ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्टसारख्या नयनरम्य समुद्रकिनारी वसलेल्या शहरात  सुमारे १४ वर्षे वास्तव्य करतेय.  भारत सोडून परदेशात राहायला जाणाऱ्या अनेकांसारखीच माझीही अवस्था होती. काहीशी गोंधळलेली, काहीशी उदास. पण पुन्हा एकवार माझ्यातल्या सकारात्मकतेला साद घालत नव्याने आयुष्य lok01सुरूकरण्याची उमेद बाळगत मी हा प्रवास सुरू केला. माझ्या वडिलांनी इथून निघताना म्हटलेलं वाक्य आजही मला चांगलं आठवतं आहे, ते म्हणजे, ‘जाऊ तिथे नंदनवन निर्माण करावं’. हाच ध्यास घेऊन माझा आधारस्तंभ असलेल्या माझ्या पतीच्या सोबतीने मी या प्रवासाची
सुरुवात केली.
परदेशगमन हा अनुभव नवीन जरी नसला तरी आता या देशाला आपलं म्हणून इथल्या लोकांशी जमवणं, इथली थोडीफार संस्कृती माहीत करून घेणं हे  काहीसं आव्हानात्मक होतं. पण मी इथल्या वातावरणात कशी सामावून गेले हे कळलंच नाही. गोल्ड कोस्ट हे शहर जितकं सुंदर आहे तितकंच ते माझ्या मुंबई शहरासारखं कॉस्मोपॉलिटन आणि सहनशील आहे. इथे प्रत्येकाकरता जागा आहे.
आज इतकी वष्रे इथे राहून मी जेव्हा मागे बघते तेव्हा मलाच खूप नवल वाटतं. मी गोल्ड कोस्टमधील एका नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये रजिस्टर्ड नर्सचा जॉब करते. या देशात नर्सला बरीच जबाबदारी आणि मानदेखील दिला जातो. करिअर कशात करायचं हा प्रश्न जेव्हा माझ्यासमोर उभा राहिला तेव्हा मनाची बरीच तारांबळ उडाली. कळेचना काय करावे!  याआधी मी एका उत्तम सरकारी संस्थेत काम केलं होतं, पण परत तिथे जायला मन मानत नव्हतं. नुसता डेस्क जॉब करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं. पण काय नेमकं ते कळत नव्हतं. मोठी बहीण अमेरिकेत रजिस्टर्ड नर्स आहे. तिने सुचवलं की, तू नर्सिग का नाही करत? पाश्चात्य देशात या व्यवसायाला खूप वाव आहे. माझ्या पतीसोबत चर्चा केल्यावर त्यांनीही प्रोत्साहन दिलं. घरच्या सगळ्यांनीच साथ दिली व तीन वर्षांचा ग्रिफीथ विद्यापीठातला कठीण प्रवास सुरू झाला. मनात एक वेगळ्या प्रकारची भीती होती. वयाच्या ३६ व्या वर्षी शिक्षण, इथली शिकवण्याची पद्धत, भरघोस अभ्यास, घराकडे मुलांकडे दुर्लक्ष तर होणार नाही ना या विचारांचं काहुर माजलं. पण हळूहळू ती भीती नाहीशी झाली आणि विद्यापीठीय जीवनाला मस्तपकी सरावले. अनेक ऑस्ट्रेलियन लोकांशी या वेळी संबंध आला. काही जण खूप जवळचे मित्र झाले, तर काही फक्त सहाध्यायी. प्राध्यापकापासून स्थानिक विद्यार्थ्यांपर्यंत सर्वानाच भारतीय संस्कृतीबद्दल प्रचंड कुतूहल असायचं. तुला तुझा देश का सोडावा लागला, तुझं लग्न कसं ठरलं, ते अगदी तू इतकं चांगलं इंग्रजी कुठे बोलायला शिकलीस? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी देत असे. सामाजिक विषयांवर चर्चा करताना मीसुद्धा आवर्जून भारताविषयी अभिमानाने बोलत असे. काही जणांना lr10खूप आश्चर्य वाटायचं, तर काहींना फारच आनंद व उत्सुकता वाटायची. एकदा असंच लेक्चर सुरू व्हायला वेळ होता. म्हणून मी आणि ६० वर्षे वयाचे माझे फेलो स्टुडंट ग्रेग गप्पा मारत होतो. आम्ही एकमेकांना हाय, हॅलो करत असू, पण बोलायचा योग पहिल्यांदाच आला. जुजबी गप्पा झाल्यावर त्यांनी मला त्यांचं वय सांगितलं. जरी मला नवल वाटलं तरी मी त्यांना तसं जाणवू दिलं नाही. तसं माझ्या वयोगटातील आणि चाळिशीतले- पन्नाशीतले लोक आपल्यासोबत शिकतात हे माहीत होतं, पण रिटायर व्हायच्या वयात यांना शिकावंसं का बरं वाटलं असेल, हा प्रश्न मी विचारणार हे बहुधा आधीच माहीत असावं. तसं ते लगेच मला म्हणाले, ‘‘माय ग्रँडकिड्स लिव्ह विथ मी, अँड माय वाइफ, माय डॉटर इज अ ड्रग अ‍ॅडिक्ट. शी लिव्हज ऑन द स्ट्रीट.’’ मी हे ऐकल्यावर दोन मिनिटं शांतच बसले. माझा चेहरा बघून ते लगेच म्हणाले, ‘‘देअर मम कान्ट बी अ गुड रोल मॉडेल फोर देम, बट वी विल टीच देम दॅट देयर इज लाइफबियँाड ड्रग्ज. इफ देयर इज अ विल देयर इज अ वे.’’ मी पुढल्या तीन वर्षांत त्यांना सर्वतोपरीने मदत करायचे. कॉम्प्युटरवर मदत, नोट्स काढून देणे, त्यांना आर्थराइटिसचं दुखणं होतं म्हणून जमेल तितकं टाइप करून देणं अशी मदत करत असे. विशेष म्हणजे तेही याची जाणीव ठेवायचे. माझ्यासाठी लायब्ररीत पुस्तक राखून ठेवायचे, लेक्चरला जागा अडवायचे व अधूनमधून कॉफीही आणायचे. मी दर वेळी पसे द्यायचा आग्रह करायचे, कारण या देशात आई, वडील, मुलं, मित्र ही सगळी नाती व्यवहारापेक्षा दुय्यम असतात हे मी जाणून होते, पण त्यांनी कधीच पसे घेतले नाहीत. रिटायरमेंटनंतर तर कॅरॅव्हॅनमधून भ्रमंती करत कुठल्याशा समुद्रकिनारी तळ ठोकायचा व कधी जोडीदारासोबत, तर कधी एकटय़ानेच थंडगार बियर पीत मजेत आयुष्य घालवायचं अशा विचारांचे ऑस्ट्रेलियन मी ऐकून होते, काही पाहिलेही होते. मात्र, ग्रेगच्या रूपात तिथे भारतीय विचारसरणीचं, कुटुंबाचा विचार करणारं जोडपं मी पहिल्यांदाच बघितलं.
