सूक्ष्मदर्शकाच्या भिंगातून दिसणारं विश्व अतिसूक्ष्म असतं; परंतु त्या विश्वाचा ध्यास घेणार्‍या माणसाचं स्वप्न मात्र आकाशाएवढं विशाल असू शकतं. अनुराधा परब लिखित ‘जीनियस जेम डॉ. जीएम’ हे पुस्तक वाचताना ही जाणीव पानागणिक अधिक सखोल होत जाते. ‘माणसाचं मोठेपण जन्माने ठरत नाही, ते कर्माने ठरतं’- हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो; पण त्याचा जिवंत पुरावा समोर उभा राहतो तेव्हाच त्या वाक्याला खरं वजन येतं. हायमीडिया या कंपनीचे संस्थापक डॉ. गंगाधर मोतीराम वारके हे असंच एक वजनदार उदाहरण.

जळगाव जिल्ह्यातल्या पिळोदे बुद्रुक या हजारभर वस्तीच्या गावापासून सुरू झालेली ही वाट आज दीडशेहून अधिक देशांत तीस हजारांवर जैववैज्ञानिक उत्पादनं पाठविणार्‍या ‘हायमीडिया’पर्यंत जाऊन पोहोचते. दोन टोकांमधलं अंतर नकाशावर मोजता येईल; पण ते ओलांडण्यासाठी लागलेली जिद्द मोजण्याचं एकच साधन असतं- असा प्रामाणिक चरित्रग्रंथ. विशेष म्हणजे यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचूनही त्यांच्या पावलांना लागलेली मातीची ओल कधीच आटलेली नाही. या वाटेवरचा प्रत्येक टप्पा स्वतंत्र प्रकरणाचा विषय ठरावा असा आहे; तरीही मला विशेष भावला तो संशोधनकाळाचा टप्पा. नोकरी सांभाळून उरलेल्या वेळातले सहा-सात तास आणि शनिवार-रविवारचे प्रत्येकी चौदा तास- हे आकडे केवळ श्रमाचे नाहीत, ते प्राधान्यक्रमाचे आहेत.

ऐन तारुण्यात आजूबाजूला आकर्षणांची कमतरता नव्हती; पण ‘क२ः’ं३्रःल्ल ःऋ ाः’्रल्ल्रू अू्रि ऋ१ःे उ८३ःस्र्ँंॠं’ या तोवर अस्पर्श राहिलेल्या विषयाला भिडलेल्या या तरुणाने विरंगुळ्याचं जग स्वत:हून दृष्टिआड केलं. परदेशी भाषेच्या अटीसाठी शिकवणी बंद पडल्यावर शब्दकोश विकत घेऊन घरच्या घरी फ्रें च शिकणं आणि त्यासाठी कंपनीतून वीस दिवसांची रजा टाकून अभ्यासाला बसणं- ही ध्यासाची व्याख्या कोणत्याही पाठ्यपुस्तकात सापडत नाही. आणखी एक जागा मुद्दाम नोंदवाविशी वाटते. ‘‘सुरुवातीला ते पिवळं रंगद्रव्य ‘रायबोफ्लेविन’ असावं या अंदाजाने सहा महिने काम झालं आणि अखेर अंदाज चुकल्याचं लक्षात आलं.’’ संशोधकाची खरी कसोटी शोध लागण्यात नसते; ती आपला अंदाज चुकल्याचं मोकळेपणाने मान्य करून दिशा बदलण्यात असते. ‘‘डॉ. सलिम धाला या मार्गदर्शकांनी आणखी दोन-तीन प्रयोग करून बघण्याची सूचना केली’’, तेव्हा आश्चर्य वाटूनही ती शिरोधार्य मानण्यातली नम्रता- हा या चरित्राचा नैतिक गाभा आहे.

घरातून मिळालेली माणसं जोडण्याची ही शिकवण पुढे उद्योगातही त्यांची सोबत सोडत नाही. माणसं ओळखणं, नाती जपणं, सहकार्‍यांवर विश्वास ठेवणं आणि प्रत्येकाला मोठं होण्यासाठी अवकाश देणं- ही डॉ. जीएम यांच्या नेतृत्वाची खरी शक्ती आहे. असंख्य सहकार्‍यांच्या श्रमांचा ते ज्या आत्मीयतेने स्वीकार करतात, त्यातून त्यांच्या यशाचा मानवी गाभा स्पष्ट होतो. सायटोफागा या सूक्ष्मजीवांवरील मूलभूत संशोधनापासून औद्योगिक उत्पादननिर्मितीपर्यंतची त्यांची वाटचाल म्हणूनच विज्ञानाच्या सामाजिक उपयोजनाचा वस्तुपाठ ठरते. संशोधनातून मिळालेली अचूकतेची शिस्त त्यांनी उत्पादननिर्मितीत जशीच्या तशी उतरवली आणि पूर्णपणे आयातीवर अवलंबून असलेल्या सूक्ष्मजीवांच्या अन्नमाध्यमांच्या – म्हणजेच कल्चर मीडियाच्या- क्षेत्रात भक्कम स्वदेशी पर्याय उभा केला.

