भ्रमयुगातला इतिहास

सध्या इतिहासातल्या गोष्टी उकरून काढून त्यांना नवी उकळी देण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत.

श्रद्धा कुंभोजकर
सध्या इतिहासातल्या गोष्टी उकरून काढून त्यांना नवी उकळी देण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. अनेक धार्मिक स्थळांच्या जागी पूर्वी हिंदू मंदिरे होती, त्यांची पुनस्र्थापना करून आपला धर्म आणि अस्मिता टिकवण्याची गरज आहे असे लोकांच्या मनावर बिंबवले जात आहे. त्याद्वारे समाजात धार्मिक विद्वेष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अर्थात् वर्तमान समस्यांवरून लोकांचे लक्ष उडविण्याचा हेतू त्यामागे आहेच. परंतु या सगळ्यातून नेमके काय साध्य होणार, याबाबत धर्माची अफू चढवलेले लोक काहीएक विचार करण्याच्या मन:स्थितीत नाहीत, ही खरी शोकांतिका आहे.
बमन : माझे बाबा कपात ओतलेला चहा
शून्य मिनिटात पितात.
अमन : माझे बाबा तर उकळतं पातेलं असतं त्यातूनच चहा पितात.
चमन : हॅ! हे तर काहीच नाही. माझे बाबा तर चहापत्ती, दूध, पाणी, साखर खाऊन आपणच गॅसवर जाऊन बसतात.
तुमच्यापेक्षा आणखी मोठं, आणखी भारी, आणखी महाग काहीतरी आमच्याकडे आहे, म्हणून आम्ही तुमच्याहून भारी आहोत असं समजण्याची वृत्ती फक्त लहान खेळगडय़ांमध्येच असते असं नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये ही वृत्ती दिसून येते. त्यातली बालसुलभ अतिशयोक्ती आणि गंमत आपल्याला हसू आणते. पण जेव्हा ‘आमची भाषा, आमचं खाणं, आमचा धर्म, आमचा देश सर्वात पुरातन- म्हणून सर्वश्रेष्ठ आहे!’ असं मोठी माणसं म्हणायला लागतात तेव्हा मात्र या सगळ्याचा आत्ताची परिस्थिती सुधारण्यासाठी काय उपयोग आहे, असा प्रश्न पडतो. याचं फारसं नीट उत्तर काही हाताशी लागत नाही. पण यातून ‘आम्ही’ आणि ‘ते’ यांच्यातली दरी मात्र अधिक रुंदावते, हे नक्की.
फार फार वर्षांपूर्वीच्या सुवर्णयुगाची कल्पना लोकांना आवडते, कारण ती माणसांच्या मनावर फुंकर घालण्याचं काम करते. ही फुंकर जोवर चालू घडीच्या दु:खावर तात्पुरता दिलासा देण्यापुरती असते, तोवर ठीक असतं. पण आज असं दिसतं की, या सुवर्णयुगाच्या बरोबरीनंच ‘आपण किती जास्तीत जास्त बिचारे, अन्यायग्रस्त आणि इतर समुदाय किती दुष्ट’ हे दाखवण्याचीही एक चढाओढ असावी. यातले ‘आपण’ आणि ‘इतर’ हे सोयीनुसार ठरवले आणि बदलले जातात. खरे पुरावे लपवून, खोटे पुरावे प्रसिद्ध करून अपवादाने घडणाऱ्या गोष्टी याच सतत घडत होत्या असं दाखवलं जातं. यातून इतिहासाचा गैरवापर करून ‘इगो मसाजिंग’ किंवा अहंकाराला कुरवाळायचं काम बिनबोभाटपणे पार पाडलं जात आहे.
