विजयाबाई गेल्या आणि १४ वर्षांपूर्वीच्या त्यांच्या मुलाखतीची गोष्ट पुन्हा आठवली. इतके दिवस बाई कुठेही भेटल्या की या गोष्टीची आठवण हमखास निघायची आणि बाई चष्म्यातून गोड हसायच्या. त्या हसण्यातनं चांगल्या मार्कानं परीक्षा पास झाल्यावर मिळतं ते समाधान मिळायचं. आता ते परत मिळणार नाही. तेव्हा, बाईंच्या मुलाखतीची ही गोष्ट शेवटची एकदा सांगायला हवी!
‘लोकसत्ता’चा संपादक होऊन दोनेक वर्षं झालेली. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या धर्तीवर ‘आयडिया एक्स्चेंज’ असा कार्यक्रम ‘लोकसत्ता’तही जोमात सुरू झाला. वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या मान्यवरांना कार्यालयात बोलवून सर्वांनी गप्पा मारायच्या, असं त्याचं स्वरूप. त्यात बाईंना बोलवावं असं ठरलं. बाई चक्क हो म्हणाल्या आणि परीक्षा आणि गंमत सुरू झाली. पहिला प्रश्न- मुलाखत कोण घेईल? नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे यांनी सुरक्षित नकार दिला. धोका पत्करायचा त्यांचा स्वभाव नाही. माझं नेमकं याच्या उलट.
त्यामुळे जे काय व्हायचं ते माझं होऊ दे… अशा उदात्त विचारानं ही मुलाखत मी घ्यावी असं अनेकांचं मत पडलं. बाईंना स्वरूप सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘‘ ते नंतर, आधी पहिला भाग मला ‘स्ट्रक्चर्ड’ हवा.’’ बाईंनी त्यांच्याकडे काम केलेल्यांनाही बोलवायला सांगितलं. विक्रम गोखले, नीना कुलकर्णी वगैरेंना निमंत्रणं गेली. मुलाखतीचा दिवस जवळ येत गेला. आणि बाईंचा निरोप. ‘‘भेटायला ये.’’ पाथरेंना सोबतीला घेऊन घरी गेलो. बाईंवर त्यांच्या कलाकृतींचा आनंद घेत, विस्मयचकीत होत प्रेम करणं वेगळं आणि बाईंचा विद्यार्थी होणं यात गुलाब आणि त्याच्या काट्यांइतका फरक आहे, याचा अंदाज होता. अनुभव नव्हता. तो आता मिळणार होता.
एका संध्याकाळी बाईंनी मलबार हिलवरच्या त्यांच्या निवांत सुंदर घरी बोलावलं. आम्ही आधीच पोहोचलो आणि ५-१० मिनिटं टाइमपास करून बरोब्बर सांगितलेल्या वेळेला बेल वाजवली. दरवाजा फारोख (त्यांचा नवरा) यांनी उघडला. त्यांना आम्ही चेहर्यानं माहीत असायचं काहीच कारण नव्हतं. पण आम्ही येणार हे त्यांना माहीत होतं. घर अत्यंत मिनिमॅलिस्टिक.
दिसायला बाईंसारखंच. क्लासी. काहींच्या व्यक्तिमत्त्वात नक्की काय वेगळं आहे असं ठाम काही सांगता येत नाही, पण तरी बरंच काही वेगळं असतं तसं… आम्हाला बसा सांगून फारोख मुंबईतल्या घरांना न शोभणार्या मोठ्ठ्या गॅलरीतल्या झाडांना पाणी घालायला गेले.बाई आल्या. आम्ही उठून उभं राहिलो. आश्वासक प्रेमळपणानं जवळीक दाखवत, गोड हसत बसा म्हणाल्या. पाठोपाठ चहा आणि पारसी डेअरीतल्या कुकीज आल्या. मग प्रश्न.
‘‘हं… कसं करू या आपण?’’
