कुठेतरी जुना वाडा पाडताना वा खोदकाम करताना अचानक प्राचीन नाण्यांचा हंडा सापडला की लोक तो पाहण्यासाठी गर्दी करतात. इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साधनांमध्ये त्या- त्या काळातील नाण्यांचा समावेश होतो. आर्थिक विनिमय, व्यापार- उदीम, सुबत्ता, अवनती, तंत्रज्ञानात्मक प्रगती, राजकीय यंत्रणा, तत्त्वज्ञान, धार्मिक कल्पना, कलाकुसर इत्यादी कितीतरी पैलूंविषयी ऐतिहासिक नाणी बोलू शकतात. नाण्यांमुळे राजांची नावे, त्यांची क्रमवारी, त्यांचा काळ, राज्यांची स्थाने, त्यांच्या सीमा समजण्यास मदत होते. नाण्याचे वजन, आकार, प्रकार, धातू, नाण्यावरील मजकूर, चित्रे, चिन्हे, नाण्याचे दर्शनी मूल्य, त्याची टांकसाळ या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
भारतीय नाण्यांचा जन्म इ. स. पूर्व ६ व्या शतकात मानला गेला आहे. ‘आहत’(Punch Marked Coins) ही सर्वात जुनी भारतीय नाणी. २६०० वर्षांची अखंडित परंपरा भारतीय नाण्यांना लाभली आहे. आदिमानवाच्या काळात चलन नव्हते. त्याची गरजच नव्हती. पण काही प्रमाणात वस्तुविनिमय होता. साधारणत: नवाश्म युगाच्या काळात पशूंना खरेदी-विक्रीतील माध्यम मानले गेले. मुख्यत: गाय हे विनिमय माध्यम होते. गाईप्रमाणे धान्य, नारळ, तंबाखू, चाकू-सुरे, मणी, शंख-शिंपले हेसुद्धा विनिमय माध्यम म्हणून वापरले जात होते. पण धान्य आणि गाय हे विनिमय म्हणून वापरताना समस्या होत्याच. उदा. दोन किलो धान्यासाठी एक गाय असेल; तर एक किलो धान्यासाठी अर्धी गाय देणे-घेणे शक्य नव्हते. त्यात धान्य नाशिवंत असल्याने टिकाऊ धातूंचा वापर सुरू झाला. धातूची कडी, अंगठय़ा, गोळे, दागिने इत्यादी वापरले जाऊ लागले. कालांतराने विशिष्ट आकाराच्या, वजनाच्या धातूच्या तुकडय़ांवर त्यातील वजन, शुद्धता, मूल्य यांची खात्री देणारी चिन्हं उमटवली गेली. पुढे हे चिन्ह उमटवलेले धातूंचे तुकडे तो- तो राजाच पाडू लागला. त्यांनाच ‘नाणी’ म्हणतात.
भारतीय नाणी पाहताना असंख्य सत्ता व त्यांचा काळ यांचा मोठा इतिहास उभा राहतो. स्वातंत्र्यापर्यंत भारतात एकछत्री अंमल कधीही नव्हता. औरंगजेबाच्या वेळी मोगल साम्राज्य खिळखिळे झाले होते. मात्र, त्याने सुरू केलेली नाणी त्याच्या पश्चात १८५७ पर्यंत देशभर चालत होती. अकबरापासून शेवटचा बादशहा बहादूरशहा जफपर्यंत घोषित, स्वयंघोषित असे २५ मोगल बादशहा होऊन गेले. त्यातील बहुतेकाने नाणी काढली होती. त्यावेळी हिंदुस्थानात सुमारे २०० ठिकाणी मोगलांच्या टांकसाळी होत्या. इंग्रजांची भारतात सत्ता होती, पण केवळ एक-तृतियांश सत्ता ते थेट राबवत होते. तर दोन-तृतियांश सत्ता वेगवेगळ्या राजवटी इंग्रज छत्राखाली राबवीत होत्या. त्यामुळेच भारतीय नाण्यांत विविधता आढळते.
