साहित्य संमेलन हा रिकामटेकडेपणाचा उद्योग असल्याचे प. पू. श्री भालचंद्रराव नेमाडेजी (यांस कोण जाणत नाही गा : हे तो बाई िहदूकार) यांचे म्हणणे असल्याचे सर्वास विदित आहेच. आमचेही अगदी तेच मत आहे. अशी संमेलने भरवून नेमके काय साध्य होते? हा lok01नेमाडेपंथीयांचा सवाल मात्र आम्हांस मान्य नाही. कां की संमेलन हे टैम्पास करण्यासाठीचे उत्तम साधन असल्याचे आमचे फारा काळापासूनचे म्हणणे आहे. या मताचा प्रत्यय नुकताच ‘भारतीय रेल्वे-राष्ट्र की जीवनरेखा’ यांच्यामुळे असंख्य साहित्य रसिकांना राहूनराहून, थांबूनथांबून, ताटकळूनताटकळून आला. या प्रवासात त्यांचा जन्माचा टैम्पास झाला असे म्हणतात. आज संमेलनाच्या समारोपानंतर स्पेशल रेल्वेने परतणाऱ्या रसिकांना पुनरपि तोच आनंद लुटता येईल. आता या क्षणी नुसत्या त्या सुविचारानेही आमुचे मन रोमांचित झाले आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही साहित्य संमेलन भरवावे की न भरवावे, हा एक टैम्पासी प्रश्न आला होता. मात्र आता तो निकाली निघाला आहे. कारण ते भरले. आता तर त्याचे सूपसुद्धा वाजण्याची वेळ आली आहे. (वाजण्याचीच! पिण्याचे सूप वेगळे असते. तसे तेही फुर्रफुस्स असे वाजतेच. पण हे वाजणे वेगळे!) तेव्हा आता संमेलन भरवावे की न भरवावे, हा प्रश्न पुढील पाच-सहा महिन्यांकरिता बाजूला ठेवला पाहिजे. त्याऐवजी आता या संमेलनाने मराठीचे किती भले केले, हा वस्तुनिष्ठ प्रश्न एक साहित्यिक परंपरा म्हणून विचारार्थ घेता येईल. विद्यापीठीय रीतीनुसार त्या चच्रेस, ‘मराठीचे नेमके भले होणे म्हणजे काय’ असा मुळापासून प्रारंभ केला पाहिजे.
आमुच्या बहुमोल बहुमतानुसार भाषेची समृद्धी वाढली म्हणजे तिचे भले होते. ही समृद्धी कशाने वाढते? (छे छे. अनुदानाने नव्हे! अनुदान काय, नुसत्या भोजनखर्चात संपून जाते.) समृद्धी वाढते ती ग्रंथनिर्मितीने. तेव्हा खरा सवाल हा आहे की, घुमान साहित्य संमेलनामुळे ग्रंथन्íिमतीस चालना मिळणार आहे का?
तर मिळणार आहे! त्रिवार मिळणार आहे!
या संमेलनाच्या निमित्ताने मराठी कवींना एक वेगळ्याच प्रकारचा निसर्ग पाहण्याची संधी मिळाली आहे. हल्ली महाराष्ट्रात दुष्काळ फार. त्यामुळे रम्य निसर्ग पाहावयास मिळतच नाही. परिणामी येथील काव्यलेखनास मोहोर येतच नाही. पंजाबातील हरित क्रांती पाहून मात्र काव्यक्षेत्री निश्चितच गळीतहंगाम सुरू होईल, यात काही शंका नाही.
साहित्य संमेलनास गेलेल्या आमुच्या एका पत्रकार-साहित्यिकाने तर तातडीने काही चारोळ्या, त्याहून पुढे प्रतिभेने उड्डाण केलेच तर अष्टोळ्या असे काव्यप्रकार हाताळण्यास प्रारंभ केला आहे. वानगीदाखल त्याची ही निसर्गचारोळी पाहा..     
गारठय़ाची रात्र अवकाळी साथीला
मी इथे कवळून माझ्या काव्यवहीला
निमंत्रितांच्या रांगेत जेव्हा बसलो मी
कोण तो ओरडला खाली : वशीला, वशीला
किंवा ही आमचे परमकवीमित्र अशोकजी नायगावकर यांची ताजी कविता पाहा..