त्याचा खरा अर्थ ‘तुझा अभ्यास किती आहे ते मला तपासू दे.’ असा होता. मी या तयारीतच होतो. कॉलेज सुटल्यानंतर नाटकात कामबिम मी कधी केलं नाही. पण अत्यंत प्रेमानं नाटकं खूप खूप बघायचो. बघतो. बाईंनी बसवलेल्या सगळ्या कलाकृती पाहिलेल्या. त्याच्या अर्थावर मित्रामित्रांत रात्ररात्र वाद घातलेले. रंगायन, माधव वाटवे, थिएटर अकादमी, पं. सत्यदेव दुबे, अल्काझी, एलकुंचवार-तेंडुलकर-दळवी तर कमालीचे प्रेमाचे वगैरे सर्व- आत्मस्तुतीचा धोका पत्करून सांगायला हरकत नाही- बर्यापैकी पाहून/ वाचून होतो. बाईंनी मला बोलू दिलं. भडाभडा सांगत गेलो त्यांनी केलेल्या कशाकशाविषयी काय काय वाटतं ते. जाड चष्म्यापलीकडचे टपोरे डोळे रोखत बाई ऐकत होत्या. मी रिकामा झालोय याची खात्री झाल्यावर म्हणाल्या…
‘‘आता प्रश्न कधी काढू या?’’
हा काही नाट्यप्रयोग नाहीये, मी विचार केला… बाई म्हणतील, सांग कधी यायचं. उत्स्फूर्ततेवर बाईंचा फारसा विश्वास नाही, हे ऐकून/ वाचून होतो. पण अनौपचारिक गप्पांचेही प्रश्न काढ असं म्हणतील असं वाटलं नव्हतं. त्या विजया ‘बाई’ होत्या, याची जाणीव झाली. पाठोपाठ दुसरा प्रश्न : ‘‘किती वेळ असेल?’’मी म्हटलं, ‘‘बाई, तुम्हाला लोक कितीही वेळ ऐकू शकतील.’’ ‘‘पण कितीही म्हणजे नक्की किती?’’ ‘‘साधारण कार्यक्रम दोन तासांचा, त्यातली ९० मिनिटं मुलाखत ठेवू. उरलेला वेळ प्रश्नोत्तरं,’’ असं म्हणालो आणि पोटात गोळा आला. वाटलं, बाई म्हणतील की प्रेक्षकांनाही सांग आधी प्रश्न कळवायला. तसं काही झालं नाही. बाईंनीच मग आकडेमोड केली आणि म्हणाल्या… ‘‘तुझ्याकडून मला १५ प्रश्न हवेत.’’ ते किती दिवसांत द्यायचे वगैरे ठरल्यावर आम्ही निघालो.
ठरलेल्या दिवशी प्रश्न नेऊन दिले. चहा-कुकी झाल्या. बाईंनी सांगितलं, ‘‘पुढच्या आठवड्यात परत भेटू, तोपर्यंत हे प्रश्न वाचून, त्यावर विचार करून ठेवते.’’ म्हणजे आणखी एक पायरी. तीही ओलांडली. पुन्हा गेलो. बाईंना काही प्रश्नांची वाक्यरचना बदलावी असं वाटत होतं. ‘‘म्हणजे असं बघ… तू असा प्रश्न विचारतोयस… तो जर असा विचारलास तर त्याचं डायमेंशन कसं बदलेल…’’ वगैरे. मला गंमत वाटत होती. एका साध्या मुलाखतीसाठी बाई किती कष्ट घेतायत, डिटेलिंग करतायत ते बघणं हे शिकणं होतं. त्या दिवशीचा शेवट झाला प्रश्नांची नव्यानं मांडणी कशी करायची आणि नवे प्रश्न कधी द्यायचे हे ठरवण्यानं. पुन्हा एक फेरी. पुन्हा चहा. नवीन कुकीज. या भेटीत फेरप्रश्नपत्रिका मंजूर. मी खूश. निघताना बाईंचा प्रश्न… ‘‘आपल्या कार्यक्रमाचा दिवस कोणता?’’ मी सांगितला. त्यांनी वेळ विचारली. ‘‘दुपारी चार ते सहा.’’ निघताना बाईंचा आदेश… ‘‘आदल्या दिवशी पावणेचारपर्यंत इथंच ये… आपण रिहर्सल करू.’’
