डॉ. आशुतोष जावडेकर

माहीच्या घरी गणपतीची शेवटची आरती होती. बरेच लोक येणार होते. माही कामात अडकली होती. तेजस आणि अरिन मागे एका सोफ्यावर मोबाइलमध्ये डोकं घालून गुपचूप ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधल्या एमिलिया क्लार्कचे फोटो बघत होते. तितक्यात गीतामावशी त्यांच्या दिशेने येत म्हणाली, ‘‘काय एवढं बघताय रे दोघे?’’ तेजसने प्रामाणिकपणे ‘गेम ऑफ थ्रोन्स..’ एवढं म्हटल्यावर त्याने पुढे काही सांगण्याआधीच अरिनने त्याचा हात दाबला. मोबाइलवर स्क्रोल करून वेगळी विंडो उघडली आणि गीतामावशीला हसत म्हणाला, ‘‘अगं, या मालिकेतलं हे एक ‘रिव्हरलँड्स’ नावाचं साम्राज्य आहे. हे बघ. ट्रायडेंट नावाच्या नदीच्या तीन उपनद्यांमधून विस्तारलेलं.. आणि मग तिथली युद्धं.’’ गीतामावशीने मोबाइल हातात घेऊन बघितलं- न बघितल्यासारखं केलं आणि सोफ्यावर विसावत म्हणाली, ‘‘नदीवरून तर काय, आजही भांडणं  होतात. मधे कावेरी नदीवरून दोन राज्यांमध्ये केवढा वाद झालेला. आम्ही तेव्हा बंगलोरला फिरत होतो. दोन दिवस अख्खा कर्फ्यू. हॉटेलात बसून मी चार चित्रपट बघितलेले.’’ तेजस म्हणाला, ‘‘परफेक्ट आहे. नद्या आणि धरणं आणि त्यावरूनची भांडणं जगभर आहेत.’’ अरिनला एकदम स्फुरण आलं. ‘‘नुसती भांडणंच काय? लोकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली आहेत! आपण इथे चार भिंतींत निर्धास्त आहोत म्हणून. माझ्या वर्गातली अंकिता त्या नर्मदा मूव्हमेंटमध्ये काम करत असते. ती सांगत असते मला अधेमधे. मी बालीला गेलेलो एकटा तेव्हा आयुंग नावाच्या नदीत राफ्टिंग केलेलं. काय कमाल सुंदर होती ती नदी! कुठे कचरा नाही. उगाच माणसं जवळ नाहीत नदीच्या. पण आपल्याकडे बघा! आत्ताच कोल्हापूर-सांगली पाण्याखाली गेलं. आणि धरणं तर वाट लावतात. नर्मदेचं अंकिता सांगते की.. ’’ तितक्यात मागून आलेली माही पटकन् म्हणाली, ‘‘नर्मदेच्या वादाला तर अनेक बाजू आहेत!’’ ‘‘काय अनेक बाजू आहेत? लोकांना घरं बांधून मिळाली आहेत का नवीन? जमिनी नव्या चांगल्या मिळाल्या आहेत का?’’ माही पटकन् म्हणाली, ‘‘खूपदा अनेक प्रकल्पांत पुनर्वसन नीट आणि चोख होत नाही. इथे भारतातच असं नव्हे, आफ्रिकेत, युरोपातही. चीनमध्ये तर विरोध करायचीच सोय नसते. पण अरिन, अनेकदा वाद पेटता ठेवण्यात आंदोलकांनाही रस असतो हे विसरू नकोस. मी पेनसिल्व्हानियात असताना बघायचे की आमच्या शेजारच्या पर्यावरणशास्त्र विभागात अनेक भारतीय, मेक्सिकन आणि आफ्रिकन एनजीओवाले ग्रॅन्ट मिळवण्यासाठी सतत भेट द्यायचे.’’ तिचं संभाषण आवेगात खोडत अरिन  म्हणाला, ‘‘म्हणजे तुला सरकारी यंत्रणांची काहीच चूक वाटत नाही? माही..’’ तो अजून काहीतरी बोलणार होता, पण तेजसने त्याचा हात दाबला. ते माहीच्या घरी गणपतीच्या आरतीला आलेले; भांडणं करायला नव्हेत. तेजस हसत म्हणाला, ‘‘बघा, नदीवरून इथेही भांडण झालं.’’ आणि सगळे हसले. मग तेजस माही आणि अरिनकडे आलटून पालटून बघत म्हणाला, ‘‘मला ना थोडं तुझं आणि थोडं तुझं पटतं. मुळात मला ‘विकास म्हणजे विनाश’ ही संकल्पनाच पटत नाही. दोन्ही गोष्टी सापेक्ष असतात. आणि माणसाचा विकास नेहमीच पर्यावरणाच्या विनाशाला सोबत घेऊन येतो असं मला वाटत नाही. अनेकदा पर्यावरणवादी धरणेच बांधायला नकोत वगैरे म्हणतात ते काही मला पटत नाही. नदीचा माणसाने उपयोग करून घेऊच नये स्वत:च्या फायद्यासाठी- असंही मला वाटत नाही. अनेक पर्यावरणप्रेमी हे त्या प्रेमाने आंधळे, अधिक भाबडे होतात, हेही खरं. अनेकदा माही तू म्हणतेस तसं काही मोजके लोक त्या पर्यावरण-प्रेमाच्या गंगेत परदेशी देणग्या मिळवून आपले हात धुऊन घेतात हेही खरं; पण सगळे तसे नसतात. आणि त्याचवेळी अनेकदा उद्योगसमूह नद्यांना गटारासारखं वापरून बिनधास्त सगळा प्रदूषित माल नदीत ढकलतात, सरकारी यंत्रणा र्निबधांची अंमलबजावणी शिथिलपणे करतात किंवा करत नाहीत, धरणग्रस्तांचं पुनर्वसन अनेकदा योग्य तऱ्हेने होत नाही; आणि गावोगावचे बिल्डर्स आटलेल्या नद्यांवर, ओढय़ांवर, नाल्यांवर बिनधास्त इमारती बांधून रग्गड पैसे मिळवतात.. तेही सगळं भयंकरच आसपास चाललेलं असतं.’’

