कुंभातील ‘अर्थ’

केशव जाधव.. तपोवनात साधुग्राम वसवण्यासाठी प्रशासनाने भूसंपादन केले, त्यात जाधवांचीही जमीन घेतली.

कुंभमेळ्याने आर्थिक उलाढालींना येणारा वेग चितारणारा लेख..
केशव जाधव.. तपोवनात साधुग्राम वसवण्यासाठी प्रशासनाने भूसंपादन केले, त्यात जाधवांचीही जमीन घेतली. अनेक वर्षे तपोवनात लक्ष्मण मंदिरासमोरील झाडाखाली मक्याची भाजलेली कणसे विकण्याचा त्यांचा धंदा. सिंहस्थ सुरू होण्याआधी पोतेभर कणसे चार-पाच दिवसही संपत नसत. तिथे आता दिवसाला एक पोते लागते. दहा ते पंधरा रुपयांना भाजलेले कणीस ते विकतात. पोत्यात सुमारे पंचाहत्तरच्या वर कणसं असतात. म्हणजे सरळसरळ व्यवसायात दुपटीहून अधिक वाढ. हे सारे कशामुळे? तर सिंहस्थामुळे!
रामदास शिंदे.. तपोवनाच्या बाजूला संत जनार्दन स्वामी आश्रम परिसरात शिंदे यांची चहाची हातगाडी. परिसरातील गॅरेजवर थांबणारे ट्रकचालक आणि मजूर हे त्यांचे नित्याचे गिऱ्हाईक. आजूबाजूला लॉन्स व मंगल कार्यालये भरपूर असल्याने लग्नाच्या मोसमात धंद्याला बरकत असते. इतर वेळी जेमतेम कमाई. सिंहस्थाची लगबग सुरू झाली आणि शिंद्यांच्या धंद्याचे रूपच पालटले. परिसरात अनेक आखाडय़ांचे मंडप सजू लागले. त्यासाठी राबणारे मजूर चहासाठी शिंद्यांच्या गाडीवर येऊ लागले. एकटय़ाचे बळ कमी पडू लागल्याने त्यांनी आठवडय़ापूर्वी दोन मुले चहा देण्याच्या कामाला लावली. धंदा एकदम जोशात आला. पर्वणी जवळ येईल तसा धंदा अधिकच वाढेल, हा त्यांचा अंदाज. हे सारे कशामुळे? तर सिंहस्थामुळे!
कुंभमेळ्यामुळे नाशकातला व्यापारउदीम, व्यवसाय, उद्योगांना कसा लाभ होतो आहे, याची ही छोटीशी उदाहरणे. जितका पैसा सिंहस्थासाठी खर्च होतो आहे, त्यापेक्षा कितीतरी पट तो वसूल होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक व व्यापार-उद्योगांचा अभ्यास करणाऱ्या संस्था-संघटनांकडून यासंबंधीचे अहवाल प्रसिद्ध होत आहेत.
‘द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया’तर्फे अलीकडेच ‘महाकुंभमेला : रेव्हेन्यू जनरेशन, रिसोर्सेस फॉर महाराष्ट्र’ हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार, सिंहस्थ राज्य शासनाच्या गंगाजळीत तब्बल दहा हजार कोटी वा त्यापेक्षा अधिक भर घालणार आहे. कुंभमेळ्यातील रोजगार संधी व होणाऱ्या व्यवसायाचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला गेला आहे. कुंभमेळ्याच्या विविध कामांवर केंद्र व राज्य शासनाकडून २३७८ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. एका धार्मिक सोहळ्यासाठी एवढा निधी खर्च करण्याची गरज आहे का, असा प्रश्न कोणाही सूज्ञाच्या मनात येणं स्वाभाविकच. परंतु धार्मिकता बाजूला ठेवून निव्वळ व्यवहार म्हणून जरी सिंहस्थाकडे पाहिले तरी तो फायदेशीरच ठरणार असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते. सिंहस्थामुळे विविध व्यवसायांत किमान साडेचार लाख लोकांना रोजगार मिळेल.
१५ जुलैपासून सुरू झालेला हा सिंहस्थ ११ ऑगस्ट २०१६ पर्यंत चालणार आहे. वर्षभर गोदावरीत स्नानासाठी अनेक तिथी पुरोहित संघाकडून जाहीर झाल्या असल्या तरी आर्थिक कुंभासाठी सिंहस्थास सुरुवात झाल्यापासूनचा अडीच महिन्यांचा कालावधी अधिक महत्त्वपूर्ण. कारण या काळातच तीन शाही स्नान म्हणजेच पर्वणी होणार आहेत. त्यासाठी एक कोटीहून अधिक लोक नाशिकमध्ये येण्याचा अंदाज आहे. परदेशातूनही भाविक, पर्यटक, धर्मानुयायी व अभ्यासक येतात. रोजगाराच्या अनेक संधीही ते सोबत घेऊन येतील. केवळ हॉटेल उद्योगाचे उदाहरण घेतल्यास नाशिकमध्ये एरवी ५५ ते ६० टक्के बुकिंग होते; परंतु पर्वणीकाळात १०० टक्के बुकिंगची अपेक्षा आहे.
