हल्ली, आयुष्य खूप म्हणजे खूपच वेगवान झालंय. पूर्वी एखादी कृती किंवा पद्धत सुरू होऊन तिची प्रथा, परंपरा, संस्कृती व्हायला शेकडो वर्षे जावी लागायची. आता, नवरात्रीला विशिष्ट दिवशी, विशिष्ट रंगांचे कपडे परिधान करायच्या खुळाला वीस-पंचवीस वर्षांत पुरातन सांस्कृतिक संचिताचा दर्जा मिळाला! इतकंच नव्हे तर त्या प्रत्येक दिवसाचे आणि रंगाचे पुराणातील व्यक्ती आणि घटनांशी नाते जुळविण्याचे कामही व्हॉट्सअॅप विद्यापीठाने पूर्णत्वास नेलेले आहेत.

‘‘वैयक्तिक वा सामाजिक जीवनातील एखादा क्षण सजवणे, साजरा करणं म्हणजे कर्मकांड’’ असं कुणीतरी म्हटलेलं असलं, आणि ‘कर्मकांड’ या शब्दाच्या भाळी जन्मत:च बदनामीचा टिळा लागलेला असला, तरी सण-उत्सवासारखी काही कर्मकांडं आपलं आयुष्य नीरस होण्यापासून वाचविण्यासाठी, आयुष्यात उत्साह भरण्यासाठी आणि क्षीण होऊन फडफडू लागलेली आशेची ज्योत तेवती ठेवण्यासाठी गरजेची असतात.

‘‘नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यात जो आनंद उपभोगायला मिळत नाही, जी चैन करायला मिळत नाही, ते उपभोगायला, करायला मिळणे म्हणजे सण साजरा करणे.’’ ही सणांची व्याख्या! वर्षभर तिन्हीत्रिकाळ अंधाराने ग्रासलेल्या आयुष्याच्या चार रात्री तरी दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाव्यात, फटाक्याच्या आणि संगीताच्या आवाजाने, गावा-शिवारात कायमस्वरूपी वस्तीला असलेल्या कंटाळवाण्या शांततेने कान टवकारून जागं व्हावं, रोजची चटणी-भाकरी खाऊन कंटाळलेल्या जिभेस काही चटपटीत खायला मिळावं, शेतातल्या शेणा-मातीशीच संबंध येणाऱ्या त्वचेला कधीतरी उटण्याचा, अत्तराचा स्पर्श व्हावा, चुरगळलेल्या, मळलेल्या कपड्यांच्या जागी अंगावर नवेकोरे परीटघडीचे कपडे घालून मिरवता यावे म्हणून सणांची निर्मिती झाली असावी. आता काळ बदलला, माणसांच्या गरजा बदलल्या, आवडी बदलल्या, काही प्रमाणात आर्थिक परिस्थितीही बदलली. पण एक गोष्ट मात्र चिरंतन आहे ती म्हणजे सर्वसामान्य माणसाचं गांजलेलं असणं! आणि त्यामुळेच या गांजलेल्या मनाला उन्नत करण्यासाठी आजही सणांची आवश्यकता आहे.

ज्या उत्सवातून, सणासमारंभातून कोणाचंही शोषण न होता, निखळ आनंद मिळतो आणि सर्वांना एकसारखा आनंद घेता येतो, असे सण साजरे करायला कुणाची हरकत असायचं काही कारण नाही. खरं तर, देव, धर्म, धार्मिकता, धर्माचरण आणि उत्सव यांचा संबंध लावू नये. मुळात सगळेच सण मानवी संस्कृतीतून आलेले आहेत. भारतात साजरे केले जाणारे बहुतेक सगळेच सण कृषी संस्कृतीशी जोडलेले आहेत. नंतरच्या काळात विविध समाजघटकांनी किंवा धर्मांनी ‘हायजॅक’ करून त्यांना आपल्या मिथक कथांत बसवलं किंवा त्या सणांसाठी नवीन मिथकं तयार केली.

