scorecardresearch

भावरम्य ‘अमर प्रेम’चा सुवर्णयोग!

‘आराधना’पासून नशीब राजेश खन्नावर लुब्ध झालं होतं. आणि प्रेक्षक फिदा!

अरुणा अन्तरकर lokrang@expressindia.com

‘अमर प्रेम’ हा वेदनाशामक, रामबाण गुणकारी चित्रपटांपैकी एक चित्रपट! पन्नास वर्षांपूर्वी- २८ जानेवारी १९७२ रोजी तो प्रदर्शित झाला. तो आला, त्याला पाहिलं, त्यानं जिंकलं.. अशी विलक्षण मोहिनी ‘अमर प्रेम’नं प्रेक्षकांना घातली. या चित्रपटाद्वारे राजेश खन्ना नामक पहिला सुपरस्टार जन्माला आला. त्या सुवर्णयोगाविषयी..

कधीमधी घशाला जीव कासावीस करणारी कोरड पडते आणि मग समोर आलेलं पाणी फिल्टर आहे की नाही, झाकलेलं आहे की नाही याचा विचार न करता त्याचे घोट घेतले जातात. १९६० ते १९७५ या कालखंडातल्या चित्रपटांमध्ये असाच दिलासा सापडतो. टेक्नॉलॉजीच्या गतिमान आकाशपाळण्यातून फिरताना आणि वास्तववादाचं लेबल मिरवणारे रुक्ष, भकास थरारपट, नाहीतर अचकट विचकट वेब सीरिज बघताना जिवाचा थरकाप तरी होतो, नाहीतर भडका. अशा वेळी या कालखंडातला कोणताही चित्रपट पाहावा. राक्षसी गतीनं आलेली भोवळ, भीतीनं पडलेला शोष आणि कर्कश्श कोलाहल यांचा थोडा वेळ का होईना, विसर पडतो. त्या शांत, निवांत आणि मनाच्या तळाशी असलेल्या विकारांच्या गढूळ कचऱ्याचा दुर्गंध चिवडण्याऐवजी प्रेम, हास्य आणि माणुसकी यांची हिरवळ दाखवणारे चित्रपट- त्यांचा भाबडेपणा जमेस धरूनही- आपोआप आठवतात.

‘अमर प्रेम’ हा अशा वेदनाशामक रामबाण गुणकारी चित्रपटांपैकी एक. नदीच्या निश्चल पात्रातून वाटचाल करणाऱ्या नौकेच्या चालीनं ‘अमर प्रेम’ पन्नास वर्षांपूर्वी पडद्यावर आला. प्रवासाची नेमकी तारीख सांगायची तर २८ जानेवारी १९७२. तो आला, त्याला पाहिलं, त्यानं जिंकलं.. अशी विलक्षण मोहिनी या चित्रपटानं प्रेक्षकांवर घातली.

त्या वर्षी ‘अमर प्रेम’ला कोण कोण प्रतिस्पर्धी होते हे लक्षात घेतलं की त्याच्या यशाचं मोल कितीतरी पट वाढतं. ही पहा काही नावं-‘पाकीजा’, ‘सीता और गीता,’ ‘बावर्ची’, ‘मेरे जीवनसाथी’! यांच्यापैकी ‘बावर्ची’ सोडता इतर सर्व चित्रपटांनी रौप्यमहोत्सवाच्या पुढे मजल मारली होती. कलात्मकतेच्या दृष्टीनं ‘बावर्ची’ या सर्वापेक्षा सरस होता. सर्वस्वी निराळा होता. आशय, विषय, कथा, दिग्दर्शन, अभिनय.. प्रत्येक बाजूनं उठावदार होता. तरीही बारा-पंधरा आठवडय़ांत त्याला चित्रपटगृहांमधून मुक्काम हलवावा लागला.