‘असोचॅम’च्या या अहवालास अनुकूल असे काही मुद्दे व्यापार आणि उद्योग क्षेत्राकडून मांडण्यात येत आहेत. सिंहस्थामुळे देशभरात सुमारे १५ हजार कोटींची उलाढाल होण्याची शक्यता असून अनेक व्यवसाय व उद्योगांना त्यामुळे उर्जितावस्था प्राप्त होईल. हॉटेल, विमान व रेल्वेसेवा, रस्ता-वाहतुकीची साधने, पर्यटन, पेट्रोल व डिझेल या क्षेत्रांत अधिक पैसा खेळू शकतो. परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून सुमारे दोन हजार कोटींचे परकीय चलन देशास मिळू शकेल. येणाऱ्या भाविकांपैकी ५० टक्के लोकांचा हॉटेलमधील खानपान आणि लॉजमधील निवासाचा प्रती व्यक्ती खर्च कमीत कमी पाच हजार रुपये जरी गृहीत धरला, तरी पर्वणीकाळातल्या प्रचंड आर्थिक उलाढालीची कल्पना येऊ शकेल. ‘द असोसिएशन ऑफ बार्स हॉटेल्स अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, नाशिक’ या संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी हा हिशेब मांडला. नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे २०० हॉटेल्स असून त्यांत साडेतीन हजारहून अधिक रूम्स आहेत. बहुतांश हॉटेलमालकांनी दरांमध्ये किमान दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाचा गल्ला केवळ दोन-अडीच महिन्यांत दीडशे कोटींवर जाऊ शकतो.
या गर्दीमध्ये सर्वच भाविक असतील असे नव्हे. त्यामुळे यातले दोन-पाच टक्के जरी आपल्याकडे वळवू शकलो तरी आपला फायदाच होईल, या हेतूने ‘वाईन कॅपिटल’चे सदस्य कामाला लागले आहेत. ऑल इंडिया वाईन प्रोडय़ुसर्स असोसिएशनचे मनोज जगताप यांच्या दाव्यानुसार, वाईन आणि नाशिक सिटी टूरसाठी त्यांच्याकडे अनेक विदेशी पर्यटकांनी नोंदणी केली आहे. वायनरींमध्येच त्यांची खाण्यापिण्यासह निवासव्यवस्था होणार आहे. एरव्ही पावसाळी हंगाम वाईन टूरसाठी मंदीचा असतो. परंतु सिंहस्थामुळे त्यात २५ टक्के वाढ होईल असा अंदाज आहे. सिंहस्थात किमान लाखभर तरी विदेशी पर्यटक येऊ शकतात. ते केवळ नाशिकलाच थांबतील असे नाही, तर देशभरातही फिरतील. तीन वा चार दिवसांचा त्यांचा सरासरी खर्च दोन लाख रुपये गृहीत धरला तरी दोन हजार कोटींचा व्यवसाय त्यांच्यामुळे होईल. ‘ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम ऑपरेटर्स ऑफ नाशिक’चे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनीही यास दुजोरा दिला. जिल्ह्यात १४५ पर्यटन संयोजक असून त्यापैकी ७२ या संस्थेचे सदस्य आहेत. नाशिकला सिंहस्थानिमित्त येणारे भाविक शिर्डी, सप्तशृंग गड, शनिशिंगणापूर, सापुतारा, तोरणमाळ अशा ठिकाणी जाऊ शकतात. त्यांच्यासाठी त्या- त्या ठिकाणानुसार पाच हजार ते पुढे टूर पॅकेजचे नियोजन आहे.
याशिवाय दूध, भाजीपाला, पाणी आदी अनेक अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा करणारेही वाहत्या गंगेत हात धुऊन घेतील. या सगळ्याचा विचार करता हा सिंहस्थ नाशिकसाठीच नव्हे, तर देशासाठीही ‘अर्थ-कुंभ’ ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: High speed of financial turnover in kumbh festival

Next Story
अभेद्य तरीही दुर्लक्षित गोपाळगड