– मुक्ता बाम
सामाजिक जाणिवा ठळक करत बहरणारी ही प्रेमकहाणी. मात्र ही हीनाकौसर खान लिखित कादंबरी फक्त सुमित-नाझियाच्या प्रेमाची गोष्ट नाही. दोन स्वभाव, विचार, प्रवृत्ती, धर्म आणि आपल्या मनातल्या अढींना स्पर्श करत मन मोकळं करणारी ही गोष्ट आहे.
सुमित, नाझिया आणि त्यांची मित्रमंडळी ही सर्व विशीतली, पत्रकारितेच्या अथवा इतर माध्यमांतून काहीतरी सामाजिक जाणिवा असलेलं काम करू पाहणारी. त्यात रोझ आहे, चिंतामणी आहे आणि असादही. मात्र हा ‘सर्वधर्मसमभाव’ कुठेही नाटकी न वाटता ही पात्रं एकमेकांमध्ये मिसळून गेलेली दिसतात. एका मॉलला लागलेल्या आगीच्या निमित्ताने आपण सुमित-नाझियाच्या जगात प्रवेश करतो. दोघांच्याही ‘अरे’ला ‘कारे’ करण्यातून त्यांचं नातं उमलत जातं. त्यातही नाझियाची आणि सुमितची गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी कशी वेगळी आहे हे त्यांच्या बातम्यांमधून जाणवत राहतं. तरीही, एकमेकांबद्दल वाटणारी ओढ आणि गैरसमजांचा तिढा सोडवत ते एकत्र येतात का? याची ही कथा. प्रेमाची आणि तितकीच आपल्या समाजाचीही.
कोणत्याही समाजाला एकसाची प्रतिमांमध्ये गुंतवणं कायमच सोपं असतं. राजकीय फायद्यासाठी हा एक भाग झाला, मात्र कला/सांस्कृतिक विश्वातही एका ठरावीक साच्यापलीकडे मुस्लीम आणि हिंदूही पात्रनिर्मिती होताना दिसत नाही. ‘या धर्माचा असूनही तो असा आहे’ अशी अपवाद दर्शवणारीच पात्रयोजना दोन्हीकडून होत राहते. ‘इत्रनामा’ मात्र अस्सल हाडामांसाची माणसं उभी करते. मात्र त्यांच्या माणूस म्हणून प्रवृत्ती मोठ्या झाल्या म्हणून त्यांच्या जडणघडणीतलं धर्माचं स्थान अधोरेखित करताना लेखिका हात अखडता घेत नाही हे विशेष. कोणताही माणूस त्याची मूळ प्रवृत्ती आणि त्याची जडणघडण, निसर्ग आणि पालनपोषण याची सरमिसळ होऊन घडत जातो. अशी घडलेली पात्रं या कादंबरीत असल्याने ती कुठेही खोटी वाटत नाहीत. क्वचित, जास्त आदर्शवादी वाटतात पण ते चित्रणही ‘असं हवं’ हा आशावाद निर्माण करणारं आहे.
प्रेम कोणत्याही जाती-धर्माहून मोठं असतं हा आजवर पाहत आलेल्या प्रत्येक प्रेमपटाचा मुख्य बिंदू असे. हे खरं आहेच. मात्र ते तितकं सहज-सोपं आहे का? प्रेम व्यक्त करून जेव्हा ही दोन धर्माची माणसं एकत्र येतात तेव्हा त्यांना कोणत्या सांस्कृतिक जाणिवा बांधून ठेवतात? कुठे अडथळे येतात? हा अत्यंत महत्त्वाचा भाग फार क्वचितच कला-साहित्याच्या माध्यमातून पुढे येतो. ही कांदबरी थेटपणे त्यावर भाष्य करते, अनेक अवघड संभाषणं उलगडून दाखवते आणि तरीही अंतिमत: प्रेमाचा विजय करते. ही जाणीव आणि नवेपणा मनाला भिडतो. अर्थात अस्वस्थही करतो.
या कथेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारितेचं जग असणं फारच पूरक ठरतं. त्यामुळे या पात्रांची तत्त्वं आणि समाजभान विकसित असल्याची खात्री पटते. अर्थातच त्यांच्यातले विसंवादही भांडण नाही तर चर्चेच्या पातळीवर जातात. लेखिकेनं हे जग जवळून अभ्यासलं आहे हेही अगदी ठळकपणे दिसून येतं. बातमी करण्याची साधी प्रक्रियाही किती सूक्ष्म पद्धतीने पत्रकारानुसार बदलत जाते हे वाचणं रंजक आहे. एक असा विचार मनात येऊन गेला की जरी वेगळ्या संस्कारांचं हे द्वंद्व नव्याने पुढे येत असलं तरी त्यासाठी निवडलेली पार्श्वभूमी संवादालाच पूरक आहे. प्रश्न सुटण्याला पूरक आहे. त्यामुळे कितीही टोकाचा प्रसंग आला तरी तो अटीतटीचा वाटत नाही. दोघांचीही चर्चा करण्याची क्षमता व कुवत आहे याची खात्री असल्यामुळे वाचक गुंतून पडला तरी त्या प्रसंगात उतरत नाही. हीच कहाणी एका वेगळ्या पटलावर घडली असती तर? पत्रकारितेनं दिलेला समंजसपणा नसतानाही शेवटी माणसं एकत्र येऊन संवाद साधू शकतात असं काही घडलं असतं तर? अधिक अकृत्रिम, कमी शिक्षित – जो वर्ग सहज भडकवला जाऊ शकतो अशा माणसांत हे घडलं असतं तर? असा एक विचार मनात येऊन गेला. ही कथा अशा प्रकारे फक्त चर्चेला पोषक वातावरणातच होऊ शकत असेल. हाही खेदजनक विचार मनात येऊन गेला.
सुमित-नाझिया आणि त्यांना साहाय्य करणारी मित्रमंडळी, नायकावर अव्यक्त प्रेम करणारी एक मैत्रीण, नायकाला प्रतिस्पर्धी वाटणारा नायिकेचा मित्र – ही अगदी तद्दन व्यावसायिक पात्रयोजना असली तरी व्यक्तिरेखा-वातावरण-विचार या पातळीवर त्यांचं अस्सल वेगळेपण कादंबरीला नवेपणा देतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोवतालचं वातावरण प्रेमकथा पुढे जाते तसं मागे पडत नाही. उलट त्या कथेचा अविभाज्य भाग होत जातं. आसपासची परिस्थिती – घटना यांचा कळत-नकळत कधी आपल्यावर, आपल्या विचारांवर परिणाम होतो तर कधी तो थेटपणे आपल्या वागण्यातही उतरतो. घडणाऱ्या घटना या दोन्ही प्रकारे पात्रांवर व कथेवर परिणाम करतात हे विशेष. सामाजिक पटलावर ही कहाणी घडत असली तरी ती आहे प्रेम-कहाणीच. हा समतोल चांगल्या प्रकारे साधला गेला आहे. नाझियाचं बातमीत गुंतणं आणि सुमितचा तटस्थपणा तर सुमितचं नाझियात गुंतणं आणि तिचा तटस्थपणा ही जुगलबंदी कादंबरीला रंजक करते.
‘इत्रनामा’, – हीनाकौसर खान, रोहन प्रकाशन, पाने – २४०, किंमत – ३५० रुपये.
writing.quill.mukta@gmail.com
