समीर गायकवाड

जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाच्या झंझावातात ग्रामीण आणि शहरी जग यांतलं द्वैत आता हळूहळू मिटत चाललं आहे. या पुसट होत चाललेल्या खुणांचा मागोवा घेणारं सदर.. ‘गवाक्ष’!

कलीच्या माळावरून खाली गेलं की पाझर तलावाचा भराव दिसतो. उन्हाळ्याच्या आधीच करपत चाललेल्या खुरटय़ा झुडपांचे बेचके जागोजाग दिसू लागतात. बरड रान असल्यानं इथं काही उगवत नाही की पिकत नाही. दीड-दोन कोस उभा-आडवा इलाखा सगळा या झुडपांनी वेढलेला. थोडं पुढं चालत गेलं की जमिनीला उतार लागतो आणि थोडी काळीकरडी माती लागते. इथं दर पावसाळी हंगामात घास-गवत उगवतं. एकदम सुळसुळीत आणि रसरशीत. सोसाटय़ाचं वारं आलं की या गवताच्या लाटा आल्यासारखं वाटतं. गवतातनं चालत गेलं की ते अंगाला लगटायला बघतं. कुत्र्यामांजराने लाडाने हात चाटावेत तसं ते हातापायाला चाटू पाहतं. उन्हे कडक होऊ लागल्यापासून गवत पिवळं पडू लागलंय. सुकून चालल्यामुळं ते हलत नाही की डुलत नाही. भगवंतासारखं ते स्थितप्रज्ञ झालंय.

सादळून गेलेल्या बिस्किटासारखं झालंय त्याचं. अधूनमधून वेडय़ा बाभळीची झाडं अंगाचा पसारा मांडून बसलेली. त्यांच्या कोरडय़ा, खरबरीत पानांवर धुळीची पुटं चढलेली. यांच्या काटय़ाच्या बुडाशी पांढऱ्या कोळ्याची चिवट, दाट जाळी सुरू झालेली. फांद्याफांद्यांत या जाळ्यांची नक्षी आणि त्यात अडकलेली चिलटे, माशा, किडे नकळत नजर खेचून घेतात. एखाद् दुसऱ्या फुलपाखराचा लाल-काळ्या ठिपक्यांचा पंखसुद्धा दिसतो. अधूनमधून कुठल्यातरी गुराच्या वाळून खडंग झालेल्या विष्ठांचे अवशेष आजूबाजूला दिसतात. बक्कळ दगडधोंडय़ांनी भरलेला भराव आता चांगलाच नजरेत भरतो. काटेकुटे तुडवत, खड्डेखुड्डे चुकवत भरावाच्या जवळ जाईपर्यंत ऊन माथ्यावर येतं.

डाव्या अंगानं खाली गेलं की पालव्याच्या धोंडय़ाचा जुना पिंपळ लागतो. एकदम जुनाट, जीर्ण. सगळीकडं पानांची चळत लागलेली. मोहोर गळून पडलेला. वरती शेंडय़ाला काटक्यांची मोकळी घरटी. पानगळ जोमात असल्याने कपडे उतरवलेल्या खंग्री पलवानाच्या बरगडय़ा दिसाव्यात तशा त्याच्या पानमोकळ्या फांद्या दिसतात. शेंडय़ाच्या टोकाला थोडीफार नवी पाने दिसतात. त्याच्या झुल्यावर एखादा चुकार रावा नजरेस पडतो. एव्हाना वाऱ्याचं घुंऽऽघुंऽऽ संगीत सुरू झालेलं असतं. पिंपळाचा बुंधा उघडा पडलेला. त्यात खोपच्या मारलेल्या. लाल-करडय़ा डिंकाचे ओघळ आणि आगमुंगळ्यांच्या शिस्तीतल्या रांगेची हालचाल एका विशिष्ट सूत्रबद्ध लयीत होत राहते. झाडाखाली बसावं म्हटलं तर सावलीचा मागमूस नाही. इकडंतिकडं डोळे भरून पाहण्यात बराच वेळ गेल्यानंतर उन्हे पुढे सरकल्यामुळे मोठय़ा लठ्ठ बुंध्याची सावली येते. आणि तिच्याखाली बसून भाकरीचं फडकं सोडलं की पोटातल्या भुकेची जाणीव होते. सोबत आणलेल्या बाटलीतलं पाणी कोमट झालेलं. हात धुऊन जठराग्नी शांत केल्यानंतर वारा डोळ्यांवर पेंग घेऊन येतो.

पाठ मातीला कधी टेकते, कळत नाही. निळ्या-पांढऱ्या आभाळातून विरळ ढगांच्या अभ्य्रातून एका सुरात आवाज काढत जाणाऱ्या टिटव्यांच्या थव्याने जाग येते. त्यांची अंडी इथंच भोवताली कुठंतरी असणार. त्यांना पांथस्थाचा धोका वाटला असणार. त्यामुळे जिवाच्या आकांताने त्यांचा गलका चाललेला. तोंडावर पाण्याचा सपकारा मारून उठावं म्हटलं तरी पाय निघत नाहीत.

धोंडिबाचा जीव इथंच गेलेला. पालव्यांच्या घरातला आडदांड गडी. भरावाचं काम सुरू असताना त्याच्या अंगावर दगडांची मोठी रास कोसळून तो जखमी झालेला. सगळा आजोरा बाजूला हटवून त्याला जखमी अवस्थेत उचलून बाहेर काढलं आणि पिंपळाच्या याच झाडाखाली आणून ठेवलेलं. काही क्षण त्यानं श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला.