२६०० वर्षांपूर्वी भारतात काशी, मगध, गांधार, पांचाल, कलिंग आदी राजवटींनी सर्वप्रथम नाणी पाडली. आहत किंवा  Punch Marked Coins या नावाने ओळखली जाणारी ही नाणी चौकोनी, गोल, लंबगोल अशा विविध आकारांत प्रामुख्याने चांदीत बनवलेली होती. ती ओबडधोबड होती, पण सारख्या वजनाची होती. अशी नाणी पश्चिम बंगालमधील सुंदरबनपासून काबूलपर्यंत तसेच दक्षिणेला कोईमतूपर्यंत सापडली आहेत. त्यात ३०० विविध प्रकार आढळून आले आहेत. त्यावर मनुष्याकृती, पशू-पक्षी, हत्यारे, झाडे ते चंद्र-सूर्यापर्यंतची चिन्हे, चित्रे अंकित आहेत. इ. स. पूर्व ४ थ्या आणि ३ ऱ्या शतकात मौर्याची सत्ता असताना त्यांनी चांदीबरोबरच तांब्याचीही नाणी पाच चिन्हे अंकित करून सुरू केली. त्यांनी ठसे ठोकून नाणी पाडण्याऐवजी साच्यात धातूचा रस ओतून ती पाडण्यास सुरुवात केली. सर्वात जुनी ओतीवकामाची चौकोनी आणि गोल नाणी इ. स. पूर्व ४ थ्या शतकातील सम्राट अशोकाच्या काळातील तक्षशिला येथे सापडली. त्यावर बुद्ध, बोधीवृक्ष, स्वस्तिक अशी नाण्याच्या एकाच बाजूला चिन्हे आहेत. दोन साचे वापरून नाण्याच्या दोन्ही बाजूंना चिन्हे उमटविण्यास पांचालांनी सुरुवात केली. गांधारांनी त्यात सुबकता आणली. इंडोग्रीकांनी चिन्हांच्या जोडीने लिपी व अक्षरांचा नाण्यांवर पहिल्यांदा वापर सुरू केला. जवळपास ३९ इंडोग्रीक राजांनी व दोन राण्यांनी उत्तर-पश्चिम भारतावर राज्य केले. तर इ. स.च्या पहिल्या शतकात कुशाणांनी चांदी आणि तांब्याबरोबर सोन्याचे पहिले नाणे काढले. हे कुशाण मूळचे चीनच्या सरहद्दीवरील भागातले. त्यांना तेथून हुणांनी हुसकावून लावले. कुशाणांपाठोपाठ शक आणि पालव आले. पण कुशाणांनी शक आणि पालवांचा पराभव करून ते अफगाणिस्तान आणि काश्मीरला स्थायिक झाले. कुशाणांनी नाण्यांवर संस्कृत भाषेचा वापर केला. तर इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील कौसंबी, अयोध्या, मथुरा इथल्या नाण्यांवर राजांची नावे ब्रह्मी लिपीत आहेत. याच काळात गुप्तांनी काढलेल्या सोन्याच्या नाण्यांत अचूकता आणि विविधता आढळते. चंद्रगुप्ताने काढलेल्या नाण्यांवर त्यांच्यासह राणी कुमारीदेवी दिसून येते. समुद्रगुप्ताच्या नाण्यांवर अश्वमेध, हातात कुऱ्हाड, शिकार करताना वीणावाद्य घेतलेली अशा विविध मुद्रा पाहावयास मिळतात. क्षत्रपांची नाणीही प्राचीन. हे क्षत्रप मूळचे पर्शियातले. पश्चिम भारतात इ.स. पूर्व पहिल्या शतकापासून इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या शेवटपर्यंत क्षत्रपांची सत्ता होती. दक्षिणेला पांडय़ा, चोला, चेरा घराणी राज्य करीत होती. मौर्य घराणं अस्ताला जात असतानाच दक्षिणेत सातवाहन घराणं उदयाला येत होतं. त्यांनी इ. स. पूर्व २२५ ते इ. स. २२५ असे ४५० वर्षे राज्य केले. सातवाहनांनी चांदी आणि तांब्याबरोबरच शिशाचीही नाणी काढली. इ. स.च्या ८ व्या शतकात दक्षिणेत बदामीचे चालुक्य, कांचीचे पालाज राज्य करीत होते. चालुक्यांना बाजूला करून राष्ट्रकुट आले. ९ व्या शतकात मध्य भारतात गुर्जर, प्रतिहार, उत्तरेला चंडेला, सोळंकी, चौहान ही राजपूत घराणी सत्तेत आली. पृथ्वीराज चौहानचा पराभव करणारा महंमद घोरी इ. स. १२०६ मध्ये निधन पावल्यावर सत्ता कुतुबुद्दीन ऐबककडे आली. त्यानंतर १८५७ पर्यंत जवळपास ६५० वर्षे दिल्लीच्या तख्तावर मुस्लीम राज्यकर्तेच होते.
