मित्रा, आपला आजचा दिवस कसाही असला तरी उद्याचा, परवाचा दिवस आणखी चांगला जावा अशी इच्छा आपल्या प्रत्येकाच्या मनात असते. तेच भविष्य. कुणीही कितीही दावे केले तरीही आपलं भविष्य कसं असेल, हे कुणालाच सांगता येत नाही. तुझ्या मनातही कधीकधी भविष्याचा विचार येतो का? तू भविष्यकडे चिंतेनं पाहतोस की बिनधास्त?
एक आहे की, भविष्याची चर्चा करताना लोक आभाळाकडे पाहतात, का ते मला एकदमच माहीत नाही. अंदाज असा की, आपलं भविष्य देवाच्या हाती असावं म्हणून किंवा काही महिन्यात पाऊस कधी पडणार हे पाहण्यासाठी लोक आभाळाकडे पाहत असावेत. त्यामुळे भविष्य म्हणून आभाळ असंही नातं जोडलं असावं. पण आज मात्र आपण भविष्याची कल्पना करताना खाली, कागदाकडे पाहणार आहोत.
तुझ्या मते, तुझ्या भविष्यात काय घडेल? हवेतून जाणार्या बस, अवकाशातलं पर्यटन, चंद्रावर जाणारी शिवनेरी, सगळे काम करणारी रोबोट मांजर, काचांच्या घरी राहणारी झाडे असं काही दृश्य डोळ्यासमोर आली आहे का? तू भविष्यात कुठे असशील? कुठे राहशील? तू श्रीमंत असशील की गरीब? तू काय काम करशील? भविष्याची अशी कल्पना म्हणजे एकप्रकारची जादूच. अशा जादूला अनेक वाटा फुटतात.
त्यामुळे त्यातल्या एकाच जादूला आज चित्रात आणू या, पण अमूर्त शैलीत! या चित्रात तुला वास्तववादी (प्रत्यक्षात दिसते, ओळखू येते तशी) आकार काढायचे नाहीत. तुझ्या मनातलं भविष्य कसं दिसेल याची भावना काढायची आहे. असंही आपलं भविष्य सिक्रेट असल्यानं कुणाला कशाला ‘दिसले’ पाहिजे. आज आता माझ्यासोबत एक छोटं चित्र कर- ‘भविष्यातला ढग कसा असेल.’
सध्या युद्धाच्या बातम्या ऐकता आपले भविष्य काही निर्बुद्ध श्रीमंत माणसांच्या हातात आहे. उद्याचं भविष्य रंगवणार्या तुझ्या वयाच्या अनेक मुलांचं भविष्य कायमचं बंद झालेलं आहे. मी डोळे बंद केल्यावर मला दिसतंय की, आकाशात धुराचे काळे ढग आहेत. संपूर्ण कागद अशा काळ्या ढगांनी भरलेला आहे. त्या ढगात अधिक काळ्या रंगाचे तुकडे आहेत. यात पावसाच्या काळ्या ढगांचा थंडावा नाही.
असं काहीसं माझ्यासमोर येतंय. चल, तू नेहमीप्रमाणे डोळे मिटून मनात भविष्यातील काही गोष्टींची कल्पना कर. तुझ्या भविष्यात आनंदी गोष्टी असतील तर भविष्य सोनेरी, पिवळा, नारंगी, पोपटी अशा चमकदार रंगात दिसेल. आणि गूढ, चिंतेचं असेल तर कधी जांभळ्या, काळ्या रंगात भासेल. भर उन्हाळ्यात तुझं भविष्य हिरव्या, निळ्या निसर्गासारखं थंडगार असू शकतं.
किंवा रोबोटिक धातूसारखं चंदेरी-राखाडीही. ढग कसाही आकारात असतो म्हणून तू कागदावर कोणताही आकार काढ. हा आकार काढताना आपल्याला फक्त कापूस वापराचा आहे. तो कागदावर फार घासायचा नाहीये. त्यासाठी कागदही जरा जाड घेऊ शकतोस. ढगांवर उडणारे ठिपके, एकमेकांत मिसळणारे रंग यांचा वापर करू शकतोस.
एखादा चौकोनी ढग दुसर्या त्रिकोणी ढगावर चढलेला आहे की बाजूला सरला? अवकाशात फुटलेला, हवेत तरंगणारा भविष्यातील ढग एकच असंख्य. हे कागदाच्या तळाशी एकवटलेत की पानभर विखुरलेत… या चित्रात काय दिसतं हे महत्त्वाचं नाही. चित्र पाहून मनातलं भविष्य कागदावरही तसंच उतरलं आहे का? नसेल तर आणखी एक कागद अंगे कापूस घे. मित्रा, जगात भविष्य कोणीच पाहिलेलं नाही, पण तुझ्या रंगांनी आज त्याला पाहता येतेय. हे धमाल चित्र आहे.
‘भविष्यातील ढगा’सारख्या इतर काही कल्पना करून तुला भविष्यातील रंग कागदावर आणता येतीलच. जसे की भविष्यातील तलाव, नदी, वारा, प्रकाश! जे करशील ते मला नक्की पाठव. तुझा चित्र मित्र श्रीबा
शिक्षक आणि पालकांसाठी सूचना…
१. कुटुंबातील परस्पर वातावरण, शाळेत शिक्षकांची वागणूक, परिसराने घेतलेली कुटुंबाची दखल हे सर्व अनुभवताना, पाहताना मुलं त्यांचे भविष्य स्पष्ट/अस्पष्ट पाहत असतात. ‘तुम्ही काय म्हणाल’ या भीतीपोटी कदाचित ते खरेपणाने व्यक्त होत नसतील. ‘कुणाला कळेल’ म्हणून शब्दात सांगायला, लिहायला घाबरतात… त्यावर अमूर्त चित्र हाच मार्ग आहे.
२. मनाचे आरोग्य जपण्यासाठी किमान आठवड्यातून एक चित्र काढण्याचा नियम ठेवा.
