सुशील धसकटे
पुण्यातील ‘हर्मिस’ प्रकाशन गेली सोळा वर्षं उत्तम धाटणीची पुस्तकं देण्याचा प्रयत्न करतेय. विज्ञान, ललित, वैचारिक, समीक्षा, माहितीपर, वाङ्मयीन, कोश या सर्वच क्षेत्रांतील ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. तरुण लेखकांसह ज्येष्ठांनाही लिहितं करणार्‍या आणि नवे वाचक घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार्‍या या प्रकाशनाचा ‘परंतु’ नावाचा वैचारिक अंकही दरवर्षी येतो. या प्रकाशनाची जडणघडण सांगणारी गोष्ट…

इयत्ता पाचवीपासूनच वाचनाची आवड लागलेली. शिक्षक वडील तळमळीनं गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगार चळवळीचं काम करायचे. त्यामुळे चळवळीचं पुष्कळ साहित्य घरात यायचं. त्यात प्रामुख्यानं कार्ल मार्क्स, व्लादिमिर लेनिन, मॅक्झिम गॉर्की, लिओ टॉल्स्टॉय, अन्तोन चेखव, महात्मा फुले, महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, अण्णा भाऊ साठे, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कॉम्रेड शरद पाटील अशा महनीय मंडळींची पुस्तकं असायची. शिवाय विज्ञानावरच्या छोट्या छोट्या माला, जोनाथन स्विफ्टची ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’, भा. रा. भागवतांचा ‘फास्टर फेणे’ असं बालसाहित्यही असायचं. या मंडळींचं लेखन लहानपणापासूनच वाचायला मिळालेलं. झपाटून वाचलेलं. शाळेतील ‘साने गुरुजी कथामाले’च्या उपक्रमात ओढला गेलो. दहावी-बारावीपर्यंत तिथं रमलो. महाविद्यालयीन काळात विद्यार्थी चळवळीत काम केलं. आजी वेळ मिळेल तसं मधे मधे वारकरी भजन-कीर्तन वगैरे ऐकायला जायची आणि काम करता करता तंद्रीतच तिच्या पद्धतीनं गळ्यावर तुकारामांचे अभंग गायची. आजीमुळे तुकारामांची भेट झाली. तुकाराम, भगतसिंग आणि साने गुरुजी या तिघांनी बालपणात अर्थ भरला. दोनतीन ग्रंथालयांची वर्गणी भरलेली होती. शाळा-कॉलेजला सुट्टी म्हटली की प्रचंड वाचायचो. यातूनच लिहायचा नाद लागला. मग १९९१ साली मी पहिली गोष्ट लिहिली, ती ‘एकमत’मध्ये छापून आली. मग ‘कुमार’, ‘ठकठक’, ‘निर्मळ रानवारा’, ‘छावा’, ‘आमची फुलबाग’, ‘टॉनिक’, ‘साकेत सवंगडी’ अशा मुलांच्या मासिकांतून आणि ‘लोकमत’, ‘सकाळ’, ‘केसरी’ आदी वृत्तपत्रांतून कविता, गोष्टी लिहीत गेलो. दहावीला येईपर्यंत पुष्कळ लेखन छापून आलेलं होतं. कवी वसंत सावंत, भा. रा. भागवत, यदुनाथ थत्ते, राजा मंगळवेढेकर, नारायण सुर्वे अशा अनेक लेखकांशी तेव्हा संपर्क आला. त्यातील काहींची पत्रं माझ्याकडे आहेत. पुढे पुणे विद्यापीठात एमए केलं. प्राध्यापक होणं हे स्वप्न वा जिद्द होती. पण काळ गतीनं आणि विचित्रपणे बदलत गेला. प्राध्यापकीसाठी द्यावे लागणारे लाखो रुपये सोडाच, दीडकीही जवळ नव्हती. राजकीय वशिला तर दूरचीच गोष्ट. शिक्षक-प्राध्यापक होण्यासाठी राजकारणी, पुढारी आणि तत्सम लोकांपुढे भीक मागावी लागणं, त्यांचे उंबरे झिजवावे लागणं यासारखं वाईट या फुले- गांधी- आंबेडकरांच्या देशात दुसरं काय असू शकतं? सामान्य, गोरगरिबांच्या अपेक्षा वा स्वप्नं वास्तवात उतरण्याचा अवकाश १९९० नंतर हळूहळू आक्रसत जाऊ लागला. आज तो अवकाश पूर्णच संपुुष्टात आलेला आहे.

शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता आटत जाऊ लागल्यानं मूळच्या वाचनाच्या आवडीतून आणि पुस्तकांच्या जिव्हाळ्यातून ग्रंथसंपादन या क्षेत्राकडे वळलो. ग्रंथसंपादक म्हणून ‘पद्मगंधा’, ‘मनोविकास’, ‘मॅकमिलन इंडिया लिमिटेड’… काही काळ ‘अंतर्नाद’ मासिक… मग फ्रिलान्स… अशी दीर्घ उमेदवारी करून २०१० साली ‘हर्मिस प्रकाशना’वर येऊन ठेपलो. ‘हर्मिस’ हा ग्रीक शब्द आहे. आरोग्य, क्रीडा, ज्ञान आदींचे ‘हर्मिस’ प्रतीक मानलं जातं. वेगळेपण आणि अर्थपूर्ण असल्यामुळे हे नाव नक्की केलं.

प्रत्येक पुस्तक आपल्याला खूप काही देतं. वैचारिकदृष्ट्या समृद्ध करतं. माणूसपणाकडे घेऊन जातं. लेखकाशी संवाद होतो. आज हयात नसलेल्या एकेकाळच्या अनेक ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या लेखकांचा चांगला सहवास लाभला. स्वत:ची म्हणून एक उन्नत मूल्यदृष्टी व जीवनधारणा असलेली लेखकांची ती पिढी अनुभवली. प्रकाशनात उतरलो ते तंजावरचे राजे सरफोजी भोसले, मुद्रणकला, हैंद शाळा पुस्तक मंडळी, जावजी दादाजी, गणेश कृष्णाजी पाटील, राणोजी आरू, सयाजीराव गायकवाड, दामोदर सावळाराम यंदे आदी मराठी ग्रंथ प्रकाशन आणि मुद्रणाची पूर्वपरंपरा नि वाटचाल बारकाईनं अभ्यासूनच. या क्षेत्रातील पुष्कळ जुनी-जाणती माणसं आता काळाआड गेलेली आहेत. काही निवृत्त झाली आहेत. यातील काहींच्या सहवासामुळे या क्षेत्रातलं मूलभूत असं ‘आतलं’ पुष्कळ शिकलो. पुस्तक ही तशी आपल्या समाजाच्या दृष्टीनं कधीच ‘प्रायोरिटी’ची बाब नाही, ही ‘रिस्क’ विचारपूर्वक घेतली. आतून कुठं तरी ‘पुस्तक’ साद घालीत होतं. प्रकाशनाची मांडामांड केली खरी, पण ती पुढं नेटानं चालवणं इतकी सहजसोपी बाब मुळीच नव्हती. या क्षेत्रातील वारसा आणि ‘आयते व्यासपीठ’ नसल्यानं शून्यातून उभं राहताना मार्ग अडचणींचा, जागोजाग संघर्ष बहुपदरी. जीवघेणी मेहनत. आर्थिक ओढाताण. चढ-उतार पुष्कळ. त्या तुलनेत फळ मात्र यथातथाच! पण विचारधारा प्रबळ असल्यानं चिकटून राहिलो.

