पुणे सोडून मी कोकणातल्या गावात २०१६ मध्ये आलो. इकडे यायचं कारण खूप काय असं दिव्य नव्हतं. ध्येयवादी किंवा रोमॅंटिक वगैरेपण नव्हतं. शहरी गोंगाट नको वाटत होता. शांतता हवी होती आणि दुसरं म्हणजे समाजाच्या नियमांपासून म्हणजे पारंपरिक लग्न, नोकरी वगैरेंपासून सुटका हवी होती. आत्ता दहा वर्षांनी विचार करताना यातलं काय साध्य झालं, काय मिळालं याची उत्तरं गुंतागुंतीची आहेत. हे मी सांगणार आहे, ते माझं आत्ताचं मत आहे. तेव्हा काहीच ठरवून करायचं नाही, जे वाटेल ते करायचं या
अ-समाजमान्य धुंदीत मी होतो.

तर झालं काय की, शांतता मिळाली. म्हणजे वर्षातले मार्च, एप्रिल आणि मे सोडून गावात जास्त सण नसतात. शिमग्यापासून पावसाला सुरुवात होईपर्यंत रोज काही न काही असतं. लग्न, हळद, बारशापासून सत्यनारायणापर्यंत तेव्हा न चुकता लाउडस्पीकर लावला जातो, कारण तशी प्रथाच पडलीय. पावसानंतर श्रावण येईपर्यंत तर फक्त पावसाचाच आवाज असतो. (किंवा असायचा, कारण आता पाऊस थोडा कमी झाला आहे.) बाकी माणसाचा ‘हुं’ की ‘चू’ ऐकू येत नाही. त्यामुळे ही भौतिक शांतता मिळाल्यावर हव्याहव्याशा एकांतवासात माझ्या डोक्यातले काळे भुंगे अजूनच वेडेवाकडे फिरू लागले. गाव हीसुद्धा समाजनियमानुसारच चालणारी व्यवस्था आहे. उलट शहरापेक्षा ती अजूनच बंदिस्त आहे. त्यामुळे गावात आल्यावरही मला काही समाजनियमापासून सुटका नाही हे दोन महिन्यांतच जाणवलं. मग मी इथला एक नियम तोडला. मी काय केलं की, इथे मी आमच्या घरी येणार्‍या एका गड्याबरोबर मजुरीला जाऊ लागलो. माझ्याकडे इकडे आल्यावर काहीच कामं नव्हती. आणि रिकामपणामुळे डोकं बधिर होऊ लागलं होतं. त्यामुळे आमच्या इथल्या कुणबीवाडीतला एक परिचित मला आंबाकाजूची कलमं लावण्यासाठी खड्डे पाडायच्या कामावर घेऊन गेला. मी आनंदाने गेलो. दिवसभर काम करून थकून येऊन मुकाट नऊ वाजताच झोपून गेलो. हे गावातल्या लोकांना समजल्यावर ते चकित झाले. कारण ‘एखाद्या बामनाने गड्याची कामं करणं’ तिथल्या नियमांना धरून नव्हतं. पण मला काही फरक पडत नव्हता. कारण मला माझ्या आवडीची कामं करायची होती. ‘बामनासारखं’ काम करायचं असतं तर शहरात सोशल होऊनच राहिलो असतो न! मला अ-सोशल किंवा अंडरकव्हर एजंट जसं काम करतो तसं काय तरी करायची धुंदी चढली होती. तर यातून पुढे हळूहळू ओळखी झाल्या. त्यातली महत्त्वाची ओळख बौद्धवाडीतल्या काकूची. तिच्याकडून एकदा मी तांदूळ विकत घेतले आणि पुढच्याच वर्षीपासून तिच्याकडे शेतीची कामं करायला लागलो. आणि मग मला समाजव्यवस्थेचे अनेक पदर, कंगोरे, खाचाखोचा आणि त्यातल्या लबाड्या दिसू लागल्या. मग मी अभ्यास केला. पुस्तकं वाचली. दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं ‘पुराणकथा’ वाचलं. हळूहळू शहर मग गाव आणि मग तिथून शेतीपूर्वी आदिम लोक कसे राहायचे इथपर्यंत जाऊन पोहोचलो. एक असं लक्षात आलं की, गावात अजूनही काही आदिम संस्कृतीतल्या चालीरीती आहेत. जसं की, पावसाळ्यात रानभाज्या, अलबी शोधून खाणं, चढणीचे मासे, खेकडे पकडून खाणं, नाही तर इतर वेळी शिकारी चालतातच. शिमग्यात किंवा शेतीला सुरुवात करायच्या आधी आणि धान्य घरात आल्यावर कोंबड्याचा निवद देणं, इ. इ. थोडक्यात शहर, गाव आणि आदिवासी या खूप मोठ्या दर्‍या आहेत, उभ्या आणि आडव्या पण… तर ही समाजव्यवस्था बनली कशी तर त्याची सुरुवात शेतीपासून झाली. आणि माणसाने वेगाने भौतिक विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यातून सुरू झालेला प्रवास हा औद्योगिकीकरण ते आत्ता पार एआयपर्यंत येऊन पोचला. पण व्यवस्था तशीच बंदिस्त राहिलीय. माणसाचं ‘हार्डवेअर’ हे जुनाटच राहिलं. म्हणजे त्याला अन्न, पाणी आणि काम हे महत्त्वाचं होतं जे आत्ताच्या काळातल्या सॉफ्टवेअरमध्ये अन्न, पाणी, निवारा असं झालं. काम ही महत्त्वाची गोष्ट माणसाच्या नव्या व्यवस्थेत दुर्लक्षित झाली. आणि निसर्गनियमानुसार त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले. कारण लग्न म्हणजे व्यवहार बनला. किंवा हळूहळू सगळ्यालाच व्यवहाराचं स्वरूप आलं. प्रवास… खरं तर सगळा प्रवास आहे. माणूस हा कधीच एका जागी स्थिरावणारा नाही. पण तरीपण आपल्याला अशी एक जागा हवी आहे जिथे सुखसमाधान मिळेल. हे औद्योगिकीकरण झाल्यावर युरोपीय माणसाच्या मनात ठसायला सुरुवात झाली. मग त्यांनी ते जगभर पसरवलं. पण याच्याही आधी बुद्धानं सांगितलं होतं की, दु:ख रोज भेटणार आहे. कारण त्याला ही व्यवस्था कशी चालते हे समजलं होतं. पाण्यावरून जर माणसं एकमेकांची डोकी फोडणार असतील तर…

