scorecardresearch

Premium

निसर्गरम्य महाराष्ट्राची झलक

महाराष्ट्राच्या वनसंपत्तीची चित्रमय ओळख करून देणारे 'वाइल्ड महाराष्ट्र' हे पुस्तक बिट्टू सहगल व लक्ष्मी रामन यांनी संपादित केले असून ते महाराष्ट्र शासनाने सँक्चुरी इंडियाच्या सहकार्याने प्रकाशित केले आहे. महाराष्ट्र हे खरोखरच 'अंजन, कांचन, करवंदी'चं राज्य कसं आहे, याची प्रचीती या …

निसर्गरम्य महाराष्ट्राची झलक

महाराष्ट्राच्या वनसंपत्तीची चित्रमय ओळख करून देणारे ‘वाइल्ड महाराष्ट्र’ हे पुस्तक बिट्टू सहगल व लक्ष्मी रामन यांनी संपादित केले असून ते महाराष्ट्र शासनाने सँक्चुरी इंडियाच्या सहकार्याने प्रकाशित केले आहे. महाराष्ट्र हे खरोखरच ‘अंजन, कांचन, करवंदी’चं राज्य कसं आहे, याची प्रचीती या पुस्तकातून येते. शासनाचे काम पाटी टाकल्यासारखं असतं असा समज रूढ असताना हे पुस्तक त्याला दणदणीत अपवाद आहे.
महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक चेहऱ्यासोबतच एक संपन्न नैसर्गिक व जैवविविधतापूर्ण असं अंगसुद्धा आहे याची राज्यातील तसेच राज्याबाहेरील बऱ्याच लोकांना दखल नसते. कोकण किनाऱ्यावरील खारफुटी व खाडय़ांपासून ते विदर्भातील विस्तीर्ण, शुष्क पानझडी जंगलांपर्यंत आणि सह्य़ाद्रीतील घनदाट, मिश्र व सदाहरित वनांनी व्यापलेल्या डोंगररांगांपासून ते मराठवाडय़ातील झुडपी व गवताळ प्रदेशापर्यंत विविध अधिवासांनी महाराष्ट्र सजलेला आहे. शहरीकरण, पायाभूत सुविधा व उद्योगांच्या रेटय़ापुढे अजूनही अनेक ठिकाणी अशा अधिवासांमध्ये बऱ्यापैकी वन्यजीवन टिकून आहे. स्थानिकांना व निसर्गप्रेमी शहरी लोकांना त्याचे अस्तित्व ठाऊक आहे; पण वन्यजीव पर्यटन भरभराटीस येईल अशी परिस्थिती अजूनही नाही. या नसíगक वारशाचं जतन करून जास्तीत जास्त लोकांना त्याचा आनंद शाश्वत व पर्यावरणस्नेही पद्धतीने अनुभवता येईल, यादृष्टीने शासकीय व इतर अनेक पातळ्यांवर प्रयत्न व्हायला हवेत.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘वाइल्ड महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या (कॉफी टेबल बुक) निमित्ताने मला पुन्हा एकदा या निसर्ग-खजिन्यात डोकावता आलं आणि माझी दशकभराची महाराष्ट्रातील वनांमधील भटकंती व अभ्यास दौऱ्यांमधील अनुभवांना नव्याने उजाळा मिळाला. त्याचबरोबर काही न पाहिलेल्या ठिकाणांबद्दल व तेथील वन्यजीवांबद्दल नवीन माहितीही मिळाली. महाराष्ट्र ‘महा’ का आहे, याचं एक वेगळं परिमाण इथला रांगडा व त्याचबरोबर लावण्यमयी निसर्ग पाहिला की लक्षात येतं. येथील वनवैभव या पुस्तकाच्या माध्यमातून नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. निसर्ग-अभ्यासक आणि शास्त्रज्ञांचे महाराष्ट्रातील वन्यजीवनावरील अभ्यासपूर्ण व रंजक लेख आणि सोबत आकर्षक छायाचित्रं यांमुळे हे पुस्तक सुंदर व वाचनीय झालेलं आहे. १८० पृष्ठांच्या या पुस्तकात सह्याद्री, विदर्भ- सातपुडा, मराठवाडा, कोकण आणि विविध ठिकाणच्या पाणथळ जागा यांविषयी निरनिराळ्या विभागांत लिखाण केलेलं आहे. प्रवीण परदेशी, उल्हास राणे, डॉ. एरॅक भरुचा, दीपक दलाल, डॉ. असद रहमानी, आयझ्ॉक किहीमकर, बिट्ट सहगल, किशोर रिठे, रमण कुलकर्णी, डॉ. परविश पंडय़ा व फराह वकील यांसारख्या अभ्यासक व लेखकांच्या शब्दांत प्रत्येक पानावर महाराष्ट्राचं हिरवं सौंदर्य उलगडत जातं व त्याचबरोबर त्याचं संवर्धन करण्याची कशी नितांत गरज आहे याचंही भान येतं.