प्रकाशन हा मुळात खर्‍या अर्थानं सांस्कृतिक व्यवसाय. समाजमनाची सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक, सामाजिक, वैज्ञानिक अभिवृद्धी करणारा. त्यातून सांस्कृतिक आदानप्रदान घडणं अपेक्षित असतं. त्यामुळे एखाद्या विशिष्ट विषयावरील पुस्तकात व्यवसाय म्हणून फार पैसा मिळणार नसला तरी ते पुस्तक छापून येणं महत्त्वाचं असतं. ती त्या विषयाची जशी गरज असते, तशीच समाजाचीही! त्या विषयाचं ज्ञान वा विचार अभ्यासक- वाचकांपर्यंत (हा मर्यादित वर्ग असला तरीही) पोहोचवणं ही निकड असते. त्यामुळे केवळ पैसाच इतकं संकुचित लक्ष्य या व्यवसायात तरी अभिप्रेत नाही. ‘विचार आणि ज्ञान संप्रेषण’ हा या व्यवसायाचा मूलभूत पाया आहे. ‘लिहिणारा’ आणि ‘वाचणारा’ यातला समन्वयक म्हणून प्रकाशकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समन्वयकाची ही मूळ भूमिका बदलली तर त्या जागी केवळ ‘धंदेवाईक’ उरतो. त्यामुळे पैसा हे मुख्य टारगेट म्हणून स्वीकारलं तर हा व्यवसाय निव्वळ सांस्कृतिक उरत नाही, तर तो बाजार होतो. शब्दांची जागा आकडे बळकावतात आणि या आकड्यांत जीवनाचा अर्थ सामावलेले अर्थपूर्ण शब्द तसेच चांगली पुस्तकंही गुदमरतात. म्हणूनच काळाची पावलं नीट ओळखून त्याप्रमाणे वाचकाभिरुची विकसित करणारा प्रकाशक महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी स्वत: प्रकाशक उत्तम वाचक आणि उत्तम अभ्यासकही असावा लागतो. समाजातील होणार्‍या बदलांकडे बारकाईनं पाहून त्याप्रमाणे आवश्यक ती पुस्तकं वाचकांसमोर ठेवणं, ही प्रकाशकाची आद्य भूमिका आहे. याचा अर्थ आर्थिक बाजूकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं असा मात्र नव्हे. मोबाइल, समाजमाध्यमांनी लोकांना पुस्तकांपासून दूर नेलं, हे खरं. परंतु हीच समाजमाध्यमं विनाअडथळा आणि कमी श्रमात सर्वदूर लोकांपर्यंत पुस्तकं पोहोचवण्याच्या कामी उपयुक्तही ठरतात.

