पराग कुलकर्णी

पबजी नावाचा खेळ – खरं तर ‘गेम’ – तुम्ही कधी खेळले आहात का? नाही? निदान नाव तरी ऐकलं असेल! मग अँग्री बर्डस्, कँडी क्रॅश, टेम्पल रन?.. गेल्या काही वर्षांत सर्वाना वेड लावणारे हे मोबाइल- कॉम्प्युटर गेम्स आहेत. मोबाइल गेम म्हटल्यावर आपल्याला मोबाइलमध्ये डोके खुपसून बसलेली आत्ममग्न लहान मुले दिसतात. पण आजकाल लहानच काय, बरीच मोठी माणसेही हे गेम्स खेळताना त्यातच हरवून गेलेली असतात. अशाच खेळांमधून आलेली, पण अनेक क्षेत्रांत सर्वव्यापी होऊ पाहणारी आपली आजची संकल्पना आहे- गेमिफिकेशन (Gamification).

खेळ म्हटले की आपल्याला मदानी खेळ, बठे खेळ आठवतात. शारीरिक, मानसिक आणि अनेकदा सामाजिक आरोग्यासाठीही खेळांचा कसा फायदा होतो हेही आपल्याला माहिती असते. पण आपण हे फायदे बघून थोडेच खेळ खेळतो? खेळातून येणारी मजा, मिळणारा आनंद हेच आपले खेळण्यामागचे प्रमुख कारण असते. आज आपण कॉम्प्युटर, मोबाइल गेमला नाके मुरडत असलो तरी तेदेखील खेळच आहेत आणि तसे बघितले तर लोकांना गुंतवून ठेवण्याचे काम चांगल्या प्रकारे करत आहेत, हे मान्य करावेच लागेल. या सगळ्याच खेळांकडे आपण मनोरंजनाचे एक साधन म्हणून पाहतो. म्हणूनच ‘खेळापेक्षा अभ्यासावर/ कामावर लक्ष दे’ हे वाक्य आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकले असते, म्हटलेले असते. पण मग खरंच खेळ आणि अभ्यास/ काम हे विरुद्धार्थी शब्द आहेत का? खेळात सहजपणे येणारी मजा अभ्यासात किंवा आपल्या इतर कामात आणता येते का? याचेच उत्तर आहे- गेमिफिकेशन. ज्या गोष्टींमुळे खेळात आपल्याला मजा येते, आनंद मिळतो त्याच गोष्टी आपण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या इतर कामांसाठी वापरून ते काम मनोरंजक, गुंतवून ठेवणारे, लोकांना सहभागी करून घेणारे करू शकतो, यालाच गेमिफिकेशन म्हणतात.

पण हे होते कसे? खेळामध्ये गुण असतात, हळूहळू वाढत जाणाऱ्या काठिण्य पातळ्या (लेव्हल्स) असतात. स्पर्धा असते, थेट जिंकणे किंवा हरणे असते. सरावाने जमेल असे, पण थोडे आवाक्याबाहेरचे आव्हान असते आणि जिंकल्यानंतर तुम्हाला विजेता म्हणून मिरवून घेण्याची एक संधी, एक सामाजिक मान्यताही असते. अनेक गेम्स हे गुण (Points), पदके (Badges), गुणवत्ता यादी (Leaderboards) आणि बक्षिसे (Rewards) यांचा गेममध्ये वापर करतात, कारण मानसिकदृष्टय़ा या साऱ्यांचेच आपल्याला आकर्षण असते आणि त्यातूनच आपण खेळाचा आनंद लुटतो. या अशा खेळाला आनंदी बनवणाऱ्या तत्त्वांना (Game Elements) जर आपण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या कामांत वापरू शकलो, तर त्या कामातही आपल्याला आनंद मिळेल, हाच गेमिफिकेशनमागचा विचार आहे. नायके प्लस अ‍ॅप हे याचे एक उदाहरण. नायके (Nike) ही खेळासाठी लागणारे कपडे, बूट बनवणारी कंपनी म्हणून आपल्याला माहिती आहे. खेळाडूंसाठी नायके प्लस हे एक अ‍ॅप आहे- ज्यात तुम्ही कधी, कुठे, किती धावता याची माहिती जमा केली जाते. यातूनच तुम्हाला तुमच्यासाठीचे काही लक्ष्य (टाग्रेट) दिले जाते आणि ते पूर्ण झाले की तुम्हाला त्यासाठी पदक (Badges) मिळते. तसेच तुमच्या कामगिरीचे मूल्यमापन, विश्लेषण केले जाते आणि अशा अनेक खेळाडूंची माहिती एकत्र असल्याने तुम्ही तुमची कामगिरी इतर खेळाडूंसोबत तुलना करून बघू शकता, ज्याद्वारे तुम्हाला सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते. नायके हे सर्व लोकांचा सहभाग वाढावा, नायके ब्रँडशी लोकांनी जोडलेले राहावे आणि यातून जमा केलेल्या माहितीचा विश्लेषणासाठी आणि अर्थातच जाहिरातींसाठी उपयोग करावा या हेतूने करते. यात ते यशस्वी झाले आहेत असे निश्चितच म्हणता येईल. आज असेच अनेक खेळांचे आणि आरोग्यासाठीचे अ‍ॅपही आपल्याला दिसतात. ‘लॉयल्टी प्रोग्रॅम’अंतर्गत क्रेडिट कार्ड वापरल्यावर, ठरावीक दुकानातून किंवा वेबसाईटवरून वस्तू खरेदी केल्यावर, ठरावीक विमान कंपन्यांनी प्रवास केल्यावर आपल्याला मिळणारे पॉइंट्स म्हणजे गेमिफिकेशनचाच एक भाग आहे.

गेमिफिकेशनचा उपयोग आज सर्वच क्षेत्रांत होतो आहे. अभ्यास टाळणारी मुले तासन् तास मोबाइलवर गेम खेळतात, हे पाहून त्यांचा अभ्यास हा एखाद्या गेमच्या स्वरूपात सादर केला तर ते जास्त प्रभावी ठरते आहे. नुसतेच गणित सोडवण्यापेक्षा प्रत्येक सुटलेले गणित गोष्टीतल्या एखाद्या राक्षसाची शक्ती कमी करते, किंवा तुम्हाला खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवते असे भासवले की मुलेही या गोष्टीच्या खेळात रमतात असा त्यामागे विचार आहे. एवढेच कशाला, आपल्या रोजच्या घरगुती कामांसाठीही गेमिफिकेशनचा वापर करणारी अ‍ॅप्स आली आहेत- ज्यात आपल्याला त्या कामांसाठी (घर स्वच्छ ठेवणे, बिल वेळेवर भरणे) गुण दिले जातात आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. चिऊ-काऊची गोष्ट सांगत बाळाला घास भरवणारी आई गेमिफिकेशनच वापरत नाही का? आज कामाच्या ठिकाणी आणि कॉर्पोरेट जगतातही कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढावा, त्यांना कामात रस यावा तसेच सहकार्याची भावना वाढीस लागावी यासाठी गेमिफिकेशन वापरले जाते. पण केवळ मजामस्ती आणि छोटय़ा कामांसाठी हे आहे का? यातून एखादे मोठे काम होऊ शकते का? याचे उत्तर शोधायला दूर जायची गरज नाही- महाराष्ट्रातली पाणी फाऊंडेशनची ‘वॉटर कप’ स्पर्धा म्हणजे गेमिफिकेशनचेच उत्तम उदाहरण आहे. पाणी वाचवण्याची स्पर्धा घेऊन त्याद्वारे पाणलोट व्यवस्थापनाची माहिती देणे, लोकांना त्या कामात प्रत्यक्ष सहभागी होण्यास लावणे, भांडणे विसरून सहकार्य वाढीस लावणे आणि गावा-गावांत स्पर्धेद्वारे बदल करण्याची, चांगले काम करण्याची ईष्र्या तयार करणे.. असे कितीतरी फायदे यामुळे झालेले दिसतात; ज्याचा उपयोग दुष्काळाशी दोन हात करण्यास होत आहे.

गुण, पदके, गुणवत्ता यादी आणि बक्षिसे म्हणजेच गेमिफिकेशन असे नाही. ती तर केवळ सुरुवात असते. सर्जनशीलतेने इतर अनेक क्लृप्त्या वापरूनही एखादे काम लोकांना आपलेसे वाटेल, आवडेल असे करता येते. लोकांनी पायऱ्यांचा वापर करावा म्हणून त्याला पियानोचा आकार देऊन त्यातून संगीत तयार करणे हादेखील गेमिफिकेशन वापरून केलेला एक नज (Nudge) आहे. गेमिफिकेशनचा व्यावसायिक वापर जसा वाढतो आहे, तसे त्याचे दुष्परिणामही जाणवत आहेत. गेम्समुळे होणाऱ्या व्यसनाधीनतेचा वापर कोणी व्यावसायिक फायद्यासाठीही करू शकतात (गुण मिळवा आणि फ्री बर्गर / पिझ्झा खा!). आपली महत्त्वाची, बिन- महत्त्वाची कामे काही प्रमाणात रंजक बनवू शकणाऱ्या या खेळांचे आपण निश्चितच स्वागत केले पाहिजे; पण त्याचबरोबर आपण ‘खेळतोय’ का ‘खेळवले’ जातोय, हे बघणेही येणाऱ्या काळात तितकेच महत्त्वाचे ठरेल. नाही का?

parag2211@gmail.com