‘पाकीजा’नं अफाट कमाई केली. पण त्याची पहिल्या नऊ -दहा आठवडय़ांची कमाई जेमतेम होती. ‘पाकीजा’ला चित्रपट अर्थतज्ज्ञांनी ‘फ्लॉप’ ठरवलं होतं. तो चालण्यासाठी त्याच्या महानायिकेला स्वत:च्या प्राणाची कुर्बानी द्यावी लागली. ३१ मार्च १९७२ ला मीनाकुमारीचं निधन झालं आणि दुसऱ्या दिवसापासून ‘पाकीजा’च्या गल्लापेटीवर छमछम बरसू लागली.

‘सीता और गीता’मध्ये अ‍ॅक्शन होती. कॉमेडी होती. नाटय़ होतं. माफक, परंतु उत्कंठा कायम ठेवणारा सस्पेन्स होता. खेरीज हेमामालिनीच्या डबल रोलचा धमाका होता. तो तुफान चालला नसता तरच नवल!

राजेश खन्नाचाच ‘मेरे जीवनसाथी’ तिसऱ्या क्रमांकाची उत्तम कमाई करत होता. त्यात सूर आणि स्वरांची तरुणाई आणि माधुर्य यांची गुंफण करणारी संगीताची कमाल होती. (श्रेय- आर. डी. बर्मन)

‘अमर प्रेम’मध्ये या दोन्ही चित्रपटांतला कोणताच गुणविशेष नव्हता. बंगाली परिवेश धारण करणाऱ्या कथा नामशेष होण्याच्या मार्गावर असताना ‘अमर प्रेम’ नेमकं तेच रूप घेऊन आला होता. त्याचा नायक पराक्रमी नव्हता. वैवाहिक जीवनातलं अपयश एकच प्यालातून निमूटपणे गिळणारा तो भित्रा पुरुष होता. झकपक फॅशनेबल कपडय़ांत न वावरता चक्क धोतर आणि कुडता या कालबा पोशाखात वावरत होता. पत्नीसकट सर्वाशी नमतं घेऊन वागत होता.

चित्रपटाची पार्श्वभूमी ग्रामीण. शहरी दिमाख त्यात नव्हता. कोलकात्याचा सुपरिचित हावडा ब्रिज होता, हुगळी नदी होती; मात्र एखाद्या पर्यटनस्थळाची रमणीयता त्यात नव्हती. तो पूल व नदी सोडता संपूर्ण चित्रपट छोटय़ा-मोठय़ा घरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये घडत होता.

इतकंच काय, कोलकाता महानगरपालिकेनं प्रचंड गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत होण्याच्या भीतीमुळे हावडा पुलाच्या परिसरात चित्रपटाचं चित्रण करण्याची परवानगीही नाकारली होती. निर्माता-दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी आपल्या नटराज स्टुडिओमध्ये पूल व नदीच्या परिसराची प्रतिकृती उभारून मुंबईच्या अंधेरी उपनगरात कोलकाता उभा केला होता. नंतर कलाकारांविना त्या परिसराची प्रत्यक्ष दृश्यं टिपून ती ‘सुपर इम्पोज’ तंत्रानं कथेतल्या प्रसंगांशी जोडण्यात आली. ‘चिंगारी कोई भडके..’ या गाण्याच्या चित्रणातही ही करामत दिसली. ती इतकी परिणामकारकरीत्या जमली होती, की पुढे वीस वर्षांनी संजय लीला भन्साळीला ‘देवदास’मध्ये एक-दोन दृश्यांची मांडणी थेट ‘अमर प्रेम’च्या शैलीत दाखविण्याचा मोह आवरला गेला नाही!

‘अमर प्रेम’ च्या कथेत नवं, निराळं असं बाकी काही नव्हतंच. संसारात दु:खी नायक बदनाम पेशा करणाऱ्या एका स्त्रीच्या प्रेमात पडतो. आणि ती दोघं त्या स्त्रीच्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलाच्या प्रेमात पडतात. सावत्र आईचा छळ सहन करणाऱ्या त्या मुलावर ही दोन दु:खी माणसं प्रेमाची पाखर घालतात. पण तिळाच्या दाण्याएवढंही सुख त्यांच्या वाटय़ाला येत नाही. नायकाचे नातलग त्याला त्या स्त्रीपासून दूर व्हायला लावतात. तर त्या लहान मुलाचा बाप नायिकेला मुलापासून तोडतो. तिघांची ताटातूट होते. पुढे तो मुलगा मोठा होतो आणि या दोघांना शोधून काढतो, एकत्र आणतो.. वगैरे वगैरे गोड शेवट!

