‘लोकरंग’मधील (१२ जुलै) ‘हिंसेचे प्रतिध्वनी’ हा अंजली चिपलकट्टी यांचा लेख वाचला आणि मन सुन्न झाले. नागरिक म्हणून हतबलता व्यक्त करण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही या गोष्टीचे वैषम्य वाटते. सध्याच्या अघोषित आणीबाणीसारख्या वातावरणात हा लेख लिहिला गेला याचे माझ्यासारख्या व्यक्तीला निश्चितच कौतुक वाटते. लेखातील शेवटचा परिच्छेद फार महत्त्वाचा आहे. विशेषत: शेवटचे वाक्य, ‘‘त्यांच्याबाबत इतरांमध्ये नैतिक अलिप्तता तयार व्हावी असं ‘नॅरेटिव्ह’ सत्ताधारी रचतात ही हिंसेची पहिली पायरीच असते, इतकं ओळखता आलं तरी सध्या पुरे.’’- निशिकांत मुपीड, मुंबई

उत्तम विश्लेषण

‘लोकरंग’मधील (१२ जुलै) ‘हिंसेचे प्रतिध्वनी’ हा अंजली चिपलकट्टी यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वीची वृत्तपत्रे पाहिली आणि आजची पाहिली तर अशाप्रकारच्या हिंसेमध्ये वेगाने झालेली वाढ अत्यंत काळजी करण्याजोगी आहे. त्यामागच्या सामाजिक, राजकीय, तंत्रज्ञान विषयक कारणांबरोबरच बदललेले कौटुंबिक जीवन हेही एक मोठे कारण आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यावर मात करण्यासाठी मार्ग दिसत नाही. सारे चित्र निराशाजनक आहे. अशी परिस्थिती जगात कोठेही कधी आल्याचा इतिहासात उल्लेख सापडतो का आणि तेव्हा मग पुढे काय घडले याचा शोध घ्यायला हवा.- डॉ. सुभाष काळे, पुणे</strong>

हिंसेची योग्य कारणमीमांसा

‘लोकरंग’मधील (१२ जुलै) ‘हिंसेचे प्रतिध्वनी’ या अंजली चिपलकट्टी यांच्या लेखात हिंसा माणूस कशी, कधी सामान्य ठरवतो याचे विश्लेषण फार छान पद्धतीने केले आहे. या सर्वांविषयी समाजात हळूहळू जी बधिरता येत आहे ती भयावह आहे. पण लेखिकेने याची कारणमीमांसा खूप सोपी करून सांगितली आहे. लेख वाचतानाही काळजी वाटते की हे कसं आणि कधी सुधारेल.- डॉ. प्रतिभा जोशी, पुणे

भयाण वास्तवाची जाणीव

‘लोकरंग’मधील (१२ जुलै) ‘हिंसेचे प्रतिध्वनी’ हा अंजली चिपलकट्टी यांचा लेख वाचला. केवळ अप्रतिम, उद्बोधक आणि भयाण वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. लेखातील शेवटचे दोन परिच्छेद सध्याच्या परिस्थितीची नेमकी जाणीव करून देणारे आहेत.- पांडुरंग पानगांवकर

हिंसावाढीचे उत्तर

‘लोकरंग’मधील (१२ जुलै) ‘हिंसेचे प्रतिध्वनी’ हा अंजली चिपलकट्टी यांचा लेख वाचताना वाढलेल्या हिंसेचे नॉर्मलाइजेशन का होत आहे याचे उत्तर शोधता आले. भवतालातून हिंसा दहशतीचे होणारे निरीक्षण, त्याची पुनरावृत्ती आणि अशा वर्तनाला मिळणारी प्रतिष्ठा यांचे तरुणांच्या मेंदूवर सखोल परिणाम होतात हे समस्येचे मूळ आहे. हिंसेला नैतिक अधिष्ठान देणे, याचे प्रमाण खूप वाढले आहे. बदलापूर लैंगिक शोषण केसमध्ये एन्काउंटर करून शासनाने तो विषय कायमचाच मिटवला असे समाजमन तयार करण्यात आले. लेखाच्या शेवटी समाजाची नैतिक अलिप्तता स्पष्ट मांडली आहे.- सुयोग अनंतराव झुटे