या पूर्ण परिसरात दोनच पिंपळाची झाडं होती. त्यांचं फारसं अप्रूप असायचं कारणही नव्हतं. तरीही त्या दिवसापासून या पिंपळाचं नावच ‘पालव्याच्या धोंडय़ाचा पिंपळ’ असं पडलं. त्याच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या कलावतीच्या डोक्यावर परिणाम झाला. ती भ्रमिष्ट झाली. ती तासन् तास इथं येऊन बसू लागली. गुरं वळायला म्हणून यायची आणि इथं बुंध्याला पाल चिकटावी तशी बसून राहायची. काहीबाही पुटपुटायची. हसायची. एकटक बघत बसायची. गाव म्हणू लागलं, कलीला धोंडय़ाने झपाटलं. तिच्या घरच्यांनी नंतर नंतर तिला पलंगाला बांधून ठेवलं; पण तिच्यात काही केल्या फरक पडला नाही.

एका लग्नसराईच्या हंगामात तिच्या घरचे सगळे लोक पानखेडला गेले आणि शेजाऱ्यांची नजर चुकवून कली इथं आली. दिवस मावळायच्या वेळेपर्यंत बसून राहिली. अंधार पडू लागला तशी तिला थोडी शुद्ध आली आणि ती निघाली. घासगवताचं रान ओलांडून, बरड माळ पायाखाली घालून ती वरच्या पांढऱ्या मातीच्या माळावर आली आणि डोक्यात पक्कं केल्यानुसार तिथल्या बांधावर तिनं फास लावून घेतला. तेव्हापासून हा ‘कलीचा माळ’ नावाने कुप्रसिद्ध झाला. गावातल्या लोकांनी ही दोन्ही ठिकाणे वर्ज्य केली. चुकूनमाकून इकडं आलेलं जित्राबदेखील कशाला तोंड लावत नाही. त्यामुळं कुठला गुराखीदेखील इकडं फिरकत नाही.

याचा परिणाम गावभर फुकाच्या कंडय़ा पिकण्यात झाला. काही महिन्यांतच इथं रानटी झुडपांचं साम्राज्य पसरलं. पाऊसपाणी पिकलं नाही तरी ही खुरटी झुडपं वेगाने वाढत गेली. आजूबाजूच्या लोकांनी आपल्या शेतशिवाराकडं जाणाऱ्या वाटांच्या दिशा बदलल्या. गावातल्या काही चुकार तरुणांनी हा पिंपळ तोडायचा प्रताप करून पाहिला; पण ते सपशेल अयशस्वी झाले. पिंपळ जोमाने वाढत राहिला. गावाकडे हे असंच असतं. कुठे कुणी फास लावून घेतला, कुणाचा चुकूनमाकून जीव गेला वा कुणी जीव दिला, तर त्या जागी जायचं लोक टाळू लागतात. जीव दिलेल्या विहिरीतलं पाणी उपसायचं कमी करतात. कुण्या बांधावरच्या बाभळीला, लिंबाला कुणी फास घेतला असला की एक तर तो बांध ओसाड होतो, नाहीतर ते झाडच कापलं जातं. कुणी अकस्मात मेलं की तिथं मोठय़ाला शिळा रचतात; जेणेकरून तिथं कुणी जाऊ नये. हे सर्व करण्यामागं त्या स्मृती नष्ट व्हाव्यात, हा हेतू असावा असंच वाटतं.

कुणाचं असं एकाएकी जाणं काळजाला चुटपुट लावून जातं. आणि त्या घटनेची स्मृती जागवेल अशी चिन्हे नष्ट करण्याकडे लोकांचा कल राहतो. खेडय़ापाडय़ांत हे अजूनही चालतं. कारण सहजतेनं ‘त्या’ दु:खद जागा टाळता येतात. पण शहरात असं होत नाही. घरातल्या घरात कुण्या आप्तेष्टाने फास घेतला असला तरी इतरांना ते घर सोडता येत नाही. कुण्या लॉजमध्ये जरी अशी घटना घडली तरी दुसऱ्याच दिवशी तिथं कुणीतरी उतरलेला असतो. अशा अनेक जागा असतात, की जिथं कुणी ना कुणी जीव दिलेला असतो. पण त्या जागा टाळून जाणं जमत नाही. कारण जागा हादेखील एक फासच झालेला असतो. राहायची जागा, ऑफिसची जागा, व्यवसायाची जागा, भोवतालची जागा.. यातलं काय काय म्हणून बदलणार, काय काय टाळणार, याचं उत्तर देता येणार नाही.

पण याला ‘असंवेदनशीलता’ म्हणता येणार नाही. ही जीवघेणी तडजोड नंतर सवयीची होऊन जाते. मात्र, एकदा का यातून बाहेर पडलं, की या स्मृती विजनवासात जातात. गावाकडं संवेदनशीलता जास्त आहे असंही म्हणता येणार नाही. पण तिथल्या जगण्यात अजून ‘स्पेस’ आहे- जी शहरात हरवत चालली आहे, हे यातून नक्की उमगतं. ‘माळावरचे फास’ हे म्हणूनच अधिक दु:खद ठरतात. कारण त्यांना किती जरी टाळले तरी ते कोणत्या न् कोणत्या रूपानं समोर येतच राहतात. सालागणिक त्याची पुनरावृत्ती कुणाच्या न् कुणाच्या वाडीवस्तीवर होत राहते आणि माळांचे, बांधांचे, वस्त्यांचे नाव बदनाम होत राहते. हवेचा रोख पाहता वाढत्या फासांची भव्यता आता आकर्षक वाटत जाईल की काय, अशी कुशंका येते.

sameerbapu@gmail.com