ही लेखमाला लिहिताना अतिशय मजा आली. पण त्याहून आश्चर्य वाटले ते प्रतिसादाचे! इतका भरभरून प्रतिसाद कधी अनुभवला नव्हता. आता निरोपाची वेळ आली आहे. उत्कटतेने निरोप घ्यावा, म्हणजे परत कधी भेटलो नाही तरी वाईट वाटत नाही, हे आपल्याला माहिती आहेच.
आयुष्य मजेत जावे असे वाटत असेल तर काय करायचे, याचा आढावा आपण या निरोपाच्या निमित्ताने घेऊयात. एखादी गोष्ट होण्यासाठी एखादी गोष्ट करावी लागते. आणि मग होता होता होणे आणि करणे, यांत काही भेद उरत नाही. सुरुवात अर्थात आपल्यापासून करायची. आपण स्वस्थ व्हावयाचे. त्यासाठी आपले शरीर-मन काय सांगते, ते ओळखायचे. काय केले असता आपली ऊर्जा वाया जात आहे असे कळले की त्या गोष्टी आयुष्यातून ‘डिलिट’ करायच्या. हे कळण्यासाठी श्वासाकडे लक्ष ठेवायचे. श्वास छातीकडे जाऊ लागला आणि पोट आवळले जाऊ लागले की आपण ताणाखाली येऊ लागलो आहोत, हे समजून श्वास पुन्हा पोटाकडे वळवायचा. हे सतत जागरुकतेने करत राहायचे. सुख आणि दु:ख या दोनही गोष्टी आपला श्वास बिघडवतात. हे पहिल्यांदा पाहायचे. मग श्वास पोटाकडे आणून  स्थिर व्हायचे. कारण या सतत बदलत्या गोष्टी असल्याने आजचे  दु:ख हे उद्याचे सुख असू शकते, तसेच आजचे सुख हे उद्याचे दु:ख असू शकते. शरीर-संवर्धन आणि मन-संवर्धन हे सारखेच महत्त्व देऊन करायचे. बिनडोक बॉडीबिल्डर किंवा मरतुकडा महात्मा वा ढेरपोटय़ा तत्त्वज्ञ सारखेच अर्धवट. शरीर-मनाला सतत कोणते ना कोणते आव्हान द्यायचे आणि ते पुरे करण्याचा विवेक ठेवून प्रयत्न करायचा आणि करत राहायचा. अशाने आपली आत्मिक ऊर्जा वाढती राहते. शरीर-मनात जाणाऱ्या यच्चयावत गोष्टी पारखून  घ्यायच्या. त्यात चव, आवाज, गंध, स्पर्श, प्रकाश यामार्फत येणाऱ्या सर्व गोष्टी येतात. शरीर-मनाचा द्वैत आणि अद्वैताचा खेळ निरखत राहायचे. वृद्धत्व आपले शरीर-मन आक्रसून टाकायचा सतत प्रयत्न करीत असते. त्याला कसोशीने दूर ठेवायचे. आपले प्रयत्न कमी पडता कामा नयेत.
दुसरी भिन्नलिंगी व्यक्ती आपल्या सहवासाने आपल्याला अपार आनंद देऊ शकते. आधीच सांगितल्याप्रमाणे ‘सुख-दु:ख समे दृष्टय़ा’ असे करून मग ‘सुख-दु:ख समे कृत्या’ असे वागायचे- म्हणजे या संबंधातून आनंद मिळू शकतो. आपल्या वागणुकीने आपल्या प्रिय व्यक्तीला शारीरिक, मानसिक, लैंगिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक अगर कोणत्याही प्रकारचे दु:ख होत असेल तर काहीतरी चुकीचे चालले आहे, एवढे समजणे आवश्यक असते. कुणी कुणाला सुखी करू शकत नाही. सुख होणे हेच चुकीचे आहे, असे कित्येक महात्म्यांनी मनावर िबबवले असल्याने कित्येकजण सुखालाच घाबरतात. अशांना सुखी करण्याचा प्रयत्न करू नये. वातावरणात अनेक सुंदर गाणी विविध लहरींवर हिंडत असतात. आपल्याकडे त्या लहरी पकडायचे यंत्र नसेल तर ती गोड गाणी आपल्याला कधीच ऐकू येत नाहीत. तेव्हा सुखाला सामोरे जाऊन त्याला मिठी मारता आली पाहिजे आणि ती वेळेवर सोडताही आली पाहिजे. ही ज्याच्या त्याची जबाबदारी असते. दुसऱ्याची अगर दुसरीची नाही. हा किंवा ही मला सुख देत नाही, हे विनोदी विधान आहे असे स्पष्ट समजले पाहिजे.
कुटुंबातील तरुण व्यक्तींना जास्तीत जास्त उभारी देणे अत्यावश्यक असते. त्यासाठी मूर्खपणा अगर गाढवपणा करण्याची मोकळीक असणे फार महत्त्वाचे ठरते. त्याशिवाय शहाणपण येत नाही. तरुण मुला-मुलींतील स्फुल्लिंग शोधून तो न विझवता त्याला बळ देणे, हे घरातील सर्वाचे कर्तव्य असते. घरातील वृद्धांकडे नव्या पिढीला देण्यासारखे काहीही नसेल तर नवी पिढी त्यांच्या आसपासही फिरकणार नाही. केवळ ‘मी वृद्ध आहे म्हणून माझा मान ठेवा,’ असे म्हणणे लाजीरवाणे असते. ‘आम्ही असंख्य लोढणी घेऊन वाढलो; सबब तुम्हीही तसेच वाढा,’ असे म्हणणे आताची पिढी ऐकणार नाही. भारतात केवळ वृद्ध असल्याने सन्मान करण्याची परंपरा आहे. त्याचा बरेच वृद्ध गैरफायदा घेतात असे म्हणता येईल. पण ज्ञानी असलेल्या तरुणाचा त्याहून अधिक सन्मान व्हावयास हवा आणि त्याच्या ज्ञानाचा समाजाला अधिकाधिक फायदा व्हावा म्हणून त्याला सर्व काही उपलब्ध करू द्यावयास हवे.
सामाजिक चातुर्य न दाखविल्याने आपली ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था  झाली आहे. हक्काबरोबर येणाऱ्या जबाबदारीचे भान गेल्यामुळे हक्क मिळवताना आणि मिळाल्यावर जबाबदारीने वागणे कुणालाच महत्त्वाचे वाटत नाही. समाजाचे नेतृत्व करण्याची इच्छा असलेले; पण नेतृत्व मिळाल्यावर काय करायचे, हेच माहिती नसलेले अपरिपक्व तरुण राजकारणात येत आहेत. आपल्या वडिलांचा वारसा चालविण्याची  कुवत आणि इच्छा दोन्ही असेल तर वडिलांचा कोणताही उद्योग मुलांनी जरूर करावा. पण तसे नसेल तर आपले आयुष्य  मजेत जाण्यासाठी आपली वेगळी वाट चोखाळावी. हे सर्वानाच लागू असते. जो स्वत:ला नीट सांभाळू शकतो, त्याच्याकडे समाजाची सूत्रे असावीत, असे लाओ त्सू म्हणतो ते उगाच नाही. सामाजिक संपत्तीचा नाश करताना नेते अगर अनुयायी यांतील कुणालाच आपण काही गैरकृत्य करतो आहोत असे वाटत नाही. किंबहुना, आपला दरारा उत्पन्न  करण्यासाठी असेच वागायचे असते असेच झाले आहे.
आपण ज्या पंचमहाभूतांच्या साहाय्याने राहतो त्यांचा समाजाने आदर केला पाहिजे. आपण आणि निसर्ग असे द्वैत नसून मीच निसर्ग आहे, माझ्या आत आणि बाहेर निसर्गच आहे. काही लोक आपण आणि निसर्ग असा भेद करू इच्छितात आणि निसर्गाला स्पर्शही करू देत नाहीत. आपले नाते हे आई-मुलासारखे असते. आईचे दूध तर प्यायचे, पण रक्त शोषायचे नाही, हा विवेक असला म्हणजे पुरे. या क्रियेत मग दोघांनाही अपरंपार आनंद असतो.
पृथ्वीतत्त्व म्हणजे सगळ्या जड वस्तू त्या पृथ्वीतत्त्वाला परत द्यायच्या.  प्लास्टिक अत्यंत उपयुक्त वस्तू आहे, पण त्याचा वापर केल्यावर ते गोळा करून त्याचे रस्ते बनविणे- असे उपाय आपण करायला हवे. मैला नदीत न सोडता सर्वत्र बायोगॅस प्लान्ट बसवून त्यापासून मिळणारे खत आणि गॅस वापरून नद्या स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. सौरऊर्जा कशी वापरायची, ते आपणच शोधून काढायचे. परदेशाकडे तोंडं वेंगाडायची नाहीत. रशिया (चेर्नोबिल), जपान  (फुकुशिमा), अमेरिका (लाँग आयलंड) अशा मोठय़ा मोठय़ा राष्ट्रांना अणुऊर्जेचे अपघात टाळता आलेले नाहीत. तसेच त्यातून उत्पन्न होणाऱ्या किरणोत्सारी पदार्थाची विल्हेवाट कशी लावायची, याविषयी सर्वत्र संभ्रम असताना आपण त्यावर एक समाज म्हणून भयानक खर्च करणे योग्य नव्हे. शहरातील सर्व इमारतींवर वेलांचे आच्छादन करून, सर्वत्र फळझाडे आणि फुलांचे वृक्ष लावून शहर सुगंधित आणि हिरवे करणे काही अवघड नाही. तसेच सर्व इमारतींनी पावसाचे पाणी साठविले तर पाण्याचा प्रश्न जरा कमी होईल.
आकाशतत्त्व म्हणजे मोकळी जागा. शहरातील रस्ते आणि जमतील तेवढय़ा जागा मोकळ्या ठेवल्या पाहिजेत. जमल्यास मोठमोठी तळी असतील तर ती न बुजवता राखली पाहिजेत. तळे मनाला जी उभारी देते ती अनुभवण्यासारखी असते.
हे सारे व्यक्ती म्हणून करायला सुरुवात करायची. एकटय़ाने काय होणार, असा विचार कदापिही करू नये. फ्रान्समधील एका माणसाने एक टोकदार काठी आणि झाडांच्या  मिळतील त्या बिया एवढे साहित्य वापरून हजारो एकर जंगल उभे केल्याचे आपण वाचले असेल. बिया काय आणि विचार काय, रुजले तर छान आहेच; पण काही विचार अगर बिया रुजायला वेळ लागतो. त्याचे वृक्ष व्हायला आणखीन वेळ लागतो. त्याची फळे यायला आणखीन वेळ लागतो. ती आपल्या नशिबात असतीलच असेही सांगता येत नाही. आपण आनंदाने करत राहणे हेच महत्त्वाचे. आणखीन कुणी येऊन मिळाले तर आणखीन मजा.
मंथनाचा काळ आहे. म्हणजे सगळे घुसळले जात आहे. घुसळणे ही एक क्रिया अशी आहे, की जे घुसळले जाते आहे त्या पदार्थातील वाट्टेल तो भाग वाटेल त्या भागाशी जवळ येतो. असे जलदगतीने चालत राहते आणि त्या पदार्थातील सर्व भाग एकमेकांच्या जवळ येऊन जातात. आश्चर्याची गोष्ट अशी की, इतकी जलद गती असताना जे भाग समविचारी असतात ते एकमेकाला चिकटून राहू लागतात आणि त्यांचा एक समूह होतो. दही घुसळले की त्याचे ताक होता होता लोणी एकत्र येते आणि ते वर येते. ते लोणी दह्य़ातच लपलेले असते. पण त्याला घुसळल्याशिवाय ते वर येऊ शकत नाही. आता लोणी कधी वर येणार आणि किती वर येणार, हे परिस्थिती ठरवते. म्हणजे घुसळणारे ताक जर गरम होऊ लागले तर लोणी वितळून जाईल, एकत्र होणार नाही. फार हळू घुसळले तर इतका वेळ लागेल, की कंटाळून जायला होईल. भयंकर गार केले तर पदार्थ घुसळलाच जाणार नाही. पण साधारणपणे लोणी येते. क्वचितच बिघडते.
आपण असे समजूया की, आजच्या या मंथनाच्या भयंकर वाटणाऱ्या परिस्थितीतून काही नवनीत बाहेर येणार आहे. हे लोणी आपली मुलेबाळे किंवा त्यांची मुलेबाळे खातील. आपल्या पूर्वजांनी आंब्याची झाडे लावली त्याचे आंबे आपण खातो, तसेच. आपले नशीब फार थोर असेल तर आपणही मरायच्या आत थोडेसे खाऊदेखील. आज आपण आत्मभान ठेवून सजगतेने राहायचे आहे, तर ते लोणी येणार आहे आणि आले हे कळणार आहे. साररूपाने असे म्हणता येईल की, सतत सतर्कतेने राहून आपल्या ऊर्जेचा विनाकारण ऱ्हास होत नाही ना, हे सतत पाहायचे आहे. कित्येक वेळा आपल्या डोळ्यांदेखत अशा काही गोष्टी चाललेल्या असतात की त्यामुळे सामाजिक परिस्थिती बिघडत जाणार आहे हे कळत असते. हे सुधारण्याचे शिवधनुष्य पेलण्याची आपली ताकद असेल तर जरूर प्रयत्न करावा. पण आपली तशी ताकद नसेल तर ती वाढेपर्यंत गप्प बसावे. पण चौकसपणे चाललेल्या सर्व गोष्टी मनात टिपून ठेवाव्यात. जेव्हा आपली वैयक्तिक ऊर्जा पुरेशी वाढेल तेव्हा आपल्याला आपणहून कुणी विचारेल अशावेळी ‘आत्ता कसे आलात माझ्याकडे?,’ असा क्षुद्र विचार न करता आपल्यापरीने कामाला सुरुवात करावी. आंब्याची झाडे लावावीत.  आपल्याला त्याचे आंबे कधी मिळणार, असा विचार करू नये.
(पूर्वार्ध)