मंदार अनंत भारदे

‘मंगल’ संकल्पनेचे प्रतीकरूप असलेला गणपती आपल्या तब्बल तेहतीस कोटी देवांमध्ये कुठल्याही वयोगटासाठी मित्र म्हणावा असा एकमेव. सध्याच्या दुर्मुखलेल्या आणि घाबरवून टाकणाऱ्या वातावरणात ‘मांगल्य आणि बुद्धीचे प्रतीक म्हणून आपण ‘हॅप्पी मॅन’सारखे गणपतीचे मूर्तीरूप जगाला अर्पण करू शकतो. डीजे आणि मिरवणुकीच्या तावडीतून गणेशाची सुटका करून मंगलपूर्तीचा ध्यास जोपासण्याची आज खरी गरज..

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

कोणत्याही धर्माचा विधी, आचरण आणि मुख्य म्हणजे श्रद्धा यांतून स्वत:ला सुटे करून घेतल्याला मला आता जवळजवळ २५ वर्षे झाली. आयुष्याची सुरुवातीची वर्षे अत्यंत सश्रद्ध म्हणून जगल्यानंतर एका टप्प्यावर ‘स्व’च्या शोधाबाबतीत माझी तत्कालीन सश्रद्धता ही ‘इदं न मम’ असल्याचं लक्षात आलं आणि मग प्रत्येक ज्ञात पतीकाला मानणं मी थांबवलं. काहीतरी अजून अर्थपूर्ण असं जीवनाचं आकलन आपल्याला व्हावं याकरिता शोध सुरू केला, जो अजूनही फळाला आलेला नाही.

या सगळय़ा पार्श्वभूमीवर प्रत्येक गणेशोत्सवात मी गणपती या प्रतीकाबद्दल विचार करीत राहतो. गणपती हा मला कायमच सगळय़ात ‘ग्लॅमरस’ देव वाटत आलेला आहे. भारतीय देवदेवतांच्या प्रभावळीत ज्या देवाभोवती सगळय़ात जास्त कथा रचल्या जाऊ शकतात आणि ज्यावर विश्वास बसू शकतो असा देव म्हणजे गणपती आहे. ‘वॉल्ट डिस्ने’नं जेव्हा त्याचं जग प्रसिद्ध डोनाल्ड डक आणि मिकी माऊस हे पात्र बनवलं, तेव्हा त्या पात्रांची सगळय़ात मोठी गंमत ही होती की, अतिशय देखण्या स्वरूपात त्यातल्या प्राण्यांना चितारण्यात आलं होतं. शिवाय त्यांच्या भोवती माणसाच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्या रचण्यात आलेल्या होत्या. गेल्या ७५ वर्षांहूनही अधिक काळ या देखण्या आणि निरागस पात्रांनी जगाच्या कल्पना आणि स्वप्न-विश्वावर राज्य केलं आहे. गेल्या किमान चार पिढय़ा तरी जगभरातल्या कितीतरी घरांतल्या लहानग्यांनी या कार्टूनच्या बाहुल्या आपल्या घरात आणल्या आणि नंतर जाणत्या वयातही या बाहुल्या सांभाळल्या. मोठं झाल्यावरही या ‘डोनाल्ड डक’ किंवा ‘मिकी माऊस’कडे बघताना त्यांना काय वाटत असावं? रोजच्या जगण्याच्या धबडग्यात वाटय़ाला आलेला रखरखीतपणा, हताशा, क्रौर्य याला सामोरे जाणे कुणाला चुकलंय? आयुष्याशी लढताना कोणी टोकदार होतात, कोणी बनेल होतात तर कोणी नियतीशरण. यातला कोणताही पर्याय स्वीकारला तरी तो थोडीच मानवी प्रतिष्ठा वाढविणारा आहे! डोनाल्ड डक किंवा मिकी माउस जेव्हा ते जाणत्या वयातही पाहतात तेव्हा त्यांना हा दिलासा मिळतो की, निरागसता प्राणपणानं सांभाळली तरी रोजच्या जगण्यातले प्रश्न हसतखेळत सुटू शकतात. तोंडी लावण्यापुरतीच लबाडी जगायला पुरते आणि कितीही फजिती झाली तरी अंतिमत: आपली कार्टून्स जिवंतही राहतात आणि मजेतही राहतात. डोनाल्ड डक किंवा मिकी माउसनं गेल्या ७५ वर्षांत ज्या ताकदीनं एक निरागस ‘ब्रँड’ बनवलाय, तेवढय़ाच ताकदीची आणि तितकीच निरागस वैश्विक अपील असलेली प्रतिमा गणपतीची आहे.

काही दिवसांपूर्वी एका भेटवस्तूंच्या दुकानात मी एक गणपतीची चांदीची मूर्ती पाहिली होती. त्यात गणपतीनं गॉगल घातला होता. त्याच्या पायात बूट होते. त्यानं अगदी फॅशनेबल टोपी घातली होती आणि तो अगदी रमून जाऊन गिटार वाजवत होता. त्याचा मूषकही गॉगल लावून नाचत होता. माझ्यासह कोणालाही यात काहीही खटकलं नाही. गणपती मंडळाच्या देखाव्यांमध्ये ट्रॅफिक पोलिसाच्या वेशातला किंवा शिक्षक बनून चष्मा लावून हातात छडी घेतलेला, सीटबेल्ट लावून गाडी चालवत किंवा हेल्मेट घालून गणपती आणि उंदीर दोघंही बसलेत आणि स्कूटर चालवत वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश देत आहेत. अशा विविध वेशांतले गणपती मी पाहिले आहेत. गंमत म्हणजे, त्यात कोणालाही काहीही वावगं वाटत नाही. देवदेवतांचे पोशाख, रूप या बाबतीतले इतर सर्व देवतांबाबत भारतीय यम-नियम अगदी काटेकोर आहेत. त्यात जरा कोणताही बदल केलेला भारतीय लोकांना आवडतही नाही आणि खपतही नाही, पण याला अपवाद फक्त गणपतीचा. तुम्हाला तो जसा दिसतो तसा तुम्ही त्याला चितारू शकता आणि कोणालाही त्यात काहीही गैर वाटत नाही. काही दिवसांपूर्वी गणपतीवर एक ‘अॅनिमेशन’पट बनवण्यात आला होता. त्यात ‘ओ माय फ्रेंड गणेशा’ असं एक गाणं होतं. यच्चयावत तेहतीस कोटी देवतांमध्ये ‘ओ माय फ्रेंड’ असं दुसऱ्या किती देवांना म्हणता येऊ शकेल? भारतीयच काय, पण एकूणच देव-देवता हे अतिगंभीर प्रकरण आहे. त्यांची सुव्यवस्थित साधना केली नाही तर त्यांचा कोप होतो, ते रौद्र रूप धारण करतात, जन्मोजन्मी ज्यातून सुटका होणार नाही अशा शिक्षा देतात. वंशनाश वगैरेसारख्या टोकाला जाऊनही शिक्षा देतात. काही देवतांची जर साधना केली तर लोकांचा विश्वास आहे की, त्या देवता आपल्या सांगण्यावरून आपल्या शत्रूचा नायनाट वगैरे करू शकतात. या सगळय़ा भयरहाटीपासून गणपती मुक्त आहे. आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या हातून काही वावगं घडलं तर गणपती आपल्याला थेट उकळत्या तेलाच्या कढईत वगैरे टाकेल, अशी भीती कुणालाच वाटणं शक्य नाही. या देवाकडे ‘हे लंबोदरा माझी चूक आपल्या उदरात घे प्लीज!’ असं म्हटलं जाऊ शकतं आणि तोही ‘ठीक आहे, दहा उठाबशा काढ किंवा पंधरा दिवस मिसळ किंवा वडापाव खाऊ नकोस’ इतपतच कठोर शिक्षा देऊन सोडून देईल, असं वाटत राहतं.

‘‘बाप्पा, माझं या मुलावर प्रेम आहे आणि माझ्या मैत्रिणीलाही तो आवडतो. काहीतरी कर आणि माझ्या मैत्रिणीच्या मनातून त्याला उतरवून टाक.’’ आता अशी जर अप्पलपोटी किंवा आपमतलबी इच्छा व्यक्त करायची असेल तर गणपतीशिवाय कोणत्या देवाचा पर्याय उपलब्ध आहे? गणपतीकडे ज्या मागण्या त्याच्या भक्तांनी केल्यात, त्याचा पेटारा जर कधी उघडला तर भारतीय ‘गॉसिप्स’चं एक विराट भांडार खुलं होईल.

‘मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोटय़ान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी’

माझे कोटय़ान कोटी अपराध आहेतच तरीही त्यांना तू पोटी घाल आणि मला मोकळं कर अशी ‘सेटलमेण्ट’ दुसऱ्या कोणत्या देवाशी होऊ शकते?

भारतीय धर्म विचारांत असं सांगितलं जातं की, प्रत्येक ईश्वर हे एकेका तत्त्वाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या ईश्वराची आराधना ही मूलत: त्या तत्त्वाची आराधना असते. सामान्य माणसाला त्याच्या मर्यादित कुवतीमुळे फक्त तत्त्वाला समोर ठेवून त्याची आराधना करणं शक्य होत नाही. त्यांना काहीतरी स्वरूपात मांडल्याशिवाय पूजन करणं शक्य होत नाही. त्यामुळे समोर मूर्ती असेल तर त्या तत्त्वाचं पूजन करणं सामान्य माणसाला सोपं होतं. या मांडणीला जर मानलं तर गणपती कोणत्या तत्त्वाचं स्वरूप असेल?

मला ‘मंगलमूर्ती’ हे गणपतीचं नाव सर्वाधिक आवडतं. मंगल हा तत्त्वविचार हिंदू धर्माव्यतिरिक्त बौद्ध आणि जैन परंपरांमध्ये प्राधान्यानं मांडलेला आढळतो. माझ्या आयुष्यात भरभराट वाटय़ाला येणं, माझं भलं होणं, माझ्या परिवाराला सुख, कीर्ती, संपन्नता, आयुरारोग्य लाभणं या सगळय़ा मानवी कामनांच्या पलीकडे मंगलाची कामना घेऊन जाते. मला जेव्हा कीर्ती, संपत्ती, यश हवं असतं तेव्हा ते किती हवं असतं? तर कोणाच्या तरी तुलनेत जास्त किंवा गेला बाजार तितकं तरी हवं असतं. ‘मंगल’ हे या अशा सगळय़ा मोजमापाच्या आणि तुलनेच्या पलीकडे आहे. कोणाला तरी हरवून मंगल साध्य होऊ शकत नाही. वारसा परंपरेनं कोणाला मंगल मिळत नाही. आता काहीही करून मंगल मिळवतोच या महत्त्वाकांक्षेनंही मंगल वाटय़ाला येत नाही किंवा कुठल्या लॉटरीतही मंगल मिळत नाही. आज खूप सारी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरं होतात आणि लोकही आपली व्यक्तिमत्त्व विकसित असावं म्हणून प्रयत्न करीत असतात. ‘मंगल होणं’ ही व्यक्तिमत्त्व विकासाची सगळय़ात सुंदर प्राचीनतम कल्पना मला वाटते, कारण या कल्पनेतच ‘माझ्यासह सगळय़ांचे’ हे अपेक्षित आहे. त्यामुळे मंगलाची महत्त्वाकांक्षा असू शकत नाही, मंगलाचा ध्यास असतो. अशा या मंगल संकल्पनेचं प्रतीकरूप गणपती असणं हे मला फार मोहक वाटतं.

गेल्या काही वर्षांत ‘हॅप्पी मॅन’ची मूर्ती जगभरात घरोघरी दिसते. ही संकल्पनाच दोन दशकभरापूर्वी बुद्धिस्ट देशांव्यतिरिक्त कोणाला माहीत नव्हती. पण आज अनेक घरांमध्ये ‘हॅप्पी मॅन’ दिसतो. ‘मंगलमूर्ती’ ही त्यापेक्षा मोठी व्यापक कल्पना आहे. गणपतीच्या मूर्तीत एक जागतिक ‘अपील’ आहे. मांगल्य आणि बुद्धी यांची कधी नव्हे इतकी आज जगाला गरज आहे. मांगल्य आणि बुद्धीच्या या प्रतीकाला ‘डीजे’च्या आणि मिरवणुकीच्या तावडीतून बाहेर काढलं आणि जगभरात मांगल्य आणि बुद्धीचा प्रसार व्हावा म्हणून गणपती या प्रतीकाचा वापर केला तर ते मोलाचं ठरेल. मंगलपूर्तीचा ध्यास धरून तसं करायचं झालं, तर भारतभरातल्या कल्पक कलाकारांसमोर आणि उद्योजकांसमोर गणपतीच्या या आधुनिक प्राणप्रतिष्ठेचं ते सकारात्मक आव्हान असेल.

mandarbharde@gmail.com

Story img Loader