नानाला पहिल्यांदा नक्की भेटलो कधी ते आठवतंही नाही, इतकं नानाचं आसपास असणं जुनं आहे. पण पहिली भेट आठवत नसली तरी ‘अहो नानाचा’ ‘ए नाना’ कधीपासून झाला ते मात्र लख्खपणे आठवतंय. या ‘अरे-तुरे’च्या प्रवासात माझ्यासाठी ‘त्यां’चा ‘तो’ व्हायच्या किती तरी आधी त्याच्यासाठी मी ‘गिर्या…’ झालेलो होतो. तेही साहजिक. नाना माझ्यापेक्षा दीडेक दशकांनी वगैरे मोठा. त्यानं त्याच्या स्वभावाप्रमाणे सुरुवातीपासनंच अरे-तुरे करणं साहजिक आणि मी माझ्या स्वभावाप्रमाणे त्याला अहो-जाहो करणंही नैसर्गिक… नात्याची ही पातळी सोडण्यात पुढाकार अर्थातच नानाचा. त्याच्या मते हा बांध होता. त्यानं तो दूर केला… आणि संवादाचा सुवावो अधिक मोकळा-ढाकळा वाहू लागला. इतका मोकळा की आसपास कोणी असलं तर ऐकणार्याच्या कानाला चटका बसेल.
सरळ काही बोलायचं, सांगायचं असलं तर नाना ‘गिर्या…’ असंच संबोधणार. त्यानंतर काही पुण्यश्लोक ‘भ’कार. मग मुद्द्याला हात घालणं, असं… हा क्रम असा असेल तर समजायचं सगळं काही उत्तम आहे. ‘अहो संपादक…’ अशी सुरुवात झाली की मात्र कोणत्या दिशेनं, कोणत्या विषयाचं क्षेपणास्त्र येऊन आदळणार आहे, याचा विचार सुरू करायचा. हा रिवाज गेल्या कित्येक वर्षांचा. आता तो कायमचा बंद होणार. मुख्य म्हणजे सार्वजनिक जीवनात आता ‘गिर्या…’ अशी हाक मारणारं फारसं कोणी नाही… हा भागही आहेच!
नानाचं सगळं अतिरंजित. ॲबनॉर्मल. त्याचं मरणही तसंच. जसा जगला; तसाच गेला. त्याचं व्यक्त होणंही कायम लाऊड असं. एकदा असं झालं…
‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ उपक्रमात राज्यभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणार्या सामाजिक संस्थांच्या कार्याचा गौरव केला जातो. त्यांच्यासाठी अर्थ-संकलन केलं जातं. गणपतीच्या दहा दिवसांत दररोज एका संस्थेची, तिच्या कामाची सविस्तर माहिती प्रकाशित केली जाते. संस्थांच्या नावे बख्खळ पैसा येतो. तो त्यांच्या हाती सुपुर्द करण्याचा जाहीर कार्यक्रम होतो. त्यात सहभागी होणारे हातही अशा कामांची महती जाणणारे असायला हवेत ही ‘लोकसत्ता’ची पूर्वअट. गेल्या काही वर्षांत अभय बंग, राणी बंग, विकासभाऊ आमटे, सदाशिव अमरापुरकर, अतुल कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, विक्रम गोखले वगैरे अनेक यात येऊन गेले. या उपक्रमाचं आता खूप नाव झालंय. त्याआधी एका वर्षी नानाला बोलवलेलं. तेव्हा त्याची ‘नाम’ वगैरे काही नव्हती. नानाची लोकप्रियता नुसती तळपत होती तेव्हाची ही गोष्ट. नाना येतो म्हणाला.
कार्यक्रमाचा दिवस ठरला. प्रसिद्धी झालेली. संस्थांचे संबंधित खुश होते. नानाला भेटायची संधी मिळणार म्हणून. ‘लोकसत्ता’तही सगळेच वाट बघत होते. तर कार्यक्रमाच्या दिवशी… दोन-तीन तास आधी नानाचा फोन. भयंकर संतापलेला. सुरुवात ‘माननीय संपादक…’ अशी. पहिले दोन-तीन मिनिटं मला कळलंच नाही… नाना का चिडलाय ते. त्याचं ‘मला समजतोस कोण…’ वगैरे अद्वातद्वा सुरू होतं. कारण कळलं. नानानं सांगितलेलं मला घ्यायला गाडी पाठव. त्याप्रमाणे गाडी तर गेलेली. अगदी वेळेच्या आधीच. पण ती साधी ‘इनोव्हा’ होती.