आज तंत्रज्ञानाच्या सोयींमुळे पुस्तक छापणं म्हटलं तर फारच सहजसोपी गोष्ट झालेली आहे, पण समजून-उमजून छापणं हे मात्र आज दिवसागणिक दुर्मीळ होत चाललं आहे. केवळ डीटीपी करून मुद्रितशोधकाकडून वाचून घेऊन उच्च प्रतीच्या कागदावर छापायला दिलं की झालं पुस्तक… इतकं ते वरवर नाही. मूळ हस्तलिखित वाचत असतानाच पुस्तकाचं दर्शनीरूप (त्याची मांडणी, आकार, कागद, मुखपृष्ठ) मनात आकार घेत असते. या प्रक्रियेत मजकुरावरील संपादनाचं (भाषा, व्याकरण, तपशील, संदर्भ, माहिती इत्यादी) काम अंतिमत: महत्त्वाचं ठरतं. या दृष्टीनं चांगलं काम होणं महत्त्वाचं असतं. ‘प्रेस्टिज प्रकाशन’च्या सर्जेराव घोरपडे यांनी निर्मिती, मांडणी आदींचा एक ठसा मनावर उमटवणारी मोजकीच, परंतु देखणी पुस्तकं केली. ‘प्रास प्रकाशना’च्या अशोक शहाणे यांनीही आशयविषय, आकार आदींच्या दृष्टीनं वैविध्यपूर्ण पुस्तकं केली. हे पाहता ‘हर्मिस’नं संख्येनं कमी, पण चांगली पुस्तकं प्रकाशित करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर पुरेसा वेळ देऊन चांगलं काम करणं याबाबत चालढकल केलेली नाही. त्यामुळे दर्जा जपला गेला. व्यक्तिमत्त्व विकास, पाककृती, अमुक कसं करावं, तमुक कसं करावं, धार्मिक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी, देवदेवस्की वगैरे हमेशा उठणार्‍या लाटांमध्ये वाहवून ‘धंदा’ केला नाही. अश्लीलता, समाजविघातक वगैरेला पुष्टी देणारंही छापलं नाही. पैशाच्या आहारी जाऊन कुठल्याही उथळ ‘ट्रेंड’ला हर्मिस बळी पडलेली नाही. समाजमन घडवणार्‍या, विचारप्रवृत्त पुस्तकांचं ‘हर्मिस’नं कायम स्वागतच केलं. समाज पुढं जायला मदत होईल अशा अलक्षित विषयांवरील पुस्तकं मात्र नफ्यातोट्याचा विचार न करता प्रकाशित केली. उदा. ‘साने गुरुजी जीवन परिचय’ (यदुनाथ थत्ते), ‘लढता लढता केलेल्या चिंतनातील काही’, ‘बहुजन स्त्रीवाद’ (विलास सोनवणे), ‘परामर्ष’ (भा. ल. भोळे), ‘मराठी शब्दलेखनकोश’(यास्मिन शेख), ‘देशीवादाचे दुश्मन’ (अशोक बाबर), ‘भूमी आणि भूमिका’ (भास्कर चंदनशिव), ‘पु. शि. रेगे यांच्या कवितेचा शोध’ (राजशेखर शिंदे), ‘व्यंकटेश माडगूळकर- व्यक्ती आणि विचार’, ‘वि. रा. शिंदे यांच्या कार्याचे पैलू’ (गो. मा. पवार), ‘दलित पँथरचा झंझावात’ (जयदेव गायकवाड), ‘अनुवाद : तंत्र आणि आव्हाने’ (गोरख थोरात), ‘क्रांतिकारी सत्यशोधक : शरद पाटील’ (रमेश चव्हाण), ‘जॉर्ज नेता, साथी, मित्र’ (जयदेव डोळे), ‘कथात्म साहित्य आणि चित्रपट रूपांतर प्रक्रिया’ (बालाजी घारूळे), ‘काळे-पांढरे अस्फुट लेख’ (अनिकेत जावरे), ‘भारताचे क्रांतिसंविधान’ (यशवंत मनोहर), ‘निवाड्याचा ठाव’ (सदानंद मोरे), ‘संत परंपरा आणि कृषिसंस्कृती’ (वामन जाधव), ‘संतविचारांची मौलिकता’ (अशोक लिंबेकर), ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ (अजय कांडर), ‘क्रांतिवीर राघोजी भांगरे’ (तुकाराम रोंगटे), इत्यादी. नव्या-जुन्या पिढीतील आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील शेकडो लेखकांची पुस्तकं केली.

एक तर महाराष्ट्रात ललित-वैचारिक साहित्य विक्रीची दुकानं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. पूर्वीची दुकानं हळूहळू बंद पडू लागली आहेत. अशात ‘नोटाबंदी’चा फटका प्रकाशन व्यवसायालाही बसला. यातून सावरतो ना सावरतो तो जीएसटी आणि मग करोनानंतरची टाळेबंदी असे एकानंतर एक आघात झाले. त्यात वाढत्या महागाईनं निर्मिती खर्चातही मोठी वाढ झाली. त्यामुळे पुस्तकांच्या किमती अपरिहार्यपणे वाढल्या. आधीच्या काटकसरीत आणखी भर पडली. परिणामी, विक्रीवर याचा पुष्कळ अंशी परिणाम झाला. करोनानं समाजाच्या, व्यक्तीच्या गरजा ठळकपणे अधोरेखित केल्या. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं पुस्तक हे तसंही अत्यावश्यक गरजेच्या यादीत खालीच होतं. तो क्रमही करोनानंतर पुष्कळच खाली तळाला घसरला.

गेल्या सोळा वर्षांत कसल्याही अनाठायी स्पर्धेपासून दूर राहिलो. विचारधारा आणि त्यापासून येणार्‍या नैतिकतेचं एक बंधन घालून घेतल्यानं कोणी काहीही करो, आपली चांगुलपणाची वाट सोडायची नाही हे पक्कं ठरलेलं. त्यामुळे अन्य प्रकाशकांशी स्पर्धा करणं, आमिषं दाखवून त्यांचे लेखक पळवणं, विषय चोरणं, परवानगीशिवाय लेखन छापून स्वामित्व हक्कांचं उल्लंघन करणं, शह-काटशहांचं राजकारण करणं, इत्यादी गोष्टींपासून दूर राहिलो. व्यावसायिक नीतिमत्तेचं पालन कधीही चांगलंच, शेवटी चांगलं कामच उरतं.

‘हर्मिस प्रकाशन’च्या वतीनं दरवर्षी ‘परंतु’ हा सामाजिक वैचारिक प्रबोधनपर विषयांवर दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. आतापर्यंत ‘म. गांधी व लोहिया’ (२०२१), ‘अलक्षित समाजसुधारक’ (२०२३), ‘माणुसकी आणि मानवता’ (२०२४), ‘कस्तुरबा गांधी’ (२०२५) या विषयांवर दिवाळी विशेषांक केले. पहिला अंक लोकांच्या देणगीतून उभा राहिला. जाहिरातींचा हातभार जवळपास नसल्याने पुढील अंक पदरमोडीतून केले. ‘दरवर्षी किमान चांगलं काही कसदार वैचारिक वाचायला मिळेल असा अंक कर, आम्हीही हातभार लावतो,’ असं अनेक मित्रमंडळींचं सांगणं होतं. त्यामुळे ‘परंतु’कडे आर्थिक लाभ म्हणून कधीच पाहिलं नाही. लेखक मंडळींनीही मन:पूर्वक सहकार्य दिलं. आता अंक लोकांमध्ये उत्तमरीत्या पोहोचत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून वाचकांकडून दिवाळीच्या आधीच नोंदणी होत आहे, ही समाधानाची गोष्ट.

प्रकाशनाच्या क्षेत्रात एक ठाम विचारधारा अंगीकारून काम करायचं म्हटलं की अडथळे पुष्कळ येतात. कष्ट भरपूर घ्यावे लागतात, मात्र तग धरून नेटानं काम करत राहणं आवश्यक असतं. एक दिवस या कष्टाचं चीज होतंच होतं. समाज अशा प्रामाणिक प्रयत्नांची दखल निश्चितपणे घेतो, हा अनुभव आहे. ‘तू केलेल्या पुस्तकांमध्ये शक्यतो चुका नसतात किंवा जाणीवपूर्वक शोधायच्या म्हटल्या तरी हाती फार काही लागत नाही. त्यातून तुझे कष्ट आणि पुस्तकाबद्दलची विश्वासार्हता दिसते.’ हा अभिप्राय विचारांच्या क्षेत्रातील ज्येष्ठ देतात तेव्हा बळ वाढतं.

विज्ञान, ललित, वैचारिक, समीक्षा, माहितीपर, वाङ्मयीन, कोश असं विषयवैविध्य आम्हाला ठेवता आलं. आजचा काळ गुणवत्तेपेक्षा संख्येला महत्त्व देणारा आहे. भारंभार पुस्तकं छापणारेही लोक आहेत. एकीकडे संख्या वाढतेय; परंतु ‘दर्जा’ मात्र दिवसागणिक तोळामासानं कमी होत आहे. ‘संख्या आणि दर्जा’ यांतला अनुबंध योग्य अन्वयानंच साधता येऊ शकेल हा थोडा दूरचा, पण चांगला मार्ग आहे. एक प्रकाशक म्हणून आपण वाचकाकडे ‘वाचक’ म्हणून पाहणार की ग्राहक म्हणून पाहणार आहोत, यावरून प्रकाशनाची दिशा बदलते.

आजचं वास्तव पाहता एक संपादक-प्रकाशक म्हणून आपण वाचकांना सुज्ञ करतो आहोत की भ्रम आणि आभासाच्या माध्यमातून अज्ञ ठेवत केवळ आपला गल्ला भरत आहोत, हा प्रश्न पार्श्वसंगीताप्रमाणे जाणीव-नेणिवेत सतत गुंजत राहिल्यानं एकप्रकारचा नैतिक अंकुश सतत राहतो, राहिला पाहिजे!

sldpm2256 @gmail.com