गणेश मतकरी हे समकालीन मराठी वाङ्मयातील एक महत्त्वाचे कथाकार, चित्रपट-अभ्यासक, ग्रंथसंग्राहक. त्यांच्या घरातील वाङ्मयप्रेमाचा, वाचन-लेखनाचा आलेला वारसा समर्थपणे पुढे नेणारे म्हणूनही ते सुपरिचित. ‘बिब्लिओफाइल’ हे पुस्तक इंग्रजी पुस्तकांबद्दलचं, तरी मतकरींनी आपल्या आरंभीच्या भूमिकेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक वाचनाबद्दलचं, सर्व वाचणार्यांबद्दलचं आणि स्वत:च्या वाचनप्रवासाचा आलेख मांडणारंही. यातील सर्व म्हणजे चाळीसही लेख हे ‘ललित’ मासिकातून गेल्या पाच वर्षांत प्रसिद्ध झालेले आहेत.

पुस्तक हाती घेताच त्याचे अनोखे मुखपृष्ठ मन आकर्षून घेते. संपूर्ण गडद निळी पार्श्वभूमी आणि त्यावर ‘बिब्लिओफाइल’ या शब्दाचा कोशगत अर्थ देणारी एक चिठ्ठी डकवलेली, ग्रंथालयाचे अर्धेमुर्धे शिक्के. प्रत्यक्ष ग्रंथालयातील पुस्तकासारखे दर्शन. पुठ्ठाबांधणी पुस्तकाचा डबल क्राऊन आकार. आतील अक्षरांचा मोठासा आकार आणि ठरीव मांडणीऐवजी काहीशी मोकळी-ढाकळी मांडणी. पुस्तकाचा असा चेहरामोहरा नकळतपणे ग्रंथाबद्दल औत्सुक्य निर्माण करतो; आणि लेखक आपल्याशी छान गप्पा मारतोय असा एक भाव मनात तयार होतो.

पुस्तके वाचण्याचा नाद, हवी ती पुस्तके मिळवण्याचा ध्यास, इतर सारासार विचार बाजूला ठेवत पुस्तके प्राप्त करताना होणारा एक प्रकारचा कैफवजा परमानंद. या सर्व बाबींबद्दल लेखकाने आपल्याशी अगदी मोकळेपणाने संवाद साधलाय. त्यांच्या या आनंदात आपणही सहज सामील होतो आणि या सफरीचा थरार अनुभवतो.

लहान वयातच गणेशने आपल्याला वाचायला काय आवडतं याचा अंदाज घेत आपलं आपण वाचन चालू केलं. पुढे जाणीवपूर्वक पुस्तकं निवडू लागला. आपल्या या छंदाला कसकसं वळण लागत गेलं हे सांगताना मुंबईतली इंग्रजी पुस्तकांची ग्रंथालयं, त्यातलं वेगळं वातावरण आणि तिथे पुस्तकं शोधताना मिळणारा आनंद आपण लेखकाबरोबर अनुभवू लागतो.

वास्तुविशारद म्हणून काम करताना दृश्यकलेची जाणीव वाढत गेली आणि पुस्तकांची मुखपृष्ठं, त्यातील चित्रं, ग्राफिक नॉव्हेल्स, कॉमिक्स यांची आवड लागली. ‘शब्द आणि चित्र’ हा संपूर्ण लेख, त्यातील माहितीसाठी अतिशय वाचनीय आहे. ‘ॲलिस इन वंडरलँड’ सारख्या परिचित पुस्तकांची जी वेगवेगळी सुरेख रूपं बाजारात आली, किंवा साल्वादोर दालीसारख्या चित्रकाराने या पुस्तकाचे जे अमूर्त दर्शन घडवलंय त्याबद्दल मतकरी सचित्र वर्णन करतात. ‘शब्दांच्या पलीकडले’ या शीर्षकाचे तीन लेख आपल्याला ‘टिनटिन,’ ‘ॲस्टेरिक्स’ यापुढच्या कॉमिक बुक्सविषयी खूप माहिती देतात. गेल्या ३०-४० वर्षांमध्ये फार जलद गतीने झालेला मीडिया विस्फोट, इंटरनेटचं सर्वव्यापी आक्रमण आणि त्यामुळे लहानथोर सार्यांचीच वाढलेली आणि अपरिहार्य झालीशी वाटणारी दृश्यसाक्षरता, यावर नेमके बोट ठेवत मतकरींनी मांडलेला विचार महत्त्वाचा वाटतो.

कोणीही वाचक सामान्यपणे बदलत्या तंत्रज्ञानाला कसा सामोरा जातो, पुस्तके विकत घेताना कसा विचार करतो हे सांगत, चांगल्या वाचकाने कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या, त्यातले फायदे-तोटे कोणते याचा नव्या-जुन्या दोन्ही पिढींच्या बाजूंनी विचार करत लेखकाने काही गोष्टी सुचवल्या आहेत. पुस्तक विकत घेणे या साध्या गोष्टीत दडलेल्या विविध गमतींचा विचार त्यांनी स्वानुभव सांगत ‘लेस इज मोर’ या लेखात केला आहे. आपली पुस्तकखरेदी कसकशी होत गेली, त्यात कसकसे बदल झाले, याच्या आठवणीही जागवल्या आहेत. त्याचबरोबर एच. पी. लवक्राफ्टच्या ‘कॉस्मिक हॉरर’ व इतरही भयकथासाहित्याची आपली आवड, हवी ती पुस्तकं शोधताना करावी लागणारी धडपड हे सारं वाचनीय आहे.