‘सूर्याने धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करणे’ या एका खगोलशास्त्रीय घटनेवर भारतातील विविध प्रदेशांत साजरे केले जाणारे मकरसंक्रांत, लोहरी, पोंगल, पेड्डा पंडुगा, बिहू, भोगी इत्यादी सण हे यांचं उत्तम उदाहरण आहे. हिंदू नसलेले लोक लखलख दिव्यांची चंदेरी उधळण करणारी दिवाळी साजरी करतात, ख्रिास्ती नसलेले लोक सांताक्लॉजच्या कथेचा आनंद घेतात, नाताळ साजरा करतात. केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही मुस्लीम लोक संक्रांतीला पतंग उडवतात, कारण त्यांच्यासाठी तो उत्सव आहे, त्या सणांचा त्यांच्या संस्कृतीशी संबंध आहे, धर्माशी संबंध नाही.

सर्वच धर्मांत दिवा किंवा उजेड म्हणजे ज्ञान, चैतन्य, आत्मज्योत यांचं प्रतीक आहे. हिंदू धर्मात सूर्याला सूर्यनारायण असं नामाभिधान असून सूर्य हा जीवनदाता, साक्षीभाव व धर्माचे प्रतीक आहे. दिवाळीत बाह्य अंधारापेक्षा अंत:करणातील अज्ञान दूर करणं अपेक्षित आहे. बौद्ध धर्मात बोधी ( Enlightenment) म्हणजेच प्रकाश प्राप्त होणं. जैन धर्मात दिवा हे आत्मशुद्धीचे प्रतीक आहे. ख्रिाश्चन धर्मात ‘देव म्हणजे प्रकाश’ असं मानलं जातं आणि अंधाऱ्या हिवाळ्यातील प्रकाशाचा उत्सव म्हणून ख्रिासमस साजरा केला जातो.

इस्लाम धर्मात नूर म्हणजे ईश्वरी प्रकाशाचे वर्णन असून कुराणात ‘नूर’ हा दिव्य मार्गदर्शनाचा प्रतीक मानला गेला आहे. ज्यू (यहुदी) धर्मात तर ‘हनुक्का’ म्हणजे अंधारावर उजेडाचा विजय अशी संज्ञा वापरलेली आहे. पारशी धर्मात अग्नी किंवा उजेड हा पवित्र मानला जातो. अशा प्रकारे जवळजवळ सर्वच धर्मांत अंधार हे अज्ञान, पाप आणि भ्रमाचे प्रतीक मानले गेले असून उजेड हे ज्ञान, सत्य आणि ईश्वराचे किंवा जागृतीचे प्रतीक मानले गेले आहे. बहुधा यामुळेच, दिवाळी आणि नाताळ (ख्रिासमस) या प्रकाशाच्या सणांना इतर सणांच्या मानाने अधिक सर्वधर्मीय स्वीकारार्हता आणि मान्यता मिळत असावी.

प्रभू रामाचे अयोध्येत परतणे आणि येशू ख्रिास्ताचा जन्म ही दिवाळी आणि ख्रिासमस या सणांची भिन्न धार्मिक कारणे असली तरी त्यांच्या साजऱ्या करण्यात बऱ्यापैकी साम्य आहे. दिवाळी आणि ख्रिासमस हे दोन्ही सण आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहेत. दोन्ही सणांत प्रकाशाला महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळीत दिवे- कंदील, तर ख्रिासमसमध्ये रंगीबेरंगी लाइट्स वापरले जातात. दोन्ही सणांच्या निमित्ताने कुटुंबीय, नातेवाईक एकत्र येतात. नवीन कपडे घालून नटणं, एरवी खाल्ले न जाणारे गोडधोड खाद्यापदार्थ बनवून खाणं, घरादाराची सुंदर सजावट करणं, एकमेकांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देणं, ही या दोन्ही सणांची खासियत आहे.

आपल्याकडे विविध सण, विशेषत: दिवाळी आणि नाताळ ज्या प्रकारे साजरे केले जात आहेत त्याकडे त्रयस्थपणे पाहिल्यास आपल्याला जाणवेल की, गेल्या दोन-अडीच दशकांत या सणांचे स्वरूप एका विशिष्ट धर्माचा धार्मिक कार्यक्रम असे न राहता ते सर्वधर्मीय उत्सवाचे होत आहे. याला अनेक घटक कारणीभूत असले तरी त्यात मुख्य आहे बाजाराधिष्ठित समाजव्यवस्था!

