गिरीश कुबेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ललित शैलीत ललितेतर पुस्तकं जितकी इंग्रजीत लिहिली जातात, तितकी ती कुठल्याच प्रादेशिक भाषेत येत नाहीत. काय असतो त्यातला ऐवज आणि विषयाच्या खोलात उतरण्याची कळकळ, याची जाणीव ती वाचताना ठळक होते. इथं दिलेल्या पुस्तकांचं हे परीक्षण नाही. मूल्यमापनही नाही. तर अत्यंत प्रतिष्ठेच्या‘टाटा लिट फेस्ट’मध्ये इंग्रजी ललितेतर पुस्तकांसाठी ज्युरी मेंबर म्हणून काम करतानाचे हे अनुभव..

आयोजकांकडून पहिल्यांदा यासाठी फोन आला तेव्हा क्षणभर गांगरायला झालं. घडय़ाळाच्या काटय़ावर पुस्तकं वाचायची सवय नव्हती आणि नाहीही, हे कारण. पुस्तकांचं वाचन दोनच कारणांसाठी आतापर्यंत केलेलं. एक म्हणजे शुद्ध आनंदासाठी. पूर्णपणे स्वान्तसुखाय! आणि दुसरं कारण म्हणजे लेखनात संदर्भ शोधनासाठी. आतापर्यंत ज्या विषयावर माझी पुस्तकं आली, त्या विषयांवर मराठीत अधिक काही लेखन नव्हतं. अजूनही फारसं नाही.त्यामुळे त्या त्या विषयांच्या अधिक वाचनासाठी इंग्रजीस पर्याय नव्हता. याखेरीज व्यवसायानिमित्तानं लेखनासाठी वाचणं होतं तेही इंग्रजीच. त्यामुळे अन्य कोणत्याही उद्दिष्टासाठी वाचायची सवय नव्हती. म्हणून असा प्रस्ताव आल्यानंतर हो म्हणण्याआधी म्हटलं जरा आणखी माहिती मागवून घेऊ या.ती आयोजकांनी लगेचच दिली. कामाची पद्धत काय, इत्यादी मुद्देही जाणून घ्यायचे होते. ते घेता आले. होकार कळवला. त्यानंतर त्यांच्याकडनं पुस्तकं कधी मिळतील, याचा तपशील आला.

..आणि तशीच त्यानुसार एकामागोमाग एक पुस्तकं थेट घरी येत गेली. परीक्षक म्हणून काम करतानाच असं नाही; पण एरवीही पुस्तक मागवणं, ते घरी पोहोचल्याचा सांगावा येणं आणि आपण त्या वेळी घरी नसलो तर संध्याकाळी/ रात्री कामावरून घरी परतून त्या कंटाळवाण्या बाइंडिगांतून पुस्तकाची सुटका करेपर्यंत- एक प्रकारचं बाळंतपणच ते- एक प्रकारची हुरहुर असते. इथं तर ती किती तरी पट अधिकच. एरवी पुस्तक आपण मागवलेलं असतं.त्यामुळे समोर काय येणार आहे याचा अंदाज असतो. पण या प्रकरणात तर काहीच माहिती नाही. कधी कधी तर घरच्या आपल्या लाडक्या कुत्रीला एकदम चार-पाच पिल्लं व्हावीत तशी एखाद्या दिवशी चार-पुस्तकं बाळंत व्हायची. हे आधी हाताळू की ते, हा प्रश्न. कधी तर जुळं झाल्यावर दाईनं किंवा आईनं दोघांनाही एकदम छातीशी धरावं तसं काही व्हायचं. अशा तऱ्हेनं ही पुस्तकं विणं आठ-दहा दिवस सुरू होतं. नंतर ईमेलद्वारे यादी आली. मग पुस्तकं फडताळावर एकामागोमाग अशी लावली. एरवी साधारणपणे एका वेळी इतकी पुस्तकं आपल्याकडून घेतली जात नाहीत. त्यामुळे ही दोन डझनांहून अधिक नवी कोरी पुस्तकं अशी शिस्तीत लावणं, हा एक वेगळाच आनंद. बैठकीची खोली त्या पुस्तकांच्या सामायिक गंधानं भरून गेली.ती सगळी एकत्र झाल्यानंतर त्यांच्याकडे पाहताक्षणीच लक्षात येणारा मुद्दा म्हणजे या लेखकांचं विषय-वैविध्य.

