सण हलकारी’

‘अखाडी तळीन, नागपंचमी खेळीन’

‘अखोजीचा पुजते करा, आला अखाडीचा फेरा’

‘अखाडीचं बोनं, आला पंचमीचा सन’

या ओळी आषाढीबद्दल आढळतात.

अशा या आषाढीचे आणि आषाढ महिन्याचे ग्रामीण साहित्यात चित्रण उमटणे अनिवार्य आहे. कारण आषाढातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आषाढी एकादशी’- जी वारीसाठी प्रसिद्ध आहे. तमाम ग्रामीण भागातून माणसं पेरण्या आटोपून वारीला निघतात. त्या सावळ्या  परब्रह्माला भेटून धन्य होतात. या वारीची वर्णनं ग्रामीण साहित्यात चिक्कार आहेत.

‘पंढरपुरा गेले, दादा पंढरपुरा गेले

चंद्रभागेच्या काठाले, एका चंद्रभागेच्या काठाले

येताचं झाळनं, झाळून केलं पटांगन

ऐसा आंघोया मांडल्या’

(वऱ्हाडी लोकगाथा, पृ. ३९)

‘सखू जाती वं पंढरपुरा

सखूनं कामधंदा वं केला

सखू येशीत गाठली..’

(वऱ्हाडी लोकगाथा, पृ. २७९, ८०)

हे पूर्ण कथागीत आहे! सखू नावाची सासुरवाशीण पंढरपुराला जाते, पण तिचा नवरा तिला वेशीतून परत आणतो. पण हा विठ्ठल सखूरूप तिच्या घरी येतो. सात दिवस राबतो. तिकडे सखू तीर्थ करून परत येते तेव्हा घरच्यांना कळते. अशा स्त्रियाही या आषाढात विठ्ठलचरणी तल्लीन होतात.

‘रस्त्यानं चालली, जनी भयानी दिसते

पोथीतला सार, पांडुरंगाले पुसते’

(बयनाचे बोल, पृ. ३६)

आषाढात असे देव आणि भक्त यांचे सख्य वाढीस लागते.

‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हणत कवी कालिदासाचे स्मरण आजकाल सर्वच करतात. पूर्वी फक्त विदर्भात रामटेकला हा सोहळा साजरा होत होता. आषाढ महिना सर्वानाच लोभवतो. परवा फेसबुकवर स्वाती दाढेची कविता होती..

‘आषाढाच्या सरी, आल्या भराभरा

डोंगरीचा झरा, झेपावला

आषाढाच्या सरी, मातीशी भेटती

डोळे ओलावती, धरतीचे

आषाढाच्या सरी, घालतात स्नान

उजळतो म्लान, मुखचंद्र’

माझ्या ‘हिरवे स्वप्न’ या कथासंग्रहात ‘आषाढ’ नावाची कथाच आहे. निसर्ग आणि मानव यांचे एकात्म रूप या कथेत चित्रमयी स्वरूपात प्रगटले आहे. ‘‘पण आषाढ दाराशी येऊन ठेपला होता. तो थांबणार नव्हता. अधीरतेने आपला अधिकार गाजवणार होता. आपल्या खटय़ाळ वर्षांवाची आरास उधळणार होता. रात्र क्षणाक्षणाने गडद होऊ लागली. बाहेर आषाढ रंगात येऊन मोत्याचा शिरवा झोकू लागला. भिजले क्षण झपाटय़ाने मावळू लागले. रात्रीला सूर्योदयाचे वेध लागले. ओली पहाट सर्वत्र पसरू लागली. वाऱ्याबरोबर गारवा लपेटू लागली. ताज्यातवान्या सृष्टीने कूस बदलली. पाखरे चिवचिवत जागी झाली. सृष्टी गीत गुणगुणत लकाकू लागली. आषाढ आता मंदावला होता. आणि उमाच्या दारात श्रावण येऊन थबकला होता.’’

तर आषाढ असा खटय़ाळ, तरी हवाहवासा. कारण अवघी सृष्टीच अधीर होऊन आषाढाची वाट बघत असते. तिच्यातली ओल पार तळाला गेलेली असते. त्यामुळे तिची लेकरं वाट बघत राहतात.

