अस्वल गुदगुल्या करून मारतं’, असं आमच्या लहानपणी मोठी माणसं आम्हाला सांगायची. त्यामुळे मी तेव्हा देवाकडं अशी प्रार्थना करायचो की, जंगली प्राण्याकडून मला मरण येणार असेल तर ते अस्वलाकडून येऊ दे. शब्दश: हसत हसत मी मृत्यूला सामोरा जाईन… हे आत्ता आठवायचं कारण म्हणजे नव्या पिढीनं ऊर्फ जेन-झीनं केलेलं आणि संपूर्ण देशानं याची डोळा बघितलेलं आंदोलन. ‘अनुभवलेलं आंदोलन’ असं मी म्हणणार नाही. याआधी झालेलं शेतकर्‍यांचं आंदोलन, शाहीनबाग आंदोलन किंवा तेव्हाची काँग्रेसची सत्ता पलटवण्यासाठी मोठं कारण ठरलेलं अण्णा हजारेंचं आंदोलन… ही सगळी आंदोलनं देशानं ‘अनुभवली’. अनुभव घेणं हा बव्हंशी गंभीर मामला असतो.

‘मैं भी अण्णा’ची टोपी घालण्यात लोक तेव्हा अभिमान बाळगत असत आणि आपण काहीतरी गंभीर कार्याला हातभार लावत आहोत अशी त्यांची प्रामाणिक समजूत होती. या आंदोलनात मुलांनी कुठल्या टोप्या घातल्या नाहीत, उलट हसत हसत अनेकांच्या टोप्याच उडवल्या. या आंदोलनात गंभीर, उभे चेहरे करून कुणी ‘‘चला, देशासाठी अमुक एक करुयात’’ टाईप म्हणतही नव्हतं आणि कुणाचा तसा आव, आविर्भावही नव्हता. चिल-पिल घेऊन मुलं मूलभूत, गंभीर काम करत होती. हे सगळं आपण (म्हणजे जेन-झीच्या आधीच्या पिढ्यांनी) डोळे विस्फारून बघितलं.

या आंदोलनानं काय नाही झालं? दमनशाही, दंडुकेशाही करणार्‍या जगातल्या कुठल्याही सरकारकडे कलेच्या मार्गानं, विनोदाच्या मार्गानं लढणार्‍या लढ्याला काही उत्तरच नसतं. तो भाग त्यांनी कायमसाठी ‘ऑप्शन’ला टाकलेला असतो. अहंकारी राजाच्या दरबारात जाऊन गोंडा लावलेली सुंदर टोपी मिरवत त्याला खिजवून, वर ‘‘राजा मला घाबरला, माझी टोपी दिली मला,’’ म्हणत नाचणार्‍या उंदराची गोष्ट आपल्याला लहानपणापासून माहीत आहे. त्या गोष्टीचं प्रात्यक्षिक जेन-झीनं दिलं. अभेद्य वाटणार्‍या तटबंदीला डोळे मिचकावत भगदाडं पाडली. इतक्या वर्षांची वाटणारी भीती हा निव्वळ बागुलबुवा होता हे सिद्ध केलं. सरकारची तळी उचलण्यात धन्यता मानणार्‍या तथाकथित मुख्य माध्यमांची लायकी काढून झाली. लोकशाहीच्या या चौथ्या पोखरलेल्या, खचलेल्या आणि कुजलेल्या खांबावर त्यांच्याच इभ्रतीची लक्तरं लटकवून झाली.

