युरोपात भटकं आयुष्य जगणार्या जमातीला ‘जिप्सी’ असं म्हटलं जातं. एका ठिकाणी स्थिर न राहता हे जिप्सी पिढ्यान्पिढ्या भटकत असतात. असं भटकं आयुष्य काही माणसं स्वत:हून स्वीकारतात. समाजाने बनवलेल्या स्टॅण्डर्डतेच्या ठोकताळ्यात न बसणार्यांकडे समाज शून्य म्हणून पाहत असतो. अशा व्यक्तींना स्वत:ला सिद्ध करण्याऐवजी, स्वत:ला शोधण्याऐवजी स्वत:त हरवायला आवडतं. मग ते खंड, देश, राज्य, जिल्हा, तालुका, शहर, घर यांसारख्या सीमांत न अडकता मुक्त होऊन फिरत राहतात न संपणार्या प्रवासासाठी… ते कुणाचेही नसतात आणि त्यांचं कुणी नसतं. असे हे प्रवासी जिप्सी होतात. खरं तर जिप्सी ही एक वृत्ती आहे. प्रत्येक माणसामध्ये एक जिप्सी लपलेला आहे. कधी तो बाहेर डोकावतो, कधी तो आतच राहतो. पण तो एकदा का बाहेर डोकावला की पुन्हा आत जात नाही. तो भटकत राहतो. अशाच एका जिप्सीची कहाणी केतन माणगांवकर यांच्या ‘# जिप्सी’ या कादंबरीत वाचायला मिळते.
एखादा चित्रपट उलगडत जावा तशी जिप्सीतल्या मानव मुकुंद लिमयेची कथा आपल्यासमोर हळूहळू उलगडत जाते. मानवला कॉलेजमध्ये ‘मामुलि’ या नावाने मित्र हाक मारायचे. तो मामुली आहे म्हणून नाही तर त्याच्या नावाचा शॉर्टफॉर्म म्हणून. पण जेव्हा त्याचं एकतर्फी प्रेम असणार्या खानिलकरने त्याला ‘तुझं अस्तित्वच नाही, तू नुसता गर्दी आहेस,’ असं म्हणून त्याला नाकर्ता ठरवलं; तेव्हा त्याला खरंच वाटू लागलं की तो ‘मामुलि’ आहे. मानवच्या आजोबांनी तो वडिलांना सोडून जाईल, मेल्यावर अग्नीही देणार नाही असं भविष्य वर्तवल्यामुळे मानवचे वडील कायम त्याचा रागराग करायचे. त्याला धाकात ठेवायचे, सतत बांधून ठेवण्याचा प्रयत्न करायचे. पण त्यांचं बांधून ठेवणं मानवच्या मुक्ततेचं कारण बनलं आणि तो जिप्सी झाला. भटकंतीमध्ये त्याला भलीबुरी माणसं भेटली, जिवलग मित्र सापडले, त्याची नाती तयार झाली, पण त्यात तो न अडकता पुढे भटकत राहतो. कादंबरीच्या शेवटी त्याला त्याचा ‘स्व’ गवसतो व नव्याने प्रेमही मिळतं.
‘# जिप्सी’ वाचत असताना मानवच्या भटकंतीसोबत वाचकही भटकत राहतो. नव्या ठिकाणी नव्या लोकांना भेटत असताना त्याचं पूर्वायुष्य त्याच्या नजरेतून पाहत राहतो. त्याचे आजोबा त्याच्या भटकंतीच्या प्रवासात विधिलिखित असल्यासारखे त्याला भेटतात. त्याच्या जीवनाचं सत्य त्याला सांगून ते त्याच्या मांडीवर आपलं जर्जर आयुष्य संपवतात. मानवला वाटलं होतं की त्याच्या आयुष्याचं पझल आजोबांना भेटल्यावर सुटेल, पण त्यांनी मरण्यापूर्वी त्याला सांगितलं की ते त्याच्या आयुष्याचं पझल सोडवू शकणार नाहीत. त्या वेळी संघमित्रा त्याच्या आयुष्यात पुन्हा येते. ती त्याला आजोबांनी सांगितलेल्या माहितीतली एक महत्त्वाची गोष्ट सांगते. आपण ‘कोण आहोत’ याचं उत्तर शोधण्यापेक्षा आपण ‘काय आहोत’ हे शोधणं सोप्पं असतं, ही गोष्ट समजावून सांगताना ती त्याला त्याची डायरी दाखवते आणि त्याने भटकंती करताना पाहिलेल्या दुर्मीळ ठिकाणांची लिहून ठेवलेली माहिती दाखवते. त्या माहितीत नुसतं पुरातत्त्वशास्त्र नसतं, तर त्या कलाकृतींमागच्या गोष्टी, आख्यायिका सगळं असतं- जे मौलिक होतं. त्याच्यात दडलेला लेखक ती त्याला दाखवते. मानवला समजावत असताना संघमित्राला कळतं की ज्या प्लुटो नावाच्या प्रसिद्ध लेखकाला ती शोधत असते तो लेखक म्हणजे मानवच आहे, तेव्हा तिला मानव नव्याने कळतो व मानवलाही आपल्यातलं वेगळेपण नव्यानं जाणवतं. ज्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी तो भटकंती करत होता त्या प्रश्नांची उत्तरं त्याला सापडतात आणि त्याचं प्रेमही पुन्हा नव्याने मिळतं.
‘# जिप्सी’ या कादंबरीतली गोष्ट त्यातल्या मानवपूर्ती मर्यादित नाही. ती तुमच्या-आमच्यातल्या वाट चुकलेल्या, स्वत्वाचा शोध घेण्यासाठी धडपडणार्या प्रत्येकाची गोष्ट वाटणारी आहे. केतन माणगांवकर प्रसिद्ध क्रियेटिव्ह डायरेक्टर आहेत. त्यांच्यातला दिग्दर्शक कादंबरीतल्या पात्रांच्या मांडणीत, वातावरणनिर्मितीत जाणवतो. कादंबरीचे निवेदन तृतीय पुरुषी असून चिंतामणी अहिरे यांचे समर्पक असे मुखपृष्ठ कादंबरीला लाभले आहे. कादंबरीचा नायक तरुण असल्याने कादंबरीत तरुणाईची भाषा वापरली आहे. त्यामुळे कादंबरीचे शीर्षकही ‘हॅशटॅग’ चिन्ह वापरून लिहिलेले आहे. ‘# जिप्सी’चे कारण शोधण्यासाठी वाचकाला भटक्या मानवची पूर्ण कहाणी वाचावी लागेल व त्या जिप्सीच्या प्रवासाचे साक्षीदार व्हावे लागेल.
‘# जिप्सी’, केतन माणगांवकर,रोहन प्रकाशन
पाने- १५७, किंमत- २५० रुपये
