छाया दातार

स्त्री-पुरुष समता या वैचारिक धारेखाली निर्माण झालेली चळवळ ही पहिल्या पर्वातील चळवळ आहे असे आजच्या बहुसंख्य स्त्रिया, विशेषत: कार्यकर्त्या मानतात. या पहिल्या पर्वातील स्त्री-पुरुष समतेच्या चळवळीला चालना देण्याचे काम हे पुरुषांनी केलेले आहे हे मान्यच झाले आहे. त्यामध्ये महात्मा गांधी हेही एक महत्त्वाचे नाव आहे हे विसरून चालत नाही.

सत्य, अहिंसा, संयम, निर्भयता याचबरोबर जातपात विरोध, सर्वधर्मसमानता असे अनेक महत्त्वाचे गुण अंगी बाणवण्यासाठी सातत्याने केलेल्या चळवळी आणि इंग्रजांना ‘चले जाओ’ सांगत इंग्रजांच्या साम्राज्यावर शेवटचा घाव घालणारे गांधीजी हे चित्र आपल्यापुढे सातत्याने रंगवले जाते. पण त्या लढ्यामध्ये स्त्रियांना मोठ्या संख्येने आणणारे गांधीजी हे स्त्री-पुरुष समानतेचे आग्रही होते, एव्हढेच नव्हे तर त्यांनी या विषयावर बराच विचार केला होता हे पुष्कळदा विसरले जाते. गांधीजींच्या वेश्याव्यवसाय, देवदासी यांच्यावरील विचारांची स्त्री-मुक्ती चळवळीमध्ये बऱ्याच वेळी चर्चा होते आणि गांधीजींच्या नैतिकतेवर टीका केली जाते. तसेच त्यांनी केलेले ब्रह्मचर्यावरील प्रयोग हेही पुष्कळदा अतिशय अरुंद दृष्टिकोनातून तपासले जातात. पण गांधीजींचा स्त्रीविषयक दृष्टिकोन व्यापकतेने तपासला जात नाही. ते काम निशा शिवूरकर यांनी अतिशय नेटकेपणे व सखोलपणे केलेले आहे ते ‘महात्मा गांधी आणि स्त्री-पुरुष समता’ या पुस्तकात.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: विनम्रतेची शाळा…

किशोर बेडकीहाळ यांनी प्रस्तावनेमध्ये ‘हे पुस्तक रॅडिकल गांधी’ उभा करणारे आहे असे म्हटले आहे. त्याचे कारणही आहे की लेखिकेने शोधून शोधून गांधीजींची अनेक वचने एकत्र केली आहेत आणि त्यामुळे गांधीजींच्या अप्रकाशित भागावर चांगला प्रकाश पडतो. काही प्रकरणे अतिशय चांगली उतरली आहेत. गांधींच्या आंदोलनांमधील स्त्रियांचा सहभाग हे प्रकरण आणि ब्रह्मचर्य आणि संततीनियमन हे प्रकरण नक्कीच अभ्यासपूर्ण झाली आहेत.

आंदोलनांमध्ये स्त्रियांच्या सहभागाला दक्षिण आफ्रिकेत असताना सुरुवात झाली. एका न्यायालयीन प्रकरणामध्ये, ‘‘ख्रिाश्चन धर्मानुसार झालेले विवाहच कायदेशीर मानण्यात येतील.’’ असा निकाल दिला गेला. त्यामुळे हिंदु, मुस्लीम आणि पारशी भारतीयांची लग्ने अवैध ठरली. त्यांची मुले अनौरस ठरली. त्यामुळे महिलांमध्ये मोठी खळबळ माजली. गांधीजी महिलांशी बोलले आणि त्यांच्या लक्षात आले की त्या लढाईत भाग घेण्यासाठी उत्सुक होत्या. गांधीजींनी कस्तुरबांवर दडपण आणले नाही, पण त्याही त्यांच्या हिमतीवर तयार झाल्या याचा गांधीजींना खूप आनंद झाला. त्यानंतर भारतात आल्यावर १९१६ पासून म्हणजेच चंपारण सत्याग्रहापासून गांधीजींची अनेक आंदोलने झाली. त्यामध्ये मिठाचा सत्याग्रह म्हणजेच दांडीयात्रा १९३०, सविनय कायदेभंग १९३० ते १९३२ आणि चले जाव १९४२ या सर्व आंदोलनामध्ये स्त्रियांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. लेखिकेने अवंतिका गोखले-ज्यांनी चंपारण सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि पुढे मराठीतील पहिले गांधी चरित्र लिहिले हा खास उल्लेख करून त्यांचा फोटोही छापला आहे. हिंद महिला समाजाची स्थापना त्यांनीच केली. पुढे ठिकठिकाणी आश्रम स्थापन झाले.