हे सगळं झालं ते का आणि कसं याची मीमांसा, विश्लेषण होत राहील. पण एक पैलू जो या आंदोलनाचा विशेषबिंदू म्हणता येईल त्याची चर्चा गरजेची.
या आंदोलनात तरुण पिढीची नवीन भाषा आपल्याला ऐकायला, प्रामुख्यानं ‘बघायला’ मिळाली. हातानं लिहिलेलं, छापून आणलेलं, रंगवलेलं, चित्रं आणि शब्द यांचा मिलाफ असलेले विविध संदेशांचे फलक हे या आंदोलनाचं ठळक वैशिष्ट्ये म्हणता येईल. मुलांनी त्यांच्या आतली खदखद बाहेर काढली ती वक्रोक्ती- विनोदाच्या बोगद्यातून. ही कात टाकलेली सळसळती भाषा आहे, हे शेवाळं साचलेलं डबकं नाही. या भाषेला जुन्या, पारंपरिक किंवा बुरसटलेल्या विचारांचा कणभरही वास नाही. ही पिढी वाढली तीच मुळात मोबाइल, इंटरनेट हातात घेऊन.

गप्पा मारायला या पिढीला भेटावं लागत नाही. मोबाइलवर ‘चॅट’ करणं हे त्यांच्यासाठी गप्पा मारणंच आहे. आणि त्या गप्पा मारण्यात त्यांनी त्यांची एक भाषा विकसित केली आहे किंवा ती चटकन संवादासाठी नैसर्गिकरीत्या तशी झाली आहे; आणि ती GM, GNTC किंवा इमोजींच्या कित्येक मैल पुढं गेली आहे. Faaaa (फा…) सारखा सुरात चालणारा शब्द प्रसंगानुसार अनेक भावना प्रकट करतो. ‘कुचुपुचू’ हे विशेषण कितीही ‘लार्जर दॅन लाईफ’ व्यक्तीला तुमच्या शेजारी आणून बसवतं. व्यक्त व्हायला एरवी जिथे शब्दांचा खच पडता तिथे एखादं मीम हे त्या शब्दांहून बरंच अधिक काही या हृदयाचं त्या हृदयी करतं. ‘‘जल्दी रिजाईन दे दे, कल सुबह पनवेल निकलना है’’ मध्ये गंभीर विषय किती अकृत्रिम पद्धतीनं मांडता येऊ शकतो हे समजतं.

ही भाषा, त्यातला विनोद समजण्यासाठी तुम्हाला तो संदर्भ माहीत असणं आवश्यक असतं. फोनवर मेलोनी ‘‘माझ्यासाठी नडला नाहीस कधी इतकं. एवढं काय त्या प्रधानमध्ये?’’ बोलतानाचं मीम एकाच वेळेस दोन पक्षांना लक्ष्य करून गेलं. अशा मीमला मोदी आणि मेलोनीच्या (स्वत: मोदींनी आणि मीडियानं तयार केलेल्या) वातावरणाची पार्श्वभूमी आहे. ‘ओटीटी’वर गाजलेल्या सीरिजमधली पात्रं असतील किंवा त्यातले प्रसिद्ध झालेले संवाद असतील, यांचा उपयोग करून या नवीन पिढीचं कार्टून तयार होतं; आणि सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे मनात आलेला विचार मांडायला कुण्या ‘प्रोफेशनल’ मनुष्याची गरज नसते! नेटवर उपलब्ध असलेल्यांपैकी टेम्प्लेट घेऊन काही मिनिटांत मीम करता येतं आणि ते प्रसारित करायला, लोकांपर्यंत पोहोचवायला कुठल्या ‘मीडिया हाऊस’ची लिफ्ट झिजवायची गरज नसते.

हाताशी असलेला ‘सोशल मीडिया’ हे काम लीलया करतो. अशा सगळ्या तोफा जेन-झीनं वापरून आंदोलन अविस्मरणीय बनवलं. त्यांचा विनोद, उपहास, वक्रोक्ती, तिरकसपणा, डार्क ह्युमर, विडंबन खळखळून हसवतं ठेवत होतं. त्याचबरोबर दोन क्षण रेंगाळायला, विचार करायला भाग पाडत होतं. म्हणून तर सारेच लोक रिल्सवर या आंदोलनाबाबत अद्ययावत राहणं पसंत करीत होते. बरं, हा सगळा मामला जडजंबाळ शब्दप्रधान नाहीच किंवा नुसता दृश्यात्मकही नाही. मुंबईत झालेल्या आंदोलनात अनेकांनी मेलडी चॉकलेट्स वाटली. ही इतकी साधी कृती ‘मैं भी अण्णा’ची टोपी घालण्याइतकी गंभीर नसेल, पण तितकीच प्रभावी ठरते. किंबहुना, डोळे मिटून मलई खाणार्‍या राज्यकर्त्यांना चिमटा काढते.