‘‘काय आमच्या मुंबईत हाहाकार झालेला २६ जुलैच्या वेळेस. मी सुदैवाने घरात होतो आणि आमचा फ्लॅट चौदाव्या मजल्यावर आहे, त्यामुळे घरात पाणीही येणार नव्हतं; पण माझे आई-बाबा तब्बल बारा तास प्रवास करून कसेबसे घरी पोचले होते. मी आणि आमच्या बिल्डिंगच्या पोरांनी मग अनेकांना जवळ जाऊन खाऊ दिला, मदतीचा हात दिला. बायका-मुलांना आमच्या अपार्टमेंटच्या मोठय़ा कम्युनिटी हॉलमध्ये ठेवलं होतं. आणि सगळ्यांच्या घरीही कोण कोण अडकलेले मित्र-मत्रिणी येऊन थांबलेले.’’ माहीच्या बाबांनी हातात निरांजन घेतलं आणि आरती सुरू झाली. तोवर अजून पाहुणेही आलेले. तेजस आरती म्हणत होता खरा; पण त्याच्या मनात अरिनच्या बोलण्यावर विचार सुरू राहिला. त्याला वाटलं, जोवर ही माणसाने माणसाला मदत करण्याची शुभंकर जाणीव जागी आहे तोवर या जगण्यात अर्थ आहे.. तोवर या आरती म्हणण्यात अर्थ आहे.

शंकराची आरती सुरू होताना दाराची बेल वाजली. कुणीतरी मागून दार उघडलं. अरिनने मागे बघितलं आणि कधीच पाहिलेलं नसताना त्याने धीरजला अचूक ओळखलं! धीरज आता माहीच्या घरी आरतीला आला म्हणजे गाडी बरीच पुढे गेलीय हे त्याला क्षणात जाणवलं. आणि मग त्याने झांजा जोरात वाजवताना शेजारी उभ्या असलेल्या गीतामावशीकडे साभिप्राय पाहिलं.

तेजसचं अजून तिकडे लक्ष नव्हतं. त्याला त्याची लहानपणीची गोदावरी नदी आठवत होती. भलीमोठी. विस्तीर्ण. संथपणे वाहणारी. काहीशी गूढ. घाटाशी कधी थबकणारी. मधे त्याने मनोज बोरगावकर या त्याच्या नांदेडच्या जुन्या मित्राचं नवं पुस्तक वाचलेलं. त्या पुस्तकाचं नावच मुळी ‘नदीष्ट’ असं होतं. मनोज त्याला नेहमी म्हणायचा, ‘‘तेज्या, जोडले राहू आपण नदीने.’’ त्याच्यासारखा नदीचा नाद असा नव्हता तेजसला; पण तरी नदीचं हे जोडलेपण त्याला आवडायचं. पुण्यात पहिल्यांदा आल्यावर मुळा-मुठेचं आक्रसलेलं, एवढंसं पात्र बघून त्याला धक्का बसलेला. पण पुण्यातल्याच पत्रकार नगरमध्ये एकदा कामानिमित्त तो गेलेला तेव्हा तिथल्या सगळ्या इमारतींची शरयू, शरावती, मेघना, कृष्णा अशी नावे वाचून त्याला अगदी मस्त वाटलेलं. नांदेडच्या त्याच्या घराशेजारी राहणारे शास्त्रीबुवा नदीस्तुती स्तोत्र मोठय़ा आवाजात म्हणायचे ते मग त्याला आठवलं. तोवर आरती संपली. थोडय़ा वेळाने विसर्जनाला जायचं होतं. हातात खाण्याची प्लेट देताना माहीने सगळ्यांची धीरजशी ओळख करून दिली. छान हसला तो. सहज वावरत होता आणि बुजरेपण अजिबात नव्हतं. गप्पांचा नूर कळल्यावर तो म्हणाला, ‘‘मी पुण्यात पहिल्यांदा आलो आणि बातमी वाचली की, बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला. तेव्हा मला वाटलं की, काय पूर आला आहे! मग जाऊन पाहिलं तर तो पूल नदीच्याच पातळीला बांधल्याचं पाहून मला हसूच आवरेना!’’

