टपालकी : जिम-नास्तिक

आज सगळीकडे चंगळवाद बोकाळला असताना काही काही बाबतीत मात्र आपण खूपच मोजूनमापून वागायला लागलो आहोत.

(संग्रहित छायाचित्र)

सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यांस,

सदू धांदरफळेचा नमस्कार.

आज सगळीकडे चंगळवाद बोकाळला असताना काही काही बाबतीत मात्र आपण खूपच मोजूनमापून वागायला लागलो आहोत. लोक आपल्या हाताला हेल्थ-बँड बांधतात आणि दिवसभरात आपण खाल्ले किती, चाललो किती, झोपलो किती, त्यातली साधी झोप किती आणि गाढ झोप किती या सगळ्याचाच हिशेब ठेवतात. खरं म्हणजे ज्यांना गाढ झोप लागते त्यांना आपण किती वेळ झोपलो याचा हिशेब ठेवण्याची काही गरज नाही. आणि ज्यांना काही कारणांनी शांत झोप लागतच नाही त्यांनी हातावर फिटबीट बांधून आपल्या चिंधीभर झोपेचा हिशेब ठेवणे म्हणजे दोड्डा गणेशने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीवर पुस्तक लिहिण्यासारखे. किंवा गोविंदाने आपल्या शूटिंगच्या डेट्स सांभाळण्यासाठी मॅनेजर नेमण्यासारखे किंवा ‘मनसे’च्या आमदारांची सभा षण्मुखानंद हॉलमध्ये लावण्यासारखे आहे. (खरं म्हणजे क्रिकेट, सिनेमा आणि राजकारण ही क्षेत्रे वगळून अर्थव्यवस्था, शेअर मार्केट किंवा आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रांतील उपमाही मला देता आल्या असत्या, पण तेवढय़ावरून लोकांनी माझ्या मराठीपणावर संशय घेतला असता, आणि भविष्यातले माझे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद धोक्यात आले असते. असो.)

यार दादू, आधीच या देशात इतक्या जातीजमाती होत्या, त्यात आता अशा खाणे, पिणे, झोपणे, चालणे, आराम, व्यायाम, द्वेष, प्रेम असं सारं काही मोजूनमापून करणाऱ्या हेल्थ कॉन्शस जमातीची भर पडली आहे. माझं असं निरीक्षण आहे की, सॅलरी कॉन्शस असलेला कनिष्ठ मध्यमवर्गीय माणूस जसजसा उच्च मध्यमवर्गीय होऊ लागतो, तसतसा तो कॅलरी कॉन्शस होत जातो. असा हा कॅलरी कॉन्शस माणूस कुणा तरी सिक्स पॅकोत्सुक मित्राच्या, झिरो फिगरोत्सुक मत्रिणीच्या किंवा स्वयंमेव मृगेन्द्रता असलेल्या डायटिशियनच्या तावडीत सापडतो. कालपर्यंत भजी, बटाटावडे, गुलाबजाम, चायनीज असल्या चमचमीत खाद्यपदार्थावाचून त्याचा दिवस जात नव्हता. आता त्याच खाद्यपदार्थात त्याला फक्त कॅलरीज आणि फॅट दिसू लागते. मग तो एक तर जिममध्ये जाऊन पैसे देऊन लोखंड उचलू लागतो किंवा मग आपल्याला जीभ नावाचं इंद्रिय आहे हे विसरून दीक्षित, दिवेकर, किटो यांच्या नावाने घडय़ाळाकडे, वजन-काटय़ाकडे आणि कॅलरीच्या तक्त्याकडे पाहत आयुष्याची आय.सी.यू. करून टाकतो.