दिल्लीच्या सुलतानांच्या काळात नाण्यांवरील पूर्वीच्या काळातील देव-देवता, पशुपक्षी गायब झाले. लिपीतही बदल होत गेला. महंमद गझनीच्या नाण्यांवर एका बाजूला अरेबिकमध्ये, तर दुसऱ्या बाजूला संस्कृतचा देवनागरीत वापर केला आहे. नाण्यांवर कुराणातील वचने आली. खलिफांची नावे, सुलतानांची नावे यायला सुरुवात झाली. त्याकाळी बहुतेक नाणी तांब्याची असत. थोडीफार चांदीची. सर्वात प्रसिद्ध म्हणजे टांका. हा इल्तुमिशने काढला. जीताल हे छोटे नाणे होते. ४८ जीतालचा १ टांका. इल्तुमिशनंतर त्याची मुलगी रझिया सुलतान राज्यावर आली. दिल्लीच्या तख्तावर बसणारी ही एकमेव स्त्री. अल्लाऊद्दीन खिलजीने नाण्यांवरील खलिफांची नावे काढून टाकली. त्यानेच व्यापाराकरिता सोन्याची मोहोर प्रसारात आणली. अल्लाउद्दीनने आपल्या नाण्यांवर स्वत:चा उल्लेख ‘दुसरा अलेक्झांडर’ असा केला आहे. महंमद बिन तुघलकने सोन्याच्या नाण्यांऐवजी तांब्याच्या नाण्यांचा केलेला प्रयोग सर्वानाच माहीत आहे. त्याने अत्यंत चांगल्या दर्जाची, कलात्मक लिपीतील नाणी चलनात आणली. विजयनगरचा सुवर्णहोन तसेच बहामनी, यादव, फारुखी यांची नाणीसुद्धा अशीच प्राचीन. मोगलांच्या काळात नाण्यांमध्ये विविधता आली. त्यांनी नाण्यांचा दर्जा सांभाळला. शेरशहा सुरीने नाण्यांमध्ये फार मोठे बदल केले. त्याने चांदीच्या आणि तांब्याच्या नाण्यांची वजने वाढवली. तांब्याच्या नाण्याचे १/२, १/४, १/८, १/१६ असे भाग केले. तांब्याच्या नाण्याला दाम म्हणत, तर चांदीच्या नाण्याला ‘रुपया’ हे नाव दिले गेले. चांदीला संस्कृतमध्ये ‘रूप’ म्हणतात. म्हणून हा चांदीचा रुपया. या शब्दानेच आपले आजचे चलन ओळखले जाते. मोगलांच्या काळात ९ रुपयांची १ मोहोर होती. ५ मोहोरांचेसुद्धा नाणे होते. अकबराच्या नाण्यांत विविधता होती. त्यावर राजाचे, टांकसाळीचे नाव, हिजरी सन, कलिमा, चार खलिफांची नावे, ईश्वराचे मागितलेले आशीर्वाद होतेच; पण काही नाण्यांवर हिंदू देवताही होत्या. जहांगीरने तर १२ राशींची १२ नाणी काढली होती. जहांगीरनेच आग्रा येथे सोन्याच्या १००० मोहोरांपासून १२ किलो वजनाची भलीमोठी मोहोर तयार केली होती. हे जगातले सर्वात मोठे नाणे. अशा पाच मोहोरा त्याने विविध देशांतील राजदूतांना देण्यासाठी तयार केल्या होत्या. त्यानेच ५००, २००, १०० मोहोरांचीही नाणी काढली. त्यानेच नाण्यांवर काव्यात्मक लिखाणाला सुरुवात केली. तर औरंगजेबाने नाण्यांवरील धार्मिक गोष्टी काढून टाकून व्यवहार भाषा आणली.
