नाटककार गो. ब. देवल स्मृतीशताब्दी वर्ष आज, १४ जून रोजी सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विस्मृतीत गेलेल्या ‘दुर्गा’ या नाटकाचा कमलाकर नाडकर्णी यांनी करून दिलेला परिचय..

गोष्ट आहे १९५५ सालची. मी उणापुरा एकवीस वर्षांचा. चर्नी रोडच्या साहित्य संघाच्या त्या खुल्या रंगमंचावरचं ते नाटक बघता बघता मी त्या नाटकातच कुठेतरी हरवून गेलो होतो. त्या नाटकाचा माझ्यावर विलक्षण पगडा बसला होता. नायिकेच्या भूमिकेतल्या त्या नटीचा अभिनय कुठेतरी माझ्या मनी खोल रुतून बसला होता. जयवंत दळवींचं ‘दुर्गा’ नाटक रंगमंचावर आलं त्यावेळी माझी ती जुनी आठवण पुन्हा उजळून निघाली. याच नावाचं साधम्र्य असलेलं नाटक पूर्वी कधी येऊन गेलं होतं काय, याची मी माझ्या मित्रमंडळींत आणि त्यावेळच्या ओळखीच्या नाटय़समीक्षकांमध्ये चौकशी केली; परंतु त्यांनाही कसला थांग नव्हता. त्यानंतर काही र्वष उलटली. माझं रूपांतर ‘समीक्षका’त झालं. मी माझ्या ‘नाटकं ठेवणीतली’ या पुस्तकासाठी लेखनसामुग्री मिळवत असताना नाटय़-इतिहासकार श्री. ना. बनहट्टी यांचं ‘नाटय़ाचार्य देवल’ हे पुस्तक हाती लागलं. या पुस्तकात मी पाहिलेली आणि हरवलेली ‘दुर्गा’ मला सापडली. नाटय़ाचार्य देवलांच्या ‘शारदा’, ‘संशयकल्लोळ’ या नाटकांबद्दल बऱ्याचदा लिहिलं गेलं आहे. पण ‘दुर्गा’ला मात्र विस्मृतीच्या कोपऱ्यात टाकलं गेलं. नाटकात दुर्गेला एकाकी जिणं जगावं लागतं. नाटकाचीही तशीच परिस्थिती झाली.
साठ वर्षांपूर्वी माझ्यावर प्रभाव पाडणाऱ्या ‘दुर्गा’चा परिचय रसिकांना करून देण्याची संधी मी शोधत होतो. यंदा देवल स्मृतीशताब्दीच्या या संधीचा मी पुरेपूर लाभ घेत आहे.
कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे विद्यार्थी दरवर्षी हौसेने एका मराठी नाटकाचा प्रयोग करीत असत. नवे उत्कृष्ट नाटक बसवायला मिळावं म्हणून प्रो. कॅण्डी यांनी जाहिरात देऊन नवी नाटकं मागवली. सर्वोत्तम ठरणाऱ्या नाटकास रुपये १५० चे बक्षीस जाहीर केले. या स्पर्धेसाठी ३५ नाटकं आली. मिरजेचे वासुदेवशास्त्री खरे यांचे ‘गुणोत्कर्ष’ हे नाटक पहिलं येऊन त्याला बक्षीस मिळालं. गो. ब. देवलांनी आपलं ‘दुर्गा’ नाटक या स्पर्धेसाठी पाठवलं होतं. हे नाटकही परीक्षकांना खूप आवडल्यामुळे कॅण्डीसाहेबांनी ‘दुर्गा’ नाटकाला रुपये ७५ चं खास बक्षीस दिलं.
‘दुर्गा’ नाटक १८८६ साली फेब्रुवारीमध्ये छापून प्रसिद्ध झालं व त्याचवेळी नरहरबुवा सरडे यांच्या चित्तचक्षुचमत्कारिक कोल्हापूरकर नाटक मंडळीने ते रंगमंचावर आणलं. या प्रयोगाचं दिग्दर्शनही स्वत: देवलांनी केलं होतं. या नाटकाने त्यावेळी खूप लोकप्रियता मिळवली. देवलांना या नाटकाने खूप द्रव्यप्राप्तीही झाली. नाटय़व्यवसायात त्यांचं पाऊल स्थिर होण्यास त्यांचं हे पहिलं छापील नाटक कारणीभूत झालं.