या पिढीची भाषा हा त्यांचा सहज ‘उद्गार’ आहे त्याला ‘दिल पे’ किंवा शब्दश: कुणी घेऊ नये. त्यांच्या विनोदात, भाषेत बहुतांश जणांना अश्लीलता वाटेल, पण ती भाषा कुणाला दुखावण्यासाठी म्हणून मुद्दाम योजलेली नाही. हे सहज टप्पल मारून पुढे जाण्यासारखं आहे; कुणाला जखमी करायचा हेतू त्यात नाही. ही पिढी दीर्घद्वेषी नाही. मुळात त्यांची ती प्राथमिकता नाही, त्यांच्याकडे तेवढा वेळही नाही आणि संयमही नाही. सतत स्क्रोल करणारी ही पिढी. आत्तापर्यंतच्या पिढ्यांचं लहानपण अंगठा चोखण्यात गेलं; तर या पिढीच्या अंगठ्याला खालून वर स्क्रोल करणारी दिशाच ठाऊक. जेन-झी मधला एकलव्य द्रोणाचार्याला अंगठा देणार नाही, दाखवेल!

(की मधलं बोट दाखवेल?) आदल्या पिढीला पुढची पिढी कायमच वाह्यात, आगाऊ वाटत आली. हे शतकानुशतके सुरू आहे. प्रत्येक आईबाप त्यांच्या पोरांना ‘‘आमच्यावेळी असं नव्हतं बरं…’’ हे वाक्य ऐकवत आले. अगदी पन्नास-साठच्या दशकातल्या मराठी, हिंदी सिनेमातही ‘‘काय ही आजकालची मुलं – ये आजकल के बच्चे भी नां…’’ अशी वाक्य म्हणताना एखादा बुजुर्ग, एखादी मावशी दिसतेच! तोच न्याय या पिढीला लागू आहे. पण मोठ्ठा फरक हा बहुधा साधनांचा आणि त्यामुळे झालेल्या भाषेतल्या, वर्तणुकीतल्या बदलांचा आहे.

आंदोलक सैरभैर व्हावेत म्हणून सरकारनं त्यांच्यावर पाण्याचा फवारा मारला तर या मुलांनी त्यात ‘रेन डान्स’ केला. बॅरिकेड्स लावले तर त्याची ढकलगाडी केली. लाठ्या मारायला पोलीस आले तर मोठमोठ्यानं राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली! एका व्हिडीओत आंदोलक पोलिसाला ‘‘टीयर गॅस की व्यवस्था नहीं है क्या?’’ असं सहज विचारताना दिसतो. सरकारधार्जिण्या संस्था आणि लोकांनी या आंदोलनाला सोरोस आणि चीनकडून फंडिंग मिळत असल्याच्या वावड्या उठवल्या तर पोरांनी थेट जिनपिंगला फोन लावत (अर्थात खोटाखोटा) ‘‘अरे क्षी, मी ऐकलं की तू आंदोलनाला पैसे पुरवतोयस. तुला क्यूआरकोड पाठवतोय, तीन चहाचे पैसे पाठव बरं.

