मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

तुम्ही टागोरांचे अभ्यासक असाल किंवा नसाल; पण एक सुसंस्कृत भारतीय म्हणून त्यांच्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला निश्चितपणे माहिती असतील. उदाहरणार्थ : १) ते भारताचे आध्यात्मिक गुरुदेव होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुपेडी असून, ते उत्तम दर्जाचे कवी, लेखक, तत्त्वज्ञ, संगीतरचनाकार, शिक्षणतज्ज्ञ आणि  उत्कृष्ट चित्रकार होते. २) नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय होते. इतकंच नव्हे तर हा सन्मान मिळवणारी आशियातील आणि युरोपबाहेरील ते पहिली व्यक्ती होते. ३) दोन देशांची राष्ट्रगीतं त्यांनी लिहिली आहेत. भारताचं राष्ट्रगीत ‘जन गण मन’ हे आणि बांगलादेशचं ‘आमार सोनार बांगला’ हे. (शिवाय श्रीलंकेतील आनंद समरकून या त्यांच्या शिष्याने श्रीलंकेचं राष्ट्रगीत लिहिलं आहे.) ४) ते महान देशभक्त होते. (१९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी त्यांना मिळालेला ‘नाईटहूड’ हा किताब परत केल्यामुळे त्यांच्या देशभक्तीवर कधीही कोणी संशय घेतला नाही.) ५) त्यांनी जवळजवळ २४०० गाणी लिहून (बंगाली भाषेत ज्यांना ‘रवींद्र गीत’ म्हणतात!) संगीतबद्ध केली होती, ही बाब त्यांना जगातील सर्वात महान गीत/संगीतकार करते. (यासंदर्भात फ्रँज शुबर्ट (जर्मन) आणि ुगो वुल्फ (ऑस्ट्रियन) यांचा उल्लेख केला जातो, पण ते दोघेही संगीतकार होते; कवी नाही.)

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…

त्यांच्या ८० वर्षांच्या दीर्घ आयुष्यात रवींद्रनाथ टागोर (१८६१-१९४१) यांनी जगातील तीन खंडांमध्ये अनेकदा आणि विस्तृतपणे प्रवास केला होता. कित्येकदा स्वैर भटकंतीदेखील केली होती. शासकीय पाहुणे म्हणून किंवा व्याख्याने देण्यासाठी म्हणून सुमारे २० वर्षांच्या कालखंडात त्यांनी ३४ देशांना भेटी दिल्या होत्या. १९१३ साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. त्यानंतर त्यांना एखाद्या ‘रॉक स्टार’सारखी प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा जागतिक साहित्य क्षेत्रात मिळाली. याचा परिणाम म्हणजे जपानपासून अर्जेटिनापर्यंत श्रोत्यांनी खचाखच भरलेली सभागृहे त्यांच्या व्याख्यानांची आतुरतेने वाट बघत असायची. म्हणूनच त्यांच्या बऱ्याच रोमांचक आयुष्यात तुलनेनं कमी माहीत असणारा हा एक वेधक पैलू या लेखातून उलगडून दाखवावा असं मला वाटतं. उपलब्ध मर्यादित जागेत त्यांच्या प्रवासातील तीन महत्त्वाच्या गोष्टींवर मी लिहिणार आहे. १) त्यांच्या १८७८ सालच्या पहिल्या इंग्लंड प्रवासाबद्दल, २) या प्रवासादरम्यान त्यांना भेटलेल्या आणि त्यांच्याशी संवाद झालेल्या काही महान व्यक्तीबद्दल, आणि ३) चीन आणि जपान या देशांची त्यांची भेट! हे देश त्यांच्यासाठी स्वागतोत्सुक नव्हते. पण असं त्यांच्याबाबतीत प्रथमच घडलं.. त्याबद्दल.

