सॅबी परेरा
बा र कौन्सिल ऑफ इंडिया या वकिलांच्या देशव्यापी संघटनेच्या अध्यक्षांनी नुकतेच असे विधान केले की, भारतीय न्यायालयांमध्ये वकिली करणार्यांपैकी अंदाजे ३५ ते ४० टक्के लोक हे बनावट किंवा खोट्या कायद्याच्या पदव्यांच्या ( Fraudulent or Fake Law Degrees) आधारे काम करत असावेत.
२०१६च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात ॲलोपॅथिक औषधोपचार करण्याचा दावा करणार्यांपैकी सुमारे ५७ टक्के लोकांकडे मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता नाहीये. याव्यतिरिक्त, कुठलीही पदवी नसलेले अधिकृत संस्थेची पदवी नसलेले, मान्यता नसलेल्या संस्थेतून कोर्स केलेले असे अनेक लोक डॉक्टर म्हणून खेडेगावापासून राजधानीच्या शहरापर्यंत रुग्णांच्या जिवावर आणि खिशांवर आपल्या प्रॅक्टिसची कैची सुखेनैव चालवीत आहेत. यंदाच्या NEET परीक्षेतील भ्रष्टाचार उघडकीस आला नसता तर किती ड्युप्लिकेट डॉक्टर तयार झाले असते? आणि आजवर झालेल्या ज्या ज्या परीक्षांतील भ्रष्टाचार उघडकीस आलेला नाही त्यामुळे आज किती अपात्र शिक्षक विद्यार्थ्यांना (बि)घडवत असतील?, किती बनावट इंजिनीयर टॉवर, पूल उभारत असतील? किती फेक अधिकारी देश चालवत असतील? किती ड्युप्लिकेट डॉक्टर आपल्या आजूबाजूला पेशंट तपासत असतील, प्रि्क्रिरप्शन देत असतील, ऑपरेशन करीत असतील? सर्वसामान्यांच्या जिवांशी खेळत असतील?
आपण बाजारातून पनीर म्हणून जे काही आणतो किंवा हॉटेलात पनीरची जी डिश खातो ते बर्याचदा दुधापासून बनविलेले पनीर नसतेच. अलीकडेच अन्न व औषध प्रशासनाने ( FDA) महाराष्ट्रातील खाद्यगृहांना खाद्यपदार्थ तयार करताना वापरल्या जाणार्या ॲनालॉग पनीर आणि चीजची माहिती जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI) च्या नियमांनुसार, ‘आइस्क्रीम’ ही संज्ञा केवळ किमान १० टक्के दुग्ध-मेद ( Milk Fat) असलेल्या दुग्धजन्य पदार्थांसाठीच वापरली जाऊ शकते. दुग्ध-मेदाऐवजी वनस्पतीजन्य मेद (पाम तेल किंवा हायड्रोजनेटेड तेल) वापरून बनवलेले कोणतेही उत्पादन कायदेशीररीत्या ‘फ्रोजन डेझर्ट’ म्हणून वर्गीकृत केले जाते आणि मुख्य लेबलवर त्याला आइस्क्रीम म्हटले जाऊ शकत नाही. तरीही असे पदार्थ सर्रास आइस्क्रीम म्हणून बाजारात विकले जात आहेत. दुधात पाणी मिसळणारे दूधवाले आणि यूपी-बिहारचे भय्ये आता कालबाह्य झालेत. आता लोक थेट पाण्यात दुधाचा फ्लेवर टाकतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मसाले, तेल, मध, मिठाई, चहा, कॉफी, कडधान्ये, ड्रायफ्रुटस, ब्रँडेड पॅकेज्ड फूड असे अनेक रोजच्या रोज सेवन केले जाणारे पदार्थ आणि रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणार्या कित्येक वस्तू या बनावट किंवा भेसळयुक्त असतात. म्हणून आमचा तात्या म्हणतो, ‘पनीरमध्ये दूध नाहीये, मिठाईत खवा नाहीये, आइस्क्रीममध्ये दूध नाहीये, नात्यांमध्ये भावना नाहीयेत हेच खरं देश डिजिटल झाल्याचं लक्षण आहे.’
नेत्यांना फेकण्याची अन् त्यांनी फेकलेलं झेलण्याची जनतेला इतकी सवय झाली आहे की, Fraudulent या इंग्रजी शब्दासाठी मराठीत ‘फसवा’ किंवा ’बनावट’ हे शब्द असताना आपल्याला फेक हा शब्द अधिक जवळचा वाटू लागला आहे. फेक शिक्षक, फेक मतदार, फेक राजकीय नेते, फेक प्रशासकीय अधिकारी, फेक सामाजिक कार्यकर्ते, फेक आध्यात्मिक गुरू अशा या फेकिस्तानात मुलांना रोल मॉडेल म्हणून यूट्यूबवर व्हिडीओ बनविणारा इन्फ्लुएन्सर दाखविण्याची वेळ आपल्यावर आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नकली, ड्युप्लिकेट, फेक वस्तू मिळणार्या देशात, एखादी दोरी किंवा विष ड्युप्लिकेट निघाल्यामुळे आत्महत्या करू लागलेल्या शेतकर्याचा, विद्यार्थ्यांचा किंवा अत्याचारग्रस्त स्त्रीचा जीव वाचला असल्याची बातमी मात्र अजूनही ऐकायला आली नाहीये.
