कॉफी हाऊस

नवनवीन कॉफी हाऊस शोधायची आणि तिथे जाऊन वेगवेगळ्या स्वादांची आणि चवीची कॉफी प्यायची, हा माझा अगदी आवडता छंद.

नवनवीन कॉफी हाऊस शोधायची आणि तिथे जाऊन वेगवेगळ्या स्वादांची आणि चवीची कॉफी प्यायची, हा माझा अगदी आवडता छंद. अशाच एका कॉफी हाऊसमधील रेनडियरच्या चित्रांनी माझे लक्ष वेधून घेतले. ते बघून फिनलंडमध्ये पाहिलेले रेनडियर्स आणि तिथे प्यायलेली फिनिश कॉफी आठवली. कॉफी हाऊस नक्कीच स्कॅन्डिनेव्हियन देशातली असणार असं वाटून मी अगदी उत्साहाने आत शिरले. पण ती कॉफी हाऊसची चेन अमेरिकन आहे, हे तिथं गेल्यावर कळलं.
तिथल्या कॉफी हाऊसच्या एका भिंतीवर लावलेल्या स्क्रीनवर रेनडियरविषयी एक फिल्म चालू होती. उत्कृष्ट चवीच्या कॉफीचा आस्वाद घेत घेत ती फिल्म बघायला फार मजा आली. मात्र, रेनडियरचा आणि कॉफीचा काय संबंध असेल, हा प्रश्न माझ्या मनात आला. माझ्याआधी बऱ्याचजणांनी ही शंका विचारली असणार, कारण कॅफेच्या मॅनेजरकडे त्याचे उत्तर तयारच होते. त्याने सांगितले की, एक जोडपं नवीन स्वादाची कॉफी बाजारात आणण्याच्या प्रयत्नात होतं आणि त्यासाठी ती दोघं अलास्काला गेली होती. तिथलं निसर्गसौंदर्य बघत असताना त्यांना रेनडियर्सचा एक कळप डौलदारपणे चालताना दिसला आणि त्यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे आहा!’ असे उद्गार निघाले. क्षणाचाही विचार न करता त्यांनी आपल्या कॉफीला रेनडियरचे नाव द्यायचं ठरवून टाकलं. त्यांच्या कॅफेमधील कॉफी पिऊन लोकांच्या तोंडूनसुद्धा आहा!’ असेच उद्गार निघायला पाहिजेत, ही त्यामागची भावना!’ यातलं खरं-खोटं माहीत नाही, पण ते ऐकायला तर खूपच छान वाटलं.
या कहाणीसोबत मॅनेजरने मला रेनडियर्सची सचित्र माहिती असलेली दोन पुस्तकं बघायला दिली. त्या पुस्तकांवरून रेनडियर या प्राण्याविषयीची खूप माहिती व नवीन गोष्टी कळल्या. वन्य वा जंगली रेनडियर म्हणजे कॅरीबू. पण युरोप व आशिया खंडांत तो रेनडियर म्हणूनच ओळखला जातो. रेनडियर हा हरणांच्या जातीत मोडणारा प्राणी आहे. आज हरणांमध्ये सात ते आठ उपजाती मानल्या जातात. प्रत्येक जातीतील प्राण्यांचा रंग, आकार, बांधा आणि त्यांची शिंगे वेगवेगळी असतात. रेनडियर हा हरणांपेक्षा बऱ्याच बाबतीत भिन्न आहे. मुख्य म्हणजे तो हरणांसारखा लाजरा वा दिसायला गोंडस नाही. तसेच तो हरणासारखा चपळही नाही. हा प्राणी जरासा गबदुल व दिसायला ओबडधोबडच आहे. पण त्याचे खरे सौंदर्य त्याच्या दिमाखदारपणात व सुंदर शिंगांमध्ये आढळते.
आर्टिक टुंड्रा, ग्रीनलंड, रशिया, कॅनडा व अलास्का या बर्फाळ प्रदेशांत राहणाऱ्या रेनडियर्सना तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी योग्य अशी शरीररचना लाभलेली असते. कडाक्याच्या थंडीपासून व बोचऱ्या वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी रेनडियरच्या कातडीवर उबदार व मऊसर असे दाट केस असतात. या केसांच्या तुकतुकीतपणामुळे त्यावर बर्फ साठून राहत नाही. आपल्या रुंद खुरांमुळे रेनडियरला खोल बर्फातून सहजपणे चालणे शक्य होते. अशावेळी खुरांचा त्यांना एखाद्या शस्त्रासारखा तर उपयोग होतोच, पण आपला अवाढव्य देह सांभाळायला व त्याला आधार द्यायलाही त्यांची मदत होते. त्यांच्या तळपायांची रचना एखाद्या गोलाकार खोऱ्यासारखी असते. त्याचा उपयोग बर्फ उपसायला होतो. ते आपली तीक्ष्ण नखे बर्फात भोक पाडायला वा माती खणायला वापरतात. रेनडियर उत्तमरीतीने पोहू शकतो. स्थलांतर करत असताना वाटेत नदी वा खोल पाणवठा लागला तरी तो पोहून पल्याड जाऊ शकतो.
खरं तर रेनडियर हा पूर्णपणे माणसाळलेला किंवा माणसांच्यात मिळून-मिसळून आनंदाने राहणाऱ्या प्राण्यांपैकी नाही. तो आपल्या कळपात राहणे आणि मोकळेपणाने कुरणात चरणे पसंत करतो. मग तो कळप दहांचा असो किंवा हजारोंचा. रेनडियरचे कळप दरवर्षी ऋतुमानाप्रमाणे स्थलांतर करतात. वर्षांकाठी ते हजारो मैलांची पायपीट करून अखेरीस आपल्या ठरलेल्या जागी पोहोचतात. स्थलांतराच्या वेळी कळपातल्या माद्या कित्येक आठवडे आधी चालायला सुरुवात करतात. त्यांच्यानंतर आधीच्या वर्षी जन्मलेल्या पिल्लांना घेऊन नर निघतात. सर्वसाधारणपणे रेनडियर दिवसाकाठी ४५ ते ५० कि.मी. चालतो. नुसता उभा असलेला किंवा बसलेला रेनडियर हे अगदी दुर्मीळ दृश्य असते. कारण तो या ना त्या कारणाने कायम चालतच असतो. त्यांचा कळप जेव्हा हलतो तेव्हा त्याचे नेतृत्व त्यांच्यापैकीच एक नर रेनडियर करतो. आपल्या कळपाचे नेतृत्व करायला मिळावे म्हणून त्यातल्या नरांमध्ये हमखास मारामारी होते. अशा मारामारीत काही वेळा त्यांची शिंगे एकमेकांत अडकून बसतात आणि ती सोडवणे भलतेच मुश्कील होऊन बसते.
उन्हाळ्याच्या दिवसांत रेनडियर्सना खाण्यासाठी टुंड्रा प्रदेशात मुबलक प्रमाणावर गवत मिळते. तिथल्या भोजवृक्षाची व वाळुंजाच्या झाडाची कोवळी पाने व इतर झाडाझुडपांवर फुटलेली पालवी म्हणजे त्यांचे आवडते खाद्य आहे. नर दिवसाकाठी जवळपास पाच किलो गवत व पाला खातो. यावरून त्याच्या भुकेची कल्पना करता येऊ शकेल. रेनडियर्सचे आयुर्मान साधारणपणे पंधरा वर्षे असून पूर्ण वाढ झालेला रेनडियर चार ते पाच फूट इतका उंच असतो. नराचे वजन ३०० किलो, तर मादीचे वजन १८० ते २०० किलो एवढे असते. हिवाळ्यात जेव्हा जमीन बर्फाने आच्छादली जाते तेव्हा मात्र रेनडियर्सचे खाण्याचे काहीसे हाल होतात. त्यावेळी बर्फाखाली असलेल्या किडय़ांवर व शेवाळ्यावर त्यांना आपली गुजराण करावी लागते. हे शेवाळे रेनडियर मॉस’ म्हणूनच ओळखले जाते. बर्फाळ प्रदेशात वर्षांतल्या बहुतेक वेळा खाण्याचे दुर्र्भीक्ष असते. रेनडियर्सना बर्फात कित्येक फूट खोल खड्डे खणून त्याखालचे किडे आणि शेवाळ शोधावे लागते. त्यांचे नाक फार तीक्ष्ण असते. त्यामुळे बर्फात कुठे खणले असता अन्न मिळेल, हे त्यांना बरोबर कळते.