बाय. झिंगचिंगटींग’’ असे रील्स केले. फुकटचा आव आणणार्‍या सरकारला या पोरांनी अध्र्या रात्री ‘फ्रेंड्स’ बोलायला भाग पाडलं. ‘हम अंग्रेजो के जमाने के जेलर है’’ वाल्या अभिनेत्या असरानीच्या हाताला चटका देणार्‍या जय-वीरूचं द्वाडपण या पिढीत आहे. अतिरेकी असल्यासारखी वागणूक देऊनही, पॅलेट गन्स, खिळे लावलेल्या काठ्या, अश्रुधूर यांचा वापर करूनही पोरांच्या मनात, वागण्यात कटुता दिसली नाही. या सगळ्या क्रियेची प्रतिक्रिया त्यांनी त्यांचा मिश्कीलपणा टोकदार करण्यात दिली. पुण्या-मुंबईतल्या आंदोलनात लाठीचार्ज वगैरे काही झालं नाही तर ‘‘आय लव यू पुणे-मुंबई पोलिस’’च्या घोषणाही ऐकायला मिळाल्या.

या आंदोलनाचा प्रतिवाद कसा करावा हे सरकारला कळलंच नाही. कुठलं लेबल देऊन बदनाम करायचं? यांना अटकाव कसा करायचा? शिवीगाळ करत रागानं नाही तर तिरकस भाषेत, पण ठामपणे विचारलेल्या प्रश्नांचा प्रतिवाद कसा करायचा? असे प्रश्न सरकारला पडले असणार. त्यांचं हुकमी ‘हिंदू-मुस्लीम’ अस्त्रही इथं बोथट झालं. आंदोलकांच्या खेळकर भूमिकेनं सरकारची चिडचिड झाली आणि त्यामुळे विचका! सतत फास्ट बोलर्स टोलवायला सरावलेल्या बॅट्समनला अचानक स्लो स्पिन गुगली पडली की त्याची कशी फे फे उडेल! आव आणलेल्या गंभीर चेहर्‍याच्या फुग्याला टाचणी लागावी आणि भस्सकन् हवा निघून गेलेला फुगा हवेत विचित्र हालचाली करत जमिनीवर यावा तशी परिस्थिती सरकारची झालेली दिसली. मोदींची तीन रेखाटनं काढून खाली क्रमानं ‘फटति’, ‘फटत:’ आणि ‘फटन्ति’ लिहिलेलं पोस्टर आणखी काय सांगतं?

आधीच्या पिढीतल्या ‘ठरावीक’ लोकांना ही भाषा, हा आविर्भाव खटकतो. ‘या पदावरच्या व्यक्तीला असं कुणी बोलतं का?’ असा प्रश्न त्यांना पडतो तेव्हा ते समाजमाध्यमांवर इतकी वर्षं अगदी गांधी, नेहरूंची चालू असलेली बदनामी सोयीस्करपणे विसरतात. डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांच्यासाठी कुठले शब्द वापरले गेले हेही विसरतात. खर्‍याखोट्याची शहानिशा करण्याची त्यांची हिंमतही नसते आणि वृत्तीही. या बहुतेक लोकांचा अमेरिका हा लाडका देश असतो, त्यांची मुलं तिथं शिकत किंवा करिअर करत असतात. पण तिथं ट्रम्पच्या विरोधात तिथली तरुण पिढी कशी भाषा वापरते, काय प्रकारचे मीम करते, काय दर्जाची खिल्ली उडवते याकडे साफ काणाडोळा करतात. बीभत्स रसाचा वापर आपल्या मुलांनी त्यांच्या निम्माही केला नसेल, तरी यांचं ‘शिव शिव’ सुरू होतं. निर्मला सीतारमन यांनी मात्र फिरत्या वार्‍याची चाणाक्ष नोंद घेत ‘‘सरकारनं जेन-झीची भाषा बोलली पाहिजे,’’ असं वक्तव्य केलं.

‘विनोदाचं जीवनातलं स्थान’ या विषयावर दहा पीएच.डी एका पारड्यात आणि यांच्या विनोदानं केलेलं हे काम दुसर्‍यात टाकलं तर तराजू एका पातळीवर येण्यासाठी हळूच पहिल्या पारड्याच्या खाली चुंबक ठेवावं लागेल! कपिल सिबल यांनी एक कोटी रुपये ‘सीजेपी’ला कायदेशीर लढ्यासाठी दिले. यातून बोध घेऊन या मुलांनी उद्या चक्क ‘पीएम केअर फंडा’तून निधी मागितला तर ते त्यांच्या खेळकर वृत्तीला साजेसंच ठरेल. मुळात ज्या तथाकथित पार्टीनं हे आंदोलन केलं त्या पार्टीचाच जन्म एका ‘भंकस’मधून झाला. त्यांच्याच शैलीत सांगायचं असेल तर ‘मजाक मजाक में रजाक हो गया’ छापाचं असेल तर या द्वाड, व्रात्य बाळाचे पाय पाळण्यात नव्हे तर सोनोग्राफीतच दिसले होते!

खूप वर्षांपूर्वी अमूलची एक ‘ॲनिमेटेड’ जाहिरात होती. मोठमोठाले मल्लप्रवीण त्यांनी उचललेली वजनं तशीच ठेवून जातात आणि शेवटी ती छोटी मुलगी भराभर सगळी वजनं एकाच हातानं उचलून नेटकेपणानं ठेवते. जेन-झीनं या प्रकारचं ठसो काम केलं. नेत्यांसह सार्‍या जगाला अचंबित करत आणि विनोदाचा आधार घेत सहजपणे!

रिल्शासनातील खळबळ…

लोकांनी आजतागायत भरपूर आंदोलनं पाहिली, लाठीचार्जच्या आणि दडपशाहीच्या चित्रफिती पाहिल्या. पण पहिल्यांदाच अशा प्रकारचे एकाच वेळी विनोद करीत गंभीरपणे चाललेलं आंदोलन त्यांना दिसलं. बहुतांश रिल्स बनविणार्‍यांनी चपखल विनोदाच्या क्षणांना कॅमेरात कैद करीत माध्यमांवर लोकप्रिय केलं. जेन-झीनं आपल्या सर्व आधीच्या पिढीला आयुष्यभर पुरेल इतकी ‘खंत’ घाऊकपणे वाटली. पण याचा परिणाम हा की, निम्म्याहून अधिक भारतीयांच्या समाजमाध्यमांचे ‘अल्गोरिदम’ त्यांना या आंदोलनाशी अद्ययावत ठेवत होते. कुठल्याही राज्यात उफाळलेल्या आंदोलनात सहभागी न होतादेखील आधीच्या पिढ्या आपापल्या रिल्शासनात बसून ‘आता नवीन काय येतंय’ यावर रात्र-रात्र जागून लक्ष ठेवत होत्या. त्यांंच्या कौतुकात रमत होत्या.

चाणाक्षपणाचा कळस…

मुंबईत आंदोलकांच्या धरपकडीत पोलिसांच्या वाहनात डांबलेले दोन जेन-झी. पकडल्यानंतर भेदरल्याचा अभिनय करीत आपल्या मोबाइलचा कॅमेरा सुरू ठेवायला विसरत नाहीत. आधीच्या बर्‍याच ‘आधी’च्या पिढीचा पोलीस अधिकारी थेट खिशात पन्नास-पन्नास ग्रॅम गर्दच्या पुड्या ठेवून ‘मग जामीन नाही मिळणार आणि आयुष्य बरबाद होईल’चा दाखला देताना आपले चित्रीकरण होतेय यापासून अनभिज्ञ. वर पोलिसाची मान वळल्यानंतर कॅमेरात जीभ दाखवत पोलिसाला भोगाव्या लागणार्‍या पुढल्या परिणामांची नांदीच करताना दिसतो. वार्‍यासारखी समाजमाध्यमांवर पसरत सर्वांना हसवत ठेवणारी ही चित्रफीत वृत्तमाध्यमांचीदेखील दखलपात्र बनली.

पण लक्षात कोण-कोण घेतो?