लेखांमध्ये दिलेले लेखकांचे, पुस्तकांचे संदर्भ हे आपल्याला गुंगवून टाकतात. मतकरींच्या स्मरणशक्तीचं राहून राहून कौतुक वाटतं.

‘मुराकामीची डार्क बीअर’ सारखा लेख तर कथाकार मतकरींच्या लेखनप्रेरणेचाही संदर्भ देतो. ‘निरर्थक अवकाशातले एकटेपण’यामधून मतकरी आजचं नवं वास्तव जाणून घेत म्हणतात, ‘नवे संघर्ष, आयडेंटिटीचे प्रश्न, अस्थिरतेची नवी जाणीव, वेगळी शैली यात अधिक दिसते आणि त्यात लेखिका आघाडीवर आहेत.’ याबरोबर दिलेली उदाहरणं वाचताना आपण अतिशय अस्वस्थ होतो.

‘पुस्तकं-गुंगवणारी/ गुंतवणारी’ या लेखातून मराठी वाचकाला अपरिचित असणार्या वेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची माहिती करून दिली आहे. जे साहित्य-ते कथात्मही असेल-ते समजून घेण्यासाठी वाचकाला विशेष प्रयत्न करावे लागतात, आपली आस्वादप्रक्रिया उंचावावी लागते त्याला ‘अरगॉडिक लिटरेचर’ असा शब्द वापरतात. काही वेळा प्रायोगिक लेखनाच्या प्रकारांमध्ये क्रमाने पाने उलटत जाण्याऐवजी पाने मागेपुढे करत, बरोबरीच्या टिपांचा वापर करत कविता किंवा कथा पुढे जाते. वाचक आणि लेखक यांची वैचारिक देवाणघेवाण व्हावी लागते. या प्रकारच्या पुस्तकांची माहिती देणारा हा लेख खरोखरी गुंगवणाराच आहे.

गणेश मतकरी हा लेखक कितीबाजूंनी पुस्तक या वस्तूचा विचार करतो याचे नवल वाटते. चित्रपट हाही लेखकाचा आवडीचा अभ्यासविषय. त्यामुळे कोणत्या पुस्तकावरून कोणत्या चित्रपटाची निर्मिती झाली, त्याची पटकथा कशी लिहिली, त्याच्या दिग्दर्शकाने संबंधितांना कोणत्या, कसकशा सूचना दिल्या या सगळ्याची पुस्तके प्रसिद्ध होतात आणि त्यांचे दस्तावेजीकरण होते. चित्रपटांमधील नवं सांगणारे लेख- नोटबुक्स ( संग्राह्य फिल्म जर्नल) द गॉडफादर बुक्स, दोन विदारक शेवट आणि एकूणच कलाप्रक्रियेच्या नोंदी वगैरे वाचणं फार आनंददायी आहे. रहस्यकथा, लोकप्रिय साहित्यातील पुस्तकं तर माहिती असणं स्वाभाविक, पण दृश्यकलांबाबतीतील अनवट, दुर्मिळ पुस्तकेही आपण कशी मिळवली, ती कशी शोधावीत, याबद्दलचे लेख वाचताना अचंबा वाटतो.

सगळे लेख एकत्रित वाचताना त्यांचा ठाशीव परिणाम होतो आणि लक्षात येतं की, या लेखनाचं संदर्भमूल्य अमोल आहे. प्रत्येक लेखाबद्दल लिहिणं आवश्यक वाटलं तरी अशक्य आहे. हे लेख वाचताना मला आठवण झाली, Michael Sadleir (मायकेल सॅदलीर) या विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील ग्रंथसंग्राहकाची. तो म्हणतो की, ‘ज्याला स्वत:ला वाचनाचा छंद, आवड असते तोच खर्या अर्थाने ग्रंथसंग्राहक बनू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की केवळ वाचनाची आवड असणारा प्रत्येकजण उत्तम ग्रंथसंग्राहक असेल किंवा तो संग्राहक होण्यास पात्र असेल. मतकरींजवळ मात्र वाचनाची आवड आणि संग्राहक होण्याची पात्रता आहे हे त्यांच्या लेखनातून लक्षात येते. इंग्रजी साहित्यातील, पुस्तकनिर्मितीतील नवनवे प्रकार, प्रयोग याबद्दलचा एक सचित्र संदर्भग्रंथ अशा या निर्मितीबद्दल लेखक व प्रकाशक यांचे अभिनंदन.

‘बिब्लिओफाइल’, गणेश मतकरी, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, पाने- २८८, किंमत- ७०० रुपये.