हेमंत प्रकाश राजोपाध्ये rajopadhyehemant@gmail.com

सध्या ऐतिहासिक विषयांवरील चित्रपट आणि मालिकांचे पेव फुटले आहे. त्यांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतिहासाचे पुनरावलोकन हा जरी या चित्रपटांचा हेतू असला तरीही ऐतिहासिक सत्याशी ते प्रामाणिक असतातच असे नाही. किंबहुना, कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली संबंधित इतिहासपुरुषाचे आणि त्याच्या कर्तृत्वाचे उदात्तीकरण करण्याकडेच त्यांचा कल असतो. या चित्रपटांना मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिसादामागील सामाजिक कारणे धुंडाळण्याचा प्रयत्न करणारा लेख..

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

सर्वसाधारण नागर मराठी व भारतीय चित्रपट प्रेक्षकाची हमखास दाद मिळवणारे, आवडते चित्रपट प्रकार (Genre) कोणते? असा प्रश्न केल्यास सामान्यत: ‘कौटुंबिक आणि ऐतिहासिक  चित्रपट’ हेच उत्तर मिळेल. स्वातंत्र्योत्तर काळात लढावी लागलेली युद्धे, परकीय हल्ल्यांना आपल्या सैन्याने दिलेली चोख उत्तरे, मुघल काळातील भव्यता आणि सरंजाम, छत्रपती शिवरायांच्या चरित्रावरचे किंवा शिवकाळातील/ शिवोत्तरकाळातील शूर रणशार्दूलांची कामगिरी हे आपल्याकडच्या ऐतिहासिक चित्रपटांत हाताळले जाणारे मुख्य व नेहमीचे विषय. या विषयांवरील चित्रपट-मालिकांना आपल्या देशात तुफान लोकप्रियता आणि संवेदनशील प्रतिसाद मिळतो. या विषयांवर चित्रपट आला की पुढचे दीड-दोन आठवडे वृत्तवाहिन्यांवरील चर्चा ते समाजमाध्यमांवरील वेगवेगळे ग्रूप्स-कट्टे अशा सर्वच व्यासपीठांवर अत्यंत हिरीरीने, त्वेषाने वाद झडतात. पात्रसंयोजन, गीतांचे बोल, ऐतिहासिक महापुरुष मानल्या गेलेल्या व्यक्तींच्या भूमिकांतील पात्रांची नृत्ये, ऐतिहासिक तपशिलांविषयीचे विचारसरणीनिहाय आक्षेप इत्यादी ‘मायलेज’ मिळवून देणारे मुद्दे या व्यासपीठांवर मांडले जातात. (प्रस्तुत लेखदेखील त्यात गणला जाऊ शकतो.) या सगळ्याच्या मुळाशी असतो सामूहिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक आणि अस्मिताविषयक आग्रह!  

