डॉ. राधिका विंझे
आज शाळेत सहलीची सूचना आल्याने ईशा आनंदात घरी आली. आजोबांना म्हणाली, ‘‘आमची सहल अभयारण्यात जाणार आहे. तिथे विविध प्राणी, पक्षी, वनस्पती आहेत, तलावात बोटिंगसुद्धा आहे. वनभोजन आहे. किती मज्जा येईल ना!’’
आजोबा म्हणाले, ‘‘आपला निसर्ग किती वैविध्यपूर्ण आहे बघ. झाडांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या केवढ्या जाती-प्रजाती, रंग रूप आकारमान यानुसार विविध रचना. तसंच आपली पृथ्वी, इतर ग्रह, तारे यांनी बनलेलं आपलं विश्वसुद्धा खूप मोठं आहे.’’
‘‘बाई म्हणतात की निसर्ग समजून घ्यायचा. म्हणजे काय हो आजोबा?’’ ईशाने प्रश्न विचारला.
आजोबा म्हणाले, ‘‘म्हणजे निसर्गाचे नियम समजून घ्यायचे. शाळेत पाठ्यपुस्तकात तू जे शिकतेस ते आपल्या आजूबाजूला घडत असतं. हे सर्व काही समजून घेणं म्हणजेच विज्ञान. निसर्गात घडणाऱ्या घटनांचा नीट अभ्यास करता यावा म्हणून माणसाने प्रयोगशाळा उभारल्या. विविध प्रयोगांतून आपल्याला निसर्गाची काही तत्त्व समजली, नियम समजले. अजूनही या नियमांचा शोध चालू आहे. आपण फक्त डोळे उघडे ठेवून सजगतेने बघायचं.’’
ईशा आजोबांना म्हणाली, ‘‘याचा अर्थ निसर्ग म्हणजे प्रयोगशाळाच नाही का! सहलीला आम्ही एका मोठ्या प्रयोगशाळेत जाणार तर!’’