नानाला हा अपमान वाटला. माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हता. शेवटी मीही वैतागलो. म्हटलं येऊ नकोस… आम्ही सांगू नाना अशा अशा कारणांनी रागावून येत नाहीये म्हणालाय… असं. इथे त्याला वाटलं असावं आपण तुटेपर्यंत ताणतोय. मला आधी विचारायचंस वगैरे म्हणाला. मीही सॉरी म्हटलं. नाना कार्यक्रमाला आला.
या कार्यक्रमात निवडल्या जाणार्या संस्थेचा एकेक प्रतिनिधी त्या संस्थेच्या कामाची थोडक्यात माहिती देतो. अडचणी-आव्हानं काय काय ते सांगतो. याही कार्यक्रमात ते झालं. मी आणि नाना स्टेजवर होतो. जे काही झालं त्यामुळे नाही म्हटलं तरी अवघडल्यासारखं झालंच होतं. नाना बसल्या बसल्या अस्वस्थ होत गेला. आपल्याला बोलायची संधी कधी मिळणारे… त्यासाठी आतुर झालेला. तो क्षण आला.
नानानं भाषणाची सुरुवातच माफीनं केली. ‘‘तुम्ही मंडळी इतकं मूलभूत पोटतिडकीनं पदराला खार लावून करताय… आणि माझ्यासारखे साधी गाडी आली म्हणून रागावतात…’’ नाना बोलता बोलता हळवा झाला.
हा अभिनय नव्हता. स्वत:च स्वत:ची कृती त्याच्या मनाला खात होती. आधीच हा कार्यक्रम तसा भावनिक होतो. नानानं प्रत्येकाला रुमाल काढायला लावले- डोळ्यांच्या कडा पुसण्यासाठी. हे असं झालं की नाना अधिक आवडू लागायचा. ‘लोकसत्ता’च्या बर्याच कार्यक्रमांना तो यायचा. मोकळेपणानं लिहायचा. त्याला बोलवायचं होतं एकदा तर म्हणाला पुण्यात आहे. मीही पुण्यात असणार होतो दुसर्या दिवशी योगायोगानं. म्हणाला घरीच ये…! फिल्म इ्स्टिटट्यूटला खेटून त्याचा अत्यंत कलात्मक म्हणता येईल असा फ्लॅट आहे. तिथे गेलो. नाना मटार सोलत बसला होता. ‘आज मस्त मटाराच्या करंज्या करू या…’ नाना म्हणाला. त्यानं त्या खरंच केल्याही! मग मटाराऐवजी खिमा घातला तर करंज्या कशा लागतात… वगैरे चर्चा. स्वयंपाकाची फारच हौस. आपल्या जवळच्यांना शब्दश: हातानं खिलवायचा.
केलेला पदार्थ खाऊ घालण्याइतकीच लिहिलेलं काही ऐकवण्याचीही फार हौस त्याला. रात्री-अपरात्री, वेळ काळ वगैरेची फारशी फिकीर न बाळगता फोन करायचा. फारच उशीर झालेला असला तर ‘‘गिर्या झोपला नाहीस नं…’ असं विचारण्याचं सौजन्य मात्र आवर्जून दाखवायचा. मध्यंतरी तो कविता करायला लागला होता. फोन करकरून ऐकवायचा. त्याच्या वागण्या-बोलण्याप्रमाणेच इंटेन्स असं काही लिहिलेलं असायचं. सुरुवातीला आयफोन वगैरे नव्हता. तेव्हा थांब थांब म्हणत मी लिहून घ्यायचो. नंतर रेकॉर्ड करायला लागलो. त्याला लिहिण्याचा आग्रह करायचो. लिहायचाही, पण नियमित स्तंभ लेखन काही करून नाही घेऊ शकलो त्याच्याकडून.
एकदा असाच फोन आला. दिलीपकुमार गेले तो दिवस. नाना खूप हललेला. का ते माहिती नाही. त्यानं काही तरी लिहिलेलं. वाचून दाखवलं. अप्रतिमच होतं ते. ‘लोकसत्ता’त नंतर छापलंही ते. एकदा लताबाईंवरही असंच काही त्यानं लिहिलं. मला दोनवेळा आनंद मिळायचा. आधी त्याच्या घनगर्द आवाजात, आरोह-अवरोहात ते ऐकायला मिळायचं. आणि नंतर छापायला. छापलेलं वाचताना नानाच्या आवाजातच ते ऐकायला यायचं ही आणखी एक गंमत.
नानाला काही काही माणसांविषयी कायमच खूप आणि खरं प्रेम होतं. विजयाबाई (मेहता) हे एक त्यातलं नाव. आपल्या हातानं जे काही झालंय त्याचं सगळं श्रेय बाईंना, असं नेहमी म्हणायचा. बाई गेल्यावरही तो असाच भावुक झाला. त्या दिवशी सकाळी मुंबईत चिक्कार पाऊस होता. तरीही नाना बाईंच्या अंत्ययात्रेला गेला. खूप मराठी कलाकार त्यावेळी आले असं अजिबात नाही. अनेकांनी ट्विट वगैरे करण्यातच धन्यता मानली. नसीर-रत्ना पाठक, अजित भुरे, भारती आचरेकर असे काही मोजकेच. पण नाना आवर्जून होता.
‘आनंदवन’वर ‘लोकसत्ता’नं काही वार्तांकन केलं होतं. तो विषय खूप गाजला त्यावेळी. दुर्दैवानं नंतर शीतलनं (विकासभाऊंची (आमटे) मुलगी, कौस्तुभची बहीण) आपलं आयुष्य संपवलं. बातमी आल्यावर सगळेच हादरले. आमटे हा माझ्याही सहकुटुंब आस्थेचा विषय. शीतल, कौस्तुभ वगैरेंचं तर अगदी घरी येणं/ जाणं. हे नानालाही माहीत होतं. जे छापून आलं ते वाचल्यावर नानाचा फोन आला. ‘गिर्या हे छापायलाच हवं होतं का…’, त्याचा प्रश्न. व्यावसायिक बांधिलकी, कर्तव्य आणि वैयक्तिक नातेसंबंध यातला हा तिढा. त्यावर खूप बोललो आम्ही. पण काही दिवसांनी शीतलची बातमी ऐकून मात्र नाना हादरला. मुळापासून हादरला. पुढे आता काय काय करता येईल… कोणाकोणाशी बोलावं वगैरे चर्चा झाली. म्हणाला, ‘‘मुन्नाच्या (कौस्तुभ आमटे) मागे उभं राहायला हवं आपण.’’
दुमत व्हायचा प्रश्नच नव्हता.
पण नानाशी दुमत व्हायचंच नाही, असंही अजिबात नाही. बर्याच विषयांवर वाजायचं आमचं. असं झालं की मजा यायची. आधीच नानाच्या तोंडात दातांपेक्षा शिव्यांचे खिळेच जास्त. त्यांचा वर्षाव व्हायचा. त्याचा ‘नटसम्राट’ प्रदर्शित झाल्यावर असं घडलं. कशाच्या निमित्तानं आम्ही फोनवर बोलत होतो. बोलता बोलता त्यानं विचारलं, ‘‘पाहिलास का ‘नटसम्राट’?’’ मला उत्तर टाळायचं होतं. पण ते काही जमलं नाही.
कसा वाटला यावर मी म्हटलं, ‘‘सिनेमात तू दाखवलायस तसा जर बाप असेल ना तर कोणीही त्याला बाहेरचा रस्ताच दाखवेल… मग तो नटसम्राट असला तरी.’’
नानाला अर्थातच ते पटेना. चित्रपटात त्या ‘नटसम्राटा’चं रोज संध्याकाळी बाटली (ओल्डमंक पाहिल्याचं आठवतंय.) घेऊन बसणं… ‘नटसम्राट’चा काळ तरीही त्यात पाचशेच्या नोटांची बंडलं दिसणं… वगैरे डिटेलिंगचे मुद्दे त्याला ऐकवले. आता नाना वैतागला. ‘‘गिर्या… तुला चांगलं दिसतंच नाही का कधी?’ वगैरे वगैरे… नानाच्या सुदैवानं आणि वादाच्या दुर्दैवानं मी नानाचं… आणि महेश मांजरेकरचंही… बरंच काही चांगलं पाहिलेलं. ‘तन माजोरी’, ‘पुरुष’, मीरा नायरच्या ‘सलाम बाँबे’तला ‘लाल बत्ती’ एरियातला बाबा, ‘परिंदा’तला अण्णासेठ वगैरे… ते त्याला ऐकवल्यावर शांत झाला. त्याची खात्री पटली मी नाना पाटेकरचा नाही; तर फक्त या भूमिकेचा टिकाकार आहे ते…
अलीकडेही एकदा असंच झालं. नाना स्वत:ला पर्यावरणवादी निसर्गप्रेमी वगैरे मानतो. जलसंधारण, वृक्षसंवर्धन वगैरेला त्याचा सक्रिय पाठिंबा असतो. म्हणून एकदा त्याला विचारलं, ‘‘नाना हल्ली पर्यावरण वगैरेकडे तुझं लक्ष नाही वाटतं?’’ त्याला प्रश्नाचा रोख सुरुवातीला कळला नसावा. निदान त्यानं तसं दाखवलं. किंवा मी काय बोलणार याची चाचपणीही करायची असेल त्याला. मी त्याला कारण सांगितलं. ‘‘हल्ली म्हटलं इतके पर्यावरणाच्या मुळावर येणारे प्रकल्प येतायत… तू तुझी संस्था काही बोलल्याचं कानावर आलेलं नाही अलीकडे.’’
नानानं वेळ मारून नेली. सगळं काही नानानंच करायचं की काय असं काही. नंतर कोणत्या तरी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाना कार्यालयात आला होता. मी नव्हतो. नानाला वाटलं मुद्दामच मी नाहीये. तिथे उपस्थित सहकार्यांना घेऊन माझ्या केबिनपाशी गेला आणि सगळ्यांच्या देखत फोनवर माझ्यावर डाफरला… स्वत:ला काय जास्त शहाणा समजायला लागलायस… असं काही बाही. टिव्हीवरच्या एका विख्यात निवेदिकेचं हसणं बघून ‘‘ती केळं आडवं खात असावी बहुधा,’’ असं म्हणाला होता. दुसर्या एकाला त्याच्याच समारंभात ‘‘हा खरं तर अभिनेता म्हणून सुमार आहे, पण ही भूमिका मात्र त्यानं चांगली केली आहे,’’ असं त्यानं ऐकवलेलं. अशी जाहीर अरेरावी करायला त्याला खूप आवडायचं. वेष कुठलाही असो. निमित्त काहीही असो. नानामधल्या ‘…आणि नाना पाटेकर’चा फणा कायम काढलेला असायचा.
नाना सगळ्या राजकीय पक्षांना, संघटनांना जवळचा. सगळ्यांत त्याची उठबस. पण म्हणून या सगळ्यांनाच तो हवा-हवासाही होता का? प्रश्न पडतो. स्वत:विषयी इतरांना कायम प्रश्न पडत राहतील… असं वागणं त्याला कसं जमायचं हादेखील एक प्रश्नच. आता त्याचं उत्तर कधीच मिळणार नाही. स्वत:चा फिटनेस सतत कौतुकानं मिरवणार्या नानाला अनफिटांना येतो तशा हार्टअटॅकनं न्यावं? हाही तसा प्रश्नच. आता लक्षात येतंय नाना पाटेकर ही व्यक्ती म्हणजे समग्र प्रश्नच. जगतानाही आणि गेला तेव्हाही…
girish.kuber@expressindia.com
@girishkuber