मला या डायटिशियन लोकांची कमाल वाटते. माणसाने काय, कसं आणि कधी खावं हे एक डायटिशियन सांगतो, त्याच्या अगदी विरोधी असं दुसरा डायटिशियन सांगतो. दोघांकडेही आपण जे काही सांगतो तेच कसे शास्त्रशुद्ध आहे हे पटवून देण्याइतके, निदान तुम्हा-आम्हाला कन्फ्युज करण्याइतके, वैद्यकीय शब्दभांडार असते. ज्यांच्याकडे असे वैद्यकीय शब्द-पांडित्य नसते ते पुराणकथांपासून इसापनीतीपर्यंत कसलाही आधार घेऊन आपल्याला गिऱ्हाईक बनविण्यात रामदेव असतात. माणसाने जेवणात फक्त मीठ सोडलं तर शंभर टक्के आजार होणारच नाहीत सांगणारे, फक्त तेल सोडलं तर यच्चयावत आजार बरे होतील म्हणणारे, आगीवर शिजवून खाणं सोडलं तर जंगलातल्या प्राण्यांसारखे निरोगी होण्याची खात्री देणारे, मेटाबॉलिझमची भीती दाखवणारे, ग्लुकागॉनचा बागुलबुवा उभा करणारे, दिवसाला दोन वेळा पंचावन्न मिनिटे जेवायला सांगणारे, दर दोन तासाला चिमूटभर खायला सांगणारे, असे हर तऱ्हेचे डायटिशियन भेटतात. आणि गंमत म्हणजे अमुक एक डायटिशियन कसा जगात भारी आहे, असे सांगणारा भक्तसंप्रदायदेखील त्यांच्यापाठी जमा होत जातो. दादू, तुला सांगतो, व्यायाम, डाएट असलं काही करायचं नाही हा माझा ठाम निर्धार असला तरी माणूस हा स्खलनशील प्राणी आहे (स्त्रीलंपटपणाचा आपल्यावरील आरोप झाकण्यासाठी असलं काही भारदस्त लिहावं लागतं!) त्यामुळे ऑफिसमधील मत्रिणीच्या नादी लागून मीही एकदा दिवसभर (उपवास आणि मांजर पाळतात तसं) डायट पाळलं होतं. घरी आल्यावर, ‘डायट करना तेरे बस की बात नही,’ असं मला खिजवणाऱ्या माझ्या मुलीसमोर फुशारकीही मारली होती. पण भूक अनावर झाल्याने मध्यरात्री उठून स्वत:च्याच घरातले ड्रायफ्रुट चोरून खावे लागले आणि त्याच रात्री मी पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांच्या साक्षीने शपथ घेतली की, जोपर्यंत दर दोन तासाला पंचावन्न मिनिटे तेलात तळलेले चमचमीत पदार्थ खायला सांगणारा डायटिशियन भेटत नाही, तोवर मी डाएट या प्रकाराला हात लावणार नाही. असो.

तोच प्रकार व्यायामाचा. अरे दादू, माझा अनुभव असा आहे की, रात्री झोपायला जाईपर्यंत जे आपल्याला सहज जमेल असे वाटते, मात्र सकाळी अशक्य आहे वाटते त्यास ‘व्यायाम’ असे म्हणतात. मी व्यायाम करायचं ठरवलं नाही असा एकही दिवस मावळला नाही; आणि मी उठून व्यायाम केला असा एकही दिवस आजवर उगवला नाही. थोडक्यात सांगायचे तर, लहानपणापासूनच मी जिम किंवा व्यायामशाळा या संस्थेवर विश्वास नसलेला जिम-नास्तिक आहे. आताही आपल्या फुगलेल्या पोटासाठी आपण जिममध्ये जाऊन घाम गाळून जिमच्या मालकाचे खिसे फुगवायचे हे काही मला पटत नाही. मी सकाळी उठल्यावर झोपेचा थकवा जावा म्हणून तासभर आराम करतो. कधी चुकून जर व्यायामाचा विचार मनात आलाच तर तो विचार पूर्णपणे निघून जाईपर्यंत डोळे मिटून पडून राहतो.

माणसाचा एक स्वभाव असतो. आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं असं आईवडिलांना नेहमी वाटत असतं. उदाहरणार्थ, परीक्षेत चांगले गुण! माझ्या वडिलांचे शरीर फारसे पीळदार वगैरे नसल्याने निदान आपल्या मुलाने तरी व्यायाम करावा, चांगली सिक्स पॅक बॉडी बनवावी अशी माझ्या वडिलांची खूप इच्छा होती. त्यांनी बळेबळे गावाजवळच्या व्यायामशाळेत पैसे भरून माझं नावही घातलं होतं. पण व्यायामाला जाण्यासाठी सकाळी लवकर उठणं मला एकदाही जमलं नाही. त्यासाठी मी रोज वेगवेगळी कारणं सांगायचो. एकदा तर मी सांगितले की, ‘‘बाबा, सकाळी लवकर उठणारे लवकर मरतात म्हणे.. कोंबडय़ाचं बघा की!’’आणि मग या चोंबडेपणासाठी मी वडिलांचा मारही खाल्ला. पण दादू तुला सांगतो, मारून, ठोकून वठणीवर यायला मी म्हणजे काय टीव्हीचा रिमोट होतो काय?