विक्रेते सदैव आपल्या वस्तू आणि सेवांच्या घाऊक विक्रीसाठी निमित्त शोधत असतात. दिवाळी असो की नाताळ यांसारखे सण त्यांना ते निमित्त पुरवितात. मग बाजारपेठा फुलतात, सुपरमार्केट, मॉल इथे महिना-महिना आधी त्या त्या सणाला साजेल अशी सजावट केली जाते. विविध उत्पादक आपल्या उत्पादनांवर विशेष सूट जाहीर करतात. ऑनलाइन स्थळांवरून आकर्षक सेलच्या जाहिरातीचा मारा सुरू होतो.

किमतीबाबत संवेदनशील असलेला भारतीय ग्राहक स्वस्त चिनी मालाला भुलतो हे ठाऊक असल्याने चीनसारखा देश प्रचंड संख्येने माल भारतीय बाजारात ओततो. दिवाळीला सिग्नलवर आकाशकंदील आणि विजेच्या माळा विकणारा पोऱ्या ख्रिासमसच्या वेळी चांदणी आणि सांताक्लॉजची टोपी विकू लागतो. फटाक्यांना तर कुठल्याच देवा-धर्माच्या भक्तांचं वावडं नसतं. ते सगळ्या धर्मांच्या अनुयायांना सारखंच आकर्षित करतात आणि सगळ्या सजीवांच्या कर्णेंद्रियांना सारखाच त्रास देतात.

जागतिकीकरण, माध्यमांचा प्रभाव, मिश्र समाजरचना, भोगवादी जीवनशैली आणि धर्मापेक्षा माणुसकीला प्राधान्य देण्याची मानसिकता यांमुळे दिवाळी आणि ख्रिासमससारखे सण हळूहळू ‘धार्मिक’पेक्षा अधिक ‘सांस्कृतिक आणि सर्वधर्मीय’ स्वरूप घेत आहेत; पण धर्म पूर्णपणे मागे पडलेला नाही. अनेक घरांमध्ये, विशेषत: नव्या पिढीसाठी दिवाळी ही फराळ, दिवे, भेटवस्तू, सुट्टी पुरती आणि ख्रिासमस हा केक, सजावट, सांताक्लॉज उत्सवापुरता मर्यादित झाला असून पूजा, प्रार्थना, धार्मिक विधी औपचारिक किंवा दुय्यम झाले आहेत. शहरी, शिक्षित, तरुण वर्गासाठी सण हा एक कार्यक्रम ( Event) आणि अनुभव ( Experience) झाला आहे, तो आस्थेचा विषय राहिलेला नाहीये.

आज हिंदू घरांत ख्रिासमस ट्री दिसतो आणि ख्रिास्ती घरात दिवाळीचे दिवे लागतात. कार्यालये, शाळा, मॉल्स, सोसायट्या इथे धर्म न पाहता सण साजरे केले जातात. ‘आपण कोणत्या धर्माचे?’ यापेक्षा ‘आपण एकत्र साजरे करतो का?’ हे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे सण धर्माच्या चौकटीतून बाहेर येऊन समाजाच्या अंगणात येत आहेत… याचा अर्थ धर्म संपू लागलेत असा नव्हे! श्रद्धावान लोक आजही दिवाळीत लक्ष्मीपूजन करतात आणि ख्रिासमसमध्ये चर्चमध्ये जातात. ग्रामीण भाग, परंपरावादी कुटुंबे, वृद्ध पिढी यांच्यासाठी सण अजूनही धार्मिकच आहेत. फरक इतकाच आहे की, जेन-झीसाठी धर्म आता ‘लादलेला’ नसून ‘निवडीचा’ झाला आहे.

या विचारसरणीमुळे सणांचा मूळ आशय पातळ होऊन सण केवळ ‘इव्हेंट’ बनण्याचा, बाजारपेठेने सणांवर (पर्यायाने धर्मावर) वर्चस्व गाजविण्याचा धोका असला तरी यामुळे सामाजिक सलोखा वाढणार असेल, धार्मिक कट्टरता कमी होणार असेल, आपलेपणाची भावना बळकट होणार असेल तर सणांवरील धार्मिक पगडा जाऊन त्याचे उत्सवीकरण व्हायलाही हरकत नसावी. उत्सव साजरे करताना स्वत:च्या आणि इतरांच्या शारीरिक-मानसिक-सामाजिक स्वास्थ्याची काळजी घेणे, त्यासाठी योग्य ते सुरक्षिततेचे उपाय योजणे आणि चुकून काही अपघात झालाच तर त्यावर तात्काळ इलाज करता येईल अशी आगाऊ तरतूद करणे या तिन्ही बाबींचे भान सुटू देता कामा नये, म्हणजे झाले!