अनेकदा या आग्रहांपैकी बरेचसे आग्रह उचितही असतात. उदा. अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक चित्रपटांवरचे काही आक्षेप इतिहासाच्या साक्षेपी अभ्यासिका प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी ‘हिस्टोरियन रिअ‍ॅक्टस्’ या ‘indie journal’वर प्रकाशित झालेल्या मालिकेत रंजकरीत्या दाखवून दिले आहेत. आणखी काही अशा ठळक गमती नमूद करणं निश्चितच औचित्यपूर्ण ठरेल. नुकत्याच आलेल्या एका चित्रपटात नरवीर बाजी प्रभूदेशपांडे पावनिखडीच्या तोंडाशी युद्धाला ललकारणाऱ्या गनिमाला बघून एकाच वेळी अतिशय विनोदी व हिणकस वाटेल अशा पुणेरी टोनमध्ये ‘‘चल!’’ असा उद्गार काढतात. प्रसंगाचे गांभीर्य बघता तो ‘‘चल!’’ विसंगत वाटतो. शिवछत्रपतींच्या  कुठल्याशा मालिकेतील शिवराय सुरतेमध्ये जाऊन गुजराती भाषेत संवाद साधतात. आणखी एकीकडे शंभूराजे चक्क फडर्य़ा इंग्रजीत बोलतात. पेशवाईवरील एका मालिकेत कुठल्याशा पूजेत उदक सोडून झाल्यावर भटजी पेशव्यांना हात पुसण्यासाठी टर्किश नॅपकीन देतात. इतिहासाकडे तपशिलात्मक जंत्री आणि (/किंवा) सैद्धांतिक मांडणी अशा दोन्ही अंगांनी गांभीर्याने बघणाऱ्या  अभ्यासकांना मराठी आणि हिंदीतही बनलेल्या ऐतिहासिक चित्रपटांतील तपशिलांच्या आणि सामान्यज्ञानाच्या हास्यास्पद पाच-पन्नास चुका बसल्या बसल्या सहज काढता येतील. अशा चित्रपटांचे निर्मितीमूल्य, संबंधित चित्रपटांतील विशिष्ट प्रसंग आणि त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया या गोष्टींतून आपल्या समाजातील काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित होतात. त्यातून केवळ चित्रपटविषयकच नाही, तर इतिहास लेखनविषयक चळवळी, सामाजिक आरोग्य व प्रगल्भतेसंदर्भातही काही निष्कर्ष काढता येऊ शकतात.

पण त्याआधी आपल्या इतिहासातील काही महत्त्वाच्या तपशिलांचा विचार करू या.  थोर नाटककार ‘भास’ हा अभिजात संस्कृत साहित्यातील महत्त्वाचा साहित्यकार. संस्कृत साहित्यरसिकांत त्याला ‘कविताकामिनीचं हास्य’ असं बिरुद बहाल केलं गेलेलं आहे.  ‘प्रतिज्ञायौगंधरायण’, ‘स्वप्नवासवदत्त’, ‘प्रतिमा’, ‘कर्णभार’, ‘ऊरुभंग’ या संस्कृतातील महत्त्वाच्या नाटकांचा कर्ता म्हणून त्याचा लौकिक जगभरातील संस्कृत अभ्यासक्षेत्रात आजही कायम आहे. पावित्र्य, शुद्धता आणि धार्मिक-पौराणिक अभिनिवेशाबाबत कडव्या आग्रही समजल्या जाणाऱ्या संस्कृत भाषाविश्वात भासाची ही नाटके अत्यंत महत्त्वाची व लोकप्रिय आहेत. कालिदासपूर्व काळापासून आजतागायत त्याच्या नाटकांचे प्रयोग रंगभूमीवर होत आहेत. त्याच्या नाटकांपैकी ‘प्रतिज्ञायौगंधरायण’, ‘स्वप्नवासवदत्त’ गुणाढय़ाच्या ‘बृहत्कथा’ या पैशाची भाषेतील काव्यातील कथांवरून, तर ‘प्रतिमा’, ‘ऊरुभंग’ आणि ‘कर्णभार’ ही नाटके रामायण आणि महाभारतावरून प्रेरित आहेत. भासाने आपल्या अद्भुत प्रतिभेने आणि स्वतंत्र प्रज्ञेद्वारे या तिन्ही नाटकांत अनुक्रमे कैकेयी, दुर्योधन आणि कर्ण या खलनायक म्हणून जनमानसात रूढ झालेल्या पात्रांना काहीशी सहानुभूती मिळेल अशा रीतीने चित्रित केले आहे. वास्तविक भासाच्या काळातही (साधारणत: इ. स. पू. १ ते इ. स. २) दुर्योधन, कर्ण, कैकेयी ही पात्रे खलनायक म्हणून लोकमानसात रुजलेली होती. विशिष्ट पात्रे लोकमानसात खलनायक म्हणून रुजलेली असतात याचाच दुसरा अर्थ नायक म्हणून रुजलेल्या पात्रांचे गौरवीकरण समाजात रूढ  झालेले असते. त्यानुसार अनुक्रमे श्रीराम, सीता व पांडव यांना नायक म्हणून नैतिकतेचे महत्तम आदर्श मानले गेलेले होते ही बाबदेखील उघड आहे. रामायण आणि महाभारताच्या रचनाकाळाचा इतिहास चिकित्सकपणे बघता श्रीराम व सीता यांचे ईश्वरत्व आणि पांडवांचे आदर्शत्व प्रस्थापित झालेले/ होऊ लागल्याचा काळ भासाला समकालीन होता असं  दिसून येतं. काही ठिकाणी अर्जुनासारख्या नायकाविषयीची पूज्यबुद्धी असलेले ‘अर्जुनायन’ नामक लोकसमूहदेखील प्रस्थापित असल्याचे बौद्ध तंत्र ग्रंथ ‘महामयुरी’ (यात यक्ष ‘अर्जुन’, यक्ष ‘दुर्योधन’ यांच्याविषयीचा पूज्यभाव दिसतो.) किंवा कौटिलीय अर्थशास्त्र, पाणिनीची ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथांतून दिसते. अशावेळी खलनायक म्हणून प्रस्थापित असलेल्या पात्रांचे उदात्तीकरण करणारा किंवा या पात्रांच्या रूढ प्रतिमेला छेद देत समांतर पात्ररचना करणारा भास उठून दिसतो.