मध्यमवर्गीय, सुशिक्षित प्रेक्षकाला आपलंसं वाटावं असं काहीही ‘अमर प्रेम’मध्ये नव्हतं. आणि तरीही इतर चित्रपटांच्या नाकावर टिच्चून  त्यानं खोऱ्यानं पैसा ओढला. इतकंच नाही तर त्याने राजेश खन्ना, शक्ती सामंत आणि आर. डी. बर्मन यांच्या कारकीर्दी यशाच्या शिखराजवळ नेल्या. या तिघांचं एकत्र येणं म्हणजे बॉक्स ऑफिसचं ‘खुल जा सिम सिम’ समीकरण पुढे तयार झालं.

या चित्रपटाच्या आणि ‘आराधना’च्याही आधी शक्ती सामंत हे यशस्वी निर्माता-दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते. मात्र, मुंबईत अन्य बंगाली दिग्दर्शकांना मिळणारा आदर व प्रतिष्ठा यापासून ते वंचित होते. त्या दिग्दर्शकांप्रमाणे भावनाप्रधान कौटुंबिक चित्रपट बनवण्याऐवजी सामंत ‘हावडा ब्रिज’, ‘चायना टाऊन’ यासारखे गुन्हेगारी चित्रपट बनवत होते. रुचिपालट म्हणून ‘कश्मीर की कली’ आणि ‘अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस’ हे प्रणयपट त्यांनी केले. तरीही ते नमुनेदार शक्ती सामंतपट होते.. उथळ उछलकूद आणि प्रेमाच्या धांगडधिंग्यानं बरबटलेले! त्यामुळे मुंबईतले ‘पंजाबी बंगाली दिग्दर्शक’ असं सामंतांचं उपहासानं वर्णन होत असे. शाळा मास्तरकी करीत चंदेरी दुनियेत आलेल्या सामंतांची ही दुखरी नस होती. तसे सुरुवातीला ‘बहु’ (१९५५) आणि मध्यंतरानंतर ‘इन्सान जाग उठा’ (१९६९) हे कौटुंबिक, सामाजिक आशयप्रधान चित्रपट करून त्यांनी आपला बंगाली खानदानाचा लौकिक जपण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अंगलट आल्यावर वाल्मिक बनण्याचा नाद त्यांनी सोडून दिला आणि वाल्या बनून थरारपटांची वाटमारी ते करत राहिले.

मात्र, वाल्मिक बनण्याचं स्वप्न ते विसरले नव्हते. ‘आराधना’मधून त्यांनी पुन्हा सन्मार्गावर पाऊल टाकलं आणि यावेळी तीर निशाने पर लग गया. ‘आराधना’च्या अनपेक्षित झंझावाती यशानं इतिहास घडवला! आणि बंगाली वळणाचे कौटुंबिक अन् प्रतिष्ठित चित्रपट बनवत राहण्याचा मार्ग सामंतांना खुला झाला. ‘अमर प्रेम’ आणि त्यानंतर ‘अमानुष’, ‘आनंद आश्रम’, ‘अनुराग’ वगैरे किमान डझनभर चित्रपट बनवून सामंतांनी आपल्या नव्या मार्गाशी इमान राखून इच्छित प्रतिष्ठा मिळवली.

‘अमर प्रेम’ च्या यशाचं बीज सामंतांनी ‘आराधना’मध्ये रोवलं होतं. राजेश खन्नासारख्या त्यावेळी फार यशस्वी नसलेल्या नटाला ‘आराधना’मध्ये दुहेरी भूमिका देण्याचं धाडस त्यांनी दाखवलं; नव्हे ते जुगारच खेळले होते. पण तो सफल ठरला. ‘अमर प्रेम’सारख्या जुन्या पठडीतल्या चित्रपटाला नेत्रदीपक यश मिळवून देण्यात राजेश खन्नाच्या लोकप्रियतेचा सिंहाचा वाटा होता. ‘आराधना’पासून नशीब राजेश खन्नावर लुब्ध झालं होतं. आणि प्रेक्षक फिदा!