आदिलशहाचे स्त्रियांच्या केसात अडकवायच्या पिनेसारखे चांदीचे नाणे पर्शियातील लार येथे बनवले जायचे म्हणून त्याने नावच ‘लारी’ झाले. महाराष्ट्रात शिवकाळाच्या पूर्वार्धात मराठय़ांचा राज्यविस्तार कोकण प्रांतात अधिक होता. ‘लारी’ हे चांदीचे नाणेही चलनात होते. म्हणूनच शिवकाळात सोन्याचा ‘होन’, चांदीची ‘लारी’ व तांब्याची ‘शिवराई’ ही प्रमुख नाणी आढळतात. शिवकाळात स्थानिक सराफ, सोनारांना परवाना देऊन विशिष्ट वजन व कस असलेली नाणी पाडून घेत. त्यांना प्रति १०० लारींमागे १ लारी व १ मण तांब्याच्या नाण्यांमागे ५ लारी मेहनताना मिळत असे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल दरबारातील सय्यद बंधूंच्या मदतीने पेशवा बाळाजी विश्वनाथने  १७१९ साली मोगल बादशहाकडून मराठी राज्याला मान्यता मिळवली. या मान्यतेबरोबरच मराठी राज्य मोगलांचे अंकित बनले. महाराष्ट्रातील टांकसाळी मोगल बादशहांच्या बिरुदावलीसह फारसी भाषेत अंकित केलेली नाणी पाडू लागल्या. या काळातील नाण्यांवर मोगल बादशहाचे नाममात्र वर्चस्व मान्य केलेल्या छत्रपती शाहू अथवा पेशव्यांचे नाव दिसत नाही. मराठय़ांच्या ११७ टांकसाळी ज्ञात आहेत. यातील काही टांकसाळी अकबराच्या काळापासून होत्या. पण मधल्या काळात त्या बंद पडल्या होत्या. मराठय़ांनी रुपयाचे नाणे ठिकठिकाणच्या टांकसाळीतून पाडले. पण त्यामुळे नाण्यामधील शुद्धतेचे प्रमाण कमी-जास्त होऊ लागले.
टांकसाळी खासगी आणि शासकीय अशा दोन प्रकारच्या असत. नाणे पाडण्याचे वतन देत असत. अशा वतनदारास ‘पोतदार’ म्हणत. टांकसाळीसाठी कच्चा माल सरकार देत असे. ज्या नाण्यांवरील मजकूर स्पष्टपणे दिसत नाही असे झिजलेले रुपये आटवून त्याची चांदी बनवली जायची. टांकसाळीत लोहार, सोनार, घणकरी, भालेकरी, टिकली करणारा, शिक्के करणारा असे कसबी कारागीर असत. त्या काळीसुद्धा खोटी नाणी पाडणारे होते. खोटय़ा रुपयास ‘करडा रुपया’ म्हणत. पेशव्यांच्या राज्याच्या भोवतालच्या प्रदेशातील सावकार पेशव्यांच्या प्रदेशातील शुद्ध धातूची चलनी नाणी आपल्या प्रांतात नेऊन ती वितळवून नव्याने त्याची थोडय़ा कमी वजनाची, कमी शुद्धतेची नाणी पाडून पुन्हा या परिसरात आणत. यात त्यांना भरपूर फायदा होत असे. इ. स. १८१८ मध्ये मराठय़ांचे राज्य संपले. ब्रिटिशांनी जेव्हा मराठी राज्य जिंकले तेव्हा भारतात ९९४ प्रकारची सोने व चांदीची नाणी चलनात होती. ईस्ट इंडिया कंपनीने १७५७ ते १८५६ या कालावधीत जवळजवळ संपूर्ण भारत हस्तगत केला आणि पैसा, आणा, रुपया ही ब्रिटिशांची नाणी चलनात आली.
पण गोवा, दीव-दमण येथे पोतुगीजांची सत्ता १९६१ पर्यंत होती. तेथे त्यांची टांगा, रुपिया ही नाणी चलनात होती. १९६१ च्या डिसेंबरमध्ये भारतीय सैन्याने गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त केला. तर १७ व्या शतकात डच, इंग्रज, फ्रेंच भारतात आले. डॅनिश लोकांनी त्रावणकोर येथे १६२० साली वसाहत केली. तेथे १८४५ पर्यंत त्यांची सत्ता होती. तिथे त्यांची ‘कॅस’ ही नाणी चलनात होती. १८४७ साली त्यांनी आपली वसाहत इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीला विकून टाकली, तर डच लोकांनी १७८४ साली नागपट्टम, १७९५ साली तुतीकोरम, १८१४ मध्ये कोचीन आणि १८२४ मध्ये कालिकत इंग्रजांच्या हवाली केले. तोपर्यंत त्यांची तेथे नाणी चलनात होती. चंद्रनगर, कारीकल, माहे, याणम व पाँडिचरी येथे फ्रेंचांच्या वसाहती होत्या. भारत स्वतंत्र झाल्यावर फ्रेंचांनी भारतात सामील होण्याबाबत सार्वमत घेतले. तेथील जनतेने भारताच्या बाजूने कौल दिल्यावर फ्रान्सने हे प्रदेश भारताच्या हवाली केले.