मी उडालो. मुलाखतीची रिहर्सल? प्रश्नाचा आवंढा गिळला. हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी पावणे चारला त्यांच्या घरी. लिव्हिंग रूममधे दोन खुच्र्या मांडलेल्या. पाथरे समोर ‘प्रेक्षकांत’ बसले. बाईंचा प्रश्न… ‘‘माईक लेपलचा की स्टँड की हातातला?’’ मी विचारच केला नव्हता. पटकन् ऑफीसमध्ये फोन करून ते विचारून घेतलं. ते उत्तर मिळाल्यावर, पुढे… ‘‘कसं बसायचं? तू माझ्या डावीकडे की उजवीकडे?’’‘‘तुम्ही म्हणाल तसं…’’हा प्रश्न बाईंनीच सोडवला. आम्ही बसलो. आता म्हणाल्या विचार… मी म्हटलं प्रश्न तर तुम्हाला आधीच पाठवलेत.
‘‘तेच विचार.’’ सुदैवाने प्रिंट आऊट घेतलेलं. ते हातात होतं. त्याप्रमाणे प्रश्न विचारत गेलो. समोर जणू खरोखरच प्रेक्षक आहेत अशा थाटात बाई उत्तरं देत गेल्या. चेहर्यावरचे हावभाव… खांदे उडवणं… मधेच मोठा पॉज… ती विचारमग्नता… सगळं सगळं झालं. पंधरावा प्रश्न नव्वद मिनिटांचा उंबरा ओलांडून पुढे गेला. मग बाईंनी एक मुद्दा एडिट केला. मग आम्ही तो एकत्रित प्रश्न पुन्हा घेतला. बाईंचं त्याच उत्साहात उत्तर. त्यांनी वेळ तपासली. म्हणाल्या, ‘‘आता ९० मिनिटांत बसेल.’’ मग चहा. यावेळी टोस्ट. जाताना ‘‘हे प्रश्न अशाच क्रमानं घ्यायचे बरं का!’’ हे बाईंचं वाक्य मला ‘क्रम बदललास तर याद राख’ असं ऐकायला आलं. भीत भीत बाईंना विचारलं… ‘‘इतकी तालीम केल्यावर मुलाखतीतली गंमत नाही कमी होणार?’’ उत्तरात बाई फक्त हलकं हसल्या.
दुसरा दिवस मुलाखतीचा. बाई बरोबर वेळेवर आल्या. सगळे जमले. नोमतोम झालं आणि मुलाखतीला सुरुवात झाली. ठरल्याप्रमाणे पहिला प्रश्न विचारला. आणि तो जणू आपल्याला माहीतच नाहीये… अशा कौतुकभरल्या अभिनयात बाई उत्तर द्यायला लागल्या. मग दुसरा… त्याचंही तसंच. तिसरा… चौथा… पंधरावा. समोरच्यांना ही मुलाखत नीरस वाटणार नाही याची चोख काळजी बाईंनी घेतली. एकालाही एकदाही शंका आली नाही… या मुलाखतीची रिहर्सल झाली असेल.
सगळं संपल्यावर मी इतका थक्कावस्थेत होतो की जे झालं ते खरंच वाटेना. बाईंना ही भावना बोलून दाखवली. त्यांना अशा कौतुकाची सवय असणार. त्या गोड हसल्या. नेहमीसारखंच! त्यानंतर प्रत्येक वेळी भेटल्या की मुलाखतीच्या तालमीची आठवण निघायची. तालीम करावी लागलेली ही माझी एकमेव मुलाखत. परवा बाई गेल्यावर तिचे व्हिडीओ तुकडे समाजमाध्यमांत फिरू लागले. ते पाहून एका कलाकाराचा फोन आला… ‘‘किती सुंदर… किती उत्स्फूर्त बोलल्यात बाई…’’