‘एकतृतीयांश वकीलच जर फेक असतील तर न्यायालयात आम्ही सत्य शोधायला जायचं?, न्याय मिळवायला जायचं? की काळे कोट घालून उभे राहिलेल्यांपैकी कोण वकिलाचा अभिनय अधिक चांगला करतो हे पाहण्यासाठी जायचं? या वकिलांतून पुढे न्यायाधीश झालेल्यांचे प्रमाणदेखील तितकेच असेल तर न्यायाची अपेक्षा करायची कुणाकडून?’ हा प्रश्न मी आमच्या गुरू महाराजांना विचारला. ‘कमअस्सल आणि फेक लोकांना कमी लेखता कामा नये. कारण ते बहुमतात आहेत,’ असा त्यांनी मला उपदेश केला आणि त्यानंतर चारच दिवसांत पोलिसांनी त्यांना भोंदूगिरीच्या आरोपाखाली अटक वरून केली. तेव्हा माझा त्यांच्यावरील विश्वास अधिकच दृढ झाला. मला तर भीती वाटून राहिली आहे की, आपलं लग्न लावणारा पाद्री, भट किंवा काझी फेक असल्याचे उद्या सिद्ध झाले तर आपलं लग्न रद्दबातल होईल का? एखाद्यावर अंत्यसंस्कार करणारा किरवंत ड्युप्लिकेट निघाला तर स्वर्गाच्या दारात त्याला अडवण्यात येईल का?
बनावट आणि दिखाऊगिरीला सगळीकडे ऊत आलेला आहे. ज्यांच्या स्वत:च्या आयुष्याचे बारा वाजले आहेत असे लोक सोशल मीडियावर मोटिव्हेशनल गुरू बनून Live- Laugh- Love असा उपदेश देत आहेत. लग्नातला फोटोग्राफर फोटो इतके एडिट करतो की रिसेप्शनमध्ये वधू-वर एकमेकांना ओळखू शकत नाहीत. काही लोक ऑफिसात बोलल्या जाणार्या कृत्रिम अमेरिकन इंग्रजी उच्चाराचे आपल्या मराठीवर असं कलम करतात की, सख्ख्या आईशीदेखील कॉलसेंटरवाल्यासारखं फेक बोलतात. इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये अटेंडन्स फेक, असाइनमेंट चॅटजीपीटीचे, प्रोजेक्ट आपल्या सीनियरचा आणि सोशल मीडियावर मिरवायला डिग्री मात्र हार्डवर्क आणि डेडिकेशनची! फेक तज्ज्ञाचा इतका सुळसुळाट झालाय की यूट्यूबवर ‘दोन दिवसांत करोडपती कसे व्हावे’ हे सांगणारा तज्ज्ञ, व्हिडीओ बनविण्यासाठी लागणारी साधी रिंगलाइट देखील एटक वर घेतो.
या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बनावटगिरीविषयी बायकोसोबत बोलत होतो. तर ती म्हणाली, ‘नवरे तरी हल्ली कुठे अस्सल राहिले आहेत? पुराणकाळात बायकोसाठी कांचनमृग आणणारे, इतिहासात बायकोच्या नावाने ताजमहाल बांधणारे अस्सल नवरे कुठे अन् आता थिएटरमध्ये बायकोसाठी पॉपकॉर्न आणायला नकार देणारे बंडल नवरे कुठे!’
यानिमित्ताने मला सर्वसामान्य लोकांचा एक गैरसमज दूर करायचा आहे. पाणीपुरी आणि शेवपुरीची चव पूर्वीसारखी लागत नाही ही गोष्ट जरी खरी असली, तरी त्याचं कारण- त्यासाठी वापरल्या जाणार्या खाद्यपदार्थाच्या भेसळीत नसून, करोनानंतर सगळे भय्ये हात धुवायला शिकल्यामुळे पाणीपुरी आणि शेवपुरीच्या चवीचा दर्जा घसरलेला आहे. असो.
आधी मला फक्त मेड इन चायना उत्पादनांच्या दर्जावर शंका यायची. आता मेड बाय ह्युमन असलेल्या सरसकट सर्वच उत्पादनांवरच शंका येऊ लागली आहे. मध्यंतरी मी नवीन घरासाठी आणलेलं चायनीज झुंबर आठवड्याभरातच खराब झालं म्हणून दुकानदाराकडे परत घेऊन गेलो तर तो म्हणाला, ‘साहेब, इतक्या पैशांत असंच मिळणार. पिवळ्या रेशन कार्डच्या बजेटमध्ये टायटॅनिक बनविता येत नाही!’