पण या सुखदु:खाच्या कल्पना आल्या कशा? षड्रिपु किंवा एकनिष्ठ, पझेसिवनेस, ओब्सेशन हे आलं कुठून तर त्या आल्या मानवी कृत्रिम समाजव्यवस्थेतून. तर ही समाजव्यवस्था आली कशी? माणसाच्या हव्यासातून… हव्यास आला कसा… माणसाला दिलेल्या डोक्यामधून…

जुनी कथा आहे. काय की माणसाचं पोट कधीच भरत नव्हतं. त्याला धड काही खायला मिळत नव्हतं आणि कितीही मिळालं तरी तो भुकेलाच असायचा. मग निसर्गदेवतेने एकदा माणसाला विचारलं की ‘बा माणसा, तुला नक्की काय हवंय?’ तेव्हा तो म्हणाला, ‘इथे असलेलं सगळं काही.’ देवतेनं आशीर्वाद दिला. माणूस खूश झाला. पण त्याला माहिती नव्हतं की नाण्याच्या दोन बाजू असतात. आणि देवतेनं त्याला एकच बाजू दाखवली होती. मग त्यातून शेतीचा शोध. उत्पादन वाढलं… जमिनीचा वारसदार आला… पुरुषाला त्याच्या वीर्याची ताकद समजली… तो त्यावर स्वार झाला.

स्त्रियांवर प्रचंड बंधनं आली आणि हळूहळू पर्यावरणाची वाट लागायला सुरुवात झाली. हवा बहकली आणि वारा फिरला. सगळं बेभरवशी झालं. माणसाचे वेडे चाळे अजूनच वाढले. आणि ही जी दुसरी बाजू आपल्याला आत्ता समजली ती पूर्वीपासूनच आहे. माणसाने सोयीसाठी लावलेली व्यवस्था जी ती आता आपल्या सगळ्या माणसांच्या डोक्यावर बसायला लागलीय, ती वरचढ झाली आहे. व्यवस्थेला काही करून नाण्याची एकच बाजू रेटून लावायचीय. समाजव्यवस्थेने असं वळण घेतलं की तिथून पुढे दरीच…

आत्ता खरंच कोणाही माणसाला बाजूला घेऊन विचारलं तरच तो खरं खरं सांगेल की त्याला या व्यवस्थेतून निसटून मुक्त जगायचं आहे. ‘पण कसं?’ ते विचारू नका. काही का असेना हळूहळू काही विशिष्ट लोकांनी तंत्रज्ञान इतकं मोकाट सोडलंय की ते आता पूर्णपणे हातपाय पसरवतंय… मला आठवतंय की मी जसा शहर सोडून इकडे आलो. हळूहळू माझ्यावरचं ‘सोशल कंडीशनिंग’ कमी होत गेलं. मी पूर्ण मोकळा होत गेलो. कारण गावात जरी सामाजिक बंदिस्तपणा असला तरी बोलण्यात मजामस्करी असते. शिव्या असतात. एकमेकांना थोडं टोचून बोलणं असतं. भांडणं असतात. पण काही दिवसांनी कामाच्या वेळी सगळे एकत्र होतात. पण शहरात मोकळेपणा आहे असला तरी शहरातले सुशिक्षित लोक हे टोचून बोलणं, भांडणं हे जरा जास्तच इगो मोडवर घेतात. आणि सध्याच्या ऑनलाइन जमान्यात जिथे सगळे व्यवहार स्क्रीनवर केले जातात तिथे मस्करी सहनपण केली जाऊ शकत नाही. वातावरण अतिशय कडक होत चाललंय. कुठल्याच प्रकारची चेष्टा-मस्करी खपवू शकत नाही. दुसर्‍या बाजूला गावातली पोरं मोबाइल ॲडिक्ट झालीयेत त्यांना आता शेती करायची नाही, पण डेटा हवा आहे… आणि म्हणूनच माणूस सामाजिक प्राणी असला तरी त्याची अशी गडबड झालीये की सध्या तो पूर्णत: व्यक्तिवादी आहे. पण ते त्याला झेपत नाहीये कारण कंडीशनिंग… समाजवादी की हिंदुत्ववादी? आपण कोण आहोत? आपल्याला काय पाहिजे? आपल्या गर्लफ्रेंडला काय नक्की पाहिजे… याबाबत सतत तणावात… सोशल मीडिया ही चीझ ज्याने तयार केली त्या ना-चीझला हे इतकं परफेक्ट समजलं की ते लॉलीपॉप आहे आणि ते चघळत राहिल्यामुळे माणसं या भ्रमात राहू शकतो की आपण सामाजिक पण आहोत आणि व्यक्तिवादी पण… काय की, बुद्धानं हेही सांगितलं होतं, जास्तीचं ज्ञान हेही शेवटी मातीत जातं.

बुद्ध, काय किंवा कुठलाही धर्म घ्या, संत घ्या… त्यांनी जे चांगले मार्ग सांगितले ते का सांगितले, कारण त्यांना समजलं होतं की ही जी समाजव्यवस्था आपण निसर्गदेवतेच्या आशीर्वादानं बनवली ती कृत्रिम आहे. ती गंडलेली आहे. त्यात सगळ्यांचा विचार केलेला नाहीये. म्हणून ते प्रबोधन करत राहिले. पण कुठल्याही व्यक्तीला अनेक व्यक्ती आवडत असतात, बरंच काही करायचं असतं, पण दोन गोष्टी खूप त्रास देत असतात. त्याला स्वत:ला काय वाटतंय आणि समाज काय म्हणतोय… आणि मग समाजापासून सुटका हेच त्याचं ध्येय बनतं असं मला वाटतं. आपल्या मनाच्या कोपर्‍यातल्या एका निर्जन बेटावर आपण एकटेच असतो. पण काहींना ती सजा वाटते आणि ते घाबरतात… पण त्यात मजाही असते…तेव्हा मला एवढंच वाटतंय सध्याचा काळ बघितला की, एकच जन्म आहे. बिनधास्त बोलत राहा. चुकत असेल तर एकमेकांना समजून घ्या… एकमेकांची डोकी खा… पण जर फक्त स्क्रोल डाऊन करत राहिलो तर… आपल्याला बहुतेक निर्जन बेटावरच राहावं लागेल… आणि त्याची तयारी मी दहा वर्षं आधीच सुरू केलीय…

hrishpalande@gmail. com