नाटकं लिहिणं, ती दिग्दर्शित करणं, नटांना अभिनय प्रशिक्षण देणं याखेरीज आयुष्यात त्यांनी दुसरं काहीच केलं नाही. कार्यकाळातील पहिली दोन दशकं  ते नाटय़व्यवसायात आकंठ बुडाले होते, तर पुढलं एक दशक त्यांनी मिळवलेल्या कीर्तीच्या व धनाच्या बळावर आपलं आयुष्य व्यतीत केलं.
चित्तचक्षुचमत्कारिक कोल्हापूरकर मंडळीतील विनायक कवठेकर हे त्यात दुर्गेचं काम करीत असत. त्यांचं काम अप्रतिम होत असे. एखादं नाटक दिग्दर्शकाचं आहे असं आपण म्हणतो. ‘दुर्गा’ नाटकाच्या बाबतीत ते लेखक देवलांपेक्षा दिग्दर्शक देवलांचं अधिक होतं असं म्हटलं गेलं. या नाटकाच्या वाचनापेक्षा त्याच्या प्रयोगाची अनुभूती वेगळी आणि अधिक रंगतदार होती, असं त्यावेळच्या जाणकारांनी लिहून ठेवलं आहे.
अण्णासाहेब किलरेस्करांच्या ‘शाकुंतल’ची पदं तर देवलांनी लिहिलीच; पण किलरेस्करांनी आपल्या नाटक कंपनीतील नटांना अभिनयशिक्षण देण्यासाठीही त्यांना पाचारण केलं. दिग्दर्शनाची व अभिनयाची ही कला देवलांनी कुठून आत्मसात केली, हे त्यांच्या चरित्रातील एक गूढ आहे. रूपांतरणासाठी त्यांना मूळ नाटकं कुठून मिळाली, हेही एक गूढच आहे. यासंदर्भात ग्रंथकार श्री. ना. बनहट्टी आपल्या पुस्तकात लिहितात- ‘पुण्यातील गोऱ्या लोकांच्या ज्या हौशी नाटय़संस्थांमध्ये अभिनयविद्येचा अभ्यास करण्यासाठी देवल जात असतील तिथे त्यांना ‘दुर्गा’ नाटकाचं मूळ गॅरिकचे ‘इझाबेला’ आणि फाल्गुनरावाचे मूळ मर्फीचे ‘ऑल इन् द राँग’ यांच्या प्रती वाचायला मिळाल्या असतील. कदाचित या दोन्ही नाटकांचा वा एकाचा प्रयोग त्यांनी पाहिलाही असेल असं वाटण्यास थोडंसं कारण हे आहे की, गॅरिकचे ‘इझाबेला ऑर द फेटल मॅरेज’ हे मूळ टॉमस सदर्नच्या नाटकाची प्रयोगाकरता तयार केलेली रंगावृत्ती आहे. त्यात सदर्नच्या मूळ नाटकाचा कुठेही उल्लेख नाही. देवलांनी आपली ‘दुर्गा’ गॅरिकच्या  रंगावृत्तीवरूनच तयार केली. रंगावृत्ती प्रयोगाकरताच असायची. तेव्हा प्रथम गॅरिकच्या ‘इझाबेला’चा प्रयोग देवलांनी पाहिला असावा. तो आवडल्यामुळे त्याच्या आधारे नाटक रचावं असं त्यांच्या मनात येऊन ‘इझाबेला’चं छापील पुस्तक आणून त्यांनी ‘दुर्गे’मध्ये त्याचं रूपांतर केलं असावं. ‘दुर्गा’ रंगभूमीवर लोकप्रिय झालं असं पाहून त्यांची उमेद वाढली. नंतर केव्हातरी ‘ऑल इन द राँग’ हे दुसरं आवडलेलं नाटक क्लबातून आणून त्याचंही रूपांतर त्यांनी करून ठेवलं असावं.