मात्र, ही बाब केवळ भासाच्या बंडखोरीपुरती मर्यादित राहत नाही. भासाच्या या समांतर पात्ररचनेला तत्कालीन समाजानेदेखील उचलून धरले आणि त्याच्या क्रांतिकारी प्रतिमेला गौरविले असल्याचे दिसून येते. ‘सूत्रधाराला समोर ठेवून वेगवेगळ्या/ स्वतंत्र (वैचारिक) भूमिका घेऊन नाटके लिहिणारा भास हा (देवासुर संग्रामात) देवकुळ विजयी होते, तसा साहित्य क्षेत्रात यशस्वी झाल्याचं बाणभट्टाने हर्षचरितात म्हटले आहे. साक्षात् कालिदासानेही ‘भासाच्या साहित्यासमोर माझा काय पाड?’ अशी प्रांजळ भूमिका घेत भासाविषयीचा पूज्यभाव प्रकट केलेला दिसतो. याचाच अर्थ काहीशी बंडखोर भूमिका घेणाऱ्या भासाच्या या नाटकांना रसिकांनीदेखील काहीही हरकत न घेता उचलून धरले. अर्थात नाटक किंवा नाटय़प्रतिभा म्हणून एकीकडे अशा बंडखोर पात्ररचना एकीकडे गाजत असताना त्याच समाजात संबंधित नायकाला देवता म्हणून कमालीची लोकमान्यता मिळण्याची प्रक्रियादेखील विनासायास सुरू होती. या समांतर प्रक्रिया सुरू असतानाही भासाच्या स्वतंत्र प्रतिभेविषयी, बंडखोरीविषयी आक्षेप घेतल्याचे संदर्भ आजवर तरी संस्कृत साहित्यात दिसून आलेले नाहीत.

आजच्या काळात ऐतिहासिक, पौराणिक चरित्रे, प्रसंगांवर चित्रपट बनवणे तितकेच प्रतिष्ठेचे ठरते आहे. मात्र, ज्या काळावर, घटनांवर आणि पौराणिक प्रसंगांवर ते बेतलेले असतात, त्या घटनांविषयी प्रातिभस्वातंत्र्य घेण्याचे धाडस एखादा चित्रपट दिग्दर्शक करू शकेल का? त्यासाठी पूरक अशी अनुकूलता लाभेल इतकी समज, संयम आणि प्रगल्भता भारतीय समाज टिकवून आहे का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या वाचकांना- खरे तर समाजातील जवळपास सर्वानाच माहिती आहेत. त्यामुळे ती इथं नमूद करण्याला काही अर्थ नाही. (किंवा खरे तर तसे उघड न लिहिण्याला एक सूचक अर्थ आहे.) ही बाब केवळ प्राचीन किंवा मध्ययुगीन महापुरुषांपुरती आणि चित्रपटसृष्टीपुरतीच मर्यादित नसून, अकादमिक, सामाजिक, वैचारिक क्षेत्रात किंवा माध्यमांच्या क्षेत्रात आधुनिक काळातल्या अनेक धर्मपुरुषांची, राजकीय-सामजिक नेते, तत्त्वज्ञ यांची चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य किती प्रमाणात उपलब्ध आहे याचं उत्तरदेखील आपण सर्व जाणतो.