आमचे काका म्हणायचे की, देह देवाचे मंदिर! तुमचे शरीर जर स्वस्थ, निरोगी, मजबूत नसेल तर परमेश्वर त्यात कसा राहणार? अरे दादू, हल्ली जेव्हा केव्हा मी स्वत:ला आरशात पाहण्याची हिंमत करतो, तेव्हा ऐन पोटावर ताणलेल्या बटनांमधून बाहेर डोकावणाऱ्या गंजीफ्रॉकसारखी एक शंका माझ्या मेंदूत डोकावते की, शरीर हे जर मंदिर असेल तर माझ्या शरीरातल्या देवाने आपल्या भवितव्याचा विचार करून हृतिक रोशन किंवा टायगर श्रॉफच्या शरीरात पक्षांतर केले असेल काय? माझ्या शरीरातून जाताना देवांनीही ‘सदुभाऊ सदैव आमच्या काळजात राहतील’ अशी लोणकढी थाप मारली असेल काय? हृतिक आणि टायगरने त्यांना आपल्या शरीरात तिकीट दिलं असेल की त्यांच्यावर ‘नारायण, नारायण’ करीत भटकायची वेळ आली असेल?

लहानपणापासूनच कष्टाळू असण्यापेक्षा कष्ट-टाळू असण्याकडे माझा कल होता. मदानी खेळ, व्यायाम, कसरती या घामगाळू गोष्टींपेक्षा मला सिनेमाची खूप आवड होती. शरीर कमावण्याचा कंटाळा असल्याने अमोल पालेकर, फारुख शेख, संजीवकुमार असे बिन-बॉडीचे लोक हिरो होऊ शकतात, तर आपण का होऊ शकत नाही अशी मी स्वत:चीच समजूत काढली होती.

माझे मित्र मला सांगायचे की, तुला सिनेमात जायचे असेल तर त्यासाठी चांगली शरीरयष्टी असणे जरुरीचे आहे, पण मला मारधाड करणारा हिरो बनण्यापेक्षा इम्रान हाश्मीसारखा अतिशय किसदार अभिनय करणारा अ‍ॅक्टर बनण्यात अधिक रस होता. शेवटी ना अ‍ॅक्टर झालो ना हिरो. आता तर परिस्थिती अशी आहे की, पेट्रोल पंपावर मोटर-सायकलमध्ये पेट्रोल भरताना तो पंपावरचा पोऱ्या ‘झिरोकडे बघा’ म्हणतो तेव्हा डबल सीटला बसलेल्या माझ्या बायकोसकट आजूबाजूचे सगळे लोक माझ्याकडे पाहू लागतात.

अरे दादू, आमचे सुरळीकरसाहेब सांगत होते की, माणसाने व्यायामबियाम करण्यापेक्षा योगा किंवा मेडिटेशन, सत्संग असं काही तरी करायला पाहिजे. हल्ली आजूबाजूला अनेक ठिकाणी अशी शिबिरं भरत असतात. तिथे हेच शिकविले जाते की, घरीदारी, ऑफिसात, समाजात, देशात जे काय चालले आहे त्या चिल्लर गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. मुळात त्याच्याकडे लक्षच देऊ नका. स्वकेंद्री व्हा. आत्म्याकडे लक्ष द्या. आनंदात राहा. माणसाने आयुष्य एन्जॉय करणं महत्त्वाचं, आनंदी होणं महत्त्वाचं! बाकी दुनिया गेली फॅट-फ्री ऑलिव्ह ऑइल लावत!

सांगायचा मुद्दा काय की, व्यायाम करून तुम्ही आपली छाती कितीही इंच फुगवली तर तुम्ही फार तर सशक्त व्हाल, निर्भय व्हालच असे नाही. चरबी किंवा कॅलरी जळवणाऱ्या कसरती करण्यापेक्षा भीती पळविणारे काही व्यायाम प्रकार करता यायला हवेत असे मला वाटते. भीती प्रत्येकाला असतेच रे! कुणी भुताला घाबरतो, कुणी देवाला घाबरतो, कुणी बायकोला, कुणी बॉसला, कुणी झुरळाला, कुणी कागदी मतपत्रिकेला, तर कुणी पत्रकार परिषदेला घाबरतो! ही भीती नष्ट होण्यासाठी नक्की किती इंचाची छाती लागते हे एकदा कुणी तरी ठरवायला पाहिजे; पण पुन्हा प्रश्न असा की, ठरवणार कोण आणि कसे? बॅलेट पेपरने ठरविणार की ईव्हीएम मशीनने? प्रश्न आरोग्याचा आहे. हू विल डिसाइड धिस? तुला कळले तर मला कळव.

तुझा फिट-बीट नसलेला जिम-नास्तिक मित्र,

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gym atheist tapalki article abn

Next Story
अनामिक बहर हा… :कधीं कधीं न बोलणार…
ताज्या बातम्या