उदाहरणार्थ, ताजमहाल ही वास्तू जागतिक वारसा आणि संस्कृतीचा मानिबदू म्हणून जगात ओळखली जाते. ही वास्तू शाहजहाननं निर्माण केली- या सत्याला बेदखल करण्याचे प्रयत्न जोर पकडत आहेत. याचं कारण म्हणजे ‘शाहजहान हा मुस्लीम धर्माचा- म्हणजेच ‘आपला’ नसलेला असून त्याचं कर्तृत्व पुसून टाकलं की ‘आपल्या’ कर्तृत्वाची रेघ आणखी मोठी भासवता येईल’ असा वेडगळ आणि घातक समज आहे. याबाबतीत अनेक इतिहासकारांनी मुघलांची आणि रजपुतांची कागदपत्रं प्रकाशित केली आहेत. जयसिंग हे विनामोबदला जमीन देत असतानाही ‘मकबऱ्याची जागा ही आपल्या मालकीची असावी लागते’ या धार्मिक संकेतानुसार त्यांना ताजच्या जमिनीच्या बदल्यात चारपट मोबदला कसा दिला गेला याचे दस्तावेजदेखील जयपूर सिटी पॅलेसच्या दफ्तरखान्यामध्ये उपलब्ध असल्याचं इतिहासकारांनी दाखवून दिलं आहे. पण या भ्रमयुगामध्ये एकदा का जनतेला गुंगवायचं ठरवलं की कसलं सत्य आणि कसले इतिहासकार? खरं तर जयसिंग यांच्या दिलदारपणाचा अभिमान बाळगावा असा संदेश यातून देणं शक्य आहे. पण त्यातून ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ अशी विभागणी होणं शक्य नसल्यामुळे हा संदेश सोयीस्कर मानला जात नसावा. त्यापेक्षा ‘आमची जमीन या दुष्ट मुघलांनी घेतली आणि ती आता परत मिळवणं हा आजचा सर्वाधिक महत्त्वाचा कार्यक्रम असायला हवा..’ अशी मागणी केली जाते.
गतकाळाची, पुरातत्त्वाची खरी-खोटी साक्ष काढून आपापल्या आजच्या राजकारणाला सोयीस्कर भूतकाळ रचला जातो आहे. या सगळ्यामध्ये इतिहासाची मोडतोड तर होतेच, पण वर्तमानातली वाटचालही अधिक खडतर होत जाते याकडे लक्ष वेधावंसं वाटतं.
जगातल्या सर्वच प्रदेशांच्या भूतकाळात डोकावलं तर आपली सत्ता प्रबळ आहे हे सांगण्यासाठी दुर्बलांच्या मालमत्तेला आणि सन्मानाला अधिकाधिक हानी पोहोचवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्याचे असंख्य दाखले मिळतात. कधी बामियानच्या बुद्धमूर्तीसारख्या वारशाचा विध्वंस केला जातो, कधी हिरोशिमासारख्या मानवी वस्तीचा विध्वंस केला जातो, कधी ‘कम्फर्ट विमेन’ असं नाव देऊन स्त्रियांच्या जगण्याचा विध्वंस केला जातो, कधी बांधकाम टिकायला हवं म्हणून बुरुजाच्या पायात जिवंत चिणून अस्पृश्य मानलेल्या जातींमधील माणसांचे बळी घेतले जातात. हे सगळे ऐतिहासिक दाखले सत्य असले तरीही आपण आज एकविसाव्या शतकात त्याच चुका पुन्हा करू नये, हा धडा इतिहास आपल्याला शिकवत असतो.
जनतेच्या भावनांची कदर न करता काशी-विश्वनाथाचं मंदिर पाडून तिथे मस्जिद उभारण्यामागे औरंगजेबाचा आपल्या सत्तेचा, धर्माचा दुरभिमान दिसतो. कालांतरानं अहिल्यादेवी होळकर यांची सत्ता माळवा आणि उत्तर भारतात स्थिरावली. त्यांनी हे मंदिर पुन्हा उभारलं. परंतु तोवर तिथे उभारलेली ज्ञानवापी मस्जिद हेदेखील धर्मस्थळ आहे हे लक्षात घेऊन त्यांनी ही मस्जिद पाडली नाही. जनभावनेची कदर न करणाऱ्या औरंगजेबापेक्षा लोकांच्या श्रद्धांचा आदर करणाऱ्या अहिल्यादेवींची कीर्ती शाश्वत आहे हे सर्वज्ञात आहे.
धर्मस्थळांचा विध्वंस करणं हे फक्त मुस्लीम राज्यकर्त्यांचंच लक्षण असल्याचा गैरसमज यानिमित्तानं पसरवला जातो आहे. परंतु ‘राजतरंगिणी’मध्ये उल्लेख केल्यानुसार, काश्मीरमधल्या हर्ष या राजानं देवळांमधला खजिना मिळवण्यासाठी ‘देवोत्पाटननायक’- म्हणजे मूर्ती उखडून काढणारा अधिकारी या पदावर कुण्या एका उदय नावाच्या माणसाची नेमणूक केलेली आढळते. काशी-विश्वनाथ कॉरिडॉर या प्रकल्पासाठीदेखील काही लोकांच्या घरांबरोबरच त्यांची खासगी मंदिरंही हटवली गेली आहेत. आर्थिक, धार्मिक, राजकीय अशा अनेक कारणांमुळे धर्मस्थळं पाडली, बांधली, स्थलांतरित केली जातात. या गोष्टीला आपल्या प्राधान्यक्रमात कुठे ठेवायचं याचा निर्णय घेताना आपण वर्तमानाचं भान सुटू देता कामा नये.