इंग्रजी नाटकाच्या मराठीकरणासाठी रूपांतरकर्त्यांने त्यात काही जुजबी बदल केले असले तरी मूळ कथानकाला विशेष कुठे धक्का लावलेला नाही. त्यांनी कथानक आपल्याच मातीत घडवण्यासाठी केलेले बदल पूर्णत: यशस्वी झाले आहेत. ‘दुर्गा’च्या पहिल्या छापील पुस्तकावर पहिल्याच पानावर ‘इंग्रजी नाटकाच्या आधारे रचलेलं’ असा स्पष्ट उल्लेख आहे.
‘दुर्गा’चा कथासारांश : जिवाजीराव कुंभे म्हणजेच बाबाजीराव हे एक सधन गृहस्थ. चंद्राजीराव हा त्यांचा थोरला मुलगा. तो जिवाजीरावांना अगदी जीव की प्राण! पण त्याच चंद्राजीरावाने पिताजींना काहीही न कळवता खेडय़ात जाऊन दुर्गाशी लग्न केलं. या घटनेमुळे जिवाजीराव कमालीचे भडकले. त्यांचा संताप अनावर झाला. ‘या मुलाचं मी तोंडदेखील पाहणार नाही,’ अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली. सरकारचे कान फुंकून त्यांनी चंद्राजीरावाला लढाईवर पाठवला.
तुळाजीराव दुर्गुणी. जिवाजीरावांचा नावडता धाकटा मुलगा. पण आता त्यांना तो लाडका झाला. त्याला बरंच झालं. प्राप्त संधीचा फायदा घेऊन तो आपल्या बापाचं मन दुर्गाबद्दल कलुषित करीत राहिला. आपल्यातल्या खलत्वाला फुलवत राहिला.
तिकडे चंद्राजीराव लढाईत जबर जखमी होतो. शत्रूच्या हाती सापडतो. कैदखान्यात पडतो. आपल्या पिताजींना व बंधुरायाला तो पत्रं पाठवीत राहतो. पण त्या पत्रांचा सुगावा तुळाजीरावाखेरीज कुणालाच लागत नाही. नतद्रष्ट तुळाजी ती पत्रं गडप करतो. ‘चंद्राजीराव लढाईत मेला!’ अशी अफवा पसरवतो. ‘जिवाजीराव तुझ्यावर रागावले आहेत. तू तिकडेच मरावेस अशीच त्यांची इच्छा आहे,’ अशा अर्थाची पत्रं तो चंद्राजीरावाला पाठवतो.
दुर्गा बिचारी विधवेचं जिणं जगत असते. तिला चंद्राजीरावपासून झालेला एक मुलगाही असतो. मुलाला घेऊन ती सासऱ्याकडे जाते. मदतीची याचना करते. पण जिवाजीराव किंचितही द्रवत नाहीत. एकाकी, विपन्नावस्थेत जगणं तिच्या नशिबी येतं.
दुर्गावर एकनिष्ठपणे प्रेम करणारा आनंदराव हा एक सधन तरुण असतो. विधवा दुर्गेची एकाकी अवस्था पाहून त्याचं पूर्वीचं विशुद्ध प्रेम जागं होतं. संकटकाळी तो तिला सर्वतोपरी मदत करतो. तिचं कर्जही फेडतो. तिला लग्नासाठी मागणी घालतो. आनंदरावच्या सभ्य वर्तनाची खात्री पटूनही आपल्या पतीशीच एकनिष्ठ असलेली दुर्गा आनंदरावची मागणी नाकारत राहते.
