मित्रा, मूर्तीशाळेत, मंडपात, दुकानात, फ्लेक्स – फलकावर, टी-शर्टवर आता बाजारात सगळीकडे गणपतीच दिसायला लागला आहे. शाडूचे, मातीचे, प्लास्टरचे, कागदाचे गणपती काही दिवस विक्रीला आहेत. पण काही आपलं दर्शन दगडात, बटाट्यात, झाडाच्या खोडातदेखील देतात.

मला लहानपणी एकदा तर चपातीच्या डागातसुद्धा गणपती दिसला होता. आईला मात्र काहीच दिसत नसल्यानं तिनं ती चपाती घाईनं संपवायला लावली. मग प्रश्न असा, काहींना दिसत असणारे आणि काहींना दिसत नसणार्‍या परिस्थितीत… बटाट्यात, खोडात, चपातीवरच्या डागात गणेशाचं रूप असतं की नसतं? आता त्या दिवशी मी असेच अष्टविनायकांपैकी काही गणपतींची रूपं पाहिली. आपल्या परंपरेत अनेक मूर्ती स्वयंभू मानल्या जातात. म्हणजे एखाद्या शिल्पकारानं बसून आधी दगडात गणपती कोरला आणि मग त्याची पूजा सुरू झाली, असं नाही. दगड, खडक, निसर्गानं घडवलेला आकार. निसर्गानं दगड दिला. वार्‍यानं, पाण्यानं, काळानं त्यावर आपलं काम केलं. कुठे एखादा उंचवटा, कुठे वळण, कुठे खोलगट भाग…

कुणा मानवाला त्यात ओळखीचा आकार भासला. त्यावर शेंदूर चढला. बाजारातल्या मूर्तीसारखा दिसत नसला तरी अचानक आपल्या सर्वांना दिसू लागलं, ‘‘अरे! हा तर गणपती!’’ पण हे घडतं तरी कसं? आपल्या डोक्यात गणेशाची एक ओळख आधीपासून तयार असते. गोलसर रूप दिसलं, एखादं वळण दिसलं, दोन ठिपके दिसले की आपलं मन बाकीचा गणेश स्वत:च पूर्ण करून टाकतं. कदाचित बाकीचे आकार आपल्याला महत्त्वाचे वाटतच नसतात.

जसं गणपतीला चार हात दाखवा किंवा आठ, सिक्स पॅक दाखवा किंवा महापोटी… आपल्याला ते मॅटरच करत नाही. जसे की, आपल्याला ढगात हत्ती दिसतो. ढगानं तो काढलेला नसतो. आपण त्याला मनातच काढलेला असतो! कलेतली ही गंमत मला फार आवडते. एखाद्या चित्रात सगळं काही स्पष्टपणे सांगितलेलं नसलं तरी चालतं. कधी कधी थोडंसं दिसलं की बाकीचं पाहणारा त्यात स्वत: शोधतो. स्वत:च्या अनुभवातून आलेलं दिसतं. त्या दगडात असणारा बाप्पा समजा भारतीय देव माहीत नसणार्‍या कुणा विदेशी माणसानं पाहिला तर त्याला कदाचित हत्तीसारखं दिसेल. किंवा चहाची किटली! म्हणूनच कदाचित दोन जण तुझ्या चित्राकडे पाहून दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगतात.

आता जरा कल्पना कर, या दगडावर विशेष फुले वाहिली नसती, शेंदूर नसता, डोळे नसते, भोवती मंदिर नसतं तर असंख्य दगडातून तुला स्वत:हून गणपती दिसला असता का? थोडं लक्ष दिल्यास दिसला असता. थोडा दगडात आणि थोडा तुझ्या कल्पनेत. कारण तू शाळेत, बाजारात जाता-येता मूर्तीशाळेत उभा राहून गणपतीच्या मूर्ती आनंदाने न्याहाळत असतोस. आज आपण कागदावर अशीच एखादी गंमत करून बघूयात. आपल्याला गणपतीच्या कुठल्याही चित्राची कॉपी करायची नाही. पेन्सिल, स्केचपेन न घेता थोडा घट्ट रंग किंवा मळलेले पीठ किंवा माती घे. गणपतीच्या रूपात महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या ते आठव. मला वाटतं, आजसाठी मोठे कान, मोठं पोट आणि सोंड पुरे.

कागदावर मोठा केशरी, लालसर नारंगी रंगाचा गोल आकार काढ. तो ओला असेपर्यंतच त्यात एक थोडा गडद केशरी रंगानं इंग्रजी र किंवा उ सारखे वळण काढून पाहा. सोंडेसारखे. कुठलाही थेट, स्पष्ट आकार नाही, आउट लाइन नाही. रंगानं रंगावर काढलेलं आकार. आधीच्या रंगात थोडे मिसळलेले एक वळण.

(माती किंवा पीठ वापरणार असशील तर ते रंगवायचा नाही.) अगदीच वाटतं आहे तर डोळ्यांच्या जागी दोन बिंदू दे. फक्त एवढं काढ की, पाहणार्‍याला क्षणभर वाटावं, ‘‘थांब… इथे गणपती दिसतोय की काय?’’ आणि बाकीचा त्याच्या मनाला काढू दे. तू केलेलं हे चित्र मला ईमेल करायला विसरू नकोस.
तुझा चित्रमित्र

श्रीबा

shriba29@gmail.com

शिक्षक आणि पालकांसाठी…

१. गणपतीची अनेक नावे तशी रूपे/ आकार आहेत. काही जुन्या तर काही नव्या चित्रकारांनी घडवलेली. असे प्रदर्शन या काळात लागले असल्यास आवर्जून जा.

२. मुलाने काढलेल्या चित्रात गणपती दिसत नसला तर त्याला तुमच्या मनातील गणपती कागदावर रंगवून दाखवा.