पाण्यात डुबकी मारून बाहेर पडणाऱ्या निळ्या शेपटीच्या वेडा राघूचं मुखपृष्ठावरील छायाचित्र दुर्मीळ आहे. खरं तर मुखपृष्ठ अजूनही आकर्षक करता आलं असतं. मलपृष्ठावरील पाणवठय़ाकडे स्तब्ध होऊन पाहणाऱ्या वाघाचं छायाचित्र मात्र खूपच बोलकं व सूचक आहे. प्रास्ताविकामध्ये शिवाजीमहाराजांचं आज्ञापत्र उद्धृत करण्यात आलेलं आहे. तीनशे वर्षांपूर्वी त्यांनी दाखवलेली निसर्गविषयक आस्था व दूरदृष्टी आणि केलेली कृती आजही मार्गदर्शक आणि अनुकरणीय आहे. पुस्तकाच्या शेवटी उपयुक्त अशी महाराष्ट्रातील सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी व झाडांची संदर्भसूची दिलेली आहे. तसेच पर्यटन महामंडळ व वन विभागातील संपर्क दिलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी कसं आणि कधी जायचं, याचा तपशील दिला आहे.
सह्याद्री
सह्याद्रीतील घाटमाथा, मावळ व समुद्राच्या दिशेला पसरलेल्या त्याच्या उपरांगांतील जंगलांची सफर करताना हे पुस्तक आपल्याला कास, महाबळेश्वर, भीमाशंकर, कळसूबाई, माळशेज घाट, कोयना, चांदोली, राधानगरी, आंबोली, बोरीवली, तानसा, कर्नाळा आणि फणसाडच्या अंतरंगात घेऊन जातं. महाराष्ट्राचं ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ समजल्या जाणाऱ्या कास पठारावरील स्वर्गीय पुष्पशोभा, महाराष्ट्राच्या सह्याद्रीतील शेकरूची उत्तर सीमा असलेलं हरिश्चंद्र कळसूबाईचं जंगल, कोयना व चांदोली मिळून बनलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, महानगरालगत वस्ती असलेले बोरीवलीचे बिबटे, आंबोलीमधील सरपटणाऱ्या प्राण्यांचं विश्व आणि कर्नाळा व फणसाडमधील समृद्ध पक्षीजीवन यांचं वर्णन आपल्याला पश्चिम घाटातील जैवविविधतेचं महत्त्व पटवून देतं.
विदर्भ- सातपुडा
विदर्भ म्हणजे महाराष्ट्रातील जंगल संपत्तीचं माहेरघर आणि वाघांचं नंदनवन. ताडोबा, नागझिरा, नवेगाव, पेंच व मेळघाटची रोमांचकारी सफर लेखक आपल्याला घडवतात. ताडोबामध्ये वाघ, अस्वल, सांबर, रानकुत्रा, मगर व गवा यांसारख्या वन्यजीवांचं नाटय़ सहज जवळून पाहायला मिळतं. तर नवेगाव-नागझिराच्या लेखात वाचकांना मारुती चितमपल्ली यांच्या निसर्गवर्णनाची आठवण हमखास होईल. सातपुडय़ाच्या कुशीतील मेळघाटमधील सिपना नदी व गोंडस अशा दुर्मीळ रानिपगळ्याबद्दल वाचताना एका गूढरम्य दुनियेत आल्यासारखे वाटते. लोणार या वैशिष्टय़पूर्ण उल्काजन्य सरोवराबद्दल आवर्जून लिहिल्यामुळे एका अल्पपरिचित स्थळाची माहिती वाचकांना होते.
मराठवाडा
लांडगा, माळढोक, काळवीट, चिंकारा, खोकड व माळरानावरील इतर जीवांचं वसतिस्थान असलेल्या मराठवाडय़ातील नान्नज आणि जवळच्या रेहकुरी या अभयारण्यांबद्दल अधिक लोकांना माहिती होणं आवश्यक आहे. हे पुस्तक ही उणीव काही प्रमाणात भरून काढतं. या प्रदेशात एकीकडे चित्त्यासारखे पूर्वीचे भक्षक नष्ट झाल्यामुळे काळविटांची संख्या काही ठिकाणी भरमसाट वाढते आहे, तर आधीच दुर्मीळ असलेले माळढोक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
कोकण