या सामाजिक, राजकीय वास्तवाखेरीज आणखी काही सामाजिक सत्ये चित्रपटांच्या सामाजिकतेविषयी मांडणे क्रमप्राप्त आहे. वेदकाळ, बौद्ध-जैनकाळ, रामायण-महाभारतकाळ, मुघलकाळ, शिवकाळ किंवा गांधी-आंबेडकर-नेहरू-सावरकर-भगतसिंग यांचा काळ म्हणजे त्या महनीय व्यक्तींचीच चरित्रे अशी एक धारणा आपल्या लोकप्रिय साहित्यविश्वात आणि चित्रपटविश्वात रूढ झालेली दिसते. वास्तवात सर्वच काळांत दिसून येणाऱ्या कमालीच्या सामाजिक गुंतागुंती आणि विसंगतता हे भारतीय समाजाचे (खरे तर जगभरातल्या सर्वच समाजसमूहांचे!) व्यवच्छेदक लक्षण. त्यामुळे संबंधित काळाची व्याप्ती या महनीय व्यक्तींच्या पल्याड जाऊन  त्यांचे कार्यकर्ते असलेले किंवा नसलेले समूह, त्यांच्या जीवनशैलीला प्रभावित करणाऱ्या राजकीय अर्थव्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या शेकडो सामाजिक गुंतागुंती आणि विसंगती यांच्या चित्रणातून अधिक व्यापकरीत्या व्यक्त होऊ शकते. तसं चित्रण करणाऱ्या कथा, कहाण्या आपल्या देशातील प्रादेशिक भाषांतील साहित्यात कमी नाहीत. बरे, या विसंगती केवळ राजकीय/ सांस्कृतिकदृष्टय़ा केवळ डाव्या/ समाजवादी किंवा उजव्या वैचारिक तथ्यांच्या भोवतीच केंद्रित आहेत असेही नाही. मात्र, आपल्याकडच्या ऐतिहासिक चित्रपटांत किंवा चरित्रपटांतल्या प्रयोगशीलतेला (सन्मान्य अपवाद वगळता) अस्मिताकेंद्री भावनांचा अनुनय किंवा त्या भावनांचा दबाव अंगवळणी पडला आहे की काय, असा प्रश्न पडतो.  वर म्हटले त्यानुसार ऐतिहासिक सामाजिक तथ्ये किंवा विविधांगी चित्रणे केवळ नायक-खलनायकांच्या चरित्र-गौरवीकरणापुरती किंवा खलनायकीकरणापुरतीच (म्हणजे बाजारभाव/ लोकप्रिय संवेदनांपुरतीच) मर्यादित असतात. तत्कालीन समाजातील सामान्य माणसांच्या आयुष्यातील प्रसंग, त्यांची सामाजिक-आर्थिक-राजकीय स्थिती, त्यांचे अ-नागर असे जीवनमान व सामान्यांची ‘भाषा’ यांचं प्रतिनिधित्व करणारी नाटके आणि चित्रपटांचा दुष्काळ मात्र संपायचे नाव घेत नाही. विजय तेंडुलकरांची ऐतिहासिक-सामाजिक भूमिकांविषयीची प्रयोगशीलता आणि साहस यांनी ७०-८०चं दशक गाजवलं. अलीकडे दगड भिरकावून व्यवस्थेला तडा देण्याचे साहस करणारा नागराज मंजुळेंचा जब्या गाजला. प्रायोगिक रंगभूमीवर केल्या जाणाऱ्या अनेक प्रयोगांचीही दखल आपल्याला घ्यायला हवी. मात्र, चित्रपटसृष्टीचा विचार केल्यास (अलीकडच्या काळात नागराज मंजुळे, सुमित्रा भावे-सुकथनकर, उमेश-गिरीश कुलकर्णी यांच्या चित्रपटांचे सन्मान्य अपवाद सोडल्यास) असे विषय हाताळण्याची वारंवारिता आणि त्यांना मिळणारा लोकाश्रय व राजाश्रय याचा विचार आपल्याकडे केवळ विद्यापीठीय चर्चासत्रांपुरताच होताना दिसतो.

