केवळ पुस्तकेच प्रकाशित न करता वाचन आणि लेखन ही कष्टसाध्य कला राज्यभर कार्यशाळा घेऊन शिकवत मराठवाड्यातील ‘हरिती प्रकाशन’ एक तपाहून अधिक काळ कार्यरत दिसते. पुस्तकांकडे केवळ वस्तू म्हणून न पाहता, सामाजिक परिवर्तनाचे साधन मानत असल्याने त्याच वकुबाची पुस्तके हे प्रकाशन छापते. त्यांची प्रकाशनामागची भूमिका…

आजचे समाजस्वास्थ्य बरे नाही याबाबत कुणाचे फारसे दुमत नसावे. माध्यमांवर दिसणारा कोलाहल, मतभेदांचे उग्र रूप आणि संवादाची सतत होत जाणारी माघार… या सगळ्याची बीजे मागील दशकातच रोवली गेली होती. समान राजकीय उद्दिष्टे असलेल्या पक्ष-संघटनांमध्येही फारसा संवाद घडत नव्हता. अशा वेळी संवादालाच केंद्रस्थानी ठेवत २०१३ साली हरिती प्रकाशनाची सुरुवात झाली. स्त्रियांच्या कर्तृत्वाला झाकोळून टाकणार्‍या पुरुषी इतिहासाला छेद देणार्‍या ‘हरिती’ या तत्त्वज्ञ स्त्रीच्या नावाने या उपक्रमाला ओळख देणे, हीदेखील एक वैचारिक भूमिका होती.

हरितीला सुरुवातीपासूनच केवळ पुस्तके प्रकाशित करणे आणि विक्री करणे या मर्यादित चौकटीत अडकायचे नव्हते. ‘मराठी प्रकाशन व्यवहार तोट्यातच चालतो’ या एकसुरी वास्तवाला स्वीकारून थांबणेही शक्य नव्हते. डिजिटल युगात वाचनसंस्कृती कमी होत आहे हा सहज, सोपा निष्कर्ष काढण्याऐवजी ही समस्या मुळातून समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. कोणत्याही भाषेचा विकास हा त्या समाजाच्या विकासाशी निगडित असतो. छपाई तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मराठीतील पुस्तकांचा विस्तार झाला असला तरी वाचनसंस्कृती आजही मर्यादित वर्तुळात अडकलेली दिसते.

छपाई तंत्राच्या प्रगतीमुळे मराठीतील पुस्तके आणि नियतकालिकांचा विस्तार झाला असला तरी आज मराठी वाचनसंस्कृतीसमोर काही गंभीर प्रश्न उभे आहेत. भारतात बहुतांश प्रकाशक स्थानिक भाषांमध्ये कार्यरत असले तरी पुस्तकांच्या बाजारपेठेत इंग्रजीचे वर्चस्व स्पष्ट दिसते. एकूण पुस्तक निर्मितीत शैक्षणिक पुस्तकांचा मोठा वाटा असून, सघन वैचारिक साहित्यनिर्मिती अत्यल्प आहे. विकसित देशांत संशोधन, प्रकाशन आणि अर्थव्यवस्था यांचा परस्परसंबंध दृढ असतो; परंतु भारतात हे क्षेत्र अजूनही कमकुवत आहे- विशेषत: स्थानिक भाषांमध्ये. वाचनसंस्कृतीच्या मर्यादांचे कारण केवळ पुस्तकांच्या किमती किंवा डिजिटल माध्यमे नसून, जात आणि पुरुषप्रधानतेतून निर्माण झालेली सांस्कृतिक रचना आहे. त्यामुळे वाचन हे अजूनही मर्यादित वर्गाचे सांस्कृतिक भांडवल राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर वाचनसंस्कृतीचा व्यापक सामाजिक विस्तार घडवणे हे प्रकाशन क्षेत्रासमोरील मूलभूत आव्हान असल्याचे लक्षात घेऊन आम्ही हरितीच्या कामाला सुरुवात केली. यातून हरितीने प्रकाशन व्यवहारात काही मूलभूत प्रयोग केले. प्रकाशन व्यवहारात वितरण हा कळीचा; परंतु अनेकदा दुर्लक्षित विभाग मानला जातो, ही जाणीव ठेवून त्याला स्वतंत्र व स्वायत्त स्वरूप देण्यात आले. वितरकांना अधिक आर्थिक प्रोत्साहन मिळावे म्हणून ६० ते ७० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचे धोरण स्वीकारले. याबरोबरच ॲडव्हान्स बुकिंग आणि ‘पुस्तक भिशी’सारख्या नावीन्यपूर्ण योजना राबविल्या. अशा उपक्रमांमुळे वितरण व्यवस्थेला नवे बळ मिळाले. परिणामी, हरितीने स्वत:ची पर्यायी वितरण क्षमता उभी केली, जी केवळ व्यावहारिक नव्हे तर चळवळीचाही भाग ठरली.

