‘लोकरंग’ (२६ जुलै) मधील ‘परिपक्व लोकशाहीकडे…’, ‘लुप्त झालेला ‘राजधर्म’’ आणि ‘इतकी झुरळे कुठून आली?’ हे अनुक्रमे वरुण सुखराज, पंकज फणसे, नीरज हातेकर यांचे लेख अभ्यासपूर्ण होते. पिढीबद्दल आणि आंदोलनाबद्दल काही मुद्दे मांडावेसे वाटतात- १. तेव्हा तुम्ही कुठे होतात? – हे भाजपच्या आयटी सेलचं आणि समर्थकांचं नेहमीचं अस्त्र आहे. काही झालं की ते हा प्रश्न उपस्थित करतात. पण या पिढीबाबत हा प्रश्नच गैरलागू ठरला. जेव्हा तो विचारला गेला तेव्हा या पोरांनी चक्क २०१४ आणि त्याआधीच्या काळात ते काय करत होते- तर लहानपणी सायकल चालवत होते, खेळत होते, शाळेत होते, वगैरेंचे फोटो टाकून रील्स केली, पोस्ट केल्या! त्यात हाती एआय असल्यानं एखादा खोटा दावा करण्यात आला की तो लगेच चेक करून त्यातला फोलपणा त्यांनी दाखवून दिला.

२. आंदोलनाची भाषा- आंदोलन म्हटलं की तीच ती गाणी, त्याच त्या घोषणा हे ठरलेलं समीकरण या आंदोलनानं पार मोडीत काढलं. कुठलंही आंदोलन चिरडायचं असेल तर आंदोलकांना भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या गर्भगळित करण्याचं तंत्र सत्ताधारी वापरतात. इथं आंदोलक फटके खाता खाताही रील करत होते, नाचत होते, गात होते. जे घडतंय ते सगळं शूट करत होते. उदा. पोलिसांना आम्हाला मारणार का, अशी थेट विचारणा करणारी रील्स किंवा पोलिसांना पूकी (क्यूट) म्हणणारे व्हिडीओज् किंवा मुंबईतल्या एका पोलिसानं ५० ग्रॅम पावडर खिशात टाकीन असं म्हणत असताना त्या पोरानं व्हिडीओ शूट तर केलाच, पण त्यात शेवटी चक्क जीभ दाखवली!

३. कंटेंट, कंटेंट आणि कंटेंट- ही पिढी चोवीस तास इंटरनेट आणि हातात मोबाइल फोनचा कॅमेरा घेऊनच मोठी झाली आहे. त्यामुळे ती सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करते. सगळ्यात त्यांना कंटेंट दिसतो. एखाद्या गोष्टीतून कंटेंट कसा तयार करायचा हे त्यांना इतकं नीट माहीत आहे की, त्यांनी भराभरा काही सेकंदांच्या रील्स तयार करून पोस्टल्या. मोठ्या पोस्ट्सपुढे या रील्स प्रभावी आणि आकर्षक ठरल्या.

४. पारंपरिक माध्यमांची ऐशीतैशी- या आंदोलनामुळे एक सिद्ध झालं, ही नवी पिढी (मिलेनियल्सही) टीव्ही चॅनेल्स पाहत नाही! कारण चॅनेल्सवरून आतंकवादी, परकीय हात, वगैरे नॅरेटिव्ह जोरजोरात सुरू झाली, पण त्यानं या पोरांना काही फरक पडला नाही. कारण ते सगळी माहिती इन्स्टाग्राम, एआय वापरून मिळवतात आणि कन्झ्युम करतात. उलट, त्यांनी यावरही विनोदी रील्स तयार केली. उदा. तीन मित्र चहा पीत असतात. तेव्हा एक मुलगा क्षी जिनपिंगना फोन करून सांगतो की, आम्ही चहा, नाश्ता केलाय. क्यूआर कोड पाठवतो, पैसे पाठवा!

५. उपरोध, व्यंगाचा वापर- वर म्हटल्याप्रमाणे क्रिएटिव्ह कंटेंट काढणं हे या पिढीला नीट जमतं. त्यामुळे त्यांनी तयार केलेली पोस्टर्स, त्यातलं व्यंग-उपरोध आणि उपहास बोचरा, भिवया उंचावणारा होता. त्यांतील भाषेवर सध्या बरीच चर्चा होते आहे. पण गेली १० हून अधिक वर्षं आयटी सेलचे ट्रोल्स कशी भाषा वापरत आहेत हे या पोरांनी पाहिलं आहे. एकीकडे संस्कार वगैरे बोलायचं, दुसरीकडे थ्रेट द्यायचे हे दुटप्पीपण त्यांना नीट माहीत आहे. ही पिढी खूप सॉर्टेड आहे, ती थेट आहे आणि उगाच ‘वैचारिक वैचारिक’ खेळत नाही. त्यामुळे ती उगाच ‘सीरियस’पणाचा आव आणत नाही. तिला मुद्द्याचं तेवढं हवं असतं. ती जगभरातल्या गोष्टी, ट्रेंड्स्, आंदोलनं पाहते. अर्थात सगळे जेन-झी असेच आहेत असा दावा नाही, पण या आंदोलनातून एक लक्षात घ्यायला हवं की, आणखी १०-१२ वर्षांमध्ये ही पिढी ३० ते ३५-४० वयोगटाची असेल. त्या वेळी ती बर्‍यापैकी अधिकारीपदावर किंवा व्यवस्थेत निर्णय घेण्याच्या स्थितीत आलेली असेल. हे जग ही पिढी चालवत असेल. त्यामुळे आज जर यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपलं तेच ते रटाळ म्हणणं, खोटे नॅरेटिव्ह, ‘आम्ही वाट्टेल ते करू, पण तुम्ही मात्र आम्ही म्हणू तसं वागा’ वगैरे चालू ठेवून ‘आम्हीच कसे भारी’ म्हणत त्यांच्या रागाकडे, आकांक्षा-अपेक्षांकडे लक्ष दिलं नाही, तर वाळूत डोकं खुपसून बसलेल्या शहामृगासारखी अवस्था होऊ शकते.