तर बरं का काय झालं की
भरून आलं घुमान अचानक अवकाळी
म्हणजे आता होणार की काय गारपीट
व उडणार की काय तिरपीट असे
म्हणता म्हणता कोणी तरी म्हणूच लागलं कविता
तेव्हा त्यास विचारलं की बुवा निमंत्रिता, का करतोस असं काव्यगायन  
कां की ऐकून समोरच्या साऱ्यांचे कान वगरे दुखून सारे शीक वगरे पडलेत
तर तो म्हणाला, की पंजाबमध्ये सारे शिख असणार व त्यात काय नवल?
तेव्हा त्यास पुन्हा विचारलं, की पण गातोस कशाला भांडल्यासारखं
तर तो कवितेच्या पुस्तकात खुणेसाठी काडी ठेवत म्हणाला
समजा लाईट गेले या हवेने, तर ज्ञानदीप नको लावायला?
संमेलनाच्या निमित्ताने केवळ कविताच नव्हे, तर अन्य अभिजात साहित्यही प्रसवले जात आहे. संमेलन विशेष गाडीमध्ये थोर लेखिका सुश्री मीना प्रभू होत्या की नाही, माहीत नाही. असतील, तर मात्र आताच प्रकाशनपूर्व सवलतीत त्यांच्या ‘माझं घुमान’ या आगामी पुस्तकाची नोंदणी करून ठेवा. त्यांच्या या आगामी पुस्तकातील हा एक आगामी उतारा..
‘‘आजची संध्याकाळ अत्यंत आल्हाददायक होती. पुणे स्थानकावर आम्ही आलो तेव्हा दुपार सरून गेली होती. मग संध्याकाळही सरली. संमेलन विशेष गाडीची वाट पाहून आम्ही सारेच आता कंटाळलो होतो. कंटाळा ही तशी खास पुणेरी भावना. दुपारी शिकरणाचे भरपेट भोजन करण्याच्या परंपरेतून हिचा उद्गम झाला असावा. तेवढय़ात कोणीतरी म्हणाले- आपली गाडी आली. फलाटावर जाऊन पाहिलं तर गाडी उभी होती. लांबलचक. अनेक डब्यांची. प्रत्येक डब्याला साहित्यिकांची नावे दिलेली. डब्यात पंखे होते. ते कधी कधी चालतही. शिवाय दिवेसुद्धा होते. तेही कधी कधी चालत. मात्र गाडी चालल्यावर ते बंद पडत. हा रेल्वेरंग मोठा मोहक होता. या भारतीय रेल्वेची सुरुवात झाली ते साल होते अठराशे..’’
असे प्रवासवर्णनपर स्थलदर्शनग्रंथ म्हणजे मराठीच्या आगामी समृद्धीत मोलाचीच भर. संमेलनास गेलेल्यांपकी अनेक साहित्यिकांच्या हातात डायऱ्या दिसत होत्या. त्यातून ही समृद्धी किती पटीने वाढणार आहे याचा अंदाज लावता येईल. त्यातील बऱ्याचशा साहित्यिकांचा आणि प्रकाशकांचा बराचसा वेळ भोजनमंडपात जात होता हे खरे! परंतु तो वेळ काही असाच फुकट जाईल असे आम्हांस वाटत नाही. येत्या काही महिन्यांत मराठी-पंजाबी पाककृतींचा एक तरी ग्रंथ बाजारात आल्याशिवाय राहाणार नाही.
शिवाय संमेलनाध्यक्ष सर सदानंद मोरे यांची संशोधनातील शिस्त पाहता त्यांनी अध्यक्षपदाचा अर्ज भरल्यादिवसापासून नोंदी ठेवण्यास सुरुवात केलीच असेल. तेव्हा संमेलन संपता संपता त्यांची अध्यक्षपदाची डायरी प्रसिद्ध होण्यास हरकत नाही. माजी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी ती थोर व उज्ज्वल परंपरा सुरू करून दिलीच आहे. या दैनंदिनीलाही तसे साहित्यिक मूल्य असतेच. समजा ते नसेल, तर ऐतिहासिक मूल्य तरी असतेच. अगदी काही नाही, तर गेला बाजार त्या पुस्तकाच्या मलपृष्ठी मूल्य – १५० रु. एवढे तरी असतेच! ही समृद्धीसुद्धा काही थोडी नाही!
 तेव्हा सध्या तरी संमेलनाने मराठी साहित्याला काय दिले हा प्रश्न आम्ही येथे निकाली काढत आहोत. (शिवाय या चच्रेतून किमान टैम्पास तरी झालाच. संमेलनाचे हे साध्य काय कमी झाले?)      
lok02