विद्यार्थांनी पहिल्या दिवसापासून आंदोलनामध्ये विनोदाचे अस्त्र परजत ठेवलं. फलक, पत्रकं, चित्रं, व्यंगचित्रं यांच्या आधारे सरकारवर टीका केली. फलकांवरील धारदार वाक्यं, बिनधास्त घोषणांनी जंतर-मंतरचं वातावरण भारून टाकलं. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर देशभरातून संताप व्यक्त झाला. विद्यार्थी घाबरण्याऐवजी आणखी विनोदी पवित्रा घेऊन व्यक्त झाले. मारणार्‍या पोलिसांना फुले देऊ लागले, ‘मारणार तर नाही ना? प्रोटिन शेक प्यायले नसल्यानं पळता येणार नाही,’ असं सांगून त्यांनाच हसवू लागले. पायाची हाडे मोडलेले तरुणदेखील घरी फोनवर ‘इथं सगळं उत्तम चाललंय’ हे सांगत लाठीधारकांना मारण्यास विनवत होते. देशभरातून आंदोलनाला पाठिंबा मिळाला आणि अनेक शहरांत आंदोलनांच्या प्रतिक्रिया उमटल्या त्याला कारणीभूत हीच भूमिका होती. आपल्या विनोदाला कोण लक्षात घेतोय, याची कल्पना विद्यार्थ्यांना पुरेपूर होती.

इतिहासात काय घडले?

ज्याच्याबद्दल आदर नसतोच, पण नंतर जेव्हा त्याची भीतीही संपुष्टात येते तेव्हा अशा नेत्याची किंवा सरकारची खिल्ली उडवण्याची प्रक्रिया सुरू होते. केनिया, नेपाळ, पेरू, बांगलादेश, तुर्कस्तान, थायलंडपासून ते अमेरिका रशियापर्यंत, जगभरातील आंदोलनांमध्ये विनोद हे हत्यार म्हणून वापरलं गेल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे संपूर्ण सत्ता उलथवली नसली तरी आंदोलनाकडे जगभराचं लक्ष वेधून घेतलं, सरकारला मागण्यांचा विचार आणि त्या अनुषंगाने कृती करायला भाग पाडलं.
१९६८ साली अमेरिकेत ‘यिप्पी’ (यूथ इंटरनॅशनल पार्टी) म्हणवल्या जाणार्‍या अमेरिकन लोकांनी व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात अध्यक्षपदाच्या शर्यतीत एक डुक्कर उभं केलं होतं. पोलंडमध्ये १९९०च्या दशकात लोककथांतील बटू आणि मायावी व्यक्तींच्या रेखाटनांचा वापर करून आंदोलन केलं.

१९९०-२००० च्या सर्बियातल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी अध्यक्षांचं चित्र पिंपावर काढून ते पिंप गर्दीच्या रस्त्यावर ठेवलं. लोकांकडून थोडे पैसे घेऊन बॅटनं त्या पिंपाला मारायची ‘सोय’ केली होती. गंमत म्हणजे सरकारनं त्या पिंपाला अटक केली आणि ते देशभर टिंगलीचा विषय ठरले. त्या काळातल्या वाढदिवसाच्या पाट्र्यांमध्ये गिफ्ट म्हणून हाताच्या बेड्या वगैरे देत. या वैशिष्ट्यपूर्ण आंदोलनातून प्रेरणा घेऊन पुढे युक्रेन, इजिप्त, जॉर्जिया आदी देशांत आंदोलनं झाली. २०११ सालच्या इजिप्त आणि ट्युनिशियामधल्या आंदोलनातही अर्कचित्र, विडंबनगीतं आणि तिरकस शैलीतल्या घोषणांनी आंदोलनाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली.

२०१२ साली रशियात ‘टॉय प्रोटेस्ट’ झालं. वेगवेळ्या बाहुल्यांच्या हातात निषेधाची आणि मागण्यांची पोस्टर्स ठेवून त्या सायबेरियाच्या बर्फाळ प्रदेशात ठेवल्या होत्या. सरकारनं ‘‘बाहुल्या काही रशियाच्या नागरिक नाहीत,’’ असं सांगत आंदोलन बरखास्त केलं, पण सरकारचं व्हायचं ते हसं झालंच आणि जगाचं लक्ष वेधलं गेलं ते वेगळंच.

dr.rangnekar@gmail.com