त्यांच्या काळात जगामध्ये त्यांच्याइतका प्रवास केलेल्या फार कमी व्यक्ती होत्या. स्वभावत:च असलेली भटकण्याची आवड आणि मानवी स्वभावाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ऊर्मी या दोन गोष्टी त्यांच्या विस्तृत प्रवासाला कारणीभूत होत्या. त्यांनी प्रवास केलेले काही देश असे (यातील अनेक देशांत ते एकापेक्षा जास्त वेळा गेले होते.) : इंग्लंड, अमेरिका, अर्जेटिना, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, इटली, रशिया, झेकोस्लोवाकिया, हंगेरी, रोमानिया, इराण, इराक, तुर्कस्थान, चीन, जपान, इंडोनेशिया, थायलंड आणि सिंगापूर. हा प्रवास त्यांनी बोटीतून आणि रेल्वेने केला. (याला अपवाद म्हणजे पर्शियाच्या शाह यांनी त्यांना कोलकात्याहून तेहरानला आणण्यासाठी खास विमान पाठवलं होतं, हा आहे.) त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी सतत चालू असत, हे लक्षात घेता इतका प्रचंड प्रवास करणं हे केवळ साहसच होतं असं नव्हे, तर ते सहनशक्तीची परीक्षा घेणारंही होतं.

इंग्लंडचा पहिला जलप्रवास १८७८ साली ते अवघे सतरा वर्षांचे असताना त्यांनी केला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी म्हणून इंग्लंडला पाठवलं. इंग्लंडला पोहोचल्यावर त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन इथे कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. शैक्षणिक पात्रतेत तरुण टागोरांना कधीच रस नव्हता. याचा परिणाम म्हणजे कायद्याची पदवी न घेताच ते दोन वर्षांनी भारतात परत आले.

या पहिल्या प्रवासानंतर सुरू झालेल्या त्यांच्या वावटळीसारख्या जगप्रवासाकडे वळण्याअगोदर तरुण रवींद्रनाथांच्या पहिल्या प्रेमाबद्दल- २० सप्टेंबरला लंडनला प्रयाण करण्यापूर्वी जे प्रेम त्यांच्या मनात उमललं, त्याबद्दल..

इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी रवींद्रनाथांनी सुमारे दोन महिने डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खड यांच्या कुटुंबात मुंबईमध्ये काढले होते. डॉ. तर्खड हे रवींद्रनाथांचे ज्येष्ठ बंधू सत्येंद्रनाथ टागोर (कउर) यांचे घनिष्ठ मित्र होते. (सत्येंद्रनाथ यांची पहिली नेमणूक मुंबईत झाली होती आणि नंतर अहमदाबादला.) या कुटुंबात रवींद्रनाथांना राहायला पाठवण्यामागे त्यांचा एक हेतू होता, तो म्हणजे डॉ. तर्खड यांची कन्या अ‍ॅना हिच्याकडून त्यांनी संभाषणात्मक इंग्रजी आणि इंग्रजी चालीरीती शिकून घ्याव्यात. म्हणजे मग त्यांचा इंग्लंडमधील दोन वर्षांचा मुक्काम सुकर झाला असता. अ‍ॅना त्यांच्यापेक्षा तीनच वर्षांनी मोठी होती आणि ती इंग्लंडला एकदा जाऊन आलेली होती. ती सुंदर, हुशार, काहीशी थट्टेखोर आणि बरीच खटय़ाळ होती. रवींद्रनाथांच्या त्यांच्या घरच्या वास्तव्यात जे अपरिहार्य होतं ते घडलंच : दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. टागोरांनी तिला ‘नलिनी’ हे नाव दिलं. ‘कवि कहिनी’ या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाची ती नायिका होती. टागोरांनी तिला दिलेलं ‘नलिनी’ हे नावच अ‍ॅनाने पुढे वापरलं. टागोर कधीही तिच्या आठवणी विसरले नाहीत. आणि तिच्याशी असलेल्या संबंधांचाही नंतरच्या आयुष्यात त्यांना विसर पडला नाही. अतिशय कोमलपणे आणि आदराने ते तिचा नेहमी उल्लेख करायचे.