जागतिकीकरणामुळे आपल्या देशातील बरेच लोक युरोप अमेरिकेतील ख्रिास्तीबहुल देशांत काम करतात. काही लोक भारतातच राहून परदेशी कंपन्यांत किंवा त्यांच्यासाठी काम करतात. त्यामुळे ख्रिासमससाठी सुट्टी मिळण्याची आणि ख्रिासमस साजरा करण्याची युरोपीय व्यवस्थापनाची संस्कृती त्यांच्यापर्यंत झिरपू लागली आहे. मुस्लीम देशांत दिवाळी आणि ख्रिासमस हा आस्थेचा नव्हे, तर अस्तित्वाचा आणि सहअस्तित्वाचा उत्सव असतो. मुस्लीमबहुल आखाती देशांत सार्वजनिक ठिकाणी बिगर-मुस्लीम धार्मिक कार्यक्रमासाठी फटाके, मिरवणुका, मोठ्या धार्मिक घोषणा अशा गोष्टींना परवानगी नाही. तरीही तिथल्या अर्थव्यवस्थेवर असलेला युरोप-अमेरिकेचा पगडा आणि तिथे काम करण्यासाठी प्रचंड संख्येने गेलेले भारतीय यामुळे मर्यादित प्रमाणात का होईना दिवाळी तसेच ख्रिासमससारखे सण (आपल्या धर्माच्या चौकटीत राहून) त्यांनीही स्वीकारले आहेत.

हिंदूंचा गणेशोत्सव, ख्रिाश्चनांचा ईस्टर, मुस्लिमांची ईद या सणांवरील धर्माचा पगडा ठळकपणे दिसून येतो. आजच्या घडीला तरी हे सण धर्मापासून वेगळे पाहता येत नाहीत. दसरा, अक्षय्य तृतीया, होळी आणि गुढीपाडव्यासारखे काही सण आहेत, ज्यांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढण्याकरिता बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था पराकोटीचे प्रयत्न करीत आहे. त्याच वेळी परंपरावादी समाज या सणांवरील धर्माचा पगडा अधिकाधिक घट्ट करीत आहे. मात्र दिवाळी आणि ख्रिासमस हे सण आपल्यावरील धर्माचा ठसा पुसण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेत. दिवाळी आणि ख्रिासमससारख्या सणांवरील धर्मांची पकड सैल होत जाणे रूढीवादी व्यवस्थेला मानवणारे नाही. तरीही आनंद साजरा करणे या मूळ उद्दिष्टासाठी निर्माण झालेले हे धर्म, जे धर्माच्या चौकटीत बंदिस्त झाले होते ते मुक्त होऊन पुन:श्च आपल्या मूळ उद्दिष्टांकडे परतत असतील तर ती नक्कीच स्वागतार्ह बाब आहे.

सण हे धर्मापेक्षा, माणसांना, समाजगटांना जोडणारे माणुसकीचे उत्सव व्हायला हवेत हे कितीही खरं असलं तरी शेकडो-हजारो वर्षांपासून जे सण धर्माशी जोडले गेले आहेत ते असे तडकाफडकी धर्मापासून विलग होणार नाहीत, करताही येणार नाहीत. सणांत धर्म असेल तर तो असण्यात काही गैर नाहीये. मात्र तो अंतर्वस्त्रासारखा ज्याच्या त्याच्या अंतरंगात, खासगी आणि फक्त त्याच्यापुरता असेल, सुपरमॅनसारखा पँटवर चड्डी घालणारा नसेल तर सणांच्या सर्वसमावेशक होण्याची शक्यता अधिक बळावू शकेल.

