– उदय कुलकर्णी
‘इस बाजा में दिल बजता है दिल, बाजा नही बजता!’ असं मरहूम फैयाजखाँ गोविंदराव टेंबे यांच्या हार्मोनियम वादनाविषयी म्हणत असत. गोविंदराव टेंबे म्हणजे गोविंदराव सदाशिव टेंबे. हे टेंबे घराणं कोल्हापूरपासून आठ मैलांवर असलेल्या दिंडोर्ली गावचे. गोविंदरावांचा जन्म ५ जून १८८१ रोजी सांगवडे या गावात झाला. त्यांचे वडील कोल्हापुरात नारायणराव रानडे या वकिलांच्या हाताखाली कायदा शिकले आणि वकिली करू लागले. गोविंदरावांनाही पुढे वकिलीची सनद मिळाली, पण गोविंदरावांचं मन वकिलीत रमणं शक्यच नव्हतं. त्यांच्या मनावर मोहिनी होती ती संगीत आणि हार्मोनियमची.
समीक्षक अरविंद मंगरूळकर यांनी १९५६ साली ‘गोविंदराव टेंबे स्मारक समिती’कडून प्रकाशित ‘जीवन व्यासंग’ या गोविंदराव टेंबे यांच्या लेख व भाषणाच्या संग्रहाला ‘कस्तुरीची पेटी’ या शीर्षकानं प्रस्तावना लिहिली होती. गोविंदरावांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत असताना प्रकाशित झालेल्या या पुस्तकात मंगरूळकर यांनी गोविंदरावांविषयी लिहिलं होतं, ‘‘गोविंदरावांनी पेटीला (हार्मोनियमला) मैफिलीत स्वतंत्र नवजीवन दिलं. तीत प्राणांची फुंकर घातली. गोविंदरावांपेक्षा अधिक तयारीनं, अधिक ईर्षेनं, अधिक जोशानं, अधिक लयकारीनं हार्मोनियम वाजविणारे वादनकार पुष्कळ असतील, पण गोविंदरावांच्या पेटीवादनातील खुशबू काही न्यारीच!’’
एकल हार्मोनियमवादनाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय गोविंदराव टेंबे यांनाच जातं. एके काळी हार्मोनियमसारख्या वाद्याला आकाशवाणीवर बंदी घालण्यात आली होती. साप्ताहिक ‘मौज’मध्ये वि. कृ. जोगळेकर यांनी ‘हार्मोनियमचे भूत’ नावानं लेख लिहिला होता. या दोन्हीसंदर्भात गोविंदरावांची ठाम मतं होती. गोविंदरावांनी १९४० साली साप्ताहिक ‘मौज’मध्येच जोगळेकर यांच्या लेखाला ‘हार्मोनियम’ या नावानं लेख लिहून सणसणीत उत्तर दिलं होतं. हे उत्तर वाचायचं असेल तर गोविंदराव टेंबे यांचा लेख आणि भाषणांचा ‘जीवन व्यासंग’ हा संग्रह वाचायला हवा. या संग्रहात गोविंदरावांनी लिहिलेली भाऊराव कोल्हटकर, गुरुवर्य भास्करबुवा बखले, गायिका गोहरजान, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, सुरेश बाबू माने, नटश्रेष्ठ दत्तोपंत हल्याळकर यांची व्यक्तिचित्रं तसेच महाराष्ट्रीय संगीताची सद्या:स्थिती, संगीताचं मराठीकरण, संगीतातील नवमतवाद, मराठी रंगभूमीवरील संगीताचं धर्मांतर आदी संगीत विषयासंबंधीचे लेख समाविष्ट आहेत. याखेरीज पुणे येथे ‘भारत नाट्य संमेलना’चे अध्यक्ष या नात्यानं केलेलं संग्राह्य भाषण आणि बडोदे येथील मराठी वाङ्मय परिषदेच्या अध्यक्षपदावरून साहित्य आणि संस्कृतीविषयक विविधांगी विचार मांडणारं भाषण हेही ‘जीवन व्यासंग’ या ग्रंथात आहे. यातून गोविंदरावांची लेखणीवर किती पकड होती आणि वैचारिकदृष्ट्या त्यांची खोली किती होती याचा प्रत्यय येऊ शकतो.
नाटकातील पहिलं ख्याली गायन, पहिल्या मराठी बोलपटाचे नायक, पेटीचे पहिले एकलवादनकार, संगीताचे पहिले सौंदर्यमीमांसक, स्वरनाट्याचे पहिले प्रवर्तक अशा अनेक बाबतीत गोविंदराव ‘पहिले’ होते. गोविंदरावांनी १९३९ साली ‘माझा संगीत व्यासंग’ या नावानं एक पुस्तक लिहिलं होतं, तर १९४८ साली ‘माझा जीवन विहार’ या नावानं त्यांनी आत्मकथा लिहिली. ‘माझा संगीत व्यासंग’च्या पहिल्या आवृत्तीला शं. वा. किर्लोस्कर यांनी प्रस्तावना लिहिली होती. या पुस्तकात गोविंदरावांनी संगीतकला कशी आत्मसात केली आणि त्यात प्रावीण्य कसं मिळवलं याची आज सुरस वाटेल अशी कथा तपशिलात वाचायला मिळते. गोविंदरावांची अल्लादियाखाँसाहेबांवर अपार श्रद्धा होती. इसवी सन १८९५ ते १९२० या पंचवीस वर्षांत गोविंदरावांनी अल्लादियाखाँसाहेबांना ऐकून त्यांची गायकी आपल्या हार्मोनियमवादनात सामील केली होती. मोगुबाई कुर्डीकरांना अल्लादियाखाँसाहेब तालीम देत तेव्हा गोविंदराव मोगुबाईंच्या शेजारी राहत होते. ही बाब लक्षात आली तेव्हा अल्लादियाखाँसाहेबांनी मोगुबाईंना आपली राहण्याची आणि तालमीची जागा बदलायला लावली होती. मोगुबाईंना शिकवताना गोविंदराव चीजा ऐकतील आणि निव्वळ ऐकून त्या आत्मसात करतील असं अल्लादियाखाँसाहेबांना वाटत होतं.
‘देवल सर्कस’चे व्यवस्थापक म्हणून देशात आणि परदेशातही त्यांनी भ्रमंती केली. यापुढचा गोविंदरावांचा प्रवास म्हणजे त्यांचा मराठी रंगभूमीशी जमलेला घरोबा. १९१० साली कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांनी ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’साठी ‘संगीत मानापमान’ हे नाटक लिहिलं. पदांकरिता नव्या चालींचा प्रश्न आला. यादरम्यान मुंबईमध्ये मौजुद्दिन, गोहरजान, मलकाजान वगैरे गायकांच्या अनेक रंगतदार छोटेखानी चीजा गोविंदरावांनी ऐकल्या होत्या. गोविंदरावांकडून बालगंधर्वांनीही त्या चीजा ऐकलेल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर बालगंधर्वांनी पदांची जबाबदारी गोविंदरावांवर सोपवावी असं सुचवलं आणि ते मान्य झालं. गोविंदरावांनी यानंतर अनेक नाटकांसाठी पदांना चाली दिल्या. यातूनच थेट लोकमान्य टिळकांशी गोविंदरावांचा संपर्क आला. राजर्षी शाहू महाराज यांच्याशी गोविंदरावांचा संपर्क होता. नाटकांच्या सादरीकरणाच्या अनुषंगानं त्या संदर्भातही काही किस्से घडले. हे सगळं ‘माझा जीवन विहार’मध्ये गोविंदरावांच्या शब्दांतच वाचायला हवं. ‘अयोध्येचा राजा’ या मराठीतील पहिल्या बोलपटासाठी नायिका म्हणून दुर्गा खोटे यांची निवड करताना व्ही. शांताराम आणि गोविंदरावांनी केलेले प्रयत्न, पुण्यातील गोळे आडनावाच्या एका नटाची ‘अयोध्येचा राजा’ बोलपटाचा नायक म्हणून केलेली निवड, गोविंदरावांना चित्रपटात भूमिका करण्याबाबत अनिच्छा असतानाही वयाच्या पन्नासाव्या वर्षी गोळेऐवजी त्यांनाच ‘अयोध्येचा राजा’चा नायक म्हणून उभं राहावं लागणं, बोलपटाचं पहिलं दृश्य कुरुंदवाडच्या घाटावर चित्रित होणं या सर्वाचा तपशील, तसेच एकूणच चित्रपटसृष्टीत गोविंदरावांनी केलेली कामगिरी या गोष्टीदेखील ‘माझा जीवन विहार’ या पुस्तकाचा भाग आहेत.
गोविंदरावांनी लिहिलेलं आणखी एक पुस्तक म्हणजे ‘रंगाचार्य’. नारायणराव बोडस यांनी मराठी नाट्यकलेच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी आपल्या आत्मचरित्रवजा पुस्तकात गैरसमज पसरवणारं लेखन केलं होतं. यापैकी काही भाग गोविंदरावांविषयीदेखील होता. गोविंदराव बोडस यांच्या या पुस्तकानं अस्वस्थ झाले होते आणि त्यांनी बोडस यांचा दृष्टिकोन नाट्यइतिहासाला बाधक होऊ नये आणि गैरदृष्टिकोनाचा फैलाव वेळीच रोखावा म्हणून ‘रंगाचार्य’ हे पुस्तक १९४० साली लिहिलं, पण गोविंदरावांच्या हयातीत ते प्रसिद्ध होऊ शकलं नव्हतं. १९५६ साली प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक म्हणजेदेखील एक वेगळा ऐवज आहे.
● udaykd@gmail.com