पुढील टप्प्यात वाचकांसाठी नावीन्यपूर्ण वाचन-लेखन कार्यशाळांची मालिका आयोजित करण्यात आली. चंद्रपूर, सावंतवाडी, महाड, जळगाव, नाशिक, लातूर आणि अहमदनगर अशा महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात या कार्यशाळा पोहोचल्या. लहान मुलांपासून ते महाविद्यालयीन तरुण-तरुणींपर्यंत विविध वयोगटांतील सहभागी यात उत्साहाने सामील झाले. या कार्यशाळांमध्ये मानवाच्या वाचन-लेखनापर्यंतच्या उत्क्रांतीचा रोचक प्रवास उलगडत, वाचणे-लिहिणे सुरुवातीला कंटाळवाणे का वाटते आणि ते सातत्यपूर्ण सरावाने कसे आत्मसात करता येते, याची सखोल उकल केली जाते. त्यानंतर वाचन आणि लेखन ही केवळ कौशल्ये न राहता, अनुभव, विचार आणि संवेदना व्यक्त करण्याची सर्जनशील साधने कशी बनू शकतात, हे सहभागींच्या प्रत्यक्ष सहभागातून उलगडून दाखवले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला अधिक जिवंत आणि आनंददायी बनवण्यासाठी प्रभावी चित्रप्रदर्शने, संवादात्मक उपक्रम आणि कल्पक फन-गेम्स यांचा समावेश करण्यात येतो. परंतु या कार्यशाळांची खरी ताकद केवळ उपक्रमांच्या वैविध्यात नसून, वैचारिक भूमिकेत आहे.

‘वाचाल तर वाचाल’ अशा भावनिक आणि अनेकदा अशास्त्रीय घोषणांवर आधारित दृष्टिकोनाला जाणीवपूर्वक छेद देत, वाचन-लेखनाचा शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय पाया स्पष्ट केला जातो. वाचन ही केवळ माहिती मिळवण्याची क्रिया नसून, मेंदूच्या एकाग्रतेला, स्मरणशक्तीला आणि विश्लेषणक्षमतेला आकार देणारी एक जटिल प्रक्रिया आहे, हे अनुभवातून पटवून दिले जाते. सततच्या स्क्रीन, नोटिफिकेशन्स आणि क्षणिक उत्तेजनांनी व्यापलेल्या आजच्या डिजिटल जगात मन विखुरलेले आणि अस्थिर होत चालले असताना वाचन ही केवळ सवय नसून एक प्रतिकाराची कृती ठरते.

वाचन म्हणजे मनाला एकाग्र करणारे सर्जनशील ध्यान. त्याद्वारे शब्दांशी संवाद साधताना विचारांची शिस्त निर्माण होते, भावनांना अभिव्यक्तीचा मार्ग सापडतो आणि अनुभवांना अर्थ प्राप्त होतो. या प्रक्रियेत वाचक केवळ मजकूर वाचत नाही, तर स्वत:लाही नव्याने वाचू लागतो. म्हणूनच हरितीच्या कार्यशाळांमध्ये वाचन-लेखन हे शिक्षणाच्या चौकटीत अडकलेले कौशल्य न राहता, आत्मजाणिवेचा, सामाजिक भानाचा आणि सर्जनशील मुक्तीचा प्रवास बनते आणि हाच त्या प्रयोगाचा खरा केंद्रबिंदू ठरतो.

या कार्यशाळांमधून अनेक नवे लेखक पुढे आले. ‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनीचा जीवनप्रवास’ या अनिल जायभाये, पंचशील डावकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील तरुण मुलींचे दमदार लेखन हे त्याचेच फलित आहे. जगण्यातले संघर्ष, शोषण आणि अपमानाचे अनुभव लेखणीमुळे कसे राजकीय भान प्राप्त करतात आणि संघर्षाला मुक्तिगामी अर्थ देतात, याचा जिवंत प्रत्यय या प्रक्रियेत येतो. या प्रयोगातून लहान मुलांनाही स्वत:च्या गोष्टी लिहिता येतात हे स्पष्ट झाले. पाचवीत शिकणार्‍या अबीर जायभायेचे ‘आमची डोंगर भेट’ हे पुस्तक हरितीने प्रकाशित केले आहे, तर आणखी अनेक मुले आपले जिवंत अनुभव कथारूपात लिहीत आहेत. पुण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या मुलांसोबतही वाचन-लेखन कार्यशाळा घेऊन हा प्रयोग पुढे नेला जात आहे. मुलांनीच मुलांसाठी लिहिलेली पुस्तके घडवण्याचा हा हरितीचा आगळावेगळा उपक्रम आहे. सामान्यांच्या जिवंत अनुभवांना ज्ञानव्यवहारात कळीचे स्थान देणारा हा प्रयोग सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो.

‘पोलादी बाया’, ‘भटकभवानी’, ‘पुरुषत्व उकलताना’, ‘स्त्रीवाद : बहुआयामी चर्चाविश्व’, ‘आरपारावलोकिता’, ‘पाळीचं पॉलिटिक्स’ अशा स्त्रीवादी जाणिवांना धार देणार्‍या पुस्तकांपासून ते ‘शिक्षक दिन : पर्यायी सांस्कृतिक राजकारण’, ‘हिंदू समृद्धी की अडगळ?’, ‘लातूर : परिघावरील आवाज’, ‘सावित्रीबाई फुले जीवनचरित्र’ यांसारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांपासून ते वाचकाचे विचारविश्व समृद्ध करणारी विविधांगी पुस्तके हरिती प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. तसेच मुस्लीम प्रश्न आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम या संदर्भातील पुस्तकांच्या मालिकांद्वारे कळीच्या सामाजिक-राजकीय प्रश्नांवर विविध वैचारिक प्रवाहांना एकमेकांसमोर आणत संवादाची सशक्त प्रक्रिया उभी केली.

राजू कालेलकर, विलास सोनवणे आणि बशरद अहमद यांसारख्या विचारवंतांचे अप्रकाशित व दुर्मिळ साहित्य पुस्तक रूपात प्रकाशित करून हरितीने वैचारिक वारशाचे महत्त्वपूर्ण दस्तऐवजीकरण केले आहे. अशा प्रकारचे दस्तऐवजीकरण हे केवळ भूतकाळाचे जतन नसून, वर्तमानाला समजून घेण्यासाठी आणि भविष्याचा दिशादर्शक ठरवण्यासाठी आवश्यक असते. विस्मृतीत जाण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या विचारांना पुन्हा प्रवाहात आणण्याचे हे काम ज्ञानव्यवहारासाठी अत्यंत मोलाचे आहे. सर्वसामान्य शोषित जनतेचे अनुभव, परिघावरील तरुण पिढीचा आवाज आणि समाजातील जटिल प्रश्नांवर संवादात्मक हस्तक्षेप… यांद्वारे हरिती प्रकाशनाने पर्यायी ज्ञाननिर्मिती आणि वितरणाची वेगळी दिशा उभी केली आहे. पुस्तकांना केवळ वस्तू न मानता सामाजिक परिवर्तनाचे साधन मानणारी ही दृष्टी हरितीला वाचन चळवळीचे स्वरूप देते.

सघन वैचारिक संवाद हे उद्दिष्ट ठेवत हरिती पुढील टप्प्यात संस्थात्मक विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत आहे. आनुवंशिक वारशापेक्षा बौद्धिक वारशाला प्राधान्य देत नव्या पिढीकडे सूत्रे सोपवण्याचा तिचा स्पष्ट मानस आहे. वितरणाची जबाबदारी समर्थपणे पेलणार्‍या राजश्री कांबळे, राहुल लोंढे आणि श्याम घुगे या तरुणांच्या रूपाने ही प्रक्रिया केवळ कल्पना न राहता वास्तवात आकार घेताना दिसते. त्यामुळे हरिती ही केवळ प्रकाशन संस्था न राहता, विचारांची परंपरा पुढे नेणारी, नव्या पिढीत रुजत असलेली आणि भविष्यात अधिक व्यापक, सामाजिक परिवर्तनाची बीजे पेरणारी वाचन चळवळ ठरते.

haritibooks@gmail.com