आकाशकंदील, चांदण्या, पणत्या, रंगीबेरंगी विजेचे दिवे, ख्रिासमस ट्री, सांताक्लॉज, कपाळावरील टिळे, डोक्यावरील टोपी, फटाके, शंकरपाळ्या, चकल्या, केक, शीरखुर्मा, नाचगाणी यांना धर्म नसतो. गांजलेल्या जिवांना दोन घटका आनंद देणे हाच त्यांचा ‘गुण-धर्म’ ‘सांताक्लॉज हा आपल्या संस्कृतीचा भाग नाहीये, सांताक्लॉज असा कुणी नसतोच’ हे सत्य मुलांना सांगून आपण झोपेत असताना मिळणाऱ्या अनपेक्षित भेटवस्तूचा आनंद त्यांच्यापासून हिरावून घेण्याने कुठलं मोठं हित साधणार आहोत? उदात्त, मंगल, आनंददायी आणि निरुपद्रवी अशा श्रद्धा, परंपरांचे धर्माधर्मात आदानप्रदान होणे मानवतेच्या दृष्टीने अधिक हितकारक नाही का?

आपला आनंद कुठल्या धर्मग्रंथात, कुणा धर्मगुरूंच्या प्रवचनात किंवा कुणा बाबा-बुवांच्या सत्संगात नसून, तो आपल्या आत आहे आणि तोच आपल्याला शोधायचा आहे. त्या आनंदाचा उत्सव साजरा करायचा आहे. हे जाणून दिवाळी आणि नाताळसारखे सर्वधर्मीय सण सारख्याच उत्साहाने साजरे करणाऱ्या लोकांची संख्या वाढो. हीच आपल्या सगळ्यांना नाताळ सणाच्या निमित्ताने शुभेच्छा! मेरी ख्रिासमस!

चीनव्याप्त उत्सव…

साधारणत: २००४ च्या आसपास भारतात चिनी बनावटीच्या गणेशमूर्ती दाखल झाल्या. त्याच काळात दिवाळीत विविध प्रकारच्या रोषणाईसाठी लागणारे दिवे, दिव्यांच्या माळा तिथून आयात होऊ लागल्या. दर वर्षागणिक त्यांची आकर्षकता आणि उपलब्धता वाढतच गेली. शहरांतील बाजारपेठा ते गावांतील आठवडी बाजारापर्यंत या स्थानिक उत्पादनांहून अधिक स्वस्त असलेल्या वस्तूंचा पुरवठा हा या वस्तू खरेदीचा मोह सर्वांना पाडणारा ठरला. २०२२ साली चिनी वस्तू महोत्सवात कमी दिसल्या. तरीही दहा रुपयांच्या सेलवर चालणाऱ्या पणत्यांपासून ते आकर्षक ‘ख्रिासमस ट्री’पर्यंत बऱ्याच उत्सवांवर चीनच्या उत्पादनांची छाप आहे. सिग्नलवरील फेरीवाल्यांपासून मॉलमधील दुकानांत दोन दशकांत सांताटोपीची चंगळदेखील चिनी कंपन्यांच्या स्वस्त मालामुळे शक्य झाली. त्यामुळे बाजारांतील उत्सवपूरक वस्तूंची मुबलक उपलब्धतादेखील सणांना कुण्या एकट्या धर्मापुरते राखत नाही.

बदलता माध्यमस्नेह…

जेनझी पिढी ही सर्वाधिक माध्यमस्नेही. गेल्या दशकामध्ये फेसबुक जितके व्यापले होते, त्याच्या कैक पटींनी ही पिढी त्यापुढे आलेल्या सर्व माध्यमांशी जोडली गेली. एखाद्या कुटुंब सदस्यांसारखे समवयीन तरुणतरुणी या समाजमाध्यमांत वावरू लागले. त्यातून प्रत्येक सण साजरा करण्यासाठी जागा ठरविण्याकडे सर्व धर्मांतील तरुणतरुणींचा कल वाढत गेला. मराठी नववर्ष दिवाळी नाताळ आदी सणांत प्रत्येक शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी उत्सवी वातावरण त्यामुळे हटकून दिसते. रमजान महिन्यात मुंबईतील महंमद अली रोड, नाशिकसह राज्यातील अनेक भागांतील मोहल्ले सर्वधर्मीय खवय्यांनी रात्रभर गजबजलेले राहतात. वांद्रे येथील माऊंट मेरीची जत्रादेखील कुणा एका धर्माच्या लोकांपुरती उरलेली नाही.

सॅबी परेरा | sabypereira@gmail.com