– प्रणव सखदेव

सक्षम विरोधक आवश्यकच

‘लोकरंग’ (२६ जुलै) मधील पंकज फणसे यांचा ‘लुप्त झालेला ‘राजधर्म’’ हा लेख वाचला. २०११ साली भ्रष्टाचाराच्या विरोधात जंतरमंतर मैदानातून अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ता मिळाल्यानंतर जनतेच्या सरकारबद्दलच्या अपेक्षा वाढल्या होत्या. कारण प्रत्येक सभेत सत्ताधारी नेते आधीच्या ७० वर्षांच्या राजवटीचा चटकदार भाषणातून चित्र रंगवून दोषारोप ठेवत होते. परंतु ७० वर्षांपासून प्रशासनात असलेली सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत असलेली खदखद व उदासीनता दूर करण्यात आताच्या सत्ताधार्‍यांना अपयश आले. सत्ताधार्‍यांविरोधात असलेली चीड मग ती शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी या पायाभूत प्रश्नांबाबत होती, ती तरुणाईनी शिताफीने रस्त्यावर उतरून व्यक्त तर केलीच; परंतु सत्ताधार्‍यांच्या धाकदडपशाहीला पुरून उरली. यापूर्वी विरोधकांना संपवण्यासाठी सत्ताधार्‍यांनी साम, दाम, दंड, भेद वृत्ती वापरली होती. परंतु त्यास तरुणाईने रस्त्यावर उतरून तोडीस तोड उत्तर दिले. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष असणे आवश्यक आहे.

-नंदकिशोर भाटकर, गिरगाव.

तरुणाईची नवसकाळ….

‘लोकरंग’ (२६ जुलै) मधील ‘इतकी झुरळे कुठून आली?’ हा नीरज हातेकर यांचा लेख वाचला. ऑनलाइन बंड जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा काय होते त्याचा भयंकर परिणाम सत्ताधारी भोगत आहेत. आजच्या तरुणांचा कोंडमारा, निराशा फक्त त्यांच्याच आत्मारामाला माहीत. आमच्या तरुणांत कर्तबगारी नाही असे आता कोणीही म्हणणार नाही. जर ते बेकर्तबगार झाले तर त्याचे पाप सडक्या शिक्षण व्यवस्थेवर. विद्यार्थिदशेत अनेक उज्ज्वल आकांक्षांचे मनोरे बांधण्यात व्यस्त असलेले विद्यार्थी स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर येतात तेव्हा हे एक राष्ट्रीय संकट होते. बुद्धिमत्तेची माती होऊ लागली आणि केवळ पोटासाठी विद्वत्तेला फाटा देऊन विषम व्यवसायात पडण्याचा प्रसंग आला की हे तरुण तापट रक्त धाडसाचा मार्ग पत्करते यात चूक कोणाची? एकूणच राष्ट्रीय तरुणांचे योग्य ते संगोपन करणे देशासाठी किती आवश्यक आहे हे यावरून दिसते.

-पंकज लोंढे, सातारा.

पूर्वग्रहदूषित नको

‘लोकरंग’ (२६ जुलै) मधील वरुण सुखराज यांचा ‘परिपक्व लोकशाहीकडे…’ हा लेख वाचला. विद्यार्थी आंदोलनाबाबत दिलेली माहिती उत्तम. लेखातील बरेच मुद्दे वस्तुस्थितीला धरून आणि पटण्यासारखे आहेत. सरकारने सर्वांनाच गृहीत धरण्याची कार्यशैली लोकशाहीसाठी घातक आहे, आणि त्यांना या आंदोलनाने एक चांगला झटका बसला हेदेखील मान्य. मात्र लेख वाचताना लेखकाच्या मनात सरकारबद्दल पूर्वग्रह आहे असे जाणवले. पंकज फणसे यांचा ‘लुप्त झालेला राजधर्म’ या लेखातही सरकारवर टीका आहे, मात्र त्यात कुठेही पूर्वग्रहदूषितपणा जाणवत नाही. अशीच तटस्थता अपेक्षित. – दीपक सावळे, नाशिक.