सात र्वष उलटतात. तुळाजीराव आनंदरावला दुर्गेकडे पुन्हा लग्नाची मागणी घालायला उत्तेजन देतो. पण दुर्गेचा नकार ठाम असतो. आनंदरावचं येणं-जाणं चालूच असतं. एकदा दुर्गाचा मुलगा माडीवरून तोल जाऊन खाली पडताना आनंदराव त्याला वाचवतो. पोटच्या पोराला मरता मरता वाचवल्याबद्दल दुर्गा आनंदरावची कायमची ऋणी होते. तिला त्याची लग्नाची मागणी नाइलाजाने मान्य करावीच लागते. दुर्गाचं दुसरं लग्न होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आनंदरावचा भाऊ प्रवासात एकाएकी आजारी पडल्यामुळे त्याला ताबडतोब निघून जावं लागतं. तुळाजीरावाला दुर्गाची काळजी घ्यायला सांगून आनंदराव निघून जातो.
सात वर्षांनी शत्रूच्या कैदेतून सुटून चंद्राजीराव घरी येतो. मेलेला आपला नवरा परत आल्याचं पाहून दुर्गाला धक्काच बसतो. ती मूच्र्छित होऊन पडते. आनंदरावाशी लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पहिला नवरा चंद्राजीराव घरी येतो. या विलक्षण योगायोगाने दुर्गा चक्रावूनच जाते.
ती शुद्धीवर येते तेव्हा चंद्राजीरावाची झोपण्याची सर्व तयारी करते आणि एकटीच बाहेर येऊन रडत बसते. बराच वेळ दुर्गा येत नाही असं पाहून चंद्राजीराव बाहेर येतो तेव्हा दुर्गा भ्रमिष्टासारखी बडबडत असल्याचं त्याला दिसतं. त्या अवस्थेत ती आनंदरावच्या छातीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करते. तो स्वत:ला कसाबसा वाचवतो.
तत्पूर्वी चंद्राजीराव घरी परतत असताना तुळाजी त्याच्यावर मारेकरी घालतो. पण आनंदराव त्याला वाचवतो.. केवळ सहृदयतेनं. चंद्राजीरावाला त्याने ओळखलेलं नसतं. आपल्या दुर्गाचं आनंदरावाशी लग्न झाल्याचं कळताच चंद्राजीरावाला जबरदस्त धक्का बसतो. खंजीर खुपसून तो आत्महत्या करतो.
आनंदरावाशी लग्न केलं हे आपल्या हातून फार मोठं पाप घडलं, या जाणिवेने दुर्गाची भ्रमिष्टावस्था शिगेला पोहोचते. पतीच्या आत्महत्येने ती अधिकच विदीर्ण होते. मृत चंद्राजीरावाचं कलेवरही तिच्या नजरेला पडत नाही. तिचा तो नाटकाच्या अखेरीचा विलाप पाहा.. (या स्वगतापूर्वी तुळाजीरावाचे सगळे कारस्थान उघडकीस येऊन त्याला तुरुंगात पाठवले जाते.. नाटकाची अखेर.)
दुर्गा- (चंद्ररावाचे प्रेत नाहीसे पाहून) अरे प्रारब्धा! तुम्ही कुठे नेलेत त्यांना! आता इतक्यात इथे होते. मी प्रत्यक्ष पाहिले होते. (रडू लागते.) कुठे हो तुम्हाला नेऊन माझ्या दृष्टिआड दडवून ठेवले! (लोकांस-) दाखवा हो! मला त्यांना काही विचारायचे आहे. एकदा तरी डोळे भरून पाहते हो! नाही ना भेटवीत! बरे तर (मुलाला उचलून घेऊन) हा माझा लाल गं बाई. आता कसे होणार? (चुंबन घेऊन) या माझ्या सोन्यावर दयेचे पांघरूण कोण घालणार आता? जगातला तर न्याय मेला. बुडालाच सगळा. पण देवा, तुझ्या घरीसुद्धा कसा नाहीसा झाला रे! (चंद्राजीरावास उद्देशून) त्यांनी कशी खाशी वेळ साधली! जातो म्हणून नुसते कळवलेदेखील नाही. पण त्यांचा माझ्यावर खरा जीव बरे! कुणाला नकळत लौकर ये म्हणून मला मूल धाडले. बाळ्या! तुझे नशीब तुझ्याबरोबर. (मुलाचे चुंबन घेऊन) मी आता येते हं! (असे म्हणून लपवून आणलेला खंजीर चटकन् उरात भोसकते व पडते. मंडळी धावतात. पण व्यर्थ!) आता मी तुमच्या देवालासुद्धा भीत नाही बरे! मांगानो! कसायानो! रडा आता मागे आमच्या नावाने. अंबाबाई, मला लवकर.. (मरते.)