‘‘सेम हिअर!’’ अरिन हसत म्हणाला. तेजस सावध बसला होता. तो ना बोलला, ना हसला. धीरज म्हणाला, ‘‘मी एकदा ब्राझीलमध्ये बिझनेस मीटिंगसाठी फिरत होतो. अमेझॉन नदी मी अगदी अनेक ठिकाणी पाहिली. तिला शेवटचं बघताना मी मनात म्हटलं : ‘ओब्रिगादो.’’’

‘‘म्हणजे काय हो?’’ गीता मावशीने आदरार्थी ‘अहो-जाहो’ करत धीरजला विचारलं. माही त्याच्या शेजारी येऊन बसत म्हणाली, ‘‘म्हणजे पोर्तुगीज भाषेतलं थँक यू.’’ तेजस खाकरला आणि म्हणाला, ‘‘माझी फेसबुक मत्रीण आहे परिणिता दांडेकर नावाची. ती जगभर नद्यांना भेट देते आणि व्हिडीओ टाकते. नद्यांची अभ्यासक आहे ती. तिचा अमेझॉनवरचा व्हिडीओ मस्त आहे.’’ थोडक्यात, तेवढय़ातल्या तेवढय़ात तेजसने धीरजला दाखवून दिलं की, बाबा, फार शायिनग मारू नको. आमचेही ओळखीचे लोक फॉरिन नद्यांच्या काठावर, प्रवाहावर जातात. गीतामावशी म्हणाली, ‘‘आमच्या कोकणातली पोमेंडीची नदी बघ. छोटीशी, पण अशी तेज! तुला आवडेल.’’ अरिनने हवेतला नूर पाहून तोवर मोबाइलवर अनुष्का शंकरचा एक ट्रॅक लावला. ‘‘ऐका सगळ्यांनी. अनुष्काचा ‘रिव्हर पल्स’ नावाचा ट्रॅक आहे.’’ सुंदर सतार सुरू झाली आणि नितीन सोनीची गिटार. नदीसारखेच प्रवाही सूर. घाट जसा नदीला वळण लावतो तसा त्या सुरांना असलेला ड्रम आणि तबल्याचा ठेका. तीन मिनिटांचं ते स्वर्गीय संगीत ऐकून सगळे खूश झाले आणि मग निघालेच सगळे विसर्जनाला.

सगळे एलिट शांतपणा सांभाळत नदीकिनारी पोचले. तिथल्या पर्यावरणप्रेमी छोटय़ा हौदात ते विसर्जन करणार होते; नदीत नव्हे. शेवटी पुन्हा एकदा आरती झाली. प्रसाद फिरला. माहीच्या आईच्या डोळ्यांत पाणी आलं. कुठलाच निरोप कधीच सहज, सोपा नसतो. कधीच असं होत नाही की, हात हलवला आणि निरोप दिलेला देव, माणूस, नदी मनात मागाहून रेंगाळली नाही! गीतामावशीचे डोळेही पाणावले. ते पाहून माहीच्याही पापण्या ओलावल्या. ते बघून धीरजने तिच्या खांद्याला ओढत जवळ धरलं आणि खणखणीत आवाजात ती एलिट शांतता भंग करत तो ओरडला, ‘‘गणपती बाप्पा..’’ सगळे मग जोरात म्हणाले, ‘‘मोरया.’’ तेजस समोरच्या नदीकडे बघत होता. त्याला वाटलं, नदी आपल्याला सगळं देईल. आणि आपण घ्यायलाही हवं ते सगळं घाट बांधत अनेक.. पण मनात कृतज्ञता हवी. इमम् मे गङ्गे यमुने सरस्स्वति शुतुद्रि.. महान् ह अस्य महिमा.. नदीस्तुती सूक्ताच्या ओळी त्याला अचानक इतक्या वर्षांनी एकदम आठवल्या. तेजसने एकदा बुडणाऱ्या गणपतीकडे पाहिलं, माही आणि धीरजकडे पाहिलं, समोरच्या वाहणाऱ्या निर्माल्य पोटात घेऊन धावणाऱ्या नदीला पाहिलं आणि मग म्हणाला, ‘‘ओब्रिगादो.’’ धीरजने चमकून तेजसकडे बघितलं आणि मग दोघे पुरुष पुन्हा एकसाथ म्हणाले, ‘‘ओब्रिगादो.’’

ashudentist@gmail.com