अपयशी प्रयोगांतूनही न विझणारी जिज्ञासा हेच पुढच्या सर्व यशाचं मूळ भांडवल ठरलं. इतके कष्ट उपसणार्‍या माणसाच्या पाठीशी काही माणसं मूकपणे उभी असतात; त्यांच्या त्यागाची नोंद इतिहास सहसा घेत नाही. हे पुस्तक ती नोंद अतिशय संयतपणे घेतं. स्वत:चं शिक्षण बाजूला ठेवून भावाच्या शिक्षणाला आर्थिक आधार देणारे थोरले बंधू त्र्यंबक वारके, धाकट्या विष्णूची अनमोल साथ आणि लग्नाच्या सात फेर्‍यांपासून आयुष्यभर पावलावर पाऊल टाकणार्‍या सरोजताई या तिघांच्या त्यागाशिवाय हे शिखर उभं राहिलं नसतं. लेखिकेने या ऋणाची नोंद अकृत्रिमपणे घेतली आहे आणि तीच नोंद या चरित्राला निव्वळ यशोगाथेच्या पलीकडे नेते.

मर्यादित साधनांत रुजलेलं उद्योगाचं ते छोटंसं बीज पुढे हायमीडिया लॅबोरेटरीजच्या विशाल वटवृक्षात रूपांतरित झालं — सुरक्षित नोकरीचा त्याग करून स्वीकारलेल्या जोखमीचं हे फळ आहे. या दोन धारांचा संगम नेमका कुठे होतो हे कोविडच्या आरंभीच्या भीषण काळाने अवघ्या देशाला दाखवून दिलं. व्हायरल ट्रान्सपोर्ट माध्यमं आणि निदानासाठी आवश्यक साधनांचा अखंड पुरवठा करण्याची जबाबदारी देशाने ज्यांच्यावर सोपवली, त्यामागे अर्धशतकाची तपश्चर्या उभी होती. त्या काळात उद्योगाचा अर्थ केवळ उत्पादन किंवा उलाढाल नव्हता; तो होता जबाबदारी, राष्ट्रसेवा आणि असंख्य जीवांप्रती असलेली बांधिलकी. संकटाच्या क्षणी विज्ञान, उद्योग आणि माणुसकी एकत्र उभी राहिली, तर अशक्य वाटणारं कार्यही शक्य होतं- हा विश्वास हायमीडिया परिवाराच्या त्या कामगिरीतून दृढ होतो.

गुंतागुंतीचं सूक्ष्मजीवशास्त्र आणि उद्योगविश्वातील बारकावे अवाजवी सुलभीकरण न करता सुबोध करणं, गौरव करतानाही वास्तवाचा पोत न हरवणं, वैज्ञानिक तपशिलात मानवी स्पंदन जागं ठेवणं आणि संघर्षाला नाट्यमयता देतानाही सत्याशी प्रामाणिक राहणं- ही त्यांच्या लेखनकौशल्याची उल्लेखनीय वैशिष्ट्यं आहेत. चरित्रनायकाचा पुतळा न करता माणूस उभा करणं आणि तरीही आदराचा अंतर्प्रवाह अखंड ठेवणं, ही त्यांच्या लेखणीची खास ओळख. साडेतीनशे पानांच्या या ग्रंथात कुठेही अलंकाराचा अतिरेक नाही; तपशील मात्र पानोपानी विश्वासार्ह आहेत. संकटात संधी कशी शोधावी, गुणवत्तेशी तडजोड न करता उद्योग कसा वाढवावा, ज्ञानाला बाजारपेठेशी आणि व्यवसायाला समाजहिताशी कसं जोडावं, तसंच तंत्रज्ञानाइतकीच मानवी नाती का महत्त्वाची असतात – यांची उत्तरं या चरित्रात सहज सापडतात.

भांडवलापूर्वी चिकाटी लागते, यशापूर्वी अपयशाचं वाचन करावं लागतं आणि प्रलोभनं टाळण्याची किंमत मोजल्याशिवाय ध्येय गाठता येत नाही- हे धडे इथं उपदेशाच्या स्वरूपात येत नाहीत, ते अनुभवाच्या स्वरूपात येतात. म्हणूनच ते मनात खोलवर रुजतात. उद्योजक, संशोधक, व्यवस्थापक आणि विद्यार्थी या सार्‍यांसाठी हे पुस्तक विशेष मौल्यवान ठरतं. मराठीत विज्ञान आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांना एकत्र सामावून घेणारी चरित्रं अभावानेच दिसतात. समाजात उद्यमशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वाचे संस्कार रुजवणारी पुस्तकं प्रकाशित करणं ही केवळ प्रकाशनव्यवहारातील कामगिरी नसून भावी पिढ्यांसाठी केलेली सांस्कृतिक गुंतवणूक आहे.

डॉ. गिरीश ब. महाजन
‘जीनियस जेम डॉ. जीएम’,
अनुराधा परब, रोहन प्रकाशन,
पाने- ३५६, किंमत- ४२५ रुपये.