‘घडवताना घडत जाणं’ हे संवेदनशील पालकत्वाचा मार्ग दाखवणारं डॉ. विठ्ठल गोरे यांचं पुस्तक लेखकाच्या अभ्यासपूर्ण व्यासंगातून उमटलेला सहज संवाद आहे. माणसाच्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर आणि तितकंच जबाबदारीचं-खरं तर आव्हानात्मक वळण म्हणजे पालकत्व असं मत लेखक मनोगतात मांडतात. पालकत्व, पालक आणि मुलांचा सहप्रवास ही या पुस्तकाच्या केंद्रस्थानी असलेली बाब. विश्वास हा कोणत्याही नात्याचा प्रमुख आधार. हेच ‘पाल्य-पालक’ या नात्यालाही लागू पडतं.
या दोघांमध्ये विश्वासाचं नातं निर्माण करण्यासाठी पालकांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी लेखक सांगतात. पालकत्वाचे प्रकार, आधुनिक स्मार्ट पालकत्व ही प्रकरणे पालकांसाठी खूप उपयुक्त ठरतील. सध्याच्या मुलांभोवती जी आव्हानं आहेत तेवढीच किंबहुना जास्त आव्हानं पालकांपुढे आहेत. या दोन प्रकरणांमधून पालकाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. पालकांसाठी मार्गदर्शक ठरतील.
पालकत्वाची खरी कसोटी लागते ती मुलांच्या किशोरवयीन वयात. या काळात मुलांना संवेदनशीलपणे व संयमाने कसं सांभाळायचं याचं उत्तरही हे पुस्तक देतं. मुलांना वाढवताना पालकांनी कसा संयम ठेवावा याचा कानमंत्रही मिळतो. तसंच मुलांची बंडखोरी, स्वातंत्र्य, डिजिटल जगाचं मुलांवर होणारं आक्रमण अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश या पुस्तकात आहे.आदर्श पालकापेक्षा सजग आणि सुजाण पालकत्वाचं महत्त्व सांगणारं हे पुस्तक आहे.
‘घडवताना घडत जाणं’,
डॉ. विठ्ठल गोरे, विहंग प्रकाशन,
पाने- ९६, किंमत- १९९ रुपये.