आंचल मल्होत्रा यांचं ‘इन द लँग्वेज ऑफ रिमेम्बिरग : द इनहेरिटन्स ऑफ पार्टिशन’ हे पुस्तक भारत-पाकिस्तान फाळणीच्या जखमा अजूनही कशा ओल्या आहेत, हे विलक्षण ताकदीनं मांडतं. आंचल यांची ओळख मौखिक इतिहासकार (ओरल हिस्टोरियन) अशी केली जाते. या विषयावरच त्यांचं आधीचंही पुस्तक आहे. त्या दिल्लीच्या. ते वाचताना गुलजारजी ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमात म्हणाले होते त्याची आठवण झाली. ‘नर्मदेच्या दक्षिणेकडच्यांना फाळणीची झळ बसलेली नाही. त्यामुळे त्या विषयावर इकडे काही लिहिलं गेलेलं नाही,’ हे गुलजारजींचं मत. ते किती खरं आहे हे या पुस्तकातनं जाणवत गेलं.

नागपूरचा पत्रकार-मित्र जयदीप हर्डिकर याचं ‘रामराव : द स्टोरी ऑफ इंडियाज फार्म क्रायसिस’ हे पुस्तकही यात होतं. महाराष्ट्रानं कृषी संकट अनुभवलंय, पण मराठीत असा ‘रामराव’ नाही. या संकटाची दाहकता दाखवून देणाऱ्या कादंबऱ्या भरपूर आहेत. पण ललित शैलीत ललितेतर पुस्तकं जितकी इंग्रजीत लिहिली जातात, तितकी ती मराठीत येत नाहीत. मराठी साहित्यव्यवहाराचं नियंत्रण करणाऱ्या मंडळींच्या मते दोनच वर्ग : कथा-कविता-कादंबऱ्या म्हणजे ललित. आणि जे ललित नाही ते गंभीर ललितेतर.

वाङ्मयीन आनंदाच्या अंगणात अशा सीमारेषा इंग्रजीवाल्यांना मंजूर नसाव्यात. कदाचित असंही असेल की, इंग्रजीत ललिताइतकीच, किंबहुना अधिक ललिती शैलीत ललितेतर पुस्तकं जास्त लिहिली जात असल्यानं हा प्रवाह तिकडे अधिक जाडजूड झाला असावा. या अशा शैलीत लिहिली गेलेली अनेक पुस्तकं या यादीत निघाली. वानगीदाखल सांगायचं तर ‘डेस्प्रेटली सिकिंग शाहरूख’ हे श्रयाना भट्टाचार्य याचं पुस्तकं. मराठीच्या मानानं जरा धाडसीच म्हणता येईल असं. विषय महिलांची लैंगिक कुचंबणा वा त्या आनंदाचा शोध घेण्याची आस. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक मुद्दय़ांवर विभागल्या गेलेल्या महिलांचा या मुद्दय़ाबाबत स्वत्वाचा शोध श्रयाना सहज समोर मांडतात. ‘द राइट टु सेक्स’ हे अमिया श्रीनिवासन यांचं पुस्तकही याच विषयावर आहे. ते ललितेतर शैलीतच लिहिलं गेलेलं आहे. महिलांतील लैंगिक जाणिवा या विषयावरचा प्रबंधच तो. बलात्कार ते पोर्न ते बलात्काराच्या खोटय़ा आरोपात अडकवले गेलेले पुरुष अशा विविध विषयांवरच्या निबंधांचा संग्रह आहे हा. अमिया ऑक्सफर्ड विद्यापीठात असतात. अशा विषयासाठी आवश्यक गांभीर्य त्यात दिसतं. ‘मेट्रोनामा : सीन्स फ्रॉम द दिल्ली मेट्रो’ हे रश्मी सदाना यांचं पुस्तक विषयाच्या निवडीसाठी अचंबित करतं. दिल्लीत मेट्रो सुरू झाल्यानंतर तिथल्या परिसरातील जनजीवनात होत गेलेला बदल हा याचा विषय. खरं तर या अशा प्रकल्पामुळे बरे-वाईट असे दोन्हीही बदल आपल्या सगळय़ांच्या आयुष्यात होतात. त्याचं असं कलात्मक नोंदणीकरण करावं असं वाटणं (आणि ते प्रकाशकानं गोड मानून घेणं) ही कौतुकाची बाब.या अशा नोंदणीकरणाचं महत्त्व दाखवून देणारं दुसरं पुस्तक म्हणजे तनुश्री घोष यांचं ‘बियाँड मी टू’ हे. तनुश्री इंटेलसारख्या कंपनीत अभियांत्रिकी विभागात काम करतात. हे पुस्तक जगभरातचं गाजलेल्या या ‘मी टू’ चळवळीचा धांडोळा घेतंच, पण या चळवळीनंतर नक्की बदल काय काय झाले, हेही नोंदवतं.