आणखी वाचा-गावात राहावे कोण्या बळे?

असहकार आंदोलनाने सामान्य जनतेत स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली. नोकऱ्या सोडून अनेकजण तुरुंगामध्ये जायला तयार झाले. अहमदाबादला भरलेल्या ऑल इंडिया लेडीज कॉन्फरन्सला ६००० महिलांची उपस्थिती होती. यामध्ये परदेशी कपड्यांच्या दुकानावर पिकेटिंग करण्याचे तंत्र महिलांना सांगण्यात आले. त्याचबरोबर, देशभर फिरून अस्पृश्यता निर्मूलन, खादीचा प्रसार, गावोगावी चरखे पोचवणे, ग्रामस्वच्छता, आरोग्य, दारूबंदी, हिंदू-मुस्लीम ऐक्य असे अनेक विषय गांधीजींनी हाताळले आणि रचनात्मक कार्यक्रमाद्वारे समाजाची उभारणी करण्याचे प्रयत्न केले. यामधून स्त्रियांना भाग घेता आला व त्या घरातून बाहेर पडू शकल्या. १९२९ साली लाहोर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात ‘स्वराज्य म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य’ असा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा झाला. यानंतर मिठाच्या सत्याग्रहामुळे ही कल्पना सर्वदूर पसरली. मृदुला साराभाई, दुर्गाबेन देसाई यांनी गांधीजींकडे परवानगी मागितली, पण त्यांनी ती दिली नाही. त्याबद्दल निषेधही नोंदवला गेला. परंतु मार्गारेट कझिन्स या आश्रमामध्ये राहाणाऱ्या परदेशी महिलेने गांधीजींना पत्र लिहून समजावले आणि पुढे दांडीयात्रेमाधील महिलांच्या सहभागामुळे जगभर हा सत्याग्रह गाजला. लेखिकेने या यात्रेनंतर झालेल्या गुजराथी स्त्रियांच्या परिषदेचा साद्यांत वृत्तान्त दिला आहे. या यात्रेनंतर स्त्रियांमध्ये मोठीच प्रेरणा जागृत झाली. पिकेटिंगचे कार्यक्रम जागोजागी होऊ लागले. त्यासाठी गांधीजींनी टिपण तयार केले होते. प्रभात फेऱ्या निघू लागल्या. साबरमती आश्रम हा या कार्यक्रमांचे केंद्र बनला होता. कस्तुरबाही त्यामध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनाही कारावासाची शिक्षा झाली. सरोजिनी नायडूंनीही यानंतरच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. उत्तर प्रदेशामध्ये नेहरू कुटुंबातील स्त्रिया रस्त्यावर आल्या. विजयालक्ष्मी पंडितांच्यावर लाठीहल्ला झाला. त्या बेशुद्ध पडल्या. कमला नेहरू म्हणजेच जवाहरलाल नेहरूंची पत्नी यांनीही कर देऊ नका मोहिमेमध्ये भाग घेतला. लेखिकेने म्हटले आहे की उपल्ब्ध माहितीनुसार १९३० ते ३१ मध्ये २० हजार स्त्रिया सत्याग्रही म्हणून तुरुंगात गेल्या होत्या.

यानंतरचे आंदोलन म्हणजे १९४२ चे, ‘करेंगे या मरेंगे’ चे चले जाव आंदोलन. १८ जुलै रोजी वर्धा येथे झालेल्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत संमत करण्यात आलेला ठराव. ८ ऑगस्ट रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आली. आणि ९ ऑगस्टपासून धरपकडीला सुरुवात झाली. या पुढील हकीकत आपल्याला बऱ्याच प्रमाणात माहिती आहे. मात्र यामध्ये रेडिओवरून प्रचार करण्याचे व ठिकठिकाणी काय होते आहे याची माहिती देणारी केंद्रे स्थापन करण्यात आली होती आणि अनेक ठिकाणी ती स्त्रियांनी चालविली होती हे विशेष. उषा मेहेता हे एक नाव त्यांच्यापैकीच. या आंदोलनामध्ये अनेक स्त्रियांना अटक झाली होती. विशेषत: सगळ्या मोठ्या पुढाऱ्यांशी संबंधित स्त्रिया होत्या. यांना लेखिका ‘राजबंदिनी स्त्रिया’ म्हणते. या पकडल्या गेलेल्या स्त्रियांमध्ये तीन पिढ्यांतील स्त्रिया होत्या. आपल्या येथील सर्व परिचित नाव म्हणजे इंदुताई केळकर. त्यांचे पती व त्या यांचे लोहियांशी म्हणजेच समाजवादी पक्षाशी नाते पुढे अधिक काळ राहिले होते. मात्र अनेक दिवस पोलिसांना चकवून अज्ञातवासात दिवस काढलेल्या गाजलेल्या स्त्रीचे नाव म्हणजे अरुणा असफली. हे सबंध प्रकरण मुळापासून वाचण्यासारखे आहे. स्वातंत्र्य आंदोलनातील प्रमुख पुढाऱ्यांशी संबंधित जवळजवळ सर्व स्त्रियांनी त्यावेळी योगदान दिलेले दिसते.

आणखी वाचा-विरूप अवस्थांतरणाची गोष्ट

दुसरे महत्त्वाचे प्रकरण आहे ‘ब्रह्मचर्य व संततीनियमन’ गांधींजींच्या मनाला अनेक वर्षे छळणाऱ्या ब्रह्मचर्य या विषयासंबंधी अधिक विचार व प्रयोग हे नौखाली येथील हिंसेच्या निराकरणासाठी गेलेले असताना गांधीजींनी सुरू केले होते, म्हणजेच आयुष्याच्या शेवटच्या काळात. १९४७ साली फाळणी होऊन स्वातंत्र्य मिळाले आणि बंगालमध्ये हिंदू- मुस्लीम वादाला सुरुवात झाली. त्या रक्तरंजित वातावरणामध्ये लोकांना शांततेचे आवाहन करण्यासाठी गांधीजी आपल्या कार्यकर्त्यांसह गेले होते. उपोषणाचा उपयोग होत नव्हता. परंतु हा हिंस्रापणा येतो कोठून या प्रश्नाने ठाण मांडले होते. कोठेतरी लैंगिक भावना उद्दीपित होणे आणि त्यामध्ये वाटणारी आक्रमकता, प्रेम भावनेचा लोप व फक्त भौतिक शरीराची गरज म्हणजे लैंगिक कृती असते का आणि ती अनेक वर्षे, संतती झाल्यावरही टिकावी का हा त्यांना पडलेला प्रश्न यावर त्यांचे मानसिक युद्ध चालू होते. त्यांनी स्वत: चार मुले झाल्यावर शरीरसंबंध थांबवले होते. एवढेच नव्हे तर ते सार्वजनिकरीत्यासुद्धा हे सांगत असत. संयम हा त्यांचा मुख्य उपदेश होता. सत्याग्रहींनाही ही संयमाची दिक्षा उपयोगी पडते असे त्यांना वाटे. स्त्री-मुक्ती चळवळीतील स्त्रियांनी तर वाचले पाहिजेच पण इतरांनीही, पुरुषांनीसुद्धा वाचले पाहिजे असे हे पुस्तक आहे.

‘महात्मा गांधी आणि स्त्री-पुरुष समता’, अॅड. निशा शिवूरकर, रोहन प्रकाशन, पाने- २५२, किंमत-३९५ रुपये.

chhaya.datar1944@gmail.com