याबाबतीत आपण आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊ शकतो. औरंगजेबानं जेव्हा आधीच्या मुघल कारकीर्दीचा पायंडा मोडून रयतेमध्ये धर्मावर आधारित भेदभाव केला, आणि मुस्लिमेतर लोकांना जझिया कर आकारायला सुरुवात केली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला १६७९ मध्ये एक पत्र लिहिलं. त्यात महाराजांनी पुढील उपदेश केलेला आहे..
(अकबर, जहांगीर, शाहजहान).. सदरील बादशहाही जझियापट्टी घेण्यास समर्थ होते, परंतु सारे लहानमोठे आपलाले धर्मावर आहेत ते सर्व ईश्वराचे आहेत, असे जाणून कोणावर जुलूम करावा हे त्याणी मनात आणिले नाही. त्यांचे उपकाराची कीर्ति अद्याप आहे, व हरएक लहानमोठे याचे मुखी त्यांची स्तुती व आशीर्वाद आहे. जशी नीयत तशी त्यास बरकत. त्या बादशहांची दृष्टि लोकांचे कल्याणात होती. हल्ली आपले कारकीर्दीत कित्येक किल्ले व मुलूख गेले व बाकी राहिले तेही जातात, कारण जे खराबी करण्याविषयी कमतर नाही, ते रयत लोक खराब (वाईट परिस्थितीत) आहेत..
सारांश, शिपाई लोक हैराण, व सौदागर पुकारा करितात, व मुसलमान रडतात, व हिंदूु लोक मनात जळतात, आणि कित्येक लोकांस पोटास मिळत नाही असे आहे तेव्हा राज्य चालविणे कसे? ..
अस्मानी किताब म्हणजे कुराण, ते ईश्वराची वाणी आहे, त्यात आज्ञा केली ती ईश्वर जगाचा किंवा मुसलमानाचा आहे, वाईट अथवा चांगला असो, हे दोन्ही ईश्वराचे निर्मित आहेत. कोठे महजीद आहे, तेथे त्याचे स्मरण करून बांग देतात व कोठे देवालय आहे तेथे घंटा वाजवितात. त्यास कोणाचे धर्मास विरोध करणे हे आपले धर्मापासून सुटणे व ईश्वराचे लिहिलेले रद्द करून त्याजवर दोष ठेविणे आहे. येविषयी चांगले अगर वाईट, जे पहावे त्यास रद्द करू नये. पदार्थाची निंदा करणे हे पदार्थ करणारावर शब्द ठेवणे आहे..’
(गो. स. सरदेसाई, ऐतिहासिक पत्रबोध,पृष्ठ ११-१२)
साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी ‘दृष्टि लोकांचे कल्याणात’ ठेवण्याबाबत बादशहाला केलेला उपदेश हा आज लोकशाहीत राज्य चालवणारे जे आपण सगळे नागरिक- त्यांनी लक्षात घ्यायला हवा.
जागतिक भूक निर्देशांकात भारत देश तळाकडे झेपावतो आहे अशा काळात महाराजांनी सांगितलेलं ‘कित्येक लोकांस पोटास मिळत नाही’ हे आपलं ‘खराब’ वास्तव मुद्दाम नजरेआड करण्याचे प्रयत्न नागरिकांनी वेळीच ओळखायला हवेत. बेकारी आणि भुकेसारख्या समस्यांपेक्षा काशी-विश्वनाथ मंदिर, ताजमहाल अशा जुन्या काळातल्या वास्तूंबाबतच्या वादांना अनेक पटीनं ठळक प्रसिद्धी मिळते. वर्तमान समस्या कुठे आहेत हे सामान्य जनतेला कळू नये म्हणून गतकालीन गोष्टींच्या शिंगांना समस्यांची चूड पेटवून देऊन तिची दिशाभूल केली जात आहे. अशा वेळी आपण औरंगजेबानं चोखाळलेल्या धार्मिक भेदभावाच्या वाटेनं जायचं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि अहिल्यादेवी होळकरांच्या पावलावर पाऊल ठेवून, वर्तमानाचं भान राखून लोकांच्या भल्याची वाट निवडोयची, हे ठरवण्याची वेळ आली आहे.
shraddhakumbhojkar@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: History illusion age religious places political current issues amy

Next Story
रधों आणि स्त्री-लैंगिकता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी