एक आजी.
बाग लोटायची. बागेतला कचरा काढायची.
थकूनभागून एका गुलमोहराला टेकायची.
गुलमोहर तिच्या सुरकुतल्या हाताच्या
स्पर्शाने मोहरून जायचा.
फांदी फांदी डोलायची.
मायेचा स्पर्श होऊन, झडझडून बरसायची.
फुलांचा सडा सार्‍या आवारात होई.
मग हातात खराटा घ्यायची.
सगळा कचरा लोटून काढायची.
थकून पुन्हा गुलमोहरालाच टेकायची.
झाडाच्या खोडावरून हात फिरवायची.

गुलमोहराचं झाड गडबडून जायचं.
आजीचा राग अन् प्रेम
त्याला कोड्यात टाकायचं.
एके दिवशी झाडाने निश्चय केला
अन् सरळ आजीलाच प्रश्न केला.
‘‘मी एवढा कचरा करतो घाण करतो
तरीही तुझा जीव माझ्यातच का गुंततो?’’
आजी भरल्या डोळ्यांनी थरथरली.
तिची पापणी थोडीशी फडफडली.
आजी बोलू लागली. डोळ्यातली नदी वाहू लागली.
‘‘बर्‍याच वर्षांपूर्वी इथं बाग नव्हती.
या वेली, फुलझाडं नव्हती.
मोकळ्या मैदानात मुलं खेळायची.
खेळता खेळता कडेनं बिया पेरायची.

माझ्या लेकरानं एक बी पेरलं.
हळूहळू रोप वाढू लागलं.
पोर माझं अपघातात गेलं,
पण त्याची आठवण म्हणून झाड तेवढं बाकी राहिलं.
पोटच्या लेकासारखं झाडाला जपलं.
या हातांनी त्याला वाढवलं.’’
आजी थरथरली उठत.
पदरानं डोळे पुसत.
झाड विचार करू लागलं.
आजीचं बोलणं नाही कळलं.
बी लावलं. झाड वाढलं.
मग, ते झाड कुठं गेलं?
वादळवार्‍यात पडून गेलं?
की कुणी तोडून नेलं?

अरे!!
आपल्याला इतकं कसं समजलं नाही!
आजीच्या पोरानं लावलेलं झाड, मी तर नाही?

farukskazi82 @gmail.com