पहिला सुपरस्टार म्हणून ओळखला जावा अशी लोकमान्यता राजेशनं ‘आराधना’मधून  मिळवली. इतकंच नाही तर दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद यांच्या जवळपास अर्धा शतक चाललेल्या राजवटीला त्यानं सुरुंग लावला. खुद्द ‘अमर प्रेम’च्या वेळी दिलीपकुमारचा ‘दोस्ताना’ आणि देव आनंदचा ‘ये गुलिस्तां हमारा’ रिंगणात होते. आदल्या वर्षी ‘दुश्मन’ आणि ‘हाथी मेरे साथी’ हे यशस्वी चित्रपट देऊन राजेश खन्नानं सिंहासनासाठी दावा दाखल केला होताच. ‘अंदाज’मध्ये शक्ती सामंतांचा लाडका हिरो शम्मी कपूर याला फक्त एका गाण्याच्या बळावर (‘जिंदगी एक सफर है सुहाना’) त्यानं भुईसपाट केलं होतं. सामंतांच्या दृष्टीनं ही घटना भरभरून लाभदायक ठरली. शम्मी कपूरच्या देहप्रदेशाच्या विस्तारामुळे त्याचं नायकपद धोक्यात आलं होतं. पण आता सामंतांना या दुर्घटनेची चिंता राहू नये अशी कामगिरी राजेशनं केली होती.

एकंदरीतच राजेशचं टायमिंग अचूक जमलं होतं. रूपेरी विश्वाचे ब्रह्मा-विष्णू-महेश ऊर्फ दिलीप-राज-देव यांचा महिमा कमी झाला नव्हता, पण ते पन्नाशीपार झाले होते. त्यांच्या निष्ठावान चाहत्यांची त्याला हरकत नव्हती, पण दरम्यानच्या काळात प्रेक्षकांच्याही दोन नव्या फळ्या तयार झाल्या होत्या आणि त्यांना आता त्यांच्या वयाचा, त्यांच्यासारखा वागणारा, बोलणारा हिरो हवा होता आणि तो त्यांना राजेश खन्नामध्ये गवसला आणि त्यांनी त्याला अक्षरश: डोक्यावर घेतलं.

राजेश खन्नाला अमिताभ बच्चनसारखं दीर्घ महानायकपद लाभलं नाही. पण सात-आठ वर्षांची छोटी कारकीर्द राजेशनं ज्या रुबाबात अन् दिमाखात उपभोगली, तितकी कमालीची लोकप्रियता अमिताभलाही मिळाली नाही. राजेश खन्नाच्या मोटारीच्या काचांवर चुंबनांचा वर्षांव करणाऱ्या अन् त्याला रक्तानं पत्र लिहिणाऱ्या चाहत्या होत्या. दैवी उपरोध म्हणून ‘अमर प्रेम’मध्ये राजेशवर रूपेरी सम्राटपदाचा अभिषेक झाला, त्याच वर्षी अमिताभचा ‘रास्ते का पत्थर’ नावाचा चित्रपटही मैदानात होता. मात्र, आणखी तीन वर्ष तरी अमिताभ राजेशच्या राजमार्गातला पत्थर बनणार नव्हता, हे विधिलिखित होतं. असो. तर मुद्दा हा की, ‘अमर प्रेम’चा कालखंड हा राजेशच्या ‘हात लावीन तिथं सोनं’ असा ऐश्वर्यसंपन्न होता. प्रेक्षकांनी त्याला हाफ पॅंटमध्ये वावरणारा ‘बावर्ची’ म्हणूनही दाद दिली होतीच. मग ‘अमर प्रेम’मधला धोतरधारी आनंदबाबू त्यांना कसा खटकणार होता? राजेशच्या या अवतारावरही त्यांनी जीव ओवाळून टाकला. शर्मिला टागोर ‘अमर प्रेम’ची नायिका होती. ‘आराधना’च्या आधीच ती  प्रस्थापित झाली होती. शक्ती सामंतांची ती लाडकी नायिका होती. तिला हिंदीत त्यांनीच आणलं आणि ‘अ‍ॅन इव्हनिंग इन् पॅरिस’मध्ये त्यांच्याखातर तिनं समजूतदारपणे बिकिनी ड्रेसची काटकसर मान्य केली. ‘आराधना’ आणि ‘अमर प्रेम’मध्ये तिला वात्सल्यसिंधू आई अन् त्यागमूर्ती बनवून सामंतांनी शर्मिलाच्या त्या समजूतदारपणाचं बक्षीस तिला दिलं. ‘अमर प्रेम’च्या वेळी ती त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘दास्तान’ आणि ‘ये गुलिस्तां हमारा’ या चित्रपटांमध्ये अनुक्रमे दिलीपकुमार व देव आनंद या महानायकांची नायिका होती. मीनाकुमारीच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सिंहासनावर वहिदा रहमान आणि नूतन यांचा दावा दूर सारून ती या पदासाठी हेमामालिनीच्या बरोबरीला आली.