कोकण किनाऱ्यावरील अधिवासांच्या मालवण व शिवडी या दोन ठिकाणांविषयी लिहिलं आहे. श्रीवर्धन, हर्णे व गणपतीपुळेसारख्या अन्य किनारी अधिवासांचा ओझरता उल्लेख एका तक्त्यात केला आहे. मालवणच्या लेखात साधारणपणे फक्त समुद्रकिनारे, नारळीच्या बागा व फेसाळणाऱ्या लाटा इतक्याच गोष्टींची जाणीव असणाऱ्या अनेक वाचकांना व पर्यटकांना आसपासच्या मासे, िशपले, कालवं, खेकडे व िझग्यांच्या जलचर दुनियेची झलक पाहायला मिळते. तसेच मुंबईतील बकाल वस्ती व प्रदूषणाच्या विळख्यात असूनही रोहित (फ्लेिमगो), तुतारी, कुरल, समुद्रपक्षी, सुरय, वंचक व बगळ्यांचं आवडतं वसतिस्थान असलेल्या शिवडी-माहूलच्या चिखलाच्या मदानांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे.
पाणथळ जागा
जंगलांच्या तुलनेत दुर्लक्षित असे वन्यजीव अधिवास म्हणजे पाणथळ जागा. पुण्याजवळील भिगवण व उजनी आणि पठणजवळील जायकवाडीमधील स्थलांतरित व स्थानिक पक्षीजीवन, पाणथळींचं महत्त्व व त्यांना वाचवण्याची आवश्यकता यांवरही यात लिखाण करण्यात आलेलं आहे. कोयना, राधानगरी, तानसा, नवेगाव व नागझिरा यांसारख्या जंगलांतील तलावांचा यात उल्लेख करण्यात आलाय. समृद्ध पक्षीजीवनामुळे महाराष्ट्राचं ‘भरतपूर’ म्हणून ओळखलं जाणारं नांदूर-मधमेश्वर या नाशिकजवळील पाणथळीबद्दल स्वतंत्र लेख आहे.
अल्पपरिचित वने
स्थानिक लोकांव्यतिरिक्त बाहेरील जगाला फारशा परिचित नसलेल्या गौताळा, टिपेश्वर, मयूरेश्वर, ज्ञानगंगा, बोर, चपराळा, चिखलदरा, अजंठा, वेरूळ, तोरणमाळ, यावल, अनेर धरण, ओझरची कुरणं आणि काही किल्ल्यांच्या आसपासच्या वनांबद्दल वेगळ्या लेखात संक्षिप्त रूपात माहिती दिली आहे.
निसर्ग छायाचित्रण
अशा प्रकारच्या पुस्तकात लिखाणापेक्षा अधिक महत्त्वाची असतात दर्जेदार छायाचित्रं. विषय व छायाचित्रकार या दोन्हीचा अप्रतिम मेळ साधला गेल्याने याबाबतीतही या पुस्तकाने बाजी मारली आहे. झाडावर चढून कुतूहलाने पाहणारा राजिबडा वाघ, सह्यकडय़ावरून गर्द हिरवाईच्या पाश्र्वभूमीवर फेसाळत कोसळणारा पावसाळ्यातील धबधबा, तेरडय़ाच्या गडद गुलाबी फुलांनी आच्छादलेलं कास पठार, फुललेल्या काटेसावरच्या झाडामागे दिसणारं घनदाट जंगलाने वेढलेलं कोयनेचं बॅकवॉटर, झाडावरील फळं खाण्यात दंग असलेलं झुपकेदार शेपटीचं शेकरू, महाबळेश्वरहून दिसणारं वर्षां ऋतूनंतरचं बलकवडी जलाशयाचं विहंगम दृश्य, नागझिरातील तलावाच्या काठावरचं नवीन पर्णशोभा मिरवणारं जंगल, एकाच वेळी पाणवठय़ाच्या दोन बाजूला समोरासमारे पाणी प्यायला आलेले वाघ व गवा, हिरव्या कोंदणात बसवलेल्या हिऱ्यासारखे दिसणारे लोणार सरोवर, कान टवकारून पाहणारा भेदरलेला ससा आणि नुकतीच अंडय़ांतून बाहेर येऊन वाळूतून समुद्राकडे जाणारी छोटी छोटी कासवं अशी अनेक छायाचित्रं नजर खिळवून ठेवतात.
काही त्रुटी
एखाद्या उत्कृष्ट कलाकृतीमध्येसुद्धा काही उणिवा राहतात. त्याचप्रमाणे या पुस्तकात आपल्याला क्षेत्रीय असमतोल दिसतो. सह्याद्री घाटमाथा व विदर्भातील जंगलांचं सखोल वर्णन करताना कोकणातील दऱ्याखोऱ्या, जंगलं, बागायतींमधील पक्षीजीवन व खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीकडे मात्र काहीसं दुर्लक्ष झालेलं आहे. विशेषत: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंडणगड, आंजल्रे, कशेडी, परशुराम घाट, वसिष्ठी नदी, जैतापूर खाडी, माल्रेश्वर, फोंडा घाट, नेरूरपार व दोडामार्ग यांसारख्या अगणित ठिकाणांच्या निसर्गवैभवाबद्दल या पुस्तकात काहीच नाही. मालवण व शिवडी या दोनच ठिकाणांविषयी लिहून हा विभाग आटोपता घेतला आहे.
