प्रतिभा कणेकर
वीणा गवाणकर यांचे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या पहिल्या कृष्णवर्णीय शास्त्रज्ञाचे ‘एक होता कार्व्हर’ हे प्रसन्न शैलीतील चरित्र १९८१ साली प्रसिद्ध झाले. तिथपासून त्यांचा चरित्रलेखनाचा प्रवास एखादे व्रत घ्यावे तसा अखंडपणे चालू राहिला. डॉ. आयडा स्कडर, रोझलिंड फ्रॅंकलीन, लीझ माइट्झनर, सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स, डॉ. सलीम अली, अवघा देह वृक्षची झाला, भगीरथाचे वारस विलासराव साळुंखे, डॉ. खानखोजे, रॉबी डिसिल्व्हा, गोल्डा एक अशांत वादळ आणि आता त्याच परंपरेतले त्यांचे अलीकडे प्रसिद्ध झालेले चरित्र म्हणजे ‘द्रष्टा’ हे निसर्गवादी हेन्री डेव्हिड थोरो यांचे चरित्र होय.
हेन्री डेव्हिड थोरो हे अमेरिकन तत्त्वज्ञ. माणसांच्या गर्दीपासून दूर राहणारे, माणसांना मुद्दाम शिकवायला न जाता, आपल्या जीवनपद्धतीतूनच, समाधानी मानवी जीवनाचा आदर्श उभा करणारे थोर तत्त्ववेत्ता! हेन्री थोरो यांचे आजोबा फ्रेंच प्रॉटेस्टंट असलेले ब्रिटिश स्थलांतरित. ते बॉस्टनमधील कॉन्कॉर्ड या गावी स्थायिक झाले. जॉन आणि सिंथिया या निसर्गप्रेमी आई-वडिलांच्या पोटी १२ जुलै १८१७ रोजी हेन्री यांचा जन्म झाला.
एक विद्यार्थी म्हणून हेन्री शालेय अभ्यासक्रमात फार हुशार नसले तरी बालपणापासून ते विचारी, आत्मसंयमी, निर्भय व नीतिमान होते. कॉन्कॉर्ड येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते हार्वर्ड कॉलेजला गेले. तिथल्या संपन्न ग्रंथालयात बसून त्यांनी भरपूर वाचन केले. पुढील आयुष्यातही त्यांचा निसर्गविहार व वाचन अखंड सुरू असे. त्यात संस्कृत महाकाव्ये, वेद, गीता, उपनिषदे, विष्णुपुराण, बुद्धाची पंचशील तत्त्वे, कबीराचे दोहे यांचाही समावेश होता.
१८३७ मध्ये हेन्रीने पदवीदान समारंभातील परिसंवादात जे भाषण केले त्यात त्यांचे तत्त्वज्ञान बीजरूपाने उमटले. मानवाखेरीज इतर सजीवांचा नैतिक भूमिकेवरून विचार केला पाहिजे, साधेपणावर श्रद्धा ठेवून जीवनातील प्रश्नांचे सुलभीकरण केले पाहिजे. आपण आजूबाजूचे जग बदलू शकत नाही; परंतु आपल्या मनाला आपण काबूत ठेवले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.
हेन्री यांच्या तारुण्याचा काळ अमेरिकेतील आर्थिक दुरवस्थेचा होता. हेन्रींना नोकरी मिळेना. तेव्हा ते वडिलांच्या पेन्सिली तयार करण्याच्या व्यवसायात उतरले व लवकरच त्यांच्या पेन्सिली अमेरिकेत सर्वोत्तम दर्जाच्या ठरल्या. त्यांनी आपल्या भावाबरोबर एक शाळा काढली. तीत मुलांना लॅटिन, ग्रीक, फ्रेंच, इंग्रजी, भौतिकशास्त्र, इतिहास या विषयांबरोबर निसर्गविज्ञानही त्यांनी शिकवले. त्यांच्या निसर्गसहली नेल्या, गणिताचा व्यवहारातील वापर शिकवण्यासाठी त्यांना जमिनीचे सर्व्हे करायला शिकवले, मुलांना जमिनीचे तुकडे देऊन त्यावर शेती करायला शिकवली.
मुलांनी केलेल्या कलिंगडांच्या शेतीतून नंतर त्यांच्या कलिंगड पाट्र्या केल्या. ही शाळा तीन वर्षे चालली. नंतरच्या काळात थोरो यांनी शेण गोळा करण्यापासून तर लोकांच्या जमिनींचे सर्व्हे करून देणे, कुंपण करून देणे, माळीकाम-सुतारकाम करणे, लेख लिहिणे, व्याख्याने देणे असे सर्वकाही अर्थार्जनासाठी केले.
समाधानी जगण्यासाठी थोरोंना निसर्गाचे सान्निध्य महत्त्वाचे वाटे. स्वत: तयार केलेल्या होडीतून ते कॉन्कॉर्ड तलावात विहार करत. एका क्षणी वल्हे सोडून देत होडीत नुसते पडून राहणेही त्यांना आकर्षक व सृजनशील वाटे. १८४४ मध्ये त्यांनी वॉल्डन सरोवराकाठी स्वत:च्या हाताने एक कुटी उभारली. त्या घराला कुलूप नव्हते, खिडक्यांना पडदे नव्हते. स्वत: पाकसिद्धी करायची, निसर्ग निरीक्षण करत शांतपणे जगायचे व लेखन करायचे हा त्यांचा हेतू होता. ‘लेखन हे अस्तित्वाचे केंद्र आहे’ असे ते मानत. वॉल्डनकाठी त्यांनी घालविलेल्या दोन वर्षांच्या वास्तव्यावर त्यांचे ‘वॉल्डन’ हे पुस्तक पुढे दहा वर्षांनी प्रसिद्ध झाले.
निसर्गाची रहस्ये जाणून घेण्यासाठी त्यांनी अनेक निसर्गसहली केल्या. ते सर्वात उंच अशा कटाहडीन शिखरावर चढले. त्यासाठी रात्रंदिवस चालत नदी, तलाव, टेकड्या, झरे पार करत त्यांनी निर्मनुष्य, ओसाड, वाळवंटी निसर्ग अनुभवला. केप कॉडच्या मोहिमा तर त्यांनी अनेकदा केल्या. रेल्वेने कॅनडाची सहल केली. वयाच्या चाळिसाव्या वर्षी दोन आठवड्यांत ३२५ मैलांचा प्रवास करत त्यांनी ॲलेगेश सरोवराला भेट दिली. १८६० मध्ये ते तीन महिन्यांच्या मिनेसोटा सफरीवर जाऊन आले. ‘केप कॉड मोहीम’, ‘कटाहडिन मोहीम’, ‘लाइफ इन वुड्स’, ‘द वाइल्ड वॉकिंग’ अशा निसर्गानुभवांबरोबर त्यांनी ‘मॅसॅच्युसेट्समधील गुलामगिरी’, ‘सिव्हिल डिसओबिडियन्स’ अशा विषयांवरही व्याख्याने दिली व लेखन केले. निसर्ग व इतिहास यावर अधिकारवाणीने बोलू शकेल अशी ती व्यक्ती होती.
थोरो कधी सामूहिक सुधारणा उपक्रमात वा चळवळीत सहभागी झाले नाहीत; परंतु वैयक्तिक व ता्त्विवक पातळीवर ते निर्धाराने भूमिका घेत. त्यांनी चर्चचा सदस्य होणे नाकारले होते. १८४४ च्या सुमारास गुलामगिरीविरुद्ध लढणार्या स्त्रीसंघटनेचे ते एजंट होते. मेक्सिको युद्धासंबंधीची अमेरिकेची भूमिका त्यांना मान्य नव्हती. या युद्धासंबंधातील मतदानकर भरणे नाकारून त्यांनी एक दिवसाचा तुरुंगवास भोगला. ही त्यांची कृती सविनय कायदेभंगाची होती. १८५० मध्ये अमेरिकेत ‘फजिटिव्ह स्लेव्ह लॉ’ आला.
गुलामगिरीतून पळून जाणार्या गुलामांविरुद्धचा हा कायदा होता. त्याला थोरोंचा विरोध होता. पळून जाणार्या गुलामांना ते आपल्या घरात आसरा देत. जॉन ब्राऊन या गुलामगिरीविरुद्ध लढणार्या नेत्याला पाठिंबा देण्यास लोक घाबरत असताना हेन्रींनी त्यांना मदत केली. ब्राऊन ही एक व्यक्ती नसून हा एक विचार आहे, हा त्यांचा दृष्टिकोन होता. ब्राऊन यांना फाशी दिली गेली तेव्हा त्यांनी ‘प्ली फॉर कॅप्टन जॉन ब्राऊन’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या ३३ हजार प्रती विकल्या गेल्या. त्या प्रतींचे मानधन थोरो यांनी हार्पर फेरी घटनेत जीव गमावलेल्या कृष्णवर्णीयांना दिले.
त्यांना सैनिक हा धैर्याचे प्रतीक वाटत नसे. ‘सत्ता ताब्यात असलेल्या निर्दय लोकांच्या हातातील ते यंत्र आहे’ असे ते म्हणत. ‘द राइट्स अँड ड्युटीज ऑफ द इंडिव्हिड्यूअल इन रिलेशन टू गव्हर्नमेंट’ या लेखात त्यांनी म्हटले आहे की, मी दिलेला डॉलर कुठे व कसा खर्च झाला आहे ते मला कळलेच पाहिजे. नागरी शासन जर अन्याय करत असेल तर त्याला विरोध-प्रतिकार करणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे यासारखे विचार ते व्याख्याने व लेखन यातून मांडत राहिले.
कुटुंबवत्सल, निसर्गवादी, अतीतवादी, निसर्गकेंद्री मानवी जीवन व मानवकेंद्री शासन यांचा पुरस्कार करणार्या हेन्री यांचे व्यक्तिमत्त्व व त्यांचे जीवन वीणा गवाणकर यांच्या प्रस्तुतच्या चरित्रग्रंथातून नेटकेपणाने उमटले आहे. इमर्सन-थोरो व अल्कॉट-थोरो, चॅनिंग-थोरो यांच्यातील गाढ मैत्रभावाचे लेखिकेने केलेले वर्णन लोभसवाणे आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील अमेरिकेतील साहित्यविश्व व त्या काळातील कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीविरोधातील चळवळी यांचे स्वरूपही या लेखनातून वाचकांपुढे अंधूकपणे उभे राहते.
महात्मा गांधीजींना ब्रिटिश राजवटीला विरोध करताना थोरो यांच्या सविनय कायदेभंगाच्या तत्त्वप्रणालीतून प्रेरणा मिळाली होती. खेड्याकडे जा, साधे जीवन जगा ही गांधीजींची शिकवण थोरो यांच्या जीवनप्रणालीशी जुळती होती. आज माणसाचे जगणे बाजारकेंद्री झाले आहे. अशा काळात हेन्री थोरो यांची जीवनकहाणी मराठीत येणे फारच अगत्याचे होते.
- द्रष्टा, वीणा गवाणकर, वॉल्डन पब्लिकेशन, पाने- २२०, किंमत- हार्डकव्हर प्रत- ५०० रुपये, पेपरबॅक प्रत- ४०० रुपये.
pratibhakanekar@gmail.com