विसाव्या शतकातील जगभरच्या या भटकंतीत रवींद्रनाथांना भेटलेले काही नोबेल पारितोषिक विजेत्या व्यक्ती : टागोर आणि अल्बर्ट आईनस्टाईन यांची दोन वेळा भेट झाली. एकदा १९२६ साली बर्लिनमध्ये आणि दुसऱ्यांदा १९३० साली न्यूयॉर्कमध्ये. या भेटींत त्यांचं विज्ञान, संस्कृती, मानवजात, सत्याचं स्वरूप अशा विषयांवर बोलणं झालं होतं. आणि निदान एकदा तरी त्या दोघांच्या आवडीच्या संगीताबद्दलही त्यांच्यात चर्चा झाली. १९१५ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच साहित्यकार रोमा रोलां हे टागोरांचे अतिशय जवळचे मित्र झाले होते. १९२३ सालचे नोबेल पारितोषिक विजेते आणि पाश्चात्त्य साहित्यजगताला टागोरांची ओळख करून देणारे इंग्लिश कवी डब्ल्यू. बी. यीट्स हेही त्यांचे मित्र झाले. ‘गीतांजली’चा फ्रेंचमध्ये अनुवाद करणारे फ्रेंच साहित्यिक आंद्रे जिदे आणि नोबेल विजेते सेंट जॉन पर्से यांना ते आपल्या १९२० सालच्या फ्रान्सच्या पहिल्या भेटीत भेटले होते. काही वर्षांतच या दोघांनाही नोबेल पारितोषिक मिळाले.

आणि आता नोबेल विजेते नसलेली व्यक्तिमत्त्वे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर. १९३० साली त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये त्यांचं स्वागत केलं होतं. १९२५ आणि २६ साली शासकीय पाहुणे म्हणून त्यांनी इटलीला भेट दिली होती आणि ते मुसोलिनी यांचे समर्थक असल्याचा (गैर)समज पसरला होता. पण टागोरांनी इटलीच्या हुकूमशहाची आणि फॅसिझम विचारधारेची निर्भर्त्सना करून हा गैरसमज वेळीच दूर केला होता. ख्रिश्चन मिशनरी, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक सी. एफ. अँड्रय़ूज हे टागोर आणि गांधी या दोघांचेही निकटचे स्नेही होते. विजनवासी अमेरिकन कवी आणि समीक्षक एझरा पाउंड यांचा टागोरांची कविता पाश्चात्त्य साहित्यजगतात लोकप्रिय करण्यात महत्त्वाचा सहभाग होता.

जपान आणि चीनमध्ये मात्र टागोरांचं योग्य स्वागत झालं नाही. लियांग क्विचॉव यांच्या निमंत्रणावरून टागोरांनी शांघायला भेट दिली होती. ते चीनमधील आघाडीचे उदारमतवादी विचारवंत होते. त्या काळातदेखील चीनमध्ये लियांग क्विचॉवसारखे विचारवंत होते, जे टागोरांची ‘आशियाचा नवा आवाज’ म्हणून गौरव करायचे. पण ते कुणाच्या खिजगणतीतही नव्हते, ही दुर्दैवाची गोष्ट होती. आत्मिक जागृतीचा उदात्त आदर्श आणि पाश्चात्त्य भौतिकवाद यांच्याभोवती टागोरांच्या व्याख्यानांची गुंफण केलेली असायची. याउलट, पाश्चात्त्य भौतिकवाद वापरून आपला देश बळकट व समर्थ करावा अशी त्यावेळच्या चिनी कम्युनिस्ट पार्टीची विचारधारा होती. १९२४ मध्ये चीनमधील विचारवंत आपल्या चिनी अस्मितेबद्दल अतिशय आग्रही होते आणि जुन्या आशियायी सदाचाराच्या भारतीय रूपाबद्दल त्यांना काहीही देणंघेणं नव्हतं. माओ डून नावाचे एक चिनी कादंबरीकार होते. त्यांनी टागोरांच्या काही साहित्याचे चिनी भाषेत भाषांतर केलं होतं आणि त्यांना टागोरांबद्दल सहानुभूती होती. पण एक कट्टर कम्युनिस्ट पुरोगामी या त्यांच्या नव्या अवतारात त्यांना असं वाटलं की, टागोरांच्या लिखाणाचा आपल्या युवकांवर वाईट प्रभाव पडेल. आणि याचा परिणाम असा झाला, की रवींद्रनाथांच्या चीनमधील आगमनानंतर काही दिवसांतच ‘टागोर परत जा’, ‘हरवलेल्या देशातील गुलामा परत जा’ अशा तऱ्हेच्या घोषणा त्यांच्याविरुद्ध दिल्या जाऊ लागल्या. आणि या कडवट स्मृती घेऊन टागोरांनी तो देश सोडला.