तसेच सह्याद्रीतील सिंहगड, विशाळगड, वासोटा व भरवगड यांसारख्या असंख्य किल्ल्यांच्या आसपासच्या वनसंपत्तीबद्दलही लिहिता आले असते. तेही राहून गेले आहे. उर्वरित महाराष्ट्रातील उस्मानाबादजवळचं येडशी अभयारण्य, अमरावतीचा छत्री तलाव, नांदेडजवळचं किनवट अभयारण्य व जळगावजवळचा हतनूर जलाशय यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण अधिवासांचा उल्लेख राहून गेला आहे.
प्रत्येक ठिकाणी काय दिसू शकतं, याच्या नोंदी काही ठिकाणी अपूर्ण आहेत. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात अपेक्षित प्राण्यांमध्ये फक्त बिबटा, शेकरू, साळू व रंगीत वटवाघूळ यांचाच उल्लेख आहे. तसेच भीमाशंकरमधील अपेक्षित प्राण्यांच्या यादीत बिबटा व भेकराचा उल्लेख राहिला आहे. पेंच व लोणारच्या लेखांतील त्या स्थळांचं नकाशावरील स्थान चुकलंय. पुस्तकाच्या शेवटी असलेला महाराष्ट्रातील वन्यजीव अधिवास दाखवणाऱ्या नकाशातही चुका आहेत. राधानगरी अभयारण्य- जे घाटमाथ्यावर आहे, ते कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर दाखवण्यात आलंय. तुंगारेश्वर अभयारण्याचं स्थानही चुकलंय.
भारतीय संस्कृती प्रथमपासून निसर्ग संरक्षणाचा मंत्र देणारी आहे. जगातील पहिला ग्रंथ असलेल्या ‘ऋग्वेदा’तसुद्धा वनं व वन्यजीवांचं महत्त्व सांगितलेलं आहे. आपली तीर्थक्षेत्रं बहुतांश ठिकाणी जंगलात असण्यामागचं कारण आहे- त्यायोगे त्या परिसराचं जतन व्हावं व सृष्टीतील देवत्व माणसाला जाणवावं. मधल्या काळात ही जाणीव लुप्त होत गेली आहे व ती पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे. असं असताना भीमाशंकरच्या लेखात बेशिस्तपणामुळे होणाऱ्या कचऱ्याचा ‘ज्योतिìलगाचा शाप’ असा दिशाभूल करणारा उल्लेख केला आहे. प्रबोधन केलं तर खऱ्या आध्यात्मिक पर्यटनातून निसर्ग संरक्षण स्वयंस्फूर्तीनं होऊ शकतं, हे आवर्जून नमूद करावंसं वाटतं.
निसर्गरक्षणार्थ..
पुढील वाटचालीबद्दल भाष्य करणारा शेवटचा लेखही उद्बोधक आहे. अभयारण्य घोषित करताना नान्नजच्या बाबतीत पूर्वी चुकलेला वास्तवाचा विचार, काही अभयारण्यांतील अर्निबध गुरंचराई, जंगलांच्या आसपास राहणाऱ्या लोकांच्या सहभागातून या जंगलांचं संवर्धन करण्याची गरज तसेच दोन जंगलांना जोडणारे अधिवासाचे पट्टे राखणे, अशा महत्त्वाच्या विषयांना इथे हात घातलाय. या अप्रतिम पुस्तकाच्या विश्वातून बाहेर पडताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते की, आपलं राज्य अजूनही बऱ्याच प्रमाणत वन्यजीवसमृद्ध आहे. पण आपली बदलती जीवनशैली, अर्निबध चंगळवाद व त्याला सर्व स्तरांतून मिळणारा पाठिंबा, त्यातून निसर्गावर पडणारा अतिरिक्त ताण, निसर्गाच्या पुनíनर्माणाच्या क्षमतेपेक्षा जास्त ओरबाडून घेणे, आपल्या पारंपरिक शाश्वत मूल्यांचा त्याग करणे आणि विकासाच्या चुकीच्या कल्पना अंगीकारणे- यामुळे आपल्या निसर्गाला ग्रहण लागलंय. ‘अंजन, कांचन, करवंदी’च्या या सुंदर देशाचं सौंदर्य अबाधित राखण्याची सुरुवात खरी तर आपल्यापासूनच व्हायला हवी.

‘वाइल्ड महाराष्ट्र’ – संपा. बिट्टू सहगल व लक्ष्मी रामन, सँक्चुरी इंडिया व महाराष्ट्र शासन, मुंबई, पृष्ठे – १८०, मूल्य – दिलेले नाही.

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2013 at 01:03 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×