नोकरी करत असताना संपर्कात आलेले स्थानिक लोक आणि विद्यापीठामध्ये भेटलेले ऑस्ट्रेलियन्स यांच्यात मात्र बराच फरक जाणवला. कदाचित तो प्रासंगिकही असू शकेल. नोकरीत सगळेच असुरक्षित. वरच्या पदावर पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा असलेले!  मात्र, विद्यापीठात सगळेच आपापल्या व्यक्तिगत आयुष्यातील घडामोडींशी जुळवून घेत अपार मेहनत करून डिग्री मिळवणं आणि उत्तम व्यवसायात स्थिरावणं असं यातील प्रत्येकाचंच समान ध्येय होतं. त्यामुळे असेल बहुतेक, पण आम्ही सगळेच रंग, भाषा, जात, धर्म विसरून एकत्रितपणे वाटचाल करत होतो. ग्रॅज्युएशनच्या दिवशी मी माझ्या ६० वर्षांच्या मित्राच्या बायकोला (अ‍ॅलिसनला) भेटले. त्यांची नातवंडसुद्धा होती. अ‍ॅलिसननी मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, ‘‘थँक्यू फोर ऑल युवर हेल्प. यू चेंज्ड अवर पस्प्रेक्टिव्ह अबाउट इंडिया अँड इंडियन्स, सो सॉरी.’’ मीही तिला मिश्कीलपणे म्हटलं ‘‘इट्स ओके. आय टु लर्नंट् दॅट ऑझीझ डू पे फोर अ कॉफी.’’ ती खळखळून हसली. पण खरंच माझी वैचारिकता बदलण्यासाठी हा एक अनुभव पुरेसा होता. ग्रेगसारख्या अनेकांना या देशात आपली स्वप्ने पूर्ण करता येतात. समाजापासून ते सरकापर्यंत सगळ्यांचा काही अंशी हातभार असतो. समाज त्यात नाक खुपसत नाही आणि सरकार पेन्शन देऊन आíथक चणचण दूर करते.
ग्रेगने माझ्याकडून काय चांगलं घेतलं यापेक्षा मी त्याच्याकडून व नकळत अ‍ॅलीसनकडून सकारात्मक असं खूप शिकले. मला त्याचा रोजच्या आयुष्यात, हॉस्पिटलमध्ये ऑस्ट्रेलियन रुग्णांची सेवा करताना बराच फायदा झाला. उत्तम शुश्रुषा केल्याबद्दल ऑस्ट्रेलियन खूप मोकळ्या मनाने भरभरून कौतुक करतात, तर कधी ‘ओन्ली बिकॉझ यू आर अ‍ॅन इंडियन, यू पुट अप विथ धिस स्ट्रेस.’ ऐकलं की खूप बरं वाटतं. कारण शेवटी कुठल्याही देशाचं नागरिकत्व घेतलं तरी भारताचं प्रतिनिधित्व करणं थांबत नाही. एक निष्ठावंत नागरिक आपण असतोच, पण नकळत आपल्या मातीशी जोडलेलं अतूट नातं आपल्या कृतीतून, वागण्यातून डोकावत राहतं.
वैचारिक आणि सांस्कृतिक आगळेपण ध्यानी ठेवून आपल्याकडे जे चांगलं आहे ते देऊन आणि समोरच्याकडे जे चांगलं आहे ते घेऊन जगण्याची तयारी ठेवली तर परदेशातील वास्तव्य थोडं अधिक सुखकर होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आपला देश सोडून आपली प्रेमाची माणसं मागे ठेवून, कधी इच्छेने किंवा कधी गरज म्हणून आपण एका नव्या विश्वात पदार्पण करतो, त्या त्यागाची फार मोठी किंमत मोजतो, पण अशा वेळी केवळ मी इथलं चांगलंच घेईन, असं जर मनाशी पक्क ठरवलं तर पश्चात्तापाची वेळ कधीच येत नाही.