१९१६ साली जपानला दिलेली भेट ही जपानी दैनिक ‘आशी शिबुम’च्या विद्यमाने आयोजित केलेली होती. (जपानी कलेतील साधेपणा आणि सुसंगती टागोरांना अतिशय भावत असे.)  १९०५ मधील जपानच्या रशियाबरोबर झालेल्या युद्धात जपानच्या विजयाचं टागोर यांनी समर्थन केलं होतं. पण नंतर मात्र जपानच्या आक्रमक युद्धखोर राष्ट्रवादावर त्यांनी जाहीरपणे टीका केली होती. ही गोष्ट जपानच्या माध्यमांतील मोठय़ा गटाच्या आणि सर्वसाधारण जपानी जनतेच्या पचनी पडली नव्हती. म्हणून ते त्यांना उघडपणे विरोध करत होते. त्यानंतर टागोरांनी जपानला पुन्हा भेट दिली. पण एकदा जे घडलं होतं त्याच्या खुणा तशाच राहिल्या.

जाता जाता : दोघं प्रेमी दुरावल्यानंतर अ‍ॅनाचं (नलिनीचं) काय झालं, हा प्रश्न या लेखाचा मसुदा वाचल्यानंतर सोपानने मला विचारला. त्याला मी दिलेलं त्रोटक उत्तर असं : १८८० मध्ये अ‍ॅनाने हॅरोल्ड लिटलडेल या स्कॉटिश माणसाशी विवाह केला आणि ते इंग्लंडमध्ये राहावयास गेले. मात्र, एडिनबर्गमध्ये वयाच्या ३३ व्या वर्षी काहीशा एकांतवासात टी. बी. या रोगाने अ‍ॅनाचा अत्यंत शोकात्म असा अंत झाला.

टागोरांच्या महाराष्ट्राशी असलेल्या संबंधांबद्दल सोपानला जाणून घ्यायची इच्छा होती, म्हणून काही गोष्टी इथे नमूद करतो.. १) लोकमान्य टिळकांवरच्या देशद्रोहाच्या खटल्यात त्यांची बाजू लढवायला दोन प्रसिद्ध इंग्लिश बॅरिस्टर टागोरांनी कोलकात्याहून मुंबईला पाठवले होते. त्यांची फी आणि खर्चासाठी त्यांनी १८९७ साली २० हजार रुपयांचा निधी गोळा केला होता. २) जयपूर अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका केसरबाई केरकर यांना ‘सूरश्री’ ही पदवी टागोरांनी १९३८ साली दिली होती. ३) बंगालमधल्या शिवाजी उत्सवाची पूर्वतयारी विष्णू बळवंत बोपर्डीकर आणि सखाराम गणेश देऊस्कर यांनी केली होती. १९०६ साली. त्या उत्सवाचं अध्यक्षपद लोकमान्य टिळकांनी भूषवलं होतं. टागोरांनी शिवाजीमहाराजांवर एक अत्यंत प्रभावी अशी पाच पानी कविता बंगालीत लिहिली होती. त्यामुळे उत्सवाच्या बंगाली आयोजकांना स्फूर्ती मिळाली आणि चांगलंच बळ प्राप्त झालं होतं. ज्यांना या कवितेचा अनुवाद वाचण्याची इच्छा असेल त्यांनी नरेंद्र जाधवलिखित ‘भयशून्य चित्त जेथ’ हे रवींद्रनाथांच्या १५१ प्रातिनिधिक कवितांचं पुस्तक वाचावं. हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. टागोरांच्या कवितेचं शीर्षक ‘शिवाजी उत्सव’ असं असून कवितेच्या प्रारंभीच्या काही ओळी अशा आहेत..

‘हे राजा शिवाजी,

कोण जाणे, कधी काळी मराठय़ांच्या देशी,

कडेकपारीतील रानीवनी अंधारात

विद्युल्लतेसारखी चमकून गेली तुझ्या मनी प्रतिज्ञा,

‘विस्कटलेल्या, विदीर्ण झालेल्या भारत देशाला

मी स्वराज्यधर्माच्या सूत्रात जोडून घेईन!’

(टीप : टागोरांच्या अर्जेटिना-भेटीचा वृत्तान्त ‘सांगतो ऐका’ या सदरात ७ फेब्रुवारी २०२० च्या लेखात आलेला आहे.)

शब्दांकन : आनंद थत्ते