विजय तापस

गंगाधर पाटील हे भारतीय आणि पाश्चात्त्य समीक्षाविचारांतला एक अबोल सेतू होता. त्यांनी मराठी समीक्षकांना आणि वाचकांनाही एक कोरं करकरीत विश्वभान आणून दिलं. कथा, कादंबरी, नाटक, कविता आणि समीक्षा हे गंगाधर पाटील यांचे पंचप्राण होते. त्याबद्दलचं त्यांचं अखंड चिंतन सर्वव्यापी होतं..

Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

मराठी साहित्य समीक्षेतल्या आधुनिक युगाचे निर्माते आणि संवर्धक म्हणून आपण ज्या दहा-बारा विचारप्रवर्तकांची नावे घेऊ त्यात सर्वोच्च स्थानी असणाऱ्या प्रा. गंगाधर पाटील यांनी नुकताच (९ जुलै रोजी) आपणा सर्वाचा अखेरचा निरोप घेतला. या निरोपाबरोबरच ९३ वर्षांची एक ज्ञानयात्रा विराम पावली. अलिबागमधल्या एका छोटय़ा गावात जन्माला आलेल्या आणि तिथेच सुरुवातीचे शिक्षण घेतलेल्या गंगाधर पाटील यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी रामनारायण रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथेच त्यांच्या ज्ञानयोगाला व ज्ञानसाधनेला सुरुवात झाली. तशी ती होणारच होती, कारण तेव्हाचा- साधारण १९४५ ते १९५१- रुईयातला प्राध्यापक वर्ग म्हणजे वि. वा. शिरवाडकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘तेजस्वी ग्रहगोलांचं कुटुंब’च होता. एकापेक्षा एक सरस प्राध्यापकांनी विविध ज्ञानशाखांतील तेजोमय ज्ञानकण हात आखडता न घेता विद्यार्थ्यांच्या पदरात घालण्याचा तो काळ होता. प्रकांड ज्ञानी प्रा. नरहरी रघुनाथ फाटक यांनी संस्कारित केलेल्या गंगाधर पाटलांनी ज्ञानार्जन, ज्ञानसाधना आणि ज्ञानार्पण हाच स्वत:चा जीवनमार्ग म्हणून निश्चित केला.

मराठी भाषा आणि साहित्य यावर निर्मळ, नितांत प्रेम करणाऱ्या गंगाधर पाटील यांचा अगदी तरुण वयापासूनच एक ‘पुस्तकभक्ष्यी’ म्हणून बोलबाला होता. ते वयाच्या अगदी पार नव्वदीपावेतो प्रचंड वाचन करणारे होते. (त्यांनी वाचलेली पुस्तकं सहज ओळखू यायची, कारण पुस्तकाच्या पानापानांवर बारीक अक्षरातल्या नोंदी आणि अधिक तपशीलवार नोंदींसाठी वहीच्या पानांचा वा चतकोरांचा समावेश झालेला असायचा. एखाद्याने नुसते ते चतकोर संगतवार लावले तरी त्याच्या नावावर एखादं दणकेबाज पुस्तक व्हावं!) त्यांनी जे जे वाचलं, ते ते असं वाचलं, वाचलेलं असं मनात कोरलं गेलं की जणू एकेक शिल्पच! त्यांनी वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाशी त्यांचा खास ऋणानुबंध, जिवाभावाचं नातं होतं. स्वत:च्या या पुस्तकांना ते सहसा कोणालाही हात लावू देत नसत. त्यांनी वाचलेल्या अतीव मोलाच्या पुस्तकांची त्यांच्या कपाटातली मांडणी इतकी खास असायची की विचारता सोय नाही. त्यांनी आयुष्यभर पोटाला चिमटे काढून, कपडय़ांची आणि इतर हौसमौज बाजूला सारून जी काही हजार पुस्तकं गोळा केली होती, त्या पुस्तकांच्या गराडय़ात बसलेल्या गंगाधर पाटलांना पाहण्याचा मला अनेकदा योग आला. ते दृश्य.. त्यांचा तो निकट एकांत अक्षरश: स्तंभित करणारा असायचा. फोर्टमधल्या राजाबाई टॉवर ग्रंथालयातल्या वाचक कक्षात अंधुक प्रकाशात बसलेले वाचनमग्न गंगाधर पाटील यांना पाहताना काय वाटायचं ते नेमकं सांगता येणार नाही. वाचनात पार बुडालेल्या वाचकाचं एखाद्या प्रतिभावंत चित्रकाराने काढलेलं आणि पाहणाऱ्यावर चेटूक करणारं जणू ते महान पोट्र्रेटच वाटायचं. हे थोडंसं विषयांतर झालं.. गोष्ट अशी की- त्या, त्या व्यक्तीच्या काही काही स्मृतीप्रतिमाच अशा असतात, की त्या अशाच खोलातून उफाळून येत असतात.

तर सांगायची गोष्ट ही की, ज्ञानार्जन, ज्ञानसाधना आणि ज्ञानार्पण हाच स्वत:चा जीवनमार्ग नक्की केलेल्या गंगाधर पाटलांनी पुढच्या संपूर्ण आयुष्यात एकदाही हा मार्ग सोडला नाही. गरिबी, हलाखी वा जीवनात वेगवेगळ्या गोष्टींचं दुर्भिक्ष जसं साधारणपणे हजारोंच्या आयुष्यात असतं तसं ते पाटील सरांच्या आयुष्यातही होतं. वेगवेगळ्या काळांत, आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर जे, जे काही भोगावं लागतं ते, ते ते स्वत: शांतपणे भोगत होते. त्यांच्या लहानपणी आणि कळत्या वयातही त्यांच्यावर संस्कार झाले ते लोकशाही, समाजवाद, आदर्शवादाचे आणि समता-स्वातंत्र्य-बंधुत्व या मूल्यांचे. गंगाधर पाटील अखेरच्या श्वासापावेतो कधीही या मूल्यांपासून ढळले नाहीत. सेवादलाचे असे काही संस्कार त्यांच्यावर होते की खुद्द सेवादलाची वाताहत झाली आणि महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारणही सेवाव्रताकडून भोगव्रताकडे सरकलं तरी गंगाधर पाटील त्यांच्या निष्ठा आणि मूल्यांवर अढळ राहिले. गंगाधर पाटील म्हणजे नम्रता, शालीनता, वागण्या-बोलण्यातली टोकाची सभ्यता, सुसंस्कृत भाषा आणि तीव्र संवेदनशीलता यांचं विलक्षण अदबशीर रसायन. त्यांची शारीरभाषाही या सगळ्याला साजेशी.. थोडी संकोचल्यासारखीच. कदाचित म्हणूनच त्यांचा सामाजिक वर्तुळांमधला वावर जवळपास शून्यवत होता. आपण आणि आपली ज्ञानसाधना, हाती घेतलेलं अध्यापनाचं  कार्य आणि सातत्याने चाललेलं लेखन हेच त्यांचे व्यावसायिक जीवनातले अग्रक्रम होते. अध्ययन- अध्यापन- लेखन हाच त्यांचा नित्यधर्म होता. त्यांनी अध्यापनाची सुरुवात केली ती बालमोहन शाळेपासून आणि ते निवृत्त झाले ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातून. त्यांच्या जीवनातला एक मोठा कालखंड त्यांनी मुंबईतल्या के. सी. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून व्यतीत केला. मात्र के. सी. महाविद्यालयाच्या संस्कृतीत ते बहुधा रमले नसावेत. त्यांच्याबद्दल प्रचंड ममत्व असलेल्या डॉ. व. दि. कुलकर्णी यांच्या सततच्या प्रेमळ आग्रहामुळे त्यांनी मुंबई विद्यापीठात अर्ज केला आणि तिथे त्यांची निवड होऊन पुढे ते मराठी विभागाचा सर्वोच्च मानिबदू ठरले, हे सर्वश्रुत आहे.

‘गंगाधर पाटील हे प्राध्यापक म्हणून कसे होते?’ असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मला आजही वाटतं की, मी आणि माझ्यासारखे अनेक ज्या १९८० च्या दशकात त्यांचे विद्यार्थी होतो, त्या सर्वाचं आणि कदाचित नंतरच्याही अनेकांचं एका बाबतीत एकमत होतं की, गंगाधर पाटील हे एक असे प्राध्यापक होते की, त्यांनी आम्हाला जो जो विषय शिकवला त्या विषयाची समग्र जाण त्यांच्यापाशी होती. त्यांचं वर्गातलं प्रत्येक व्याख्यान म्हणजे विद्यार्थ्यांची बुद्धी, भावनाविश्व, त्यांचा जीवनानुभव उंचावणारी अमूल्य देणगी होती. त्यांच्या व्याख्यानात वक्तृत्वाचा दिमाख नव्हता, भाषेचा जरतारीपणा नव्हता, उत्तम प्राध्यापकाला आवश्यक असणारे अभिनयगुण नव्हते आणि तरीही त्यांच्या व्याख्यानाची मोहिनी प्रचंड होती. त्यांच्या अभ्यासाची, व्यासंगाची, सर्जनशीलतेची, अर्थनिर्णयनशक्तीची आणि अत्यंत गुंतागुंतीच्या विषयाला अनुभवाच्या पातळीवर आणण्याची सहजता यांची एकात्मता त्यांच्या प्रत्येक व्याख्यानात होती. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक झाले, कारण त्यांचं प्रत्येक व्याख्यान इन्स्पिरेशन देणारं, नवं, अज्ञात, विलक्षण असं काही देणारं आणि मुख्य म्हणजे साहित्याला भिडण्याचा आत्मविश्वास देणारं होतं.

प्रा. गंगाधर पाटील यांनी केलेलं समीक्षात्मक लेखन, त्यांनी मराठी साहित्य समीक्षेत पेरलेल्या नवी युरोपिय ज्ञानदृष्टी- ज्या समीक्षा पद्धतीची रुजुवात त्यांनी स्वत:च्या लेखनातून प्रत्यक्षपणे मराठी वाचकांना करून दिली. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर गंगाधर पाटील यांनी मराठी समीक्षेत एका प्रबोधनयुगाची पहाट निर्माण केली असं म्हणायला हवं. आज मागे बघताना हे लक्षात येतं की, आदिबंधात्मक, मानसशास्त्रीय, घटितार्थशास्त्रीय समीक्षा, अर्थनिर्णयन मीमांसा, संज्ञामीमांसा, चिन्हमीमांसा, समीक्षासिद्धांतन, संरचनावाद, उत्तर-संरचनावाद, ज्याँ-पॉल सार्त् यांच्या अस्तित्ववादी तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोणातून झालेल्या साहित्यविचारांची मराठी वाचकांना ओळख करून देणे, देरिदा-फुको- हायडेगर-चॉम्स्की-रोलाँ बार्थ-बाक्तिन या सर्वाचं विचारधन मराठी वाचक, समीक्षक, संशोधक यांच्यापर्यंत नेणारे गंगाधर पाटील म्हणजे भारतीय आणि पाश्चात्त्य समीक्षाविचारातला एक अबोल सेतू होता. खरं बोलायचं तर पाटलांनी मराठी समीक्षकांना आणि वाचकांनाही एक कोरं करकरीत विश्वभान आणून दिलं. महाराष्ट्र शासनासाठी डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी संपादित केलेल्या ‘समीक्षा संज्ञाकोशा’तील प्रा. गंगाधर पाटील यांनी लिहिलेल्या नोंदी जरी एखाद्याने पाहिल्या तरी हा माणूस किती विद्वान होता हे त्याच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. कविवर्य पु. शि. रेगे, केशवसुत, इंदिरा संत, ज्ञानदेव, विष्णुदास नामा यांच्या विविध रचना असोत,  नेमाडेंची ‘कोसला’, भाऊ पाध्ये यांची ‘राडा’ या कादंबऱ्या असोत किंवा ब्रेख्तचं विचारविश्व आणि त्याचं नाटक असो वा इतर अनेक मराठी कवितांवर/ कलाकृतींवर त्यांनी जे काही लिहिलं आहे ते अपूर्व आहे. कथा, कादंबरी, नाटक, कविता आणि समीक्षा हे गंगाधर पाटील यांचे पंचप्राण होते.

त्यांनी चार माणसांसारखा संसार केला. मुलांना उत्तम शिक्षण आणि आत्मविश्वास देऊन भरारी घ्यायला साथ दिली. नातवंडांवर जीव ओवाळला. आणि अनेक वर्षांपूर्वी पुढे निघून गेलेल्या पत्नीला दिलेल्या वचनांची पूर्तताही केली. या साऱ्यात लिहून झालेली अनेक पुस्तकं प्रकाशित करायची राहूनच गेली आहेत. आता त्यांच्या मागे त्यांचं हे अप्रकाशित साहित्य ग्रंथरूपात आणणं हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल.

vijaytapas@gmail.com