डॉ. रवींद्र शिवदे
आकाशापासून भूतलापर्यंतचा भवताल आपल्याला नकारात्मक घटक आणि घटनांचा साक्षीदार बनवतोय. सचोटीने काहीही करू पाहणार्‍याचे ‘गाढव’ बनलेले पाहायला मिळतेय. प्रामाणिक नोकरदार, अधिकारी, पोलीस, शिक्षक, प्राध्यापक, इंजिनीअर, वकील, आर्किटेक्ट, सी.ए. इतकेच काय व्यापारी आणि शेतकरीदेखील मूर्ख ठरवले जातायत आणि सगळ्याच यंत्रणांतील अप्रामाणिकांचा उदोउदो चाललाय. या वातावरणाची आणि याही स्थितीत कोणत्याही ‘कट’कटीविना ‘नीट’ काम करणार्‍यांच्या राजकीय ऊर्मींची तसेच सामाजिक बाबींची नस व्यंगाद्वारे पकडणारे दोन मासले…

मी डॉ. रवींद्र शिवदे, संस्थापक अध्यक्ष या नात्याने जाहीर करतो की ‘डी.जे.पी.’ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मी जरी व्यवसायाने डॉक्टर असलो तरी ‘डी.जे.पी.’ चा अर्थ ‘डॉक्टर्स जनता पार्टी’ असा नसून ‘डाँकी जनता पार्टी’ असा आहे.

आता वाचकांच्या (किंवा माध्यम प्रतिनिधींच्या) मनात काही प्रश्न उद्भवणे साहजिक आहे. उदा.-

तुमच्या पक्षाची ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे काय आहेत?
तुम्हाला संस्थापक अध्यक्ष कुणी केले?
अध्यक्षपदासाठी तुमची पात्रता काय आहे?
या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मी देणार आहे-

सर्वप्रथम ‘डाँकी’ अर्थात् ‘गाढव’ या शब्दाची व्याप्ती समजून घेणे महत्त्वाचे आहे. या देशातील प्रत्येक प्रामाणिक व्यावसायिक हा ‘गाढव’ आहे. या देशात सचोटीने आणि सेवाभावी वृत्तीने व्यवसाय करून आपली भरभराट होईल आणि त्यासोबत समाजाचेही भले होईल अशा भ्रमात राहण्यार्‍या प्रत्येक ‘गाढवा’चे आमच्या पक्षात स्वागत आहे. या ‘गाढवां’ना किमान सुखसोयीसहित जगण्याचा हक्क प्राप्त व्हावा हेच पक्षाचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी संघर्ष करणे हे ध्येयधोरण आहे.

राहता राहिला प्रश्न माझ्या अध्यक्षपदाचा. माझ्या मते ‘गाढव’ या संज्ञेसाठी एका डॉक्टरहून अधिक पात्र व्यक्ती सापडणे कठीण आहे. एके काळी वैद्यकीय व्यवसाय हा पैसा, प्रतिष्ठा आणि पुण्य या तिन्ही गोष्टींची प्राप्ती करून देणारा होता. अजूनही समाजातील अत्यंत बुद्धिमान आणि कष्टाळू तरुण मोठ्या आशेने या व्यवसायात पदार्पण करतात. इतर कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्याची क्षमता त्यांच्यात असते. पण डॉक्टर होतात आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या मालकांची गधामजुरी करतात. बरे, खासगी व्यवसाय करावा तर त्यासाठी प्रचंड भांडवल लागते. समजा, ते भांडवलही कर्ज काढून उभे केले व मोठ्या कष्टाने व धाडसाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला तर नीतिमत्तेचे पालन करीत व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहणे अशक्य होते. आज या व्यवसायाची अवस्था ‘कोणीही यावे टपली मारून जावे’ अशी झालेली आहे. पोलीस, प्रशासन, पत्रकार आणि पुढारी या पारंपरिक पीडकांच्या पाढ्यात आता पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांची भर पडली आहे. आता केवळ टपल्यांवर न निभावले जाता ‘गाढवा’ला लाथा, बुक्क्या तसेच प्राणघातक शस्त्रांचाही प्रसाद मिळू लागला आहे.