मानवी देहात अवतरल्यावर साक्षात् ईश्वरदेखील मानवी संवेदना, मानवी आयुष्यातील मर्यादांचे पालन करतो. काम-क्रोध-स्नेह-लोभ-मोह इत्यादी विकारांच्या व मानवी संवेदनांच्या मर्यादांत आनंदाने जखडून घेतो असं मोठय़ा कौतुकाने सांगणारी शेकडो काव्ये धार्मिक, राष्ट्राभिमानी, संस्कृतिप्रेमी मंडळींच्या नित्य वाचन-श्रवणाचा (आणि ‘दूर-दर्शना’चा!) अविभाज्य भाग आहेत. ईश्वरी श्रद्धा आणि त्या श्रद्धांचा दंभ मिरवणाऱ्या व्यवस्थांमधली विसंगती यांवर प्रखर शब्दांत आघात करणारे अनेक तत्त्वज्ञ, संत, अवधूत सिद्ध आपल्याकडे पूजले जातात. ही मतांची अभिव्यक्ती, त्यांची विविधता कीर्तनासारख्या लोकाभिमुख माध्यमांतून प्रकट केली जाई. ती व्यक्त होताना कीर्तनकारांकडून, संतांकडून तथाकथित वात्रट, अश्लील वाक्प्रचार, किस्सेदेखील सांगितले जात. अशी स्मृती जागवणारे, संदर्भ दाखवणारे अनेक अभ्यासू/ वडीलधारे आजही आपल्या भोवतालात आहेत. भारतीय उपखंडातील चित्रपटसृष्टीला शेकडो विविधांगी वैचारिकतांचे प्रतिनिधित्व करणारी रामायण, महाभारतकथा, जातके आणि देवतांच्या आख्यानांना प्रहसनाद्वारे मांडणाऱ्या नाटय़परंपरेची अत्यंत गौरवशाली पूर्वपीठिका आहे. सामान्य, गरीब घरात जन्मलेल्या भिक्षुकांच्या, वीरांच्या कर्तृत्वगौरवापासून ते मुजोर पंडितांच्या, उन्मत्त राजांच्या, व्यापाऱ्यांच्या, ऋषींच्या गर्वहरणाच्या, इतकेच काय- अंतर्गत सांप्रदायिक स्पर्धेतून एकमेकांचे खून पाडल्याचे किस्से सांगणाऱ्या अनेक साहित्यकृतीदेखील हिंदू, बौद्ध, जैन, मुस्लीम धर्मविश्वात लोकप्रिय आहेत. हे ग्रंथ, ही आख्याने त्या काळात माध्यमांची, कथाकथनाची, लोकजागरणाची भूमिका बजावत असे मानले जाते. त्यांतून सामाजिक-राजकीय भूमिकांतील वैविध्यही बिनदिक्कतपणे मांडले जाई. चित्रपट हे माध्यम या प्राचीन माध्यमांची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्यास समर्थ असताना आपल्याकडे ते वैविध्य जपले का जात नाही, हा विचार लोकशाहीवादी म्हणवून घेणाऱ्या आपल्या समाजाने करणे अगत्याचे झाले आहे.