पेशवे काळात ब्रिटिश कालखंडाप्रमाणे एक देश- एक चलन नव्हते. १८ व्या शतकात मराठा राज्याचा विस्तार भारतभर झाला होता. त्यामुळे लूट, खंडणी, नजराणे, व्यापार इत्यादी मार्गानी विविध प्रांतांतील, विशेषत: उत्तरेकडील वैविध्यपूर्ण चलनांची आवक महाराष्ट्रात झाली. नाण्यातील धातूचे मूल्य हेच त्याचे मूल्य असे. पण विविध नाण्यांतील धातूचा कस विभिन्न व स्थलसापेक्ष असल्याने किमतीत फरक असे. त्यामुळे चलनाच्या विनिमय दरासाठी नाण्यातील धातूच्या शुद्धतेची तपासणी केली जाई. यासाठी नाण्याच्या बाजूवर कानस घासून वा नाण्यावर लहानसे छिद्र पाडून अंतर्भागातील धातू पाहत असत. तसेच आम्लाचा वापर करून नाणे पारखत असत. एकदा परीक्षण झाल्यावर सराफ त्यावर आपली चिन्हे उमटवीत. पण पुढील काळात ते वेगळ्या प्रांतांत गेल्यास तेथील सराफ त्यांची चिन्हे उमटवीत. नाण्याचे पदोपदी परीक्षण होऊ लागल्यावर त्याचे स्वरूप बिघडून जात असे. त्यावर अनेक छिद्रे पाडल्यामुळे त्याचे मूल्यही कमी होत असे. म्हणूनच ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या नाण्यांबाबत कसाची, वजनाची कोणी शंका घेऊ नये, नाणी सुलभपणे चलनात राहावीत यासाठी १८१८ मध्ये जाहीरनामा काढून कंपनीच्या नाण्यांवर छाप मारण्यास बंदी केली व १८३५ साली एकछत्री चलनाचा कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार चौथ्या विल्यमचा रुपया आणि रुपयाचे भागमूल्यांक हे ब्रिटिशांचे हिंदुस्थानातील कायदेशीर चलन म्हणून जाहीर करण्यात आले. या रुपयाचे अंतर्गत आणि दर्शनी मूल्य एकच ठेवण्यात आले होते. यालाच रौप्यमान पद्धती असेही म्हणतात. नव्या सुवर्ण मोहरेसाठी १५ चांदीचे रुपये असा दर ठरवण्यात आला व ईस्ट इंडिया कंपनीने धातूचे ठरावीक प्रमाण व कंपनीची चिन्हे असणारी सोन्या-चांदीची नाणी चलनात आणली. पण बाजारात या दोन्ही धातूंच्या किमतीत चढउतार होऊन फरक पडू लागल्याने या दोन्ही धातूंतील नाण्यांचे प्रमाण कायम ठेवणे कंपनीस अशक्य झाले. तेव्हा कंपनीने एकधातुक पद्धत स्वीकारून फक्त चांदीचीच नाणी चलनात ठेवली व चांदीबरोबरच तांब्याची १/२ आणा, १/४ आणा, १/१२ आणा ही नवी नाणी चलनात आणली.
व्हिक्टोरिया राणीच्या कारकीर्दीतील नाण्यांचे दोन प्रकार आहेत. ईस्ट इंडिया कंपनीची नाणी व १ नोव्हेंबर १८५८ रोजी सत्ता कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेल्यानंतरची नाणी! जरी हे सत्तांतर १८५८ साली झाले असले तरी १८६२ सालापासून ईस्ट इंडिया कंपनीचे नाव नाण्यांवरून काढून टाकण्यात आले. १८६२ ते १८७६ च्या दरम्यान पाडलेल्या नाण्यांवर राणीचा उल्लेख ‘Victoria Queen’, तर १८७७ ते १९०१ या नाण्यांवर ‘Victoria Empress’ असा आहे. व्हिक्टोरिया राणीच्या काळात अलवार, बिकानेर, धार, देवास इत्यादी संस्थानांनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी राणीच्या नावाने नाणी पाडली. चित्रकूट-उदयपूरच्या नाण्यांवर ‘दोस्ती लंधन’ (लंडनशी मैत्री) असे लिहिले आहे, तर जोधपूरच्या चांदीच्या नाण्यांवर व्हिक्टोरियाचा उल्लेख ‘श्री माताजी’ असा केला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात ६०० च्या वर संस्थाने होती. त्यातील १२५ जणांची स्वत:ची नाणी होती. अवध हैदराबादचा तांब्याचा फलूस आणि सोन्याची अश्रफी होती. कच्छ, भावनगर, पोरबंदर यांची चांदीची कोरी, तांब्याचा ढिंगलो, डोकडो, तांबियो अशी नाणी होती, तर म्हैसूरचा पागोडा प्रसिद्ध होता.