काही दिवसांपूर्वी, ट्रेनमध्ये बाजूच्या सीटवर बसलेला नेहमीच्या परिचयातील एक इसम मोबाइलवर व्हिडीओ पाहात होता. ‘काय पाहतोयस?’ विचारल्यावर तो म्हणाला, ‘मी काल दिवाळी पहाट कार्यक्रमाला गेलो होतो. तेथे लावलेल्या स्क्रीनवरून मी स्वत: मोबाइलवर रेकॉर्ड केलंय. म्हटलं, इथे गर्दीत अन् गर्मीत काही व्यवस्थित ऐकायला, बघायला जमत नाहीये. नंतर ट्रेनमध्ये मोबाइलवर फुरसतमध्ये पाहता येईल!’ मी त्याला काही बोललो नाही. काय बोलणार? एखाद्या कलेचा आस्वाद घ्यायचा असो, खाद्यपदार्थाचा असो वा निसर्गसौंदर्याचा… अस्सल, निखळ, निकोप असं काही आपल्या प्रकृतीला झेपतच नाही. आपली पचनशक्तीच इतकी कमकुवत झालीय की, वास्तवाच्या धारोष्ण दुधात आभासी दुनियेचं पाणी घातल्याशिवाय आपल्याला ते हजम होत नाही!
दुधावरून एक गंमत आठवली. दुधातील जिवाणू मारण्यासाठी आपण ते उकळून पितो आणि गोमूत्र मात्र कुठल्याही प्रक्रियेशिवाय नीट पितो. याचा अर्थ इतकाच की आपल्या शरीराला भेसळीचे किंवा टाकाऊ पदार्थ पचविण्याची अधिक सवय झालीय. या बनावट गोष्टी आपल्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग झालेल्या आहेत की, आता खरं बोलणारा प्रामाणिक माणूस लोकांना संशयास्पद वाटतो. शुद्ध शाकाहारी जेवण, शुद्ध तूप, १०० टक्के ऑरगॅनिक फळे आणि भाजीपाला असे शब्द दिसले तरी त्याच्या दर्जाची शंका येते. नकलेला अस्सल मानण्याची अन् अस्सल गोष्टींवर शंका घेण्याची ही सवय इतकी खालवर झिरपलीय की, परवा राणीच्या बागेतील पेंग्विन पाहून एक पोरगा म्हणाला, ‘‘हे डुप्लिकेट आहेत. यावर ‘ Use Me’ लिहिलेलं नाहीये.’’
पूर्वी आपण कलिंगड विकत घेतले आणि कापल्यावर ते लाल आणि गोड नसल्याचं आढळलं तर पैसे वाया गेल्याचं दु:ख होत असे. आता आपण कलिंगड विकत घेतले आणि कापल्यावर ते खूप लाल आणि अत्यंत गोड असल्याचं आढळलं तर ते ऑरगॅनिक नसल्याचा डाऊट येतो!
ज्याला नकली, बनावट, ड्युप्लिकेट किंवा फेक म्हणावं अशा गोष्टींचा इतका सुळसुळाट झालाय की या देशाची वाटचाल ‘फेकिस्तान’कडे होऊ लागली आहे की काय अशी शंका येते. ऑटोट्युनरच्या साहाय्याने स्वत:ला प्लेबॅक सिंगर म्हणवणारे अन् स्टेज शोमध्ये केवळ प्लस वनवर लीप सिंक करणारे ड्युप्लिकेट गायक बोकाळले आहेत. दरमहा पंधराशे रुपयांची ओवाळणी देऊन जोडलेल्या लाडक्या बहिणींपैकी चाळीस टक्के बहिणीदेखील फेक निघाल्या. निवडणुकीत स्वत:च्या बायकोचा प्रचार करताना ‘युवकांच्या मनातील पहिली पसंती’ असा नारा देणारे नवरे फेकच असणार, ते जेन्युईन असूच शकत नाहीत! विद्यापीठात शिकविल्याच न जाणार्या अभ्यासक्रमाचे, त्याकाळी अस्तित्वातच नसलेल्या फॉन्टमध्ये छापलेले बनावट प्रमाणपत्र दाखविणार्याला आपल्या डोक्यावर बसविणार्यांच्या देशात आणखी काय होणार आहे!
सर्वत्रच इतकी भेसळ वाढलीय, सगळं जगणंच इतकं फेक झालंय की आता ‘चांगला माणूस’ हा शब्दही ऑरगॅनिक मधाइतकाच दुर्मीळ वाटतो. मध्यंतरी आपल्याकडे नकली नोटा शोधून व्यवहारातून बाहेर काढण्यासाठी डिमॉनेटायझेशन केलं होतं, त्याचप्रमाणे एखाद्या रात्री आठ वाजताच्या मुहूर्तावर एखाद्या विश्वगुरूने फेक माणसं शोधून त्यांना व्यवस्थेतून बाहेर काढायला डिह्यूमनायझेशन करायला काय हरकत आहे?
अस्सल, निखळ, निकोप असं काही आपल्या प्रकृतीला झेपतच नाही. आपली पचनशक्तीच इतकी कमकुवत झालीय की, वास्तवाच्या धारोष्ण दुधात आभासी दुनियेचं पाणी घातल्याशिवाय आपल्याला ते हजम होत नाही.
