scorecardresearch

आदले । आत्ताचे: अन्नव्यवहारातून येणारी हिंसा..

मराठी कादंबरी विस्तारली, जाडजूड झाली; पण तिला झालेला आशयाचा मधुमेह ही तिची मुख्य समस्या. यावर अद्याप विचार केला जात नाही.

lokrang

जी. के. ऐनापुरे

मराठी कादंबरी विस्तारली, जाडजूड झाली; पण तिला झालेला आशयाचा मधुमेह ही तिची मुख्य समस्या. यावर अद्याप विचार केला जात नाही. अशा परिस्थितीत ‘डहाण’ या कादंबरीत आवश्यक असलेला आशय सापडत जातो. अन्नव्यवहार आणि त्यातून अस्तित्वाला येणारी हिंसा हे ‘डहाण’ कादंबरीचे स्वरूप आहे. आपल्याकडे अतिपरिचित असलेली शैक्षणिक व्यवस्था एवढय़ाच अर्थाने या कादंबरीचे वाचन व्हायला नको..

नव्वदोत्तरी महानगरी कथासाहित्यातील महत्त्वाचे नाव. पदव्युत्तर शिक्षणापर्यंत गिरणगावातच जडणघडण झाल्यामुळे या परिसराला साहित्यात आणणाऱ्या ‘कांदाचिर’, ‘चिंचपोकळी’ आणि ‘रिबोट’ या तीन महत्त्वाच्या कलाकृती. सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ या ठिकाणी प्राध्यापकी करताना गेल्या दोन दशकांत दीर्घकथा, कादंबरी आणि समीक्षा प्रांतात विपुल लेखन. ‘खंगोल’, ‘निकटवर्तीय सूत्र’, ‘झिंझुरडा’, ‘स्कॉलर ज्यूस’ हे काही लोकप्रिय कथासंग्रह. ‘‘महज अंगणात लावलेली झाडं पाहता पाहता मुळं धरतात आणि जमिनीशी एकजीव होऊन जातात. माणसासारखी झाडं स्थलांतर करू शकत नाहीत.’’ (पृ. ३६५)राजपुत्र सिद्धार्थ गौतम याने गृहत्याग केला हा कादंबरीचा आरंभिबदू. त्याला ज्ञानप्राप्ती झाली, तो बुद्ध झाला हा कादंबरीचा अंतिबदू; अशी सैद्धांतिक मांडणी काही वर्षांपूर्वी केली होती. नव्या शतकातील कादंबरीकडे पाहताना याच दृष्टिकोनातून पाहायला हवे, असा विचारव्यूह आग्रही करता येईल का? असा मुद्दा नव्या कादंबऱ्या वाचत असताना अधिक पुढे येत राहतो. कादंबरीचा आरंभिबदूच अनेकांना सापडत नाही तर अंतिबदूजवळ, कादंबरी लिहिण्याचा विचार सुरू झाल्यावर, बरेच जण अनेक वर्षे फक्त घुटमळतच राहतात. प्रत्यक्षात कादंबरीलेखन सुरू होते त्या वेळी लिहिणारा या दोन्ही बिंदूंच्या दरम्यान अव्याहतपणे चकरा मारत असतो, अनुभवाला आशयाच्या पातळीवर जिरवत असतो. या प्रक्रियेत त्याच्या विन्यासाचे नियंत्रण सुटले की कादंबरी आशयातून निर्माण होणाऱ्या विस्ताराला, निकटतेला मुकते. यातून लिहिणारा यांत्रिक होतो. त्याचे लिहिणे मृत होत जाते. प्रसिद्ध कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांनी असाच काय तरी विचार करून स्वत:ला दुय्यम दर्जाचा पराभूत कादंबरीकार म्हणून घोषित केले होते.

मराठीतल्या अनेक नव्या- जुन्या कादंबरी लिहिणाऱ्यांची अवस्था याच्या पलीकडची झाली आहे. सामाजिकता खोडून कल्पनेवर आपली उपजीविका चालू ठेवणारे अनेक कुपोषित कादंबरीकार या स्थितीच्या अग्रभागी आहेत. मराठी कादंबरी विस्तारली, जाडजूड झाली; पण तिला झालेला आशयाचा मधुमेह ही तिची मुख्य समस्या. या बाजूवर दोन्हीकडील लोक विचार करायला तयार नाहीत. या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी नव्या आशयाला, भूप्रदेश, भाषा, संवेदना, संस्कृती अशा सगळय़ाच बाजूने शरण जाणे, हाच पर्याय हाताशी उरतो. ‘डहाण’ या अनिल साबळे याच्या कादंबरीत ही नको असलेली शरणता आणि पाहिजे असलेला आशय अशा दोन्ही बाजूंचा विस्तार झालेला पाहायला मिळतो.

दुर्गम भागातील, जंगलातील आश्रमशाळेवर वर्ग-चार पदावर, स्वयंपाकी म्हणून कामाला आलेला अंकुश नागरे या कादंबरीचा नायक आहे. सरकारी नोकरी असल्यामुळे नियमित पगार आणि ही बेरहम व्यवस्था केव्हा तरी आपल्याला शिक्षक म्हणून स्वीकारेल, अकरावी- बारावीच्या वर्गावर केव्हा तरी आपल्याला मराठी शिकवायला मिळेल, अशा आशेवर त्याने हे वर्गवारपद स्वीकारले आहे. त्यासाठी तो सामाजिक चर्चेलासुद्धा सामोरा जाताना दिसतो. हा नायक छोटय़ा शहरातून जंगली भागात आल्यामुळे त्याची लेखक म्हणून निर्माण झालेली सकारात्मक सूक्ष्म संवेदना या कादंबरीला एक प्रकारची निकटता आणि ताजेपणा बहाल करते. अर्थात त्यासाठी या कादंबरीत आलेला नवा भूप्रदेश (नाशिक- पुणे जिल्ह्याला जोडून असलेला जंगली दुर्गम भाग) तितकाच जबाबदार आहे. नायकाचे कुटुंब, विद्यार्थी आश्रमशाळा आणि वसतिगृहातील कर्मचारी, गावकरी, अधूनमधून या जगातील पर्यायी व्यवस्थेची तपासणी करायला येणारे अधिकारी यातील संवाद- विसंवाद आणि त्यातून निर्माण होणारे भेसूर, भीतीदायक शिक्षणव्यवस्थेचे चित्र हे या कादंबरीचे आशय- विस्तार सूत्र आहे. कादंबरीच्या शेवटच्या पानापर्यंत येणारी नवी नवी पात्रे हेसुद्धा या कादंबरीचे ठळक वैशिष्टय़ आहे. ‘पात्र दुय्यमता’ असे याला म्हणता येईल; पण या पात्रांच्या अंगांनी येणारी कथानके, उपकथानके, उपकथानकांच्या प्राथमिक, द्वितीय, तृतीय शाखा यातून विषयाचे गांभीर्य कोणत्याही अर्थाने निसटताना, पातळ होताना दिसत नाही. तरीही नागरे, माळवे- साठे, आरोटेबाई, पाटोळेबाई, कोकरेबाई, सफाई कामगार निळे, सांगोलेकर, देशमुख, डुस अशी महत्त्वाची पात्रे, त्यांच्या अनोख्या मानसिक वर्तन- विकारांसह ध्यानात राहतात. विस्कटलेल्या जगण्यातून आलेली आदिमता किती वेगळय़ा प्रकारच्या वर्तनाला जन्म देते; याची पुनरावृत्ती कादंबरीच्या पानापानांत वाचायला मिळते. आश्रमशाळा, वसतिगृहातून पळून जाणारे (अचानकपणे) विद्यार्थी, निकृष्ट जेवणामुळे आजारी पडणारे विद्यार्थी, वडिलांसाठी चपात्या पळवून नेणारा बुधा, हातांवर ब्लेड मारून मुलीचं नाव कोरणारा पोफळे, दहावीलाच सगळे केस पिकलेली मुलगी, शिक्षकांनी केलेल्या दंडाची रक्कम भरण्यासाठी धाब्यावर कामाला जाणारा उमेश गारे असे अनेक विद्यार्थी पात्रे कादंबरीच्या मोठय़ा पसाऱ्यातसुद्धा नेमकेपणाने ध्यानात राहतात. या कादंबरीतील स्त्रीपात्रे स्त्रीवादी आशयासाठी नवा महामार्ग होऊ शकतात. तो पुन्हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. अन्नव्यवहार (फुलेंचा शब्द) आणि त्यातून अस्तित्वाला येणारी हिंसा हे ‘डहाण’ कादंबरीचे नवे रूप आहे. मराठी कादंबरीला परिचित (अति) असलेली शैक्षणिक व्यवस्था (आशय म्हणून) अशा अर्थाने या कादंबरीचे वाचन झाल्यास या कादंबरीचे नवेपण झाकोळून जाण्याची शक्यता अधिक आहे. ही हिंसा निसर्गातील अन्नसाखळीचे रूप दाखवत असली तरी तिचे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष स्वरूप तसे नाही.

रिकामा वेळ, मनाविरुद्ध लादण्यात आलेले जगणे, संपूर्ण जगापासून आलेले तुटलेपण यातून आलेला तो खेळ आहे. पुन:पुन्हा सर्प दिसणे आणि अजगराला (सर्पाला) मारण्याचे प्रसंग, धान्यकोठीतील किराणा चोरण्याची समूह मानसिकता, आगोटेबाई- खानबाई यांच्यात दवाखान्याच्या बिलावरून झालेली हाणामारी, त्याला लागलेले मुस्लीम- हिंदू वळण, कावळे सर- लांजेकरबाई यांच्यातील भांडणाचा झालेला विपर्यास, डुस सरांनी माजवलेली दहशत, निकेचा आजार आणि त्यातून तयार झालेले त्याचे वर्तन, देशमुखांचे शिवाजीप्रेम, आश्रमशाळा विरुद्ध वसतिगृह असा सुरू झालेला संघर्ष, आश्रमशाळेच्या शिक्षकाकडून मांसाहारासाठी होणारी पशुहत्या, अन्नव्यवहाराचा भाग म्हणून होणाऱ्या शिकारी.. ही सगळी अंतर्मनात दबून राहिलेली हिंसेची रूपे, लेखकाने त्यात स्वीकारलेली वर्णनपरता आणि सूक्ष्मता ध्यानात घेण्यासारखी आहे. या अन्नव्यवहाराने गाठलेली बीभत्सता निवेदक सांगतो त्या वेळी वाचताना अंगावर काटा येतो. एका ठिकाणी मटण बिर्याणी दोघांनी खाल्ली आणि हात धुण्यासाठी हॉटेलच्या मागे गेल्यानंतर एक रोगाने मेलेली मेंढी वेटर कापत होता. त्या मेंढीचं सडलेलं तोंड, पोट डेबरं झालेलं, चारी पाय काडय़ा झालेले. थोडय़ा वेळापूर्वी मटण बिर्याणी खाताना काही हाडं आपल्याला का चावत नव्हती, याचा खुलासा नागरेला झाला. मोटारसायकल चालवताना दातात गुंतलेलं मांस त्याने बोटाने काढून फेकलं (पृ. १४२) अशी अनेक वाचनीय वर्णने कादंबरीत येतात. भूक आणि शिक्षण यांचा मेळ घालण्यासाठी अस्तित्वात आलेली व्यवस्था, अन्नव्यवहाराच्या बाबतीत सगळी सरकारी मदत असतानासुद्धा कशी अपयशी ठरली; याचे भान ही कादंबरी देते.

वर्णनपरता आणि आशयाच्या निकटपणातून आलेली नैतिकतासुद्धा कादंबरीला ताजेपणा बहाल करते. पाऊस, हिवाळा, उन्हाळा, वीज गेल्यानंतरच्या अंधारातील लोकांचे व्यवहार. कातकरी – पारधी – ठाकूर लोकजीवनाचे अधूनमधून येणारे संदर्भ कादंबरीच्या विस्ताराला भरकटू देत नाही. या कादंबरीच्या संदर्भाने ध्यानात आलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशय निवडताना, मांडताना समकालाचा, साहित्य व्यवहाराचा लेखकाने केलेला विचार. बौद्धिक चर्चा, विस्ताराला पातळ करणारे संवाद, कादंबरीच्या विन्यासाबद्दलची फालतू चर्चा, नायकाची बेफिकिरी आणि त्यातून निर्माण झालेले गौरवीकरण, प्रयोगशीलतेतून विचारव्यूहात आलेल्या कुपोषणाला दडवून ठेवण्याचा समजूतदार अभिजनी प्रयत्न अशा अनेक घटकांना बाजूला करण्याचा प्रयत्न लेखक म्हणून अनिल साबळे यांनी धाडसाने केला आहे. वर्ग चारमधील स्वयंपाकी नायक असल्याने, गेल्या १०-१५ वर्षांत आशयात रुतून बसलेल्या अनेक गोष्टी आपोआपच पुसल्या जाऊन नवप्रवाही आशय दिसायला लागतो. कादंबरीच्या शेवटी नकळतपणे या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग होतो. पैसे भरून तो अशा दुर्गम भागातल्या आश्रमशाळेत बदली करून घेतो, जिथे पाऊस पडून विहिरी भरल्याशिवाय या गावातली आश्रमशाळा सुरू होत नाही अशी निसर्गरम्य परिस्थिती आहे. येथे ‘स्व’ आणि समूह यामध्ये लेखक ‘स्व’ची निवड करतो. स्व-जाचातून शांती असा त्याचा मार्ग आहे; पण दोन-चार भेटींतच आकलन झालेल्या या नव्या आश्रमशाळेच्या परिस्थितीमुळे, त्याच्यातल्या निर्णयाचे विचलन सुरू होते.

‘डहाण’ म्हणजे व्रण. जखम चिघळल्यानंतर ती बरी झाली की असा व्रण तयार होतो. महाराष्ट्राच्या काय, जगाच्या नकाशावर आदिवासी पट्टा म्हणजे डहाणू. डहाणू म्हणजे समर्थपणे व्रण सांभाळणारा. ही कादंबरी वाचून या एकूणच वंचित समूहाबद्दल कुणाला करुणा वाटली तरी फार झाले असे म्हणता येईल. सामाजिक – सांस्कृतिक – शैक्षणिक संक्रमणाबद्दल गप्पा ठोकताना हा व्रण दिसायलाच हवा; याची तजवीज किंवा आशय या कादंबरीने आपल्यासमोर ठेवला आहे.

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 12:00 IST