कवी भास असो, विविध रामायणांचे, महाभारतकथांचे कर्ते असोत किंवा धार्मिक कथानकांवर बेतलेल्या विडंबनात्मक गवळणी, वगांचे रचयिते असोत; सामाजिक बहुरंगीत्वाचे हे सारे चितारी भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचे खरे शिलेदार होते. विशिष्ट एकच एक विचारसरणी प्रमाणित करण्याच्या आग्रहातून निर्माण झालेले चित्रपट, विशिष्ट एकाच साहित्यकृतीतून उचललेले संवाद व व्यक्तिचित्रे प्रमाणित करणाऱ्या एकसाची चित्रपटांचे सातत्य सांस्कृतिक वैविध्याने नटलेल्या संस्कृतीच्या प्रवाहाला बाधा ठरू शकतात.

१९७९ साली प्रमोद काळे या अभ्यासकांनी  EPW ( Economic And Political Weekly या नामांकित नियतकालिकात लिहिलेल्या ‘Ideas, Ideals and the Market : A Study of Marathi Films’ या निबंधात ‘‘केरळ, बंगाल, तामिळनाडू, कर्नाटकातील चित्रपट निर्माते उजव्या, डाव्या वगैरे विविधांगी राजकीय विचारसरणीचे चित्रण करणारे सिनेमे बनवत असतात. परंतु मराठी चित्रपट मात्र गांधीवादी समाजवादाच्या नावाखाली साचेबद्ध चित्रपट बनवण्यातच (महाराष्ट्रातल्या सडक्या राजकीय व्यवस्थेचे चित्रण करणारा ‘सामना’ हा चित्रपट अपवाद!) धन्यता मानतात..’’ असे नमूद केले आहे. एकीकडे गांधीवादी समाजवाद आणि दुसरीकडे राष्ट्रवादाने भारलेल्या ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती १९६०-७०च्या दशकात होत असे. आता ५० वर्षांनीदेखील ‘गांधीवादी समाजवादा’चेच नाव पुढे करणाऱ्या गटांच्या राजकीय उत्कर्षांच्या काळातही गांधीवादी समाजवाद नावापुरताही मिळत नसला तरी ऐतिहासिक चित्रपटांच्या मालिकांनी आणि पौराणिक सीरियल्सने जपलेली साचेबद्धता काही बदलाची लक्षणे दाखवत नाही.

अन्यत्र कुठेही न आढळणारी अशी विविधता, सांस्कृतिक श्रीमंती, महान संस्कृत साहित्यातील कालिदास-भासादि साहित्यिक किंवा वाल्मीकी, व्यास यांच्या वारशाचा अभिमान आपण सारेच मिरवतो. मात्र, ही सारी थोर साहित्यकार मंडळी स्वयंप्रज्ञता व प्रातिभस्वातंत्र्याचा आग्रह कसोशीने जपत होती, हे वास्तव मात्र आपण सोयीस्कररीत्या विसरतो आहोत. वास्तविक आपल्याकडची चित्रपट क्षेत्रातील मंडळी कमालीची प्रतिभावंत आहेत याविषयी शंका बाळगण्याचे काहीही कारण नाही. मात्र, ‘प्रतिभावान, अभ्यासू मंडळींद्वारेच जर प्रातिभस्वातंत्र्याचे व वैविध्याचे अत्यंत महत्त्वाचे मूल्य दुर्लक्षित होत असेल तर ते काही विशिष्ट कारणांमुळे, राजकीय/ सांस्कृतिक  दबावामुळे ठरवून तर होत नाही ना?’’ अशी शंका घेतल्यास वावगे ठरणार नाही. अर्थात हे अक्षम्य दुर्लक्ष आपल्या प्राचीन पूर्वसूरींच्या ठेव्याच्या व पर्यायाने परंपरांच्या आणि राष्ट्रीय वारशाच्या अपमानालाच कारणीभूत ठरते आहे, हे लक्षात घ्यायची वेळ अजूनही गेलेली नाही.

(लेखक भारतीय धर्म, संस्कृत भाषा, समाजेतिहास या विषयांचे अभ्यासक व संशोधक आहेत.)