व्हिक्टोरिया राणीनंतर १९०१ ते १९१० दरम्यान सातव्या एडवर्डच्या नावाने नाणी पाडली गेली. या नाण्यांवरील एडवर्ड मुकुटविरहित होता. भारतीयांनी ‘बोडक्या राजाचा रुपया’ अशी या नाण्यांची संभावना केली. १९१० सालच्या एडवर्डच्या रुपयावर व एक आण्यावर राजमुकुटधारी एडवर्ड आहे. १९१० ते १९३६ दरम्यान पंचम जॉर्जच्या नावाने नाणी पाडण्यात आली. पंचम जॉर्जच्या १९११ सालच्या रुपयाचे उत्पादन सरकारला अचानक थांबवावे लागले. या रुपयावरील पंचम जॉर्जच्या राजवस्त्रावर हत्ती होता. पण सोंड व पाय कमी आकाराचे असल्याने तो डुकरासारखा दिसू लागला. लोकभावनेचे महत्त्व लक्षात घेऊन हा रुपया तात्काळ थांबवला गेला. या रुपयाची ९४ लाख नाणी पाडण्यात आली होती. त्यातील सात लाख नाणी चलनात आली होती. उरलेली ८७ लाख नाणी वितळवण्यात आली व १९१२ साली सुधारित नाणी काढण्यात आली.
१९३६ ते १९४७ दरम्यान सहाव्या जॉर्जच्या नावाने नाणी काढण्यात आली. सहाव्या जॉर्जच्या १९४० नंतरच्या नाण्यातील चांदीचे प्रमाण अध्र्यावर आणण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यावर ऑगस्ट १९४७ ते मार्च १९५० यादरम्यान भारतातील टांकसाळीतून १९४७ या गोठवलेल्या सालाची (Forzen Dates)नाणी पाडण्यात आली. १९५० साली भारतीय प्रजासत्ताकाची रुपया- आणा- पैसा ही नाणी चलनात आली. तोपर्यंत सहाव्या जॉर्जची नाणी प्रचलित होती. त्यावेळी ४ पैशांचा १ आणा व १६ आण्यांचा (६४ पैशांचा) १ रुपया असे विनिमय होते. १९५७ साली भारताने दशमान पद्धत स्वीकारली व १०० नव्या पैशांचा १ रुपया झाला, तर १९६४ साली नाण्यांवरील ‘नवे पैसे’ या शब्दप्रयोगातील ‘नवे’ हा शब्द काढून टाकला व फक्त ‘पैसे’ असा उल्लेख नाण्यांवर करण्यात येऊ लागला.
जुन्या नाण्यांचा अभ्यास करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी येथे ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूमिस्मॅटिक स्टडीज’ ही संस्था आहे. या संस्थेत विविध काळांतील राजांच्या तीन हजार नाण्यांचे संग्रहालय, सुसज्ज ग्रंथालय, नाणी-लिपी परिचय वर्ग, विश्रामगृह अशा सोयी आहेत. मुंबई विद्यापीठाने कालिना संकुलात असलेल्या दिनेश मोदी नाणे संग्रहालय आणि नाणेशास्त्र संस्थेत नाण्यांचा अभ्यास करण्यासाठी ‘नाणेशास्त्र’ विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे.     

Tejashri pradhan premachi goshta trp fell laxmichya paulanni Tuzech Mi Geet Gaat Aahe Top 10 Marathi Serial
‘प्रेमाची गोष्ट’चा टीआरपी घसरला, दुसरं स्थान मिळवलं ‘या’ मालिकेने; जाणून घ्या टॉप-१० मालिका
Currency Coins
वित्तरंजन : भारतातील चलनी नाणी
आधुनिक भारताचा इतिहास
भारतीय संस्कृती व वारसा