विषय-वैविध्य, कमालीची रसाळता आणि प्रवाही मांडणी यासाठी उठून दिसतं ते ‘बेटर टू हॅव गॉन : ऑरोविल : लव्ह, डेथ ॲण्ड द क्वेस्ट फॉर यमुटोपिया’ हे आकाश कपूर यांचं लिखाण. साठच्या दशकात ऑरोविलात दाखल झालेल्या दोघांचा गूढ मृत्यू होतो. त्यांची मुलं अमेरिकेत वाढतात, ते योगायोगानं पुढे एकमेकांना भेटतात आणि इतिहासातल्या त्या गूढ घटनांचा वर्तमानात शोध घेतात, त्याची ही कहाणी. आकाश हे सिद्धहस्त लेखक आणि न्यूयॉर्क टाइम्सचे स्तंभलेखक. वर्तमानपत्रीय लिखाण करणाऱ्याचं लिखाण वाहतं असतं. हे पुस्तक तसं आहे. इतकंच कौतुकास्पद लिखाण आहे ते परिमल भट्टाचार्य यांचं. ते बंगाली आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत लिहू शकतात. ‘फिल्ड नोट्स फ्रॉम अ वॉटरबोर्न लॅँड : बेंगॉल बियाँड द भद्रलोक’ हे उत्तम कादंबरीइतकं उत्कट आहे. परिमल इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. त्या भाषेचं सौष्ठव आणि भद्रलोकीय बंगाली याचं उत्तम मिश्रण यात आढळतं.लेखनशैलीच्या उजवेपणासाठी लक्षात राहतं ते ‘१९४६ लास्ट वॉर ऑफ इंडिपेंडंट्स : रॉयल इंडियन नेव्ही म्युटिनी’ हे प्रमोद कपूर यांचं लिखाण. कपूर सराईत लेखक आहेत. १९४६च्या बंडाचा इतिहास लिहिण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट या लिखाणात दिसतात.

याखेरीज ‘आय एम ओनीर अँड आय एम गे’ हे समलैंगिकाचं स्वचरित्रात्मक म्हणता येईल असं पुस्तक यात होतं. सध्या ते बरंच गाजतंय. उदय माहुरकर यांचं ‘सावरकर’ हेही स्पर्धेत होतं. त्यात फारसं काही नवीन नाही. मराठी वाचकासाठी तर नाहीच नाही. लिखाणही तसं रटाळच. पुलेला गोपीचंद याचं प्रिया कुमार यांनी लिहिलेलं चरित्र, प्रसन्न मोहंती यांचं अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा सांगोपांग शोध घेणारं ‘ॲन अनकेप्ट प्रॉमिस : व्हाट डिरेल्ड द इंडियन इकॉनॉमी’, धीरेंद्र झा यांचं ‘गांधीज् ॲसासिन’ ही काही उल्लेखनीय पुस्तकं. ‘गांधीज् ॲसासिन’ लक्षणीय. नक्षलवादावर ‘रेड सन’ हे अप्रतिम पुस्तक लिहिणारे सुदीप चक्रवर्ती अनेकांस स्मरणात असतील. त्या विषयावरचं ते पहिलं सांगोपांग पुस्तक. त्यांचंच ‘द इस्टर्न गेट : वॉर अँड पीस इन नागालँड, मणिपूर अँड इंडियाज फार इस्ट’ हे तितकंच महत्त्वाचं पुस्तक. ते वाचल्यावर आपण आपल्याच देशातल्या काही भागांकडे किती दुर्लक्ष करतो या जाणिवेनं लाज वाटते. इच्छुकांनी हे पुस्तक आपापल्या ‘वाचायलाच हवे’ या यादीत नोंदवून ठेवायला हरकत नाही.