जिवाजीराव (गोंधळून)- तोच खंजीर खुपसा रे माझ्या उरात. नाहीतर मला जिवंत तरी जाळून टाका! (मुच्र्छा येऊन पडतो व त्याचवेळी पडदाही पडतो.)
देवलांच्या भाषेचा साधेपणा या स्वगतावरून सहज लक्षात यावा. दुर्गाचा आनंदरावाशी होणारा पुनर्विवाह ही नाटकातल्या केंद्रस्थानी असलेली गोष्ट आहे. ‘दुर्गा’ नाटक १८८६ साली रंगमंचावर आलं. त्यावेळी उच्चभ्रू वर्गात पुनर्विवाहाला मान्यता नव्हती. म्हणून देवलांनी या नाटकातील प्रमुख पात्रंच काय; पण सर्व कथानकच लेकवळ्याच्या समाजात आणून ठेवलं. तुळाजीरावापासून सर्वच व्यक्तिरेखा संधी मिळताच आपण लेकवळय़ाच्या समाजातील आहोत, हे अगदी सहजपणे प्रकट करतात. मूळ नाटकातील इझाबेला (दुर्गा) ही मठवासिनी जोगीण आहे. बायरनशी (चंद्राजीराव) लग्न करून ती व्रतभंग व ईशद्रोह करते. त्यामुळे इझाबेलाच्या शोकांतिकेला सबळ कारण मिळतं. दुर्गा ‘वाईट पायगुणांची किंवा पांढऱ्या पायाची’ असा तिचा सासरा आणि दीराकडून वारंवार उल्लेख होत असला तरी तिच्या शोकांतिकेला ते पुरेसं नाही.
मूळ नाटकात व्हिलेरिय (आनंदराव) इझाबेलचे (दुर्गा) सर्व कर्ज फेडतो म्हणून इझाबेला व्हिलेरियशी दुसरं लग्न करायला तयार होते. देवलांची दुर्गा आनंदरावाने कर्जफेड केल्यानंतरही लग्नाला संमती देत नाही. त्यानंतरच्या भेटीच्या वेळी दुर्गेचा मुलगा माडीवरून पडतो. त्याला आनंदराव खालून झेलतो. मुलाचे प्राण वाचवल्यामुळे झालेल्या उत्कट आनंदाच्या भरात दुर्गा आनंदरावाची लग्नाची मागणी पुरी करते.
‘दुर्गा’तला खलनायक तुळाजीराव अगदी प्रारंभापासून प्रेक्षकांना विश्वासात घेऊन आपलं कटकारस्थान उघड करून सांगत असतो. देवलांनी वापरलेलं प्रेक्षकांना विश्वासात घेण्याचं हे लेखनतंत्र आजही बऱ्याच प्रमाणात सामाजिक नाटकांतून अवलंबिलं जातं. सामाजिक विषयावरचं नाटक अनाठायी रहस्यनाटक होण्याचा धोका त्यामुळे टळतो. नाटककाराचे लेखनतंत्रावरील प्रभुत्व या छोटय़ाशा कृतीनेही सिद्ध होते.
दुर्गाची भ्रमिष्टावस्था, ती हातात खंजीर घेऊन येते तो प्रसंग, चंद्राजीरावाची व तिची भेट व त्यावेळची चंद्राजीरावाची मन:स्थिती आणि दुर्गाचा शेवट हे या नाटकातील हृदयभेदक नि तितकेच कारुण्यपूर्ण प्रसंग आहेत.