‘भुई उसवे उसवे, ओल दडे खोल खोल

ऐकू येईना नदीला, रान सोबत्याचे बोल

जळ भूमीचं पळालं, पाणी तोंडचं पळालं

पिऊनिया मृगजळ, रानझुडूपं जळालं’

मृगजळाने सृष्टीचं भागत नाही, तर तिला आषाढ बरसावा लागतो. म्हणूनच श्रावणापेक्षाही आषाढ महत्त्वाचा! कारण तो जीवनदान देतो.

‘पड पड पान्या, नको आयकू जनाचं

असं झालं वाळवनं, गाईबाईच्या तनाचं

पड पड पान्या, निंगू दे भाजीपाला

जीव निवातला, नादारीबाई तुला’

आषाढात पावसाची अशी मनधरणी केली जाते. कारण नादारी असणाऱ्या ग्रामीण स्त्रीला निदान फांजीसारख्या रानभाज्या रांधून आपल्या चिल्यापिल्यांची भूक भागवता येते. वाळलेल्या गाईला चारा मिळतो.

आषाढातील महत्त्वाच्या सणाला लग्न झालेल्या मुलीला पहिल्यांदा माहेरी आणतात. विदर्भातील ग्रामीण भागात तशी पद्धत आहे. तिला साडीचोळी, जावयाला कपडे करतात. या सणाला क्षेत्रपाळ श्रेणीतील देवांना ‘बोणं’ (नैवेद्य) देतात. आरत्या म्हणतात. काही ठिकाणी लळितं भरतात. (छोटी जत्रा!) त्यात लळितं सादर करतात. आषाढातील अमावास्या बदनाम असली तरी आषाढाची सुरुवात मात्र मान्यताप्राप्त असते. कारण ज्येष्ठाच्या शेवटी आणि आषाढाच्या सुरुवातीला भूमी रज:स्वला असते असे मानतात. काही ठिकाणी अंबुवाची उत्सव करतात. अंबुवाची म्हणजे ‘रजोदर्शन.’ आणि अंबु म्हणजे सर्जनशील जल! म्हणून या काळात नांगरत नाहीत. म्हणूनच आषाढातील पौर्णिमा हा सफलनविधीच असतो.. स्त्री आणि भूमी दोन्ही बाबतीत! भूमीच्या रज:स्वला अवस्थेनंतरचा आनंदोत्सव म्हणजे आषाढी पौर्णिमा! तर अमावास्या म्हणजे लेकुरवाळीची पूजा! जिवतीची, दिव्याची, ठावणीची पूजा या अमावास्येला करतात. वास्तविक ही शुभ आहे. पण पुढे श्रावणात मटण आणि दारूला बंदी असते म्हणून या अमावास्येला लोक मनसोक्त पितात आणि गटारात लोळतात. स्वत:च तिला ‘गटारी अमावास्या’ म्हणतात. या अमावास्येवर ग्रामीण साहित्यात खूप उपरोधिक कविता आढळतात.

थोडक्यात- आषाढात सृष्टीबरोबर संवेदनशील मनंही चिंब भिजतात आणि सर्जनाची निर्मिती करतात. ग्रामीण भागात तर आषाढ खूप महत्त्वाचा महिना ठरतो.

‘बरस ना मेघराया, चिंब चिंब आषाढात

न्हाऊ दे धरणीमाय, चिंब चिंब आषाढात

शमव ना काहिलीला, चिंब चिंब आषाढात

नेसव ना हिरवा शालू, चिंब चिंब आषाढात

भिजव ना वारकरी, चिंब चिंब आषाढात

फुलू दे ना भक्तीचा मळा, चिंब चिंब आषाढात

वाटुली पो नवोढा, चिंब चिंब आषाढात

खुलू दे ना रंग सारे, चिंब तिच्या आयुष्यात

नाचू दे ना मने सारी, चिंब चिंब आषाढात

पळव ना दानवता, चिंब चिंब आषाढात’

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Facts about ashadhi festival spiritual significance of ashad month importance of ashadh month zws

Next Story
भ्रष्ट व्यवस्था बदलणे गरजेचे!
ताज्या बातम्या