या यादीत ठेवायलाच हवीत अशी काही उल्लेखनीय पुस्तकं या नामावलीत होती. डॉ कफील खान यांचं ‘द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी’ हे अनुभवकथन काटा आणणारं आहे. पाच वर्षांपूर्वी २०१७ साली तिथल्या रुग्णालयातल्या अपघातात ६३ बालकं आणि १८ प्रौढ बळी पडले. गोरखपूरचं स्थानमाहात्म्य सांगायला नको. त्यामुळे या अपघातानंतरच्या कारवाईचा वरवंटा मोठय़ा ताकदीनं फिरला. डॉ. खान यांना अटक झालीच, पण नंतर ‘रासुका’खालीही त्यांच्यावर कारवाई केली गेली. ती ‘अशीच’ असणार. कारण अलाहाबाद उच्च न्यायालयानं त्यांना सर्व आरोपांतून दोषमुक्त केलं. गोरखपूर आणि तिथल्या अपघातग्रस्त रुग्णालयातला डॉक्टर ‘खान’ असणं हे संदर्भ लक्षात घेतले तर या पुस्तकाचं महत्त्व लक्षात येईल. बिहारमधल्या जाती-पातीत विभागल्या गेलेल्या वास्तवासाठी ‘लास्ट अमंग इक्वल्स’ हे वाचणं आवश्यक. भाजप, नरेंद्र मोदी यांचा उदय यावरच्या सातत्यपूर्ण लिखाणासाठी निलंजन मुखोपाध्याय हे नाव अनेकांना परिचित असेल. अजिबात कंठाळी नसलेली त्यांच्या मांडणीत जराही अभिनिवेश नसतो. त्यांचं ‘डिमॉलिशन ॲण्ड द व्हर्डिक्ट : अयोध्या अॅण्ड द प्रोजेक्ट टू रिकॉन्फिगर इंडिया’ हे पुस्तक राजकारण अभ्यासकांसाठी महत्त्वाचं. अयोध्येतली बाबरी मशीद पाडण्यापासून आता होऊ घातलेल्या राम मंदिरापर्यंत सगळा इतिहास गोळीबंदपणे यात मांडला गेलाय. वर्तमानपत्री लिखाणाची सवय असल्यानं त्यात अजिबात फापटपसारा नाही.

लेखकाच्या अभ्यासाची दखल घेण्यासाठी यातल्या काही पुस्तकांचा उल्लेख करावा लागेल. उदाहरणार्थ ‘प्लॅिनग डेमॉक्रॅसी’ हे उच्च दर्जाचं पुस्तक. लेखक निखिल मेनन तरुण आहे. पॅरिसला प्राध्यापकी करतो. अलीकडे पाश्चात्त्य देशांत जाऊन आपल्याकडच्या काही पायाभूत विषयांवर मूलगामी लेखन करणाऱ्यांची एक पिढीच समोर येताना दिसते. विनय सीतापती इत्यादी. निखिल त्यांच्यात नक्की शोभेल. प्रा. प्रसन्तचंद्र महालनवीस यांच्या दुर्लक्षित कामावर हे पुस्तक आहे. प्रा. महालनवीस यांच्यासारख्या द्रष्टय़ा सांख्यिकीतज्ज्ञामुळे आपल्याला पंचवार्षिक योजना मिळाल्या. सध्या नेहरूकालीन सगळय़ांचीच खिल्ली उडवायची स्पर्धा सुरू आहे. महालनवीसांसारख्यांचं मोठेपण लक्षात येण्यासाठी त्या खिल्लीत सहभागी होणाऱ्या अभागींना आपलं बौद्धिक लहानपण सोडावं लागेल. अतिशय महत्त्वाचं म्हणता येईल अशांतलं हे पुस्तक आहे. निखिल मेनन याला त्यासाठी धन्यवाद.अशी अभिनंदनास पात्र ठरेल अशी लेखिका म्हणजे रुक्मिणी एस. आधीचं ‘प्लॅनिंग डेमॉक्रसी’ हे इतिहासातलं सत्य पुढे आणतं, तर रुक्मिणी यांचं ‘होल नंबर्स अँड हाफ ट्रुथ्स : व्हॉट डेटा कॅन आणि कॅनॉट टेल अस अबाऊट मॉडर्न इंडिया’ वर्तमानातलं सत्य दाखवतं. हे अशा प्रकारचं लिखाण आपल्याकडे प्रथमच होतंय. त्या डेटा जर्नालिस्ट आहेत. म्हणजे विदा पत्रकार. अलीकडे सरकार वा अन्यांकडून सोयीस्कर आकडेवारी समोरच्यांच्या तोंडावर फेकण्याची नवी प्रथा रूढ होताना दिसते. भारतीयांना शब्द लवकर समजतात. संख्यांचा अर्थ लावायला वेळ लागतो. त्यात आर्थिक साक्षरतेबाबत न बोललेलंच बरं. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक निश्चित एक नवा मार्ग दाखवतं. तूर्त त्या मार्गावर फार कोणी नाहीत. पण ती वाट उद्याचा हमरस्ता आहे.असा वेगळा आणि यापेक्षा धाडसी मार्ग जोसी जोसेफ यांनी चोखाळलाय. त्यांचं ‘द सायलेंट कु : ए हिस्टरी ऑफ इंडियाज डिप स्टेट’ हे पुस्तक अतिअत्यावश्यक यादीत ठेवायला हरकत नाही. इतकं ते महत्त्वाचं आहे. आपल्याकडे मुळात अशा प्रकारचं काही लेखन केलं जात नाही. पोलीस, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा वगैरेंवर सत्याधारित लिखाण आपल्या व्यवस्थेच्या आणि लेखकांच्याही ‘बस की बात नही’. म्हणून या यंत्रणांच्या उद्योगांवरचं आणि आपल्यावरच्या अदृश्य पकडीवरचं हे पुस्तक वाचणं अतिअत्यावश्यक ठरतं. जोसेफ पत्रकार आहेत. याआधीचं त्यांचं भारतीय भ्रष्टाचाराचं ‘ए फिस्ट ऑफ व्हल्चर्स’ (गिधाडांची मेजवानी) अनेकांना आठवत असेल.

जोसीचे आडनावबंधू टी जे जोसेफ यांचं इंग्रजी अनुवाद केलेलं ‘अ थौजंड कट्स : ॲन इनोसंट क्वेश्चन ॲण्ड डेडली आन्सर’ हे आत्मकथन हृदय पिळवटून टाकतं. मुळात हे मळय़ाळम भाषेत लिहिलं गेलं. जोसेफ महाविद्यालयात प्राध्यापक होते. अंतर्गत परीक्षांत त्यांच्याकडून एक प्रश्न विचारला गेला. त्यातल्या व्यक्तीचं नाव महंमद. ही व्यक्तिरेखा त्यांनी लोकप्रिय मल्याळी कथेवरनं घेतली. पण हा प्रश्न जणू प्रेषित महंमद यांना गृहीत धरून विचारला गेलाय अशी वदंता पसरली, वृत्तसंस्थांनी तशी बातमी दिली, महाविद्यालयावर मोर्चा आला, दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली, जोसेफ यांना अटक झाली, सुटका झाल्यावर भर रस्त्यात त्यांचा हात कलम केला गेला, या धक्क्यानं पत्नी दगावली आणि या दु:खावर मिठाची डागणी म्हणजे त्यांच्या ख्रिश्चन धर्मीय शिक्षण संस्थेनंही त्यांना वाऱ्यावर सोडलं. ही सत्यकथा सध्या गाजणाऱ्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या इस्लामी दहशतवादी संघटनेची.त्या संघटनेचं अस्तित्व दाखवून देणारी ही पहिली कथा. वाचायलाच हवी अशी- अस्वस्थ करणारी.

त्या अस्वस्थतेला उतारा म्हणजे अनिरुद्ध कानिसेट्टी याचं ‘लॉर्डस ऑफ द डेक्कन’ हे अप्रतिम पुस्तक. त्यासाठी अनिरुद्धचं कौतुक करावं तितकं कमीच. खरं तर हे त्याचं पहिलंच पुस्तक. हा बंगलोरचा. तरुण इतिहास संशोधक. या पुस्तकासाठी त्यानं घेतलेले श्रम, त्याची मांडणी याला तोड नाही. इ.स. सहा ते १२ हा या पुस्तकाचा काळ. अनिरुद्ध त्यात अगदी चालुक्य, राष्ट्रकुट, चोला इत्यादी घराण्यांच्या जन्मापासनं सुरू होणारी कहाणी ते दख्खनचा भरभरी इतिहास, देवस्थानांची उभारणी, जैन-बौद्ध परंपरांचा उदय असा सप्तरंगी इतिहासाचा विशालपट आपल्यापुढे उभा करतो. या पुस्तकाच्या निमित्तानं एक मोकळा, नव्या युगाचा इतिहास संशोधक आपल्यासमोर येतो, ही आणखी एक आश्वासक बाब.

या साऱ्या लेखकांचे, त्यातही बहुसंख्य तरुण, अभ्यासविषय, त्यांच्या मांडणीतला कमालीचा धीटपणा हे सुखावणारं आहे. इंग्रजीच्या बाजारपेठीय आकारामुळे हे सारं लिहिण्यासाठी जी उसंत या मंडळींना मिळते ती हेवा वाटावी अशी. इंग्रजी ही ज्ञानभाषा का आहे, याचंही उत्तर यातून मिळतं.यातल्या काही महत्त्वाच्या पुस्तकांचा परिचय ‘लोकसत्ता’त करून द्यायचा मानस आहे. पण तोपर्यंत हा समृद्धीचा दरवळ इंग्रजीच्या भाषाभगिनींतही पसरावा यासाठी हा प्रपंच.

girish.kuber@expressindia.com
@girishkuber

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fine style books regional language tata lit fest english non fiction books jury member author girish kuber amy
First published on: 20-11-2022 at 00:08 IST