हे संपूर्ण नाटकच मुळी उदात्त प्रेमाचं, पतीवरील एकनिष्ठेचं व निरागस प्रेमाचं अजोड असं मिश्रण आहे. देवल या नाटकाच्या जबरदस्त प्रेमात पडण्याचं हेच एक महत्त्वाचं कारण आहे. साधे, अनलंकृत संवाद हे या नाटकातील संवादांचं खास देवलीय वैशिष्टय़ म्हणता येईल. नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर किंवा कृ. प्र. खाडिलकर यांना ‘कृत्रिमतेच्या युगाचे प्रवर्तक’ म्हटलं गेलं आहे, तर श्री. ना. बनहट्टी देवलांना ‘स्वाभाविक शैली-वृत्तीचे नाटककार’ म्हणतात.
‘दुर्गा’ नाटकात आजच्या भाषेत सनसनीखेज प्रसंग आहेत. त्यातले बरेचसे केवळ कथनातूनच आले आहेत. आणि मुख्य म्हणजे त्या बहुतेक प्रसंगांचा आधार केवळ योगायोग हाच आहे. आणि तरीदेखील या नाटकातल्या त्रुटी वाचकाला अजिबात जाणवत नाहीत. याचं कारण देवलांची साधी-सोपी भाषा. एकही सुभाषितवजा वाक्य नसल्यामुळे नाटकातील अतार्किकता वा हिशेबीपणा लक्षात यायला रसिकाला अवसरच मिळत नाही. ते उत्कंठा वाढवत पुढं पुढं जात राहतं. ‘हे नाटक वाचनापेक्षा प्रयोगातच अधिक रंगतं,’ असं जे त्यावेळच्या प्रेक्षकांचं मत नमूद केलं गेलं आहे, त्यातून या नाटकाचं प्रयोगमूल्य नाटकाचे दिग्दर्शक देवल यांनी पुरेपूर जाणलं होतं, हेच कळून चुकतं.
‘दुर्गा’ हे त्या काळातलं एक हृदयद्रावक नाटक. सरळ, सुबोध कथानक, धक्कादायक पेचप्रसंग, आदर्श मूल्यांची जपणूक, उदात्त, निरागस, निरपेक्ष प्रेमभावनेचं दर्शन, वात्सल्याचा शिडकावा आणि कारुण्याचं अस्तित्व या गुणांमुळे हे नाटक तुफान लोकप्रिय झालं तर नवल नाही. साहित्य संघाने १९५५ साली देवल स्मृतिदिनाच्या निमित्ताने नटवर्य गणपतराव बोडसांच्या मार्गदर्शनाखाली या नाटकाचा प्रयोग केला होता. त्यात आजच्या ख्यातनाम दिग्दर्शिका विजया मेहता (जयवंत) यांनी ‘दुर्गा’ची भूमिका केली होती. माझ्या आठवणींच्या कोपऱ्यात तो प्रयोग संदर्भाविना बराच काळ रुतून बसला होता. त्याचं कारण त्यातल्या दुर्गेचा अभिनय हेच असावं. नाटक वाचल्यानंतर व त्यातील दुर्गाच्या व्यक्तिरेखेचे विविध रंग लक्षात आल्यानंतर तर त्याबाबत माझी खात्रीच पटली.
विष्णुदास भाव्यांचं नाटक दबा धरून बसलेलं असताना, किलरेस्करांची रंगभूमी संगीतात आकंठ बुडालेली असताना मधे जी गद्य नाटकांची पोकळी निर्माण झाली होती ती या ‘दुर्गा’ने भरून काढली. मला वाटतं, प्रभावी कौटुंबिक नाटकाचा हाच प्रारंभ असावा. गद्य नाटकांच्या वाटचालीत महत्त्वाचा वाटा असलेल्या ‘दुर्गा’ला आणि तिच्या जनकाला मन:पूर्वक प्रणाम. गोविंदाग्रजांच्या शब्दांतच त्यांना आदरांजली वाहायला हवी.. ‘वंदन नाटय़मिलिंदा गोविंदा तव पदारविंदाना.’
kamalakarn74@gmail.com

vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी