जाहिरात आणि प्रचार यांमधून सरकार जनमानसाला हवा तसा आकार देऊ शकतं, हे जेवढं विद्यमान सरकारला माहीत आहे तेवढं ‘सत्तर साल में’ कुणाही सत्ताधार्‍यांना उमगलं नसेल. तरीसुद्धा ‘सामाजिक बदलासाठी प्रचारयंत्रणा राबवण्या’चं उत्तम उदाहरण म्हणून १९६० आणि ७० च्या दशकांतल्या कुटुंब नियोजन प्रचाराचा नुसता उल्लेख नव्हे तर अभ्यासही केला जातो. भारतात १९६१ पासून सरकारनं कुटुंब नियोजनाचा प्रचार धडाक्यानं सुरू केला, याच्या खुणा जपणारी कितीतरी पोस्टरं, प्रचारचित्रं आज इंटरनेटवर विखुरलेली आहेत. त्या जाहिरातींनी घडवलेला बदल आपल्यासमोर आहेच आणि या जाहिरातींनाही आज स्मरणरंजनाचं मोल आलंय. उदाहरणार्थ, ‘कुटुब नियोजन केंद्राची खूण- लाल त्रिकोण’ असं सांगणारं मराठी पोस्टर लंडनमधल्या कुठल्याशा ऑनलाइन लिलाव- संकेतस्थळावर विकायला होतं. त्याची अंदाजित किंमत ७५ ते १५० ब्रिटिश पौंड अशी होती! आणखी शोधल्यावर अशी बरीच पोस्टरं लिलावात असल्याचं दिसलं.

मराठी पोस्टरचा तो ब्रिटिश लिलाव एप्रिल २०२१ मधला- म्हणजे पौंडाच्या त्या वेळच्या दरानुसार ७७५० ते १५४५० रुपये एवढी बोली मिळण्याची आशा या पोस्टरच्या लिलावदारांना होती. तरी हे पोस्टर बर्‍यापैकी नंतरचं असावं. साधारण १९७० च्या दशकात कुटुंब नियोजनाच्या जाहिरातींमधल्या चौकोनी कुटुंबाचं चित्र बदललं. आई, बाबा, मुलगा आणि मुलगी या सार्‍यांचे चेहरे वर्तुळाकार झाले. कुणालाही, कुठेही सहज रंगवता येईल, असं हे चित्र. त्याआधी बहुधा या छापील जाहिरातींचं काम (आर्टवर्क) निरनिराळ्या चित्रकारांकडून करवून घेतलं जात असावं. त्यामुळे १९६० च्या दशकात कुटुंब नियोजनाच्या जाहिरातींमधली कुटुंब निरनिराळी दिसायची.

या चित्रांमधल्या कुटुंबांनी नियोजनाचा प्रचार करता-करता कुटुंब या संकल्पनेबद्दलचे दृष्टिकोनही आपसूकपणे उघड केले. पहिल्या काही वर्षांमध्ये जणू शिकल्यासवरल्या सुखवस्तू लोकांसाठीच संततिनियमन आहे, अशा थाटात चित्रं काढलेली दिसत. रेडिओ, गुबगुबीत खुर्ची, गालीचा असलेल्या घरात पुरुष आणि मुलगा वाचत आहेत, पत्नी ‘सुविद्य’ असेल, पण खाली बसून तिच्या पतीनं जे काही वाचलं ते ती कौतुकानं ऐकून घेते आहे, तिची लाजाळू मुलगी तिच्यामागे लपते आहे, अशी सरकारी जाहिरात १९६४ सालची. पण १९६६ नंतर मात्र चित्र बदलू लागलं. जाकीट, गांधीटोपी घातलेला कामगार/ शेतकरी आणि त्याची कारभारीण हेही चित्रात आले. राजस्थान, उत्तर प्रदेशातही त्या-त्या प्रदेशातली वस्त्रं ल्यायलेले स्त्रीपुरुष या जाहिरातींमध्ये दिसू लागले. पण रुबाब पुरुषाचा आणि माया महिलेची, हे काही बदललं नाही. याला छेद देणारी ‘निरोध’ची जाहिरात १९६९ मधली असावी. एक बाप मायेनं आपल्या मुलीला (बहुधा मुलगीच असावी ती) ग्लासातून दूध पाजत आहे, असा छापील फोटो असलेली ही जाहिरात होती. फोटो दीडदोन फुटांपर्यंत मोठे करून थेट पत्र्यावर छापण्याचं तंत्र विकसित झाल्यामुळे १९७१ नंतर ही जाहिरात मुंबईच्या लोकलगाड्यांवरही दिसायची.

‘लाल त्रिकोण’ हे बोधचिन्ह प्रचारात आणण्याचं श्रेय भारतात तरी दीप त्यागी ऊर्फ धर्मेंद्रकुमार (डीके) त्यागी यांना दिलं जातं. प्रवाद असा की, मुळात त्याचे जनक फ्रँक वाइल्डर. मुद्दा तो नाही. लाल त्रिकोणाचा इतिहास थोडाबहुत नोंदला तरी गेलाय, पण वर्तुळाकार चेहर्‍यांच्या त्या कुटुंबाची कल्पना कोणाची? ती पहिल्यांदा कोणी चितारली?- याबद्दल काही म्हणता काहीच माहिती मिळत नाही. त्या चित्रकाराला सलामच. त्याच्या आधी कुटुंबाचं ‘भारतीयीकरण’ करण्याचे बरेच प्रयत्न झालेले दिसतात. पण भारतीय कुटुंबाची- हिमाचल प्रदेशपासून तमिळनाडूपर्यंत कुठल्याही लोकांना आपलीच वाटणारी प्रतिमा म्हणजे वर्तुळाकार चेहर्‍यांचं ते कुटुंब! हा चांगल्या अर्थानं, साधारणीकरणाचा उत्तम नमुना आहे.

त्या नमुनेदार वर्तुळाकार चेहर्‍यांच्या कुटुंबातून फक्त साधारणीकरण नव्हे तर आधुनिकीकरणही मूर्त झालं. हुबेहूब माणसासारखे नसले तरी ओळखू येणारे आणि टापटीप चेहरे. तेही मोजक्या रेषांच्या वापरातून साकारलेले. डिझाइन लोकांपर्यंत पोहोचवायचंच असेल तर तो सोपं हवं; तो सोपेपणा यात पुरेपूर. शाळकरी मुलांनाही कुटुंबाचं हे चित्र काढता येईल, इतका सुलभ आकार. आधुनिकतावादी (मॉडर्निस्ट) सौंदर्यदृष्टी ज्या भौमितिक आकारांना प्राधान्य देते, त्या सौंदर्यदृष्टीला मिळालेला हा कौटुंबिक भारतीय चेहरा… त्यामुळे हे कुटुंब जणू आधुनिकीकरणाच्या भारतीय प्रकल्पाचंही प्रतीक!

ते गोल चेहरे इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातले असतील; पण त्यामागचा आधुनिकीकरणाचा प्रकल्प नेहरूवादी होता. तो प्रकल्प आता मागे पडलाय. पण म्हणून कुटुंब नियोजनाची चित्रंसुद्धा पुन्हा बदलावीत? हा बदल गेल्या आठवड्यातल्या लोकसंख्या दिनी (११ जुलै) आसामच्या तिनसुकिया जिल्हा परिवार कल्याण विभागाच्या ट्वीटवर दिसला. पारंपरिक कपडे (जणू आसामात टीशर्ट, स्त्रियासाठी चुडीदार मिळतच नसावेत) पेहरून, भारतीय बैठकीत बसलेलं चौकोनी कुटुंब आता परत आलंय. भारतीय कुटुंबाच्या चित्राचं आधुनिकीकरणापासून पुन्हा परंपराप्रिय होत असणारं वर्तुळ जणू पूर्ण होणार, असंच तर त्या ‘गमोसा’ लेवून बसलेल्या पुरुषाच्या कुटुंबाभोवतीचं वर्तुळ सांगत नाहिये ना?

ऐंशी-नव्वदीतला मारा…

नोकरी व्यवसाय करून थकून भागून बिर्‍हाडात आलेल्यांसाठी दोन घटकांचा विरंगुळा संध्याकाळच्या काळात सिग्नेचर ट्यूनसह दूरदर्शन ऐंशी-पंच्याऐशी काळापर्यंत करीत होता. पुढे दुपारी दोनपासून मालिकांचा, माहिती-बोधपटांचा मारा व्हायला लागला. तेव्हा कुटुंबनियोजनाचा गीत-चित्रदर्शी प्रसार करणे सरकारला सोपे झाले. या काळातील गाजलेल्या कुटुंबनियोजन गीतांमध्ये ‘जरासी सावधानी जिंदगीभर आसानी…’ ही निरोधचे फायदे सांगणारी तसेच ‘बोल सखी बोल तेरा राज क्या है, क्या है तेरी खुषी का राज? तू बतादे हमको आज…’ ही ‘माला डी’ गर्भनिरोधक गोळ्यांची (हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांतील) जाहिरात शहरांतील गल्लीबोळांतील तसेच गावातील न कळत्या वयातील मुलांसाठी जाहीररीत्या गाण्याची बाब बनली होती. इतका तिचा प्रचार रेडिओ तसेच टीव्हीमधून उत्तमरीत्या झाला होता. सुनील गावसकर यांची क्रिकेट कारकीर्द गाजत असताना ‘धावा काढताना जितक्या जास्त तितक्या उत्तम पण मुलांबाबत तसे नाही.’ हे समजावून सांगत ‘तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल खरोखरीच प्रेम आहे का?’ हा प्रश्न विचारणारी जाहिरात कार्यक्रमांच्या दरम्यान सातत्याने दर्शन देई. याच काळात ‘पच्चीस पैसे मे तीन मिलते है’ हा निरोधचा तपशील देणारी समंजस-कर्तव्यदक्ष गृहिणीची जाहिरातदेखील लक्षवेधी ठरलेली. दोन हजारनंतर ‘डॉक्टर या केमिस्ट के सलाह से आज के जमाने की कौनसी भी गर्भनिरोधक गोली ले…’ हे सांगणारी जाहिरात शहरगावांत कुटुंबनियोजनाचे महत्त्व सरकारी वाहिन्यांवरून समजावत होती. पुढे सारीच शहरगावे खासगी वाहिन्यांच्या विळख्यात गेली. आज परदेशी विविध वैशिष्ट्यांचे निरोध जवळच्या औषध दुकानांत आलेलीत बुवा हे सांगणार्‍या अत्याकर्षक ललना अभिनित जाहिराती संध्याकाळी सातपासून टीव्हीच्या ‘प्राईम टाइम’मध्ये अबालवृद्धांच्या नेत्र आणि मनधक्क्यांसाठी सादर होत आहेत. ती देखील लोकसंख्या आटोक्यात ठेवणारी खारबेगमीच.

artwords@gmail.com