‘अमर प्रेम’चा उत्तुंग संगीतकार राहुल देव बर्मन हा राजेश खन्नाइतकाच या चित्रपटाच्या यशातील महत्त्वाचा भागीदार होता. ‘अमर प्रेम’ची कथा पाहता त्याचं संगीत राहुल देव बर्मनच्या पिताजींकडे (एस. डी. बर्मन) यांच्याकडे जायचं. पण सामंतांनी पुन्हा एकदा धाडस दाखवून पित्याची जागा पुत्राला दिली आणि आर. डी. बर्मननं या संधीचं सोनं केलं. ‘अमर प्रेम’च्या बरोबरीने त्या वर्षी त्याचे ‘अपना देश’ आणि ‘मेरे जीवनसाथी’ हे चित्रपटही प्रदर्शित झाले होते. भिन्न प्रवृत्तींच्या या तीन चित्रपटांचं संगीत ही पुढे निर्माण होणाऱ्या वैभवशाली ‘आरडी पर्वा’ची नांदी होती. पाश्चात्त्य संगीताच्या प्रभावाखाली असलेला आरडी तसं संगीत काळाची, धंद्याची गरज म्हणून देत होता. पण हे भावनाप्रधान, गंभीर, भारदस्त प्रकृतीचं संगीत त्याला अपरिचित नव्हतं आणि अप्रियही नव्हतं. ते त्याच्या रक्तातच होतं हे त्यानं सलामीच्या ‘छोटे नवाब’मध्ये सिद्ध केलं होतं. ‘अमर प्रेम’च्या ‘रैना बीती जाय’च्या आधीचं ‘घर आजा घिर आये बदरा साँवरिया’ आठवतंय ना? ‘अमर प्रेम’च्या भावुक कथेला अनुरूप संगीत देऊन आपण चित्रपट संगीतातले बडे नवाबच नाही, तर सार्वभौम सम्राट होणार याची जणू घोषणाच त्याने केली. राजेशप्रमाणे तोही त्याच्या क्षेत्रातला सुपरस्टार बनला. ‘अमर प्रेम’बरोबरच ‘अपना देश’, ‘मेरे जीवनसाथी’ हेही सिल्व्हर ज्युबली हिट् चित्रपट झाले आणि दोन नव्या सुपरस्टार्सच्या जमान्याचा हिंदी चित्रपटांत उदय झाला.

अपरिचित भूतकाळाची मायावी निर्मिती करतानाच त्याग, वात्सल्य आणि माणुसकी यांचा हळवा सूर आळवणारा, दूरवरचा असूनही आपलासा वाटणारा ‘अमर प्रेम’ हिंदी चित्रपटसृष्टीला नवा वर्तमानकाळ आणि  दोन सुपरस्टार्स देऊन एक प्रसन्न, भावरम्य आठवण मागे ठेवून गेला.

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goldenframes bollywood first superstar rajesh khanna movie amar prem zws

ताज्या बातम्या