टुंड्रा प्रदेशातील स्थानिक लोकांच्या जीवनात रेनडियरने फार महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. नॉर्वे, फिनलंड या देशांत लहान गावांतील जवळजवळ प्रत्येक कुटुंबाकडे, विशेषत: सामी लोकांकडे दहा-बारा तरी रेनडियर्स असतातच. बऱ्याच गोष्टींत त्यांचे जीवन या प्राण्यावर अवलंबून असते. ते लोक रेनडियर्सचे दूध पितात. त्याचे मांस अगदी आवडीने खातात. नॉर्डिक देशांतून रेनडियरच्या मांसाची फार मोठय़ा प्रमाणावर निर्यात होते. रेनडियरचे मांस मऊ व लुसलुशीत असून अतिशय चविष्ट असते. त्यात स्निग्धांशाचे प्रमाण फार कमी असल्याने लोक ते खाणे पसंत करतात. या सर्वच देशांतून रेनडियर मीट बॉल्स आणि सॉसेजेस हे आवडीचे खाणे आहे. त्याची चवही जराशी वेगळी, पण छान असते. त्याच्या कातडय़ापासून बनवलेल्या कपडय़ांचा व शालींचा बोचऱ्या थंडीपासून बचाव करायला फार उपयोग होतो. कमावलेल्या कातडय़ाला किंमतही भरपूर मिळते. रेनडियरच्या शिंगांपासून शस्त्रे, खेळणी व इतर अनेक वस्तू बनविल्या जातात. सामान वाहून नेण्यासाठी वा बर्फावरून घसरत्या गाडय़ा ओढण्यासाठी तर या प्रदेशात रेनडियरइतका उपयुक्त प्राणी नाही.
कॉफी हाऊसमधील फिल्मवर रेनडियर फार्म दाखवत होते; ते बघून मी मनाने फिनलंडमध्ये बघितलेल्या रेनडियर फार्मवर जाऊन पोचले. फिनलंडमध्ये अलीकडच्या काळात पर्यटन व्यवसाय विकसित झाल्यामुळे तिथे आता रेनडियर फार्मस्च्या सहली आयोजित केल्या जातात. आपण तिथे रेनडियर्सना जवळून बघू शकतो. त्यांना चारा भरवू शकतो. या फार्मस्वर आलेल्या लोकांसाठी खास फिनिश पद्धतीच्या जेवणाचा कार्यक्रम असतो. अशा फार्मस्वर मुख्यत: रेनडियर ब्रीडिंग करतात. साधारणपणे या माद्या जून महिन्यात वितात व दरवर्षी एका पिल्लाला जन्म देतात. फार्मवर असलेली काही दिवसांची लहान लहान पिल्ले फारच गोंडस दिसतात. प्रत्येकाच्या गळ्यात रंगीत दोरे बांधले जातात. दोऱ्यांच्या रंगावरून त्या- त्या पाडसाचे वय आणि ओळख कळते. फार्मवरच्या गाइडने सांगितले की, ही पिल्ले जन्म झाल्यानंतर काही मिनिटांतच स्वत:च्या पायांवर उभी राहू शकतात आणि दुसऱ्या दिवसापासून आपल्या आईच्या बरोबर चालूदेखील शकतात. पाच ते सहा दिवसांचे पिल्लू माणसाला मागे टाकेल एवढे जोरात पळू शकते. ही पिल्ले पहिले पाच-सहा महिने आईच्या अंगावर पीत असली तरी काही दिवसांनी गवत, पाला वगैरेही खायला लागतात. साधारण एक वर्षांचे झाले की पिल्लांना शिंगे फुटायला लागतात. रेनडियरच्या नर व मादी दोघांनाही शिंगे असतात. नराची शिंगे वसंत ऋतूत गळून पडतात, तर मादीची शिंगे पाडसाला जन्म दिल्यानंतर गळतात.
कॉफी हाऊसमधली पुस्तके, त्यातले रेनडियर्सचे फोटो आणि फिल्म बघण्यासाठी मग माझ्या त्या ठिकाणी मुद्दाम दोन-तीन चकरा झाल्या. ही सारी माहिती वाचताना सांताक्लॉजची बर्फावरची गाडी ओढणारे रेनडियर्स डोळ्यांसमोर उभे राहिले. रेनडियर फार्मवर बागडणारी पाडसे आणि तिथल्या अनेक मजा मजा आठवल्या. त्या सुंदर आठवणींत रंगून गेल्यामुळे पुढच्या कॉफीचे घुटके घेताना नकळत ओठातून उद्गार आले- आहा’!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Finland and finnish coffee