‘डी.जे.पी.’च्या अध्यक्षपदाची माळ मी स्वत:च आपल्या गळ्यात घालून घेतली आहे. कारण मी डॉक्टर तर झालोच, पण त्यातल्या त्यात स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र ही अत्यंत धोकादायक, क्षणात होत्याचे नव्हते करणारी, अल्पमोली व बहुश्रमी शाखा निवडली. हा दुहेरी ‘गाढव’पणा केल्यामुळे मी अध्यक्षपदासाठी पात्र आहे यात कोणतीच शंका उरत नाही.

‘डी.जे.पी.’ स्थापन करण्याची प्रेरणा मला एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाकडून मिळाली नाही, तर प्रत्यक्ष माझ्या गुरुवर्यांकडून मिळाली आहे. हे गुरुवर्य मुंबईतील प्रख्यात सर्जन होते. ‘गधेडा’ ही त्यांची अत्यंत आवडती शिवी! त्यांच्या युनिटमधील मेडिकल स्टुडंटपासून सीनियर रजिस्टारपर्यंत सर्वांनाच ‘गधेडा’ची लाखोली वाहिल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नसे. आमच्या बॅचच्या पहिल्या सर्जिकल टर्मच्या पहिल्याच दिवशी सरांनी आम्हाला समोर उभे केले आणि फर्मावले- So, You have taken admission to a Medical College. You want to become doctors. If you think that doctorl s life is all ¸ मज्जा, you are the biggest ¦ गधा on Earth. Quit now, before it is late. A doctor’ s life is PURE DONKEY WORK!

अशा प्रकारे अल्पवयातच माझ्या ‘गाढव’पणा वर शिक्कामोर्तब झाले.

हेही वाचा

‘डी.जे.पी.’त डॉक्टर मंडळींचा भरणा जास्त असला तरी या देशात सचोटीने व्यवसाय करू पाहणारा (आणि फसलेला) प्रत्येक व्यावसायिक ‘गाढव’च आहे, म्हणून आमच्या पक्षाचा सदस्य होण्यास पात्र आहे. यात प्रामाणिक नोकरदार, प्रामाणिक सनदी अधिकारी, प्रामाणिक पोलीस (होय असतात), शिक्षक, प्राध्यापक, इंजिनीयर, वकील, आर्किटेक्ट, सी.ए. इतकेच काय व्यापारी आणि शेतकरीदेखील आले. या सर्वांना आवाहन आहे की आमच्या पार्टीत सामील व्हा!

नुकताच दिल्ली येथे ‘जंतर मंतर’वर आमच्या पार्टीचा देशव्यापी मेळावा संपन्न झाला. मेळाव्यासाठी देशभरातून शेकडो (फेसबुकी भाषेत लाखो) प्रतिनिधी आले होते. काहींनी गाढवाचे मुखवटे घातले होते, तर काहींच्या डोक्यावर ‘मी गाढव’ हे जाहीर करणार्‍या टोप्या होत्या. कृत्रिम कान आणि शेपट्या यांची रेलचेल होती. कुठल्याही क्षणी लाथाळ्या सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस बंदोबस्त चोख होता. मेळाव्यात खालील प्रमाणे मुख्य प्रस्ताव मांडले गेले व एकमताने मंजूर झाले-

‘गाढव’ हा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात यावा. गाढवांविषयी अपमानास्पद उल्लेख शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात यावे. उदा. ‘बखत पडा बाँका तो गधे को कहे काका’, ‘अडला नारायण गाढवाचे पाय धरी’, ‘गाढवाला गुळाची चव काय’, ‘गाढवापुढे गायली गीता, कालचा गोंधळ बरा होता’, ‘गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ’ इत्यादी. ‘ॲनिमल फार्म’ या कादंबरीतील बेंजामिन नावाच्या प्रामाणिक व कष्टाळू गर्दभोत्तमाचे पुतळे गावोगावी उभारावेत. आयुष्यभर कष्ट करून, सचोटीने राहून शेवटी हलाखीतच दिवस कंठणार्‍या गाढवांना गर्दभश्री, गर्दभभूषण व गर्दभरत्न असे चढत्या श्रेणीतले पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करावेत.

वधू-वरांची वरात, तसेच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची मिरवणूक गाढवावरून काढण्यात यावी.

नाशिकसारख्या काही महापालिकांनी शहरांतील उकिरडे हटवून घंटागाड्यांतून कचरा वाहून नेण्याची अगोचर प्रथा सुरू केली आहे. त्यामुळे गाढवांना लोळायची सोयच उरली नाही. घंटागाड्या रद्द करून गाढवांच्या पारंपरिक विश्रांतीस्थानांचा जीर्णोद्धार करावा.

वडांगळी ता. सिन्नर या नाशिक जिल्ह्यातील गावात धुळवडीच्या दिवशी गावच्या जावयांची गाढवावरून मिरवणूक काढण्याची ऐतिहासिक प्रथा आहे. वडांगळीस तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करावा व मिरवणुकीनंतर जावयांचा जो मानपान केला जातो त्याचा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून करावा असा प्रस्ताव वडांगळीचे ग्रामस्थ लंबकर्ण खुळे यांनी मांडला.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गाढवांचा गौरव वाढविणार्‍या शिलाहारकालीन शिळा आढळतात, ज्यांना ‘गधेगळ’ म्हटले जाते. या शिळांना ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले जावे व क्रमिक पुस्तकांत त्यांचा इतिहास समाविष्ट करावा.

भारतात अनेक जाती-जमातींत व्यवसायास मदत म्हणून गाढवांचा प्रतिपाळ केला जातो. या गर्दभरक्षक जमातींचा एक खास प्रवर्ग निर्माण करून त्यांना केंद्र व राज्य पातळीवर सर्व क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे.
पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच जागांवर डी.जे.पी. आपले उमेदवार उभे करणार आहे. निवडणूक चिन्ह अर्थात ‘गाढव’ हेच राहील. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पार्टीचेही ‘गाढव’ हेच चिन्ह असल्यामुळे त्या पार्टीशी हातमिळवणी करून परकीय मदत मिळवण्यासाठी संस्थापक अध्यक्ष लवकरच अमेरिकेचा दौरा करतील.

वरील सर्व प्रस्ताव खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर झाल्यामुळे संयोजक मंडळी थोडी रिलॅक्स झाली आणि दिल्लीच्या सुजाण नागरिकांनी जंतर मंतर मैदानावर करून ठेवलेल्या कचर्‍याचा त्यांनी आस्वाद घेतला. मैदानावर काही स्टॉल्सही लागलेले होते. त्यातील बुकस्टॉलमध्ये डॉ. आनंद नाडकर्णी यांचे ‘गद्धे पंचविशी’ तसेच कृष्णचंद्र यांचे ‘गधे की आत्मकथा’ या पुस्तकांची तुफान विक्री झाली. तसेच ळँी छं६ ्र२ ंल्ल अ२२ या वचनाचा आधार घेऊन काही बुकसेलर्सनी कायद्याची पुस्तके विक्रीला ठेवली होती. त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्रातून आलेल्या लोकनाट्य पथकाने ‘गाढवाचे लग्न’ हे दादू इंदुरीकरांचे अजरामर लोकनाट्य सादर केले आणि प्रेक्षकांनी रेकण्याच्या तसेच खिंकाळ्यांच्या स्वरूपात दